सभाशास्त्र : (लॉज् ऑफ मिटिंग्ज ). सभेच्या पद्धतशीर नियोजनासाठी संमत केलेली शास्त्रशुद्ध नियमावली. कायदयानुसार स्थापन होणाऱ्या सहकारी संस्था, सार्वजनिक न्यास, कार्पोरेट कंपन्या इत्यादींना ठराविक कालाने सभासदांची, भागधारकांची सभा घेणे आवश्यक व बंधनकारक असते. संस्था, कंपनी, न्यास यांच्या योग्य व्यवस्थापनासाठी अशा सभा घेणे आवश्यक असते. त्या सभांची आखणी व नियोजन विशिष्ट पद्धतीने करावे लागते. त्यालाच सभाशास्त्र म्हणतात. त्यामध्ये सभेची पूर्वसूचना विशिष्ट कालमर्यादेत सभेपूर्वी सभासदांना देणे बंधनकारक असते. सभेच्या प्रकारानुसार म्हणजे सर्वसाधारण, षण्मासिक वा वार्षिक सभा, विशेषकरून बोलविलेली सभा, नियामक मंडळाची सभा इत्यादी. सभेच्या पूर्वसूचनेचा कालावधी वेगवेगळा असू शकतो. सभेसाठी असणारी कार्यकमपत्रिका, तसेच मागील सभेचे इतिवृत्त सभासदांना आगाऊ दयावे लागते. सभेला अध्यक्ष असणे आवश्यक असते. सभेचे निर्णय कायदेशीर असण्यासाठी ⇨गणपूर्ती (सभासदांची कमीत कमी संख्या ) असणे आवश्यक असते. गणपूर्तीचे नियम बनवावे लागतात. सहकारी संस्था, न्यास, अन्य संस्था यांच्या घटनेमध्ये वा त्याखाली बनविण्यात आलेल्या नियमांमध्ये वरील तपशील दिलेले असतात. सभेच्या कार्यकमपत्रिकेनुसार विषयांवर चर्चा करण्यात येते, निर्णय घेतले जातात व त्यानुसार ठराव संमत केले जातात. या सर्वांची नोंद सभेच्या इतिवृत्तात करण्यात येते. सभेची आखणी नियमानुसार न झाल्यास बोलविण्यात आलेली सभा बेकायदेशीर ठरू शकते.

जोशी, वैजयंती