डायसी, अल्बर्ट व्हेन : (४ फेब्रुवारी १८३५–७ एप्रिल १९२२). एक इंग्लिश विधिवेत्ता. लेस्टरशरमधील लटरवर्थजवळील क्लेब्रुक हॉल येथे जन्म. ऑक्सफर्ड येथील बेल्यल कॉलेजात त्याचे शिक्षण झाले. १८६० मध्ये तो ट्रिनिटी कॉलेजचा अधिछात्र झाला. १८६३ ते १९१६ पर्यंत त्याने लंडन येथे वकिली केली. १८७० व १८९८ मध्ये त्याने अमेरिकेस भेट देऊन हार्व्हर्ड विद्यापीठात जी भाषणे दिली, ती पुढे पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्यात आली. १८८२ मध्ये कायद्याचा प्राध्यापक म्हणून त्याची ऑक्सफर्ड विद्यापीठात नेमणूक झाली. १९०९ मध्ये त्याने सर्व विद्यापीठीय पदांचा त्याग केला. १८९९ ते १९१२ पर्यंत लंडन येथील वर्किंग मेनस कॉलेजचा तो प्राचार्य होता. आयर्लंडच्या स्वराज्याचा तो कट्टर विरोधक होता. कायदा व राजकीय प्रश्नांवर त्याने विपुल लेखन केले. वैचारिक स्पष्टता व उत्तम वर्णनशैली यांमुळे त्याचे ग्रंथ पहिल्या दर्जाचे मानण्यात येतात. ऑक्सफर्ड येथे त्याचा मृत्यू झाला. त्याने लिहिलेली काही महत्त्वाची पुस्तके अशी : इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ द लॉ ऑफ कॉन्स्टिट्यूशन (१८८५), ए डायजेस्ट ऑफ द लॉ ऑफ इंग्लंड विथ रेफरन्स टू द कॉन्फ्लिक्ट ऑफ लॉज  (१८९६) व लेक्चर्स ऑफ द रिलेशन बिटविन लॉ अँड पब्लिक ओपिनियन ड्युरिंग द नाइंटीन्थ सेन्चरी  (१९०५).

                खोडवे, अच्युत