हुकूमनामा : (डिक्री) . सक्षम अधिकाऱ्याने दिलेला आदेशाचा लेखाजोखा. विधिसंहितेत अभिप्रेत असलेला या शब्दाचा कायदेविषयक अर्थ भिन्न, मर्यादित व विशिष्ट असा आहे. 

 

दिवाणी प्रक्रिया संहिता १९०८ या कायद्यामध्ये हुकूमनामा या संज्ञेची व्याख्या दिलेली आहे. त्या व्याख्येचा अन्वयार्थ किंवा अर्थबोधन पुढील-प्रमाणे : फौजदारी, महसूलविषयक व अन्य विशेष न्यायाधिकरणे किंवा विशिष्ट न्यायालये यांच्याकडे काही विषय निर्णयासाठी कायद्यानेच सोपवलेले असतात. अशी सर्व प्रकरणे सोडून उर्वरित सर्व दिवाणी स्वरूपाची प्रकरणे व खटले दिवाणी न्यायालयांच्या अधिकारकक्षेमध्ये येतात. अशा सर्व दाव्यांमध्ये सुनावणी करून लिखित न्यायनिर्णयावर स्वाक्षरी केली जाते. त्यानंतर वादीने प्रतिवादीविरुद्ध केलेली मागणी बजावणीसाठी मान्य किंवा अमान्य केली असेल, त्याप्रमाणे अंतिम आदेश किंवा हुकूम याचा लेख न्यायालयात तयार केला जातो. या लेखावरदेखील, न्यायनिर्णय प्रक्रियेप्रमाणेच न्यायाधीश स्वाक्षरी करून दिनांक लिहितात. या लेखाला हुकूमनामा असे म्हणतात. 

 

एखादा दिवाणी दावा सुनावणीच्या वेळी, वादीच्या अनुपस्थितीमुळे अमान्य किंवा रद्द झाल्यावरदेखील नामंजुरीचा आदेश लेख काढला जातो. अशा लेखाचा समावेश हुकूमनामा या संज्ञेत होतो. 

 

असमाधानी पक्षकारास हुकूमनाम्याविरुद्ध वरिष्ठ न्यायालयांकडे दाद मागण्याची (अपील करण्याची) मुभा असते. अशा प्रकरणांमध्ये अपील झाले, तर अपिलीय न्यायालय आपला न्यायनिर्णय देते. त्या निर्णयामध्ये दिलेल्या अंतिम आदेशाचा हुकूमनामा काढावयाचा असतो. त्याचे स्वरूप खटल्यात प्रथम निर्णय देणाऱ्या (कनिष्ठ/मूळ) न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब, त्यात अंशतः दुरुस्ती किंवा नव्याने वेगळाच हुकूम देणे असे असते. 

 

सर्वसाधारणपणे हुकूमनाम्यामध्ये दाव्याचा खर्च न्यायालयाने मंजूर केला आहे/नाही, याचा उल्लेख व रक्कम यांचा तपशील असतो. 

जोशी, अंबादास