प्रभासपाटण : गुजरात-सौराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्राचीन स्थल. याच भागातील दुसरे प्रसिद्ध स्थल सोमनाथ हे असून प्रभास सोमनाथच्या पश्चिमेस सु. ३·२ किमी. अंतरावर आहे. प्रभास व सोमनाथ ही दोन्ही स्थळे वेरावळ या सौराष्ट्र किनारपट्टीवरील बंदराच्या अगदी नजीक आहेत. याला देवपट्टण किंवा वेरावळ असेही म्हणत. प्रभास क्षेत्राचा उल्लेख पुराणांत आलेला असून या विभागाचा यादव आणि श्रीकृष्ण या दोघांशीही निकटचा संबंध आहे. आजही प्रभासमध्ये श्रीकृष्णाशी निगडित अनेक स्थाने व मंदिरे असून ज्या ठिकाणी श्रीकृष्णाला मृत्यू आला, तेथेही एक मध्ययुगीन मंदिर अस्तित्वात आहे.

श्रीकृष्णकालासंबंधी वा इतर काळासंबंधी पुरावा मिळविण्याच्या दृष्टीने प्रभासपाटण येथे विविध पुरातत्त्वज्ञांनी उत्खनन केलेले आहे. सर्वांत आधी (१९५४-५५) बी. सुब्बाराव व पी. पी. पंड्या यांनी उत्खनन केले. या उत्खननाचा सविस्तर वृत्तांत प्रसिद्ध झालेला नसला, तरी या वस्तीचे कालमापन सापेक्षरीत्या स्तरानुसार इ. स. पू. २००० मानण्यात येते. अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आकाराची आणि रंगकाम असलेली मृत्पात्रे या वस्तीचे लोक वापरीत असत, असे आढळून आले. कृष्णकालीन व तत्संबंधीचा कोणताही पुरावा उत्खननात उपलब्ध झाला नाही.

त्यानंतर डेक्कन कॉलेज, पुणे व गुजरात शासनाचे पुरातत्त्व खाते यांनी संयुक्तरीत्या १९५५-५६ मध्ये आणि नंतरही उत्खनन केले. या उत्खननात एकूण चार कालखंडांतील वस्तीचे अवशेष उपलब्ध झाले. कार्बन–१४ पध्दतीनुसार पहिली वस्ती इ. स. पू. सु. २३०० ते २००० या काळात झाली. या कालखंडाला ‘प्रभासपूर्व’ अशी संज्ञा दिली जाते. या काळातील मृत्पात्रे हाताने बनविलेली असून ती राखी, तांबडी किंवा लाल व काळी या तीन वर्णांची होती. या वस्तीचा नाश पुरामुळे झाला. दुसरी वस्ती इ. स. पू. १८०० ते १५०० या काळात झाली. या काळाला ‘पूर्व-प्रभास’ असे नाव दिलेले आहे. या काळात उत्कृष्ट चित्रकारी असलेली, चाकावर घडविलेली विविध आकारांची मृत्पात्रे प्रचलित झाली. चित्रकारी बहुतांशी भौमितिक स्वरूपाची असून वाडगे, कप, छोट्या उभ्या दांड्यासारखे कान असलेली भांडी इ. प्रमुख आकार वापरात होते. तिसरी वस्ती इ. स. पू. १५०० ते १२०० या काळातील असून यात मृत्पात्रांमध्ये सुबकपणा दिसून येत नाही. याच काळात सौराष्ट्रातील रंगपूर संस्कृतीशी प्रभासच्या लोकांचा संपर्क आल्याचा पुरावा मिळाला. इ. स. पू. १२०० नंतर प्रभासला फारशी वस्ती झाली नाही. मात्र इसवी सनाच्या सुरुवातीच्या काळात पुन्हा येथे वस्ती झालेली दिसते. क्षत्रप नाणी व तत्कालीन खापरे यांनुसार प्रभास येथे क्षत्रप काळात वस्ती झाली, असे म्हणता येईल.

विविध काळांतील मृत्पात्रांव्यतिरिक्त प्रभासच्या कोणत्याच उत्खननांत इतर फारसा पुरावा सापडलेला नाही. इ. स. पू. १५००–१२०० व इसवी सनाचे २ रे ते ४ थे शतक या काळातील दगडी वास्तूंचे अवशेष सापडले आहेत परंतु त्यांचे स्वरूप त्रोटक आहे. आधुनिक प्रभास ज्या नदीकाठी वसले आहे, त्या हिरण्य नदीकाठी अश्मयुगीन हत्यारे मिळाली आहेत.

संदर्भ : 1. Nanavati J. M. Mehta, R. N. Choudhary, S. N. Somnath : 1956, Baroda,1971. 2. Sankalia, H. D. A Short Guide to the Exhibition of Excavated Antiquities from Prabhas, Rajkot, 1972.

देव, शां. भा.