कीर्तिस्व : (गुडविल). सामान्यपणे कोणत्याही व्यवसायाने वा व्यापारीसंस्थेने धंद्यात मिळविलेले चांगले नाव त्याच्या कीर्तिस्वाचेद्योतक असते. मत्ता (ॲसेट्स) म्हणून कीर्तिस्वाचे स्वरूप अमूर्त असल्यामुळे  त्याची व्याख्या करणे कठीण आहे. विशिष्ट नावाने ओळखल्या जाणाऱ्या व्यवसायाकडे किंवा फर्मकडे गिऱ्हाइकांचा अनेक कारणांनी कल असतो. कल निर्माण करणारे असे सर्व घटक या संज्ञेत अभिप्रेत आहेत.

निव्वळ मुर्त मत्तेच्या मूल्यातिरिक्त व्यापारधंद्याच्या खरेदीकरिता देण्यात येणाऱ्या सामान्य कीर्तिस्व समजण्यात येते. वस्तुतः प्रस्थापित व्यापारधंद्याचे सर्व फायदे मिळविण्याकरिता दिलेली ती किंमतच असते. भांडवल, साठा, निधी अथवा मालमता त्यांच्या मूल्यातिरिक्त  व्यापारधंद्याचे हे मोल व्यापारधंदा विकतेवेळी किंवा विकत घेतेवेळी बव्हंशी घेण्यात येते. कीर्तिस्वाला व्यवसाय किंवा व्यापारधंद्याव्यतिरिक्त निराळे अस्तित्व नाही. 

मालाचा उच्च दर्जा व लोकप्रियता, विक्रेत्याची सचोटी व कौशल्य स्नेहपूर्ण आणि सौजन्यशील वागणूक, व्यापारास परिपोषक असे स्थळ किंवा परिसर अशा सर्व घटकांमुळे कीर्तिस्व निर्माण होते या दृष्टीने कीर्तिस्वाचे वस्तुनिष्ठ, कौशल्यनिष्ठ,  व्यक्तिनिष्ठ, स्थलनिष्ठ व विशिष्ट सीमा-व्याप्ती असे प्रकार संभवतात. प्रत्येक धंदा चालू व भरभराटीत असला म्हणजे कीर्तिस्व कमी जास्त प्रमाणात अस्तित्वात असते. ते गाव, तालुका, प्रांत, जिल्हा, देश यांप्रमाणे विशिष्ट सीमेमध्येच प्राप्त झालेले  असते.

धंदा किंवा दुकाने जेव्हा विकतात, तेव्हा कीर्तिस्व जमेस धरून किंमत ठरविली जाते. ही किंमत धंद्याच्या किंवा दुकानाच्या नफ्याच्या चढत्या किंवा घटत्या प्रमाणात अंवलबून असते. साधारणतः तीन वर्षाचा सरासरी नफा (गेल्या पाच वर्षांतील सरासरीने निघणारा ) ही कीर्तिस्वाची किंमत न्यायालयांनी मान्य केलेली आहे. विशिष्ट काळापर्यंत जवळपास तसा व्यापार करणार नाही, असा केलेला करार विक्रेत्याने मोडल्यास त्याच्यावर नुकसानभरपाईची कारवाई होऊ शकते. 

पटवर्धन, वि. भा. खोडवे, अच्युत