बेचनपत्र :बेचनपत्र याचा सर्वसाधारण अर्थ म्हणजे मिळकतीचे वा एखाद्या हक्काचे हस्तांतर. यापैकी स्थावर मिळकतीचे हस्तांतर ज्या लेखान्वये होते त्या लेखास ‘खरेदीखत’ अथवा ‘गहाणखत’ ही संज्ञा रूढ आहे. जंगम माल अथवा हक्क यांचे हस्तांतराचे बाबतीत बेचनपत्र ही संज्ञा रूढ आहे. जंगम मिळकत या शब्दात कोणताही जंगम माल व काही हक्क उदा., येणे असलेले कर्ज, मालाची मालकी दर्शविणारे लेख इत्यादींचा समावेश होतो.

जंगम मिळकतीच्या खरेदी-विक्रीमध्ये करार लेखी अथवा तोंडी असू शकतो. वस्तू व तिची किंमत यांच्या हस्तांतरणाद्वारे सदर खरेदी-विक्रीचा करार होऊ शकतो. हा करार सशर्त वा परिपूर्ण असू शकतो. जंगम मिळकतीच्या खरेदी-विक्रीमध्ये त्या वस्तूचे अथवा मालाचे हस्तांतर प्रत्यक्ष केव्हा होते हे ठरविणे महत्त्वाचे असते आणि ते विक्रेता व ग्राहक यांच्या इच्छेवर अवलंबून असते. यावरून सदर वस्तूबाबतची जबाबदारी ही खरेदीदाराची आहे वा विक्रेत्याची हे ठरविता येते. जंगम मालाच्या खरेदी-विक्रीबाबतचे नियम हे जंगम विक्रि अधिनियम १९३० यामध्ये दिलेले आहेत. [⟶ जंगम विक्री अधिनियम].

प्रत्यक्ष जंगम मालाचे हस्तांतरासाठी बेचनपत्र करण्याची जरूरी आहे, असे नाही. त्याचे हस्तांतर प्रत्यक्ष माल ताब्यात देऊन होऊ शकते. माल विकत घेणाराने मागितल्यास मालाची किंमत रोख मिळाली हे दाखविणारा रोखीचा पुर्जा अगर पावती माल विकणाराने देण्याचा बाजारशिरस्ता आहे परंतु मालाचे हस्तांतरास त्याची जरूरीच आहे असे नाही. ही रोख अगर रोखीची पावती म्हणजे प्रत्यक्ष रोखीने झालेल्या मालाचा हस्तांतर व्यवहाराचा लेखी पुरावा असतो. अशा रोख पुर्जास बेचनपत्र म्हणता येत नाही, कारण हस्तांतर त्या लेखान्वये झालेले असते.

येणे असलेल्या कर्जाचे हस्तांतर मात्र बेचनपत्राशिवाय होऊ शकत नाही. आयुर्विमापत्रावरून येणे असणाऱ्या रकमेचे हस्तांतर त्या पत्राच्या बेचनपत्रानेच करावे लागते. सागरी विमापत्राचे हस्तांतर बेचनपत्रानेच केले पाहिजे असे नाही. सागरी विमापत्रावर पृष्ठांकन करून अगर इतर बाजारशिरस्त्याप्रमाणेही त्याचे हस्तांतर होऊ शकते. आगीच्या विम्याचे हस्तांतर बेचनपत्राने करावे लागते. येणे असलेल्या कर्जाच्या तारणावर अगर विमापत्राच्या तारणावर कर्ज घेतानाही येणे असलेल्या कर्जाचे अगर विमापत्राचे बेचनपत्र करावे लागते. कर्जाचे अगर विमापत्राचे हस्तांतर बेचनपत्राने केल्यानंतर बेचन घेणाराने कर्ज बेचन घेतल्याची लेखी नोटीस कर्जातील ऋणकोस द्यावी हे चांगले. तसेच विमापत्राचे बेचन घेणाराने विमा कंपनीस लेखी नोटीस देऊन ठेवणे चांगले, म्हणजे फसवणूक होऊ शकत नाही. [⟶ विमा].

पटवर्धन, वि. भा.