अळियासंतानम् कायदा : कानडीमध्ये ‘अळिया’ म्हणजे ‘जावई’. त्यावरून लक्षणार्थाने मातृसत्ताक कुटुंबपद्धती दर्शविण्यासाठी ‘अळियासंतान’ हा शब्द वापरला जातो. भारतात बहुतेक सर्वत्र पुरुषपूर्वजापासून वारसा सुरू होऊन पुरुषसंततीच्या द्वारे पुढे जातो. दक्षिणेतील पश्चिम किनाऱ्यावरील काही भागांत मात्र न्यायनिर्णयांनी मान्य केलेल्या रूढी-अन्वये स्त्रीप्रधान कुटुंबव्यवस्था चालू आहे. तेथे स्त्री-पूर्वजापासून स्त्रियांमार्फतच वारसा चालतो. मलबार-आदी प्रदेशात (विशेषतः दक्षिण कानडात) या पद्धतीला ‘अळियासंतान’ म्हणतात.

तेथील एकत्र कुटुंबाला ‘कावरु’ ही संज्ञा आहे. स्त्री, तिचा पती व मुलेमुली त्याचे घटक असून स्त्री त्याची पुढारी असते. उत्तर-जीवित्वाचा नियम त्या पद्धतीतही लागू आहे आणि मुलींना दत्तक घेण्याची प्रथा आहे. स्त्रीप्रधान अशी जरी ही समाजव्यवस्था आहे, तरी यातील स्त्री ही आपव्या नवऱ्याच्या कुटुंबातच राहते.

ही विधिपद्धती त्या भागात पहिल्या शतकात सुरू झाली. तुलू जमीनधारकांनी व त्यांच्याशी केलेल्या विवाहसंबंधामुळे अरबी वसाहतवाल्यांना झालेल्या वंशजांनी (ज्यांना ‘मोपला’ म्हणतात) व बंट-आदी जमातींनी त्या पद्धतीचा अंगीकार केला. या विषयावर अय्यर, पी. आर्. सुंदरम् यांचा मलबार अँड अळियासंतानम् लॉ  हा ग्रंथ प्रमाणभूत आहे.

मद्रासमध्ये प्रगमनशील समाजाच्या गरजांप्रमाणे या विधीविषयी अधिनियम करण्यात आले आहेत. ‘अळियासंतानम् अधिनियम १९४९’ हा त्यांपैकी होय. १९५६ च्या भारतीय वारसा अधिनियमातील तरतुदीस अनुसरून अळियासंतानम् कायद्याप्रमाणे वागणाऱ्यांचा वारसा हक्क आता ठरविण्यात येतो.

संदर्भ : Aiyer, N. Chandrasekhar, Ed. Mayne’s Treatise on Hindu Law and Usages, Madras, 1958.

गाडगीळ, श्री. वि.