अफरातफर : दुसऱ्याच्या जंगम संपत्तीचा अप्रमाणिकपणे स्वत:साठी अल्पकाळसुद्धा वापर करणे म्हणजे दंडनीय अफरातफर. एका व्यक्तीचा विश्वस्त म्हणून ताब्यात घेतलेली जंगम संपत्ती दुसऱ्याची आहे असे प्रतिपादणेसुद्धा दंडनीय अफरातफर होते. त्यामुळे स्वत:करिता ती न वापरतासुद्धा गुन्हा घडतो. अशी संपत्ती दुसऱ्याच्या ताब्यातून नेली  किंवा नेण्याकरिता हलवली, की चोरी होते. पण तिचा अप्रामाणिक वापर केला, तरच दंडनीय अफरातफर होते. सुरुवातीस सद्भावनेने ताब्यात घेतलेल्या संपत्तीचा नंतर अप्रामाणिकपणे वापर करणाराही गुन्हेगार होतो. संपत्तीच्या सहमालकांपैकी कोणाही एकाने तिचा वापर केला, तर तो अधिकृत व वैधच असतो. पण त्याने ती विकून पैसे एकट्यानेच घेतले, तर मात्र गुन्हा घडतो. आढळलेली जंगम संपत्ती ताब्यात घेणारी व्यक्ती ताबडतोब दोषी होत नाही. पण ती कोणीची हे समजल्यावर किंवा समजण्याची साधने उपलब्ध झाल्यावर काही प्रयत्‍न न करता ती आपल्याजवळ ठेवल्यास गुन्हा होतो. परित्यक्त माल ताब्यात ठेवल्याने अपराध घडत नाही. इंग्‍लंडमध्ये तर असा माल ज्याला आढळतो, तो त्याचा मालकच होतो. 

मृत्युसमयी व्यक्तीच्या ताब्यात असलेल्या व त्यानंतर त्याच्या वैध वारसदारांच्या ताब्यात न गेलेल्या संपत्तीची अफरातफर हा अपराध अधिक गंभीर समजला जातो आणि तो जर मृत व्यक्तीने नियुक्त केलेल्या लिपिकाने केला, तर त्याला अधिक कडक शिक्षा द्यावी, अशी कायद्यात  तरतूद आहे. 

श्रीखंडे, ना. स.