सहसेवक नियम : ( फेलो-सर्व्हन्ट रूल ). एखादया व्यक्तीला सेवक वा नोकर म्हणून सवेतन वा निर्वेतन नियुक्त करून त्याच्या कामाच्या पद्धती जो नियंत्रित करतो, त्यास कायद्याच्या परिभाषेत सर्वसाधारणपणे मालक म्हणून संबोधतात. मालकाचा समादेश (कमांड) अथवा अधिकार नसला, तरी सेवकाने नोकरीच्या ओघामध्ये केलेल्या कृत्याबद्दल मालक दुसऱ्याला उत्तरदायी होतो परंतु नोकरीच्या व्याप्तीबाहेर नोकराने केलेल्या कृत्याबद्दल तो जबाबदार होत नाही. शासकीय खात्याचा मुख्य हा आपल्या नियंत्रणाखाली काम करणाऱ्या नोकराने केलेल्या कृत्यासाठी, आणि मालक हा नोकराने नेमलेल्या पडनोकराच्या कृत्यासाठी किंवा विधीच्या बंधनामुळे नेमलेल्या नोकराच्या कृत्यासाठी उत्तरदायी होत नाही.

काम करीत असताना सहसेवकाच्या हलगर्जीपणामुळे नोकराला झालेल्या इजेबद्दल मालकावर जबाबदारी नाही, हे तत्त्व १८३७ मध्ये सामान्य विधी (कॉमन लॉ) न्यायालयात मांडण्यात आले. औदयोगिक अपघातात मालकावर येणारी आर्थिक जबाबदारी कमी करण्यासाठी याचा उपयोग झाला परंतु लवकरच हे तत्त्व टाळण्याकडे न्यायालयीन तसेच शासकीय कल दिसू लागला. १८९७ मध्ये झालेल्या पहिल्या श्रमिक नुकसानभरपाई कायदयाप्रमाणे जखमी नोकरास मालकाची वैयक्तिक जबाबदारी न दाखवावी लागता नुकसानभरपाई मिळे. या प्रकारचे इतरही फरक इंग्लंडच्या कायद्यात होऊन सहसेवक तत्त्व मागे पडू लागले. १९४८ मध्ये केलेल्या अधिनियमानुसार ( लॉ रिफॉर्म-पर्सनल इन्जरीज ॲक्ट ) ब्रिटिश पार्लमेंटने हे तत्त्व रद्द करून टाकले. त्यानंतर सहसेवकाच्यासुद्धा हलगर्जीपणामुळे झालेल्या इजेबद्दल मालक जबाबदार ठरतो, आणि सेवासंविदेत तो जबाबदार नाही, अशी शर्त असल्यास ती अगाह्य समजण्यात येते. भारतातही सहसेवायोजनेचे तत्त्व अंमलात होते. त्याची व्याप्ती १९३८ च्या नियोक्तादायित्व अधिनियमाने पुष्कळ कमी झाली आहे. १९५१ च्या नियोक्तादायित्व दुरूस्ती अधिनियमाने मालकाची जबाबदारी अपवर्जित वा नियमित करणारे करार विधिबाह्य ठरविले आहेत.

सक्षम सहसेवक ठेवावे, चांगली यंत्रे बाळगून ती चांगल्या स्थितीत ठेवावी, नोकरांच्या सुरक्षिततेला जपावे, तसेच त्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा प्रकारची बंधने सामान्य विधीने मालकावर घातली होती. भारतात श्रमिक नुकसानभरपाई अधिनियमान्वये काम करीत असताना कर्मचाऱ्याला अपघाताने इजा झाल्यास किंवा मरण आल्यास मालकावर नुकसानभरपाई देण्याचे बंधन आहे.

स्वत:च्या कृत्याबद्दल नोकर जबाबदार असतोच. मालकाचा अभिकर्ता किंवा नोकर म्हणून त्याच्या हिताकरिता ते कृत्य केले, हा त्याचा बचाव होऊ शकत नाही. स्वत:च्या सदोष कृती वा अ-कृतीमुळे झालेल्या परिणामाबद्दल नोकर मालकालाही उत्तरदायी होतो आणि नोकराच्या हलगर्जीपणामुळे मालकाला दयावी लागलेली नुकसानभरपाई तो नोकराकडून वसूल करू शकतो.

श्रीखंडे, ना. स.