प्रदूषण : पृथ्वीवर वनस्पती, मानव व इतर प्राणी ज्या पर्यावरणात (परिसरात) राहतात त्या पर्यावरणातील विविध घटकांत संतुलन प्रस्थापित झालेले असते. सजीवांच्या एका जातीने त्याज्य केलेली वस्तू (अपशिष्ट) दुसऱ्या एखाद्या जातीला पोषणासाठी इष्ट असू शकते. अशा परस्परावलंबनामुळे पर्यावरणाची संरचना सातत्याने टिकून राहते परंतु सध्याच्या अफाट लोकसंख्यावाढीमुळे व औद्योगिकीकरणामुळे पृथ्वीच्या पर्यावरणातील नेहमीच्या घटकांव्यतिरिक्त इतर अपायकारक घटक मोठ्या प्रमाणात पर्यावरणात शिरतात. त्यामुळे पर्यावरणाच्या विविध घटकांतील संतुलन बिघडते व पृथ्वीवरील वनस्पती व प्राणी यांच्या जीवनाच्या सातत्याला धोका निर्माण होतो. अशा क्रिया-प्रक्रियांमुळे पर्यावरणी प्रदूषण उद्‍भवते.

पृथ्वीच्या पर्यावरणात अनेक प्रकारच्या भौतिक, रासायनिक व जैव क्रिया-प्रक्रिया घडून येत असतात. विविध प्रकारचे जीवसमूह व मानव सभोवतालच्या परिस्थितीशी जुळते घेऊन राहत असतात. त्यांच्या चयापचयी उत्सर्गामुळे (शरीरात घडून येणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींतून निर्माण झालेल्या व शरीराबाहेर टाकल्या जाणाऱ्या पदार्थांमुळे) बरीच घाण निर्माण होते व हळूहळू सर्व परिसर दुर्गंधीयुक्त व दूषित होतो. सुदैवाने इतर प्रकारच्या सजीवांच्या काही जाती या नैसर्गिक अपशिष्टांचा स्वपोषणासाठी उपयोग करून घेतात व थोड्याफार प्रमाणात परिसर शुद्ध राखण्यास मदत करतात. बरीच घाण पाण्याबरोबर वाहून जाते. अशा रीतीने परिसरात मोठ्या प्रमाणात फेरबदल घडून येत नाहीत व जीवनचक्र अव्याहतपणे चालू राहते. अठराव्या शतकापासून मात्र परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. मानवाकडून परिसरात ढवळाढवळ केली जात आहे प्रचंड प्रमाणावर जंगलांचा विनाश होत आहे लोकसंख्या भयानक त्वरेने वाढत आहे उद्योगधंदे झपाट्याने वाढत आहेत. खनिज इंधनांच्या व अणु-ऊर्जेच्या साहाय्याने नैसर्गिक साधनसंपत्तीचे विविध प्रकारच्या वस्तूंत, यंत्रांत, उपकरणांत रूपांतर होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांत तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. जगात अग्रेसरत्व मिळविण्यासाठी प्रगत राष्ट्रांत चुरस निर्माण झाली आहे. यासाठी औद्योगिक उत्पादन वाढविणे हा एकच मार्ग त्यांनी अवलंबिला आहे. वाढत्या औद्यिगिकीकरणामुळे शहरांची संख्या व विस्तार वाढत आहे. त्याबरोबरच मोटारींची व अनेक प्रकारच्या वाहनांची संख्याही वाढत आहे. अधिक धान्योत्पादनासाठी व ते धान्य टिकवून ठेवण्यासाठी रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. या सर्व मानवी व्यवहारांमुळे घातक व रोगमूलक द्रव्यांचे असंख्य कण नद्यांत, महासागरांत, जमिनीत व वातावरणात विखुरले जात आहेत. हे कण पृथ्वीच्या परिसरातील नेहमीचे घटक नसतात ते उपद्रवकारक प्रदूषकांचे (परिसर प्रदूषित करणाऱ्या द्रव्यांचे) असतात. आधुनिक युगात पर्यावरणी प्रदूषणात्मक ज्या कठीण समस्या निर्माण झाल्या आहेत त्यांचा उगम अशा प्रकारे वाढत्या लोकसंख्येत, शहरांच्या वाढत्या संख्येत व विस्तारात आणि तंत्रविज्ञानाच्या वाढत्या उपयोजनात आढळतो.

प्रदूषणाचे मूलघटक : पर्यावरणात मुख्यत्वेकरून शिरणारी प्रदूषके म्हणजे ज्वलनक्रियेमुळे निर्माण झालेले पदार्थ, मानवी उत्सर्ग (मलमूत्र), निःश्वासित केलेले वायू, निरनिराळ्या वस्तूंचे सूक्ष्म धूलिकण, विकृतिकारक सूक्षजीव, विविध पदार्थांचे बाष्प कण, निरनिराळे विषारी वायू, विविध उद्योगांत वापरलेले विद्रावक (विरघळणारे पदार्थ), कृषिकार्यासाठी वापरलेली खते व कीटकनाशके ही होत. त्यांच्या जोडीला तापमानाच्या अतिरेकी सीमा, अवरक्त प्रारण (दृश्य वर्णपटातील तांबड्या रंगाच्या अलीकडील डोळ्यांना न दिसणाऱ्या प्रारणाचा भाग प्रारण म्हणजे तरंगरूपी ऊर्जा), जंबुपार प्रारण (दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील डोळ्यांना न दिसणाऱ्या प्रारणाचा भाग) आणि क्वचित प्रसंगी तीव्र दृश्य प्रारण, आयनीकारक प्रारण (विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगट निर्माण करणारे प्रारण) किरणोत्सर्गी समस्थानिकांनी (अणुक्रमांक तोच पण भिन्न अणुभार असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या भेदक किरण बाहेर टाकणाऱ्या प्रकारांनी) बाहेर टाकलेले प्रारण, गोंगाट (अप्रिय आवाज), परा-उच्च कंप्रतेचे ध्वनी(प्रतिसेकंदास होणाऱ्या कंपनांची किंवा आवर्तनांची संख्या अतिशय उच्च असलेले ध्वनी) आणि विशिष्ट प्रकारचे सूक्ष्मतरंगलांबीचे विद्युत् चुंबकीय प्रारण यांसारखे अनिष्ट घटक पर्यावरणात प्रदूषक म्हणून प्रवेश करतात. स्थलकालानुरूप ह्या भौतिक, रासायनिक व जैव घटकांचे प्रमाण व उपद्रव सह्य मर्यादांबाहेर गेल्यास प्रदूषण उद्‍भवते.

मानवाने अवलंबिलेल्या औद्योगिकीकरणामुळे विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून सहा लक्ष टन अँटिमनी, तितकेच आर्सेनिक, दहा लक्ष टन कोबाल्ट, आठ लक्ष टन निकेल यांसारख्या विषारी मूलद्रव्यांचे कण वातावरणात विखुरले गेले आहेत आणि कोळसा, खनिज तेल व इतर जीवाश्मी (हायड्रोकार्बनयुक्त साठ्यांच्या रूपातील) इंधन जाळल्यामुळे गेल्या शंभर वर्षांत २५,००० कोटी टन ऑक्सिजन संपुष्टात आला आणि त्याऐवजी ३४,००० कोटी टन कार्बन डाय-ऑक्साइड हवेत मिसळला गेला, असा अंदाज करण्यात आलेला आहे. जंगलांपासून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळू शकतो पण १९५० सालानंतर जगात इमारती लाकडासाठी व इंधनासाठी बेसुमार जंगलतोड होऊन ६६% जंगलांचा विनाश झाला. त्यामुळे ऑक्सिजनाची उपलब्धता कमी झाली. औद्योगिकीकरणाबरोबर शहरांची संख्या व विस्तार वाढला. मोटारींची संख्या वाढली. त्याचबरोबर मोटारींनी बाहेर टाकलेला कार्बन मोनॉक्साइडसारखा विषारी वायू हवेत अधिकाधिक प्रमाणात मिसळू लागला. आवाजाच्या वेगापेक्षा अधिक वेगाने प्रवास करणारी अत्याधुनिक स्वनातीत जेट विमाने मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन वापरतात आणि उच्चतर वातावरणात जलबाष्प व कार्बन डाय-ऑक्साइड सोडतात. तेथे जलबाष्पाचे मेघ बनतात आणि या सर्व घटनांमुळे स्थानिक जलवायुमानात (दीर्घ कालीन सरासरी हवामानात) बदल होऊ लागले. १९०० ते १९४० पर्यंतच्या कालावधीत उत्तर गोलार्धाचे सरासरी तापमान ०·६° से. इतके वाढले, तर पुढील तीस वर्षांत ते ०·३° से. ने कमी झाले, असे आढळून आले. तापमानऱ्हासाच्या अशा प्रवृत्तीमुळे हिमयुगाला प्रारंभ होतो की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

सध्या प्रगत देशांत अनेक वस्तू काही काळ वापरल्यानंतर फेकून देण्यात येतात. त्यांत मुख्यत्वेकरून प्लॅस्टिकची भांडी, पिशव्या, आवरणे, वेष्टने, बाटल्या, टिनचे (कथिलाच्छादित पत्र्याचे) डबे, काचेची तावदाने, व इतर वस्तू आणि कागद यांचा समावेश असतो. थोडेसे नादुरुस्त असलेले दूरचित्रवाणी संच व मोटारगाड्याही फेकून देण्यात येतात. १९६० सालानंतरच्या अंदाजांप्रमाणे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये प्रतिवर्षी ६,००० कोटी टिनचे डबे, ३,००० कोटी बाटल्याव बरण्या, ४० लाख टन वजनाच्या प्लॅस्टिकच्या वस्तू, एक कोटी टन वजनाच्या लोखंड व पोलादाच्या वस्तू, ८० लक्ष दूरचित्रवाणी संच, ७० लक्ष ट्रक व मोटारगाड्या, ३ कोटी टन कागद व कागदी वस्तू त्याज्य म्हणून फेकून दिल्या जातात. शेतकी उद्योगातील २२८ कोटी टन वजनाच्या त्याज्य वस्तू, खनिज उद्योगांतून १७० कोटी टन वजनाच्या त्याज्य वस्तू, औद्योगिक प्रकल्पांतून बाहेर फेकलेले ११ कोटी टन वजनाचे पदार्थ, शहरी वस्त्यांतून साचणारा २५ कोटी टन वजनाचा कचरा व इतर त्याज्य पदार्थ एकत्रित केले जाऊन शहरांबाहेर टाकण्यात येतात. ह्या टाकाऊ वस्तूंमुळे प्रचंड प्रमाणावर घाण पसरते व प्रदूषण उद्‍भवते. त्यातून उपद्रवी कीटक निर्माण होतात व वनस्पतींचा संहार होतो. अनेकदा टायरसारख्या निरुपयोगी रबराच्या वस्तू, कचरा, कागद वगैरे जाळण्यात येतात व राख नद्यांत किंवा समुद्रात फेकून देण्यात येते. त्यामुळे वातावरणीय व जलीय प्रदूषणाची आपत्ती ओढवते.

अणुस्फोटांमुळे निर्माण झालेले व अणुकेंद्रीय विक्रियकांतून (अणुभट्ट्यांतून) अभावितपणे वा अपघाताने निघालेले किरणोत्सर्गी कण आसमंतात विखुरले जातात. शेतातील पिकांवर, दुभत्या जनावरांच्या चाऱ्यावर, वनस्पतींवर, पाण्यावर व हवेत त्यांने अतिक्रमण होते. त्यामुळे परिणामी एक विषारी व प्राणघातक अन्नश्रृंखला [⟶ परिस्थितिविज्ञान] निर्माण होते. पिकांवर फवारलेल्या कीटकनाशकांचाही स्वल्प अंश ह्या अन्नश्रृंखलेत शिरतो. प्रदूषणाचे हे परिणाम फारच गंभीर स्वरूपाचे असतात.

बहुतेक सर्व प्रकारचे प्रदूषण औद्योगिक अपशिष्टांमुळे उद्‍भवते. या अपशिष्टांवर जर ती जेथे निर्माण होतात तेथेच नीट नियंत्रण ठेवले व ती निर्धोक केली, तर पर्यावरणी प्रदूषणाची गंभीर समस्या बऱ्याच अंशी सोडविली जाऊ शकते.


 

जलीय प्रदूषण : पृथ्वीवर सु. १·४ X १०२१ लिटर इतके मुबलक पाणी आहे विद्यमान लोकसंख्येप्रमाणे त्याची दरडोई वाटणी केली, तर प्रत्येक माणसाला ४२,००० कोटी लिटर पाणी मिळू शकेल. ह्या पाण्याचा अतिशय मोठा भाग महासागरात सामाविलेला आहे. त्यात विविध प्रकारची लवणे व रसायने मोठ्या प्रमाणात विरघळलेली असतात. दैनंदिन उपयुक्ततेच्या दृष्टीने हे खारे पाणी जसेच्या तसे घेऊन वापरण्याजोगे नसते. त्या पाण्यावर काही प्रक्रिया करून त्यात विरघळलेली लवणे काढून टाकून ते पाणी गोडे करून वापरात आणणे शक्य असते पण अशा निर्लवणीकरणाला फार खर्च येतो. औद्योगिक कामासाठी असे गोडे करून घेतलेले पाणी वापरणे आर्थिक दृष्ट्या परवडणारे नसते त्यामुळे नैसर्गिक रीत्या उपलब्ध असलेले गोडे पाणीच मोठ्या प्रमाणावर वापरतात. कारखान्यांतून बाहेर पडणारे पाणी प्रदूषित असते. ते नद्यांत सोडले जाते किंवा समुद्राकडे वळविले जाते. कारखान्यांतून बाहेर पडणारे दूषित पाणी एका ठिकाणी साठवून काही प्रक्रियांनी शुद्ध केल्यानंतर ते पुन्हा वापरात आणण्याच्या शक्यतेचा क्वचितच विचार केला जातो [⟶ पाणीपुरवठा]. ज्यामुळे प्रदूषित पाण्याचे व जलीय दूषितीकरणाचे प्रमाण एकसारखे वाढत जाते व गोड्या पाण्याचे साठे हळूहळू संपुष्टात येऊन पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होते.

नद्यांच्या काठांवर आणि सागरी किनाऱ्यांवर अनेक औद्योगिक प्रकल्प व मोठी शहरे वसली आहेत. लक्षावधी लोक शहरांत राहतात. शहरवासीयांनी विसर्जित केलेली घाण, गटारातील पाणी, कचरा, वाहितमल आणि औद्योगिक प्रकल्पाच्या विविध प्रक्रियांतून उत्सर्जित होणाऱ्या त्याज्य वस्तू, निरुपयोगी द्रव्ये व किरणोत्सर्गी पदार्थांचे कण विहिरींत, नद्यांत, नाल्यांत, सरोवरांत अथवा महासागरांत सोडलेजातात. त्यामुळे सर्व जलाशयांचे पाणी प्रदूषित होते. पिकांच्या संरक्षणासाठी डीडीटीसारखी कीटकनाशके व इतर कवकनाशक (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींचा नाश करणारी) वा जंतुविनाशक रसायने जमिनीवर टाकण्यात येतात अथाव पिकांवर फवारण्यात येतात. त्यामुळे मृत्तिकावरण (जमिनीने व्यापलेली क्षेत्रे) प्रदूषित होते. पाऊस पडला की, हे सर्व विषारी पदार्थ शेवटी जलाशयांत जाऊन मिसळतात. भूमिगत पाण्याच्या साठ्यांपर्यंतही क्रमाक्रमाने हे पदार्थ जाऊन पोहोचतात. ॲस्बेस्टस, बेरिलियम व शिसे यांचे अतिसूक्ष्म कण, वालुकाकण, धूलिकण, धूम्रकण, कार्बन मोनॉक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड, सल्फर डाय-ऑक्साइड इत्यादींसारखी वातावरणातील प्रदूषकेही पावसाबरोबर जमिनीवर येतात व अनेक जलमार्गांद्वारे शेवटी महासागरांत पोहोचतात. जलीय परिसरात वाढणाऱ्या वनस्पतींच्या कणाकणांत व कोशिकांत (पेशींत) ती सामावली जातात. अशा रीतीने भूमिगत जलप्रवाहांसहित संपूर्ण जलावरण प्रदूषित होते. अनंत प्रकारचे मासे महासागरांच्या किनारपट्टीजवळ वाढत असतात. ह्याच क्षेत्रात वनस्पतिप्लवकांसारखे (पाण्यावर तरंगणाऱ्या सूक्ष्म वनस्पतींसारखे) सूक्ष्मजीव मानवांना व मानवेतर प्राण्यांना श्वसनासाठी लागणारा ऑक्सिजन उपलब्ध करून देतात. ह्या सागरी विभागात विषारी प्रदूषके मिसळल्यास प्रचंड प्रमाणावर माशांचा व वनस्पतिप्लवकांचा संहार होतो. मानवांचे अन्न प्रदूषित व विषमय होते आणि ऑक्सिजनाच्या निर्मितीत घट होते. शहरवासीयांनी उत्सर्जित केलेली घाण व सांडपाणी यांची नीट विल्हेवाट लावली नाही, तर सार्वजनिक आरोग्य धोक्यात येते.

काही दुर्घटना : एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभापासून यूरोप आणि उत्तर अमेरिकेतील विविध उद्योगांसाठी प्रचंड प्रमाणावर पाण्याची गरज भासू लागली. कसेही करून ते मिळविण्याच्या प्रयत्नांत पाण्यात विकृतिकारक व रोगमूलक जंतू असतात व पाण्याच्या काही वापरांमध्ये या जंतूंच्या वाढीला अनुकूल परिस्थिती निर्माण होते, ह्या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष होऊ लागले. त्यातून जलीय प्रदूषणाचे विघातक परिणाम दाखविणाऱ्या काही दुर्घटना अनुभवास येऊ लागल्या. १९६५ सालच्या वसंत ऋतूत कॅलिफोर्नियातील रिव्हरसाइड या औद्योगिक शहरात एकाएकी उद्‍भवलेल्या जठरांत्रशोथाच्या (जठर व आतडे यांना दाहयुक्त सूज येणाऱ्या रोगाच्या गॅस्ट्रोएंटेरिटिसच्या) साथीत एका महिन्यात १,५०० लोक सापडून त्यांतील ३ लोक मृत्यू पावले. ह्या साथीने एकंदरीत दहा ते पंधरा हजार लोक त्या वेळी पछाडले गेले असावेत. तेथील पाण्यात साल्‌मोनेला टायफिम्युरियम नावाचे जंतू आढळले. क्लोरिनीकरणाने तेथील पाणी कधीच निर्जंतुक केले गेले नव्हते.

यूरोप खंडातील इतिहासप्रसिद्ध व एकेकाळच्या सौंदर्यसंपन्न ऱ्हाईन नदीच्या किनाऱ्यावर अनेक औद्योगिक प्रकल्प उभारले गेले आहेत, अनेक शहरे वसली आहेत. त्यामुळे हळूहळू ती प्रदूषित होऊन ‘यूरोपची विषारी गटारगंगा’ बनली आहे. १९७० साली जर्मनीतील एका कारखान्यातून एंडोसल्फॉन नावाच्या अत्यंत विषारी कीटकनाशकाचे अनेक डबे नजनचुकीने ऱ्हाईन नदीन ओतले गेले. त्यामुळे नदीतील ४ कोटींपेक्षा अधिक मासे मेले. हे मृत मासे नेदर्लंड्‌समधून वाहत जाऊन समुद्रापर्यंत पोहचले व सर्वत्र घाण पसरून परिसर विषमय झाला.

इ. स. १९५३ मध्ये कॅनडामधील न्यू ब्रन्सविकमध्ये वन्य संपत्तीचे व पिकांचे कीटकांपासून रक्षण करण्याच्या उद्देशाने विस्तृत क्षेत्रावर विमांनांतून डीडीटी हे कीटकनाशक फवारण्यात आले. या घटनेनंतर दोनच दिवसांनी नद्यांतील सामन व इतर प्रकारचे मासे मरू लागले आणि जंगलातील पक्षी मोठ्या संख्येने मृत्युमुखी पडले. अन्नश्रृंखला विषमय करणे हा जलीय प्रदूषणाचा एक अत्यंत विघातक असा परिणाम आहे.

पॅसिफिक महासागरातील पृष्ठाजवळील पाण्यात औद्योगिकीकरणामुळे वाढत्या प्रमाणात शिसे शिरत आहे. १९२०-६९ या कालावधीत दर किग्रॅ. वजनाच्या सागरी पाण्यात शिशाचे प्रमाण ०·०२ मायक्रोग्रॅम पासून ०·०७ मायक्रोग्रॅमपर्यंत वाढलेले आढळले आहे. त्यामुळे जीवसृष्टीला शिशाच्या विषबाधेचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.

पारा हासुद्धा जीवसृष्टीला आपत्तिकारक आहे. पाण्यात पाऱ्याचे प्रमाण अत्यल्प असल्यास तो परिसरातील विविध परिस्थितिवैज्ञानिक घटकांत भिनून त्याचे घोर परिणाम एखाद्या दुर्घटनेच्या स्वरूपात अनुभवास आल्याशिवाय पाण्यातील धोक्याच्या पातळीपलीकडील पाऱ्याचे अस्तित्व सहसा कळून येत नाही. उदा., स्वीडन, कॅनडा व इतर ठिकाणी लाकडाचा लगदा तयार करणाऱ्या उद्योगक्षेत्रातून पारा हे द्रव्य अपशिष्टाच्या स्वरूपात नद्यांत सोडले जाते. ते पाणी पिऊन जगणाऱ्या अनेक वन्य जीवांना त्यामुळे धोका उत्पन्न झाला आहे. स्वीडनमध्ये माशांवर उपजीविका करणाऱ्या सागरी गरूड पक्ष्यांची संख्या अतिशय कमी झाली आहे. हे मासे दूषित व विषमय झालेले असतात. ते खाल्ल्यामुळे सागरी गरूड पक्ष्यांनी आपला अंत ओढवून घेतला असावा. कदाचित त्यांनी घातलेल्या अंड्यांमधील निषेचनक्षमता (फलित होण्याची क्षमता) विषामुळे लयाला गेली असावी. पाऱ्याच्या संदर्भातील आणखी एक उदाहरण म्हणजे १९५० मध्ये जपानमधील क्यूशू बेटावरील मीनामाता या गावातील एका प्लॅस्टिकच्या कारखान्यातून निघालेल्या अनेक त्याज्य वस्तू लगतच्या मीनामाता उपसागरात फेकून देण्यात आल्या आणि त्यांत बराचसा पारा व पाऱ्याची काही संयुगे होती. प्रथम त्यातील धोका कोणाच्याही लक्षात आला नाही. या पाऱ्याने दूषित झालेले मासे खाल्ल्यामुळे ११० लोकांना १९५३-६० या कालावधीत असाध्य शारीरिक अपंगता जडली किंवा मृत्यू आला. काही बालकांनाही गर्भावस्थेत या विषबाधेमुळे काही जन्मजात विकृती जडल्याचे आढळले. यामुळे पाऱ्याच्या विषबाधेतून उद्‍भवणाऱ्या व्याधींचा ‘मीनामाता विकृती’ या नावाने आता सर्वत्र उल्लेख केला जातो. जगातील समुद्रांत अशा रीतीने प्रतिवर्षी सु. ५,००० टन पारा जात असतो, असा अंदाज आहे. मुंबईच्या परिसरातही काही औद्योगिक अपशिष्टांमधून सागरी पाण्यात पारा मिसळला असल्याचे आढळले आहे.

इंग्लंडने दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर दोन लक्ष टन वजनाचा टाबून नावाचा तंत्रिकाविकृतिकारक (मज्जासंस्थेच्या विकृती निर्मिणारा) वायू समुद्रात सोडून दिला. त्यातील काही वायू निसटून त्यामुळे १९६९ मध्ये आयरिश समुद्राच्या परिसरात हजारो सील, मासे व सागरी पक्ष्यांचा अंत झाला, असे सांगण्यात येते.


 

जलीय प्रदूषकांचे प्रकार : नैसर्गिक पाणी हे अनेक प्रकारच्या सजीवांचे वसतिस्थान आहे. ते एक सर्वकामी विद्रावक आहे म्हणजे अनेक रसायने त्यात विरघळू शकतात. औद्योगिक क्षेत्रांतून बाहेर येणाऱ्या, तसेच घरगुती कामांसाठी वापरलेल्या पाण्यात अनेक पदार्थांचे कण व अनेक प्रकारचे व्हायरस आणि जीवजंतू मिसळले जातात. सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, अमोनियम, मॅग्नेशियम, क्लोराइड, नायट्राइट, बायकार्बोनेट, सल्फेट आणि फॉस्फेट यांसारखे अकार्बनी पदार्थ आणि अगणित प्रकारचे कार्बनी पदार्थ वापरलेल्या पाण्यात आढळतात. यांशिवाय अनेक कीटकनाशके, प्रक्षालके (डिटर्जंट्स), फिनॉलापासून तयार केलेली रसायने, कार्‌बॉक्सिलिक अम्ले यांसारखे विविध प्रकारचे कार्बनी पदार्थही त्या पाण्याबरोबर वाहत असतात. ह्या पदार्थांमुळे पाण्याची चव बिघडते. अशा पाण्यापासून निरनिराळे रोग उद्‍भवतात वनस्पतींचा व जलीय जीवांचा संहार होतो आसमंतातील सौदर्य नष्ट होते सर्वत्र घाणीचा व कुबट वासाचा उपद्रव होतो. काही प्रकारच्या जलीय वनस्पती मात्र अशा प्रदूषिक परिसरात खूप जोराने वाढतात, संपूर्ण जलपृष्ठ आच्छादितात व शेवटी नाश पावतात. अशा जलाशयातील पाणी शेती, उद्योगधंदे, नौकाविहार व इतर मनोरंजन, जलचर व भूचर जीवांचे संवर्धन या दृष्टीने पूर्णतया निरुपयोगी असते. साधारणपणे पाण्यातील प्रदूषकांचे पुढीलप्रमाणे वर्गीकरण केले जाते.

(१) मानवी मलमूत्र व औद्योगिक कार्बनी अपशिष्टे : साधारणपणे शहरवासीयांनी उत्सर्जित केलेले मलमूत्र आणि औद्योगिक अपशिष्टांतील कार्बनी पदार्थ मलवाहिन्यांतून नेऊन नद्यांत, समुद्रात किंवा दूरच्या जलाशयात टाकून देण्यात येतात. ह्या जलाशयात राहणाऱ्या सूक्ष्मजंतूंना मलवाहिन्यांतून येणाऱ्या कार्बनी पदार्थांतून खाद्य मिळते, त्यांच्याकरवी ऑक्सिडीकरणाची क्रिया [⟶ ऑक्सिडीभवन]. चालू राहते व पाणी हळूहळू शुद्ध होऊ लागते पण हे शुद्धीकरण मर्यादित स्वरूपाचे असते. पाण्यात जर अतीव प्रमाणात कार्बनी पदार्थ असले, तर सूक्ष्मजंतूंची जीवरासायनिक ऑक्सिजनाची मागणी वाढते व पाण्यातून उपलब्ध होणाऱ्या ऑक्सिजनाचे एकंदर प्रमाण घटते. त्यामुळे परिसरातील नेहमीचे परिस्थितिवैज्ञानिक संतुलन बिघडते व प्रदूषणाची समस्या निर्माण होते. संस्कारित अन्न, कागद व माल्ट तयार करणाऱ्या कारखान्यांतून आणि ऊर्ध्वपातन प्रक्रियेने (द्रव घटकांचे मिश्रण तापवून तयार होणारे बाष्प पुन्हा थंड करून मिश्रणातील घटक अलग करण्याच्या प्रक्रियेने) विविध रसायने तयार करणाऱ्या कारखान्यांतून अनेक कार्बनी अपशिष्टे पाण्यात फेकली जातात. तीही पाण्यातील जीवरासायनिक ऑक्सिजन शोषून घेतात व प्रदूषण तीव्रतर करतात.

(२) सांसर्गिक रोगमूलक सूक्ष्मजंतू: शहरांतील सांडपाणी व मैला घेऊन जाणाऱ्या मलवाहिन्यांत अनेक प्रकारच्या रोगांचे जीवजंतू व व्हायरस शिरत असतात. मलवाहिन्यांतील परिस्थितीत हे रोगमूलक जीवजंतू दीर्घ कालपर्यंत तग धरू शकत नाहीत. समुद्रात सोडण्यापूर्वी त्या पाण्यावर काही संस्कार केल्यास जंतूंच्या बहुतेक जाती नामशेष होतात. ज्या काही रोगांचे जीवजंतू शिल्लक राहतात त्यांच्यावर विशेष जंतुनाशक प्रक्रिया केल्या, तर तेही नष्ट होतात. हे संस्कारित पाणी पिण्याच्या पाण्याच्या साठ्यांपासून दूरच ठेवण्यात येते. पिण्यासाठी पुरविण्यात येणाऱ्या पाण्याची अधूनमधून वैद्यकीय परीक्षा किंवा तपासणी करणे आवश्यक असते. मैलापाण्याची नीट सोय न झाल्या कारणाने दूषित झालेल्या पाण्यामुळे जठरांत्रशोथ, बृहदांत्रशोथ (मोठ्या आतड्याचा शोथ) व आंत्रशोथ (आतड्याचा-मुख्यत्वे लहान आतड्याचा-शोथ) यांसारख्या व्याधी संभवतात. १०० मिलि. पाण्यात अशा रोगकारक जंतूंची संख्या दहापेक्षा अधिक असता कामा नये. यांशिवाय पाण्यात अनेक प्रकारच्या रोगांना कारणीभूत होणारे व्हायरस असतात. त्यांचे अस्तित्व चटकन हुडकून काढण्याच्या वैद्यकीय पद्धती व त्यांची सुरक्षा संख्यामर्यादा निश्चित करणारी तंत्रे पदोपदी अंमलात आणली पाहिजेत.

(३) वनस्पतिपोषक द्रव्ये : नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम व तत्सदृश जीवनावश्यक मूलद्रव्ये परिस्थितिवैज्ञानिक आवर्तन पूर्ण करण्यासाठी जमिनीत परत येत नाहीत. ती विविध प्रकारच्या जलप्रवाहांना मिळून अपशिष्टांच्या स्वरूपात वाहात जातात व शेवटी महासागरांत जाऊन पडतात. धान्य काढून घेतल्यानंतर उर्वरित निरुपयोगी वनस्पतींची इतर प्रकारच्या कचऱ्याप्रमाणे विल्हेवाट लावण्यात येते. त्यामुळे कृषिक्षेत्रात वनस्पतींचे पोषण करणाऱ्या द्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक रीत्या सातत्याने अपव्यय होत असतो. पोषक द्रव्यांची ही तूट भरून काढण्यासाठी तितक्याच मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा उपयोग करावा लागतो. पुढे कधी काळी ती प्रदूषके ठरतील, याची ती खते वापरताना कल्पना नसते. केवळ विपुल प्रमाणात अन्नधान्याची निर्मिती व्हावी हाच हेतू रासायनिक खतांच्या वापरात मुख्यत्वेकरून अभिप्रेत असतो. जोराचा पाऊसपडला की, ओहोळ व तात्पुरते जलप्रवाह निमार्ण होतात ते नद्यांना मिळतात व नद्या समुद्रांना मिळतात. त्यांच्याबरोबर पर्यायाने जमीनीवर टाकलेल्या रासायनिक खतांतील बरीचशी द्रव्ये वाहून नेली जाऊन बहुतेक सर्व जलावरण प्रदूषित होते. जमिनीवर पडलेले पाणी पाझरून भूमि-अंतर्गत जलाशयाच्या साठ्यापर्यंत पोहोचते. त्या पाण्याबरोबर रासायनिक खतांतील मूलद्रव्ये भूमिजलापर्यंत पोहोचतात व ते पाणी दूषित करतात. अशा प्रकारांमुळे दूषित झालेले पाणी सरोवरांमध्ये किंवा नद्यांमध्ये शिरल्यास जलाशयात ⇨ शैवले जोमाने वाढू लागतात. शैवले साधारण प्रमाणात वाढल्यास त्यांच्यापासून माशांना अन्न मिळते. ह्या शैवलांमुळे पाण्यातील ऑक्सिजनाचे संतुलनही साधले जाते पण त्यांना जर कृषिकार्यासाठी जमिनीवर विखुरलेल्या रासायनिक खतांतील नायट्रोजन व फॉस्फरस यांचे उर्वरित भाग पोषणासाठी उपलब्ध झाले, तर शैवलांच्या विविध जाती अती त्वरेने वाढू लागतात व गर्दी करून त्या इतर वनस्पतींचा विस्तार खुंटवितात, तसेच जलाशयातील माशांच्या जीवितालाही धोका निर्माण करतात. कालांतराने जर त्यांना पाण्यातून पोषक द्रव्ये इष्ट प्रमाणात मिळाली नाहीत, तर त्यांचा तितक्याच त्वरेने संहार होतो. ही मृत शैवले कुजू लागतात व अनेक प्रकारचे सूक्ष्मजंतू निर्माण होतात आणि ते पाण्यातील ऑक्सिजन शोषून घेतात. या कुजणाऱ्या शैवलांमुळे सर्वत्र घाण व दुर्गंधी पसरते.

(४) कार्बनी पीडकनाशके : मानवी परिसरात वाढणारे विविध प्रकारचे कीटक, उपद्रवी किडे व जंतू आणि काही जातींचे तण व अपायकारक वनस्पती यांच्या अडथळ्यामुळे मानव जातीच्या अनेक विकासयोजना रोखून धरल्या जातात. काही जंतूंमुळे रोगराई पसरते उपयुक्त पाळीव जनावरे मृत्यूमुखी पडतात, कृषिकार्यात व्यत्यय येतो व अन्नधान्याचे उत्पादन घटते. अलीकडे अनेक कीटनाशक, कवकनाशक, तणनाशक इ. पीडकनाशक रसायनांचा शोध लागला आहे [⟶ पीडकनाशके]. त्यांच्या साहाय्याने रोगकारक जंतूंचा व कीटकांचा आणि निरूपयोगी व उपद्रवी तणांचा विनाश करायचा मानवाने सपाटाच आरंभिला आहे. त्यामुळे कृषिकार्यात आश्चर्यकारक प्रगती घडून आली व अन्नधान्यनिर्मिती प्रमाणाबाहेर वाढली. आता कृषिकार्याच्या बहुतेक सर्व अवस्थांत व शाखांत पीडकनाशकांचा सर्रास उपयोग केला जात आहे. एकाहून एक प्रभावी अशी नवनवीन पीडकनाशक द्रव्ये, त्यांच्या अपशिष्टांविषयी व त्यांच्या विषारीपणाविषयी विशेष माहिती नसताना, वापरात आणली जात आहेत. त्यांचा अल्पांश कधीकधी पिण्याच्या पाण्यात शिरल्यास जलीय प्रदूषणाचा धोका निर्माण होतो. हे टाळण्यासाठी निरनिराळ्या मार्गांनी व निरनिराळ्या ठिकाणांहून मिळविलेले पाणी शहरवासीयांना पुरविण्यापूर्वी वेळोवेळी त्याचे आरोग्यदृष्ट्या परीक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. 


(५) त्याज्य खनिज द्रव्ये व रसायने : कारखान्यातून निघालेली अपशिष्टे विशिष्ट संस्कारांनी निर्धोक न करता तशीच सरोवरांत किंवा नदीनाल्यांत जाऊ दिली, तर जलीय प्रदूषणाच्या अनेक गंभीर समस्या निर्माण होतात. कॅल्शियम व मॅग्नेशियम यांची लवणे पाण्यात विरघळल्यास ते पाणी कठीण (साबणाचा फेस ज्यात होऊ शकत नाही असे, अफेनद) होते. औद्योगिक कार्यासाठी व पिण्यासाठी अशा पाण्याचा विशेष उपयोग होऊ शकत नाही. ह्याच पाण्यात जर औद्योगिक अपशिष्टांतील काही विषारी रसायने मिसळली गेली, तर त्या जलप्रवाहांच्या नित्याच्या जैविक क्रियाशीलतेत, बदल घडून येतात. काही रसायनांच्या प्रभावाने ते पाणी अम्लीय किंवा क्षारीय (म्हणजे अम्लाशी विक्रिया केल्यास लवण देण्याचा गुणधर्म असलेले) होते. हा गुणधर्म प्रमाणाबाहेर वाढल्यास तेच पाणी क्षरणकारी (झीजवून नाश करणारे) होते त्यातील सजीव सृष्टीचा नाश होतो. काही विशिष्टरासायनिक द्रव्यांमुळे पाण्यातील ऑक्सिजनाचे प्रमाण घटते. साधारणपणे औद्योगिक प्रकल्पातून आर्सेनिक, बेरियम, क्रोमियम, काही सायनाइडे, शिसे, पारा, काही फिनॉलांच्या जातींची रसायने बाहेर येऊन पाण्यात मिसळतात. पिण्याच्या पाण्यातील त्यांची संहती (प्रमाण) विशिष्ट मर्यादेपर्यंतच (उदा., आर्सेनिकच्या बाबतीत प्रती लिटर ०·०५ मिग्रॅ.पर्यंत) सह्य राहू शकते. या संहतीचे वारंवार परीक्षण करावे लागते व ती सह्य मर्यादांपलीकडे जाऊ न देण्याबद्दल दक्षता घ्यावी लागते.

(६) सांडपाण्यातील व पाणलोटातील गाळ : औद्योगिक क्षेत्रांतून किंवा शहरांतून येणाऱ्या त्याज्य पाण्यातील अवसादामुळे वा गाळामुळे सरोवरातील व नद्यांतील पाण्याला गढूळपणा येतो व त्यामुळे जलपृष्ठाचे स्वरूप बदलते. किनाऱ्याजवळील भागात अशी गाळाचे थरांवर थर जमा होतात. लहान व उथळ पाट, चर किंवा खाड्या गाळाने भरून जातात. कधीकधी जलप्रवाहात मध्येच धरणासारखी गाळाची भिंत निमार्ण होते आणि सांडपाणी व मैलापाणी कोंडले जाते. अवसादनक्रियेमुळे (साचण्यामुळे) चिकट गाळ (साखा) खाली बसू लागतो. ह्याच पाण्यात अनॉक्सिजीवी (अंशतः वा पूर्णपणे ऑक्सिजनविरहित असलेल्या परिस्थितीत जगू शकणारे) जंतू निर्माण होतात. त्यांच्याकडून या साख्याचे अंशतः अपघटन (घटक अलग होण्याची क्रिया) होते. त्यासाठी पाण्यातील ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात खर्ची पडतो व हवेतील कार्बन डाय-ऑक्साइडाचे प्रमाण वाढते. अनॉक्सिजीवी जंतूंमुळे हायड्रोजन सल्फाइड वायू पाण्यात मिसळला जातो. ह्या घटनांमुळे सर्वत्र दुर्गंधी पसरते.

जगातील अनेक मोठी शहरे समुद्रकिनारी वसली आहेत. त्यांतील गटारे व मलप्रवाह किनाऱ्यालगतच्या सागरी पाण्यात सोडल्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाबरोबर इतर अनेक समस्या उद्‍भवतात. गटारांबरोबर विषमज्वर, प्रलापक सन्निपात (टायफस) ज्वर, जठरांत्रशोथ, यकृतशोथ यांसारख्या रोगांचे जंतू किनाऱ्याजवळील पाण्यात जातात. तेथून ते माशांच्या पोटात जाऊन पर्यायाने हे दूषित झालेले मासे खाणाऱ्या मानवांना व मानवेतर प्राण्यांना ग्रस्त करतात. अशा पाण्यात पोहणे, सूर मारणे किंवा फळ्यांच्या साहाय्याने समुद्रपृष्ठावर घसरत जाणे धोक्याचे असते. समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या शहरांतील बरीचशी विषारी घाण मलकुंडातून भूमिगत मार्गांनी पाझरून किनाऱ्यालगतच्या सागरी पाण्यात मिसळते. त्यामुळे प्राण्यांनी विसर्जित केलेल्या घाणीवर, ती समुद्रात टाकण्यापूर्वी निर्धोक करण्यासाठी काही संस्करण करणे आवश्यक ठरते. तथापि अशा संस्करणानंतरही बरीच पोषण द्रव्ये पाण्यात शिल्लक राहतातच. अशा प्रकारे समुद्रकिनाऱ्याजवळील पाण्याला आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणावर पोषण द्रव्ये मिळतात. त्यांवर शैवले व इतर जीव जोमाने व प्रमाणाबाहेर वाढतात. ह्या अभिक्रियेला सुपोषणक्रिया म्हणतात पण तीमुळे परिणामी सागरी पाण्याची उपयुक्त उत्पादनक्षमता बरीच कमी होते. किनारपट्टीजवळील प्रदूषित पाणी साधारणपणे काळवटलेले असते. त्यातून सूर्यप्रकाशाचे किरण खूप खोलवर जाऊ शकत नाहीत. त्यामुळे जलपृष्ठाखालील वनस्पतींची प्रकाशसंश्लेषणात्मक क्रिया [⟶प्रकाशसंश्लेषण] मंदावते, वनस्पतींचा नाश होऊ लागतो, पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनाचे प्रमाण कमी होते आणि मृत वनस्पती कुजतात. अतिप्रदूषित पाण्यात सागरी सूक्ष्मजंतू मोठ्या संख्येने वाढतात. तेही पाण्यातील ऑक्सिजन संपवून कार्बन डाय-ऑक्साइडाची वृद्धी करतात. ह्या जंतूंमुळे अनेक प्रकारचे रोग उद्‍भवून पाण्यातील खाण्यास योग्य अशा माशांचा, कवचधारी जीवांचा व पाणकोंबड्यांचा विनाश घडून येतो व जेलीफिशसारखे प्राणी आणि इतर उपद्रवी जंतू जोमाने वाढू लागतात. ह्या दृष्टीने शेवटी समुद्रात जाणाऱ्या गटारांतून किंवा मलप्रवाहांतून उपद्रवी जीवजंतूंस पोषक असे अन्न किंवा खनिज पोषक अन्न किनाऱ्याजवळील पाण्यात प्रवेश करणार नाही, अशी दक्षता घेणे आवश्यक असते.

जमिनीवर महावृष्टी झाल्यास पूर येतात आणि बरेचसे पाणी पाणलोटाबरोबर समुद्राला मिळते. त्या पाण्यात डीडीटी, एंड्रीन, पॅराथिऑन, हेप्टॅक्लोर इत्यादींसारखी कीटकनाशके मिसळलेली असल्यास ती समुद्रांतील उपयुक्त जातींच्या माशांचा नाश करतात. समुद्रकिनाऱ्यावर उभारलेल्या औद्योगिक प्रकल्पांतून अनेक धातू, अम्ले आणि आरोग्यविघातक वायू बाहेर पडतात. कागद आणि लगदा तयार करणाऱ्या कारखान्यांतून अनेक त्याज्य विषारी पदार्थ बाहेर येतात. इतर औद्योगिक कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या अपशिष्टांबरोबर शिसे, तांबे, जस्त, निकेल, पारा, कॅडमियम, कोबाल्ट यांसारख्या धातूंचे कण व लवणे आणि सायनाइड, सल्फाइड, अमोनिया, क्लोरीन, ल्युओरीन यांसारखे विषाक्त रासायनिक पदार्थही उत्सर्जित होतात. परिणामी हे सर्व पदार्थ किनारपट्टीलगतच्या समुद्राच्या पाण्यात प्रवेश करतात व उपयुक्त सागरी जीवसृष्टीच्या अस्तित्वाला धोका निर्माण करतात.

 (७) किरणोत्सर्गी पदार्थ : जगात अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे किरणोत्सर्गी समस्थानिक नैसर्गिक अवस्थेत आढळतात. विपुल प्रमाणात ते कोठेही उपलब्ध होत नाहीत. तथापि आतापर्यंत अनेक अणुकेंद्रीय विक्रियांचा सूक्ष्म अभ्यास केला गेला असून त्यांचे नियंत्रण आणि उपयोग करण्याचे मार्गही शोधले गेले आहेत. त्यांच्या साहाय्याने आता विविध प्रकारची किरणोत्सर्गी मूलद्रव्ये त्यांच्या नैसर्गिक स्वरूपांत हव्या त्या प्रमाणात तयार करता येतात इतकेच नव्हे, तर विविध अणुकेंद्रीय विक्रियांनी त्या किरणोत्सर्गी मूलद्रव्यांचे अनेक समस्थानिकही बनवून ते ऊर्जानिर्मितीसाठी, तसेच वैद्यक, कृषी इ. विविध क्षेत्रांत उपयुक्त कार्यांसाठी वापरणे आता शक्य झाले आहे [⟶ अणुकेंद्रीय अभियांत्रिकी अणुऊर्जेचे शांततामय उपयोग]. तथापि किरणोत्सर्गी अणूंचे भंजन करून अणुकेंद्रीय विक्रियांनी ऊर्जानिर्मिती केल्यास भंजन क्रियेनंतर जी किरणोत्सर्गी द्रव्ये निर्माण होतात, त्यांचे वस्तुमान पुष्कळच अधिक असते. अनेक कार्यांसाठी ती उपयोगात आणली गेली, तरी त्यांचा बराचसा भाग शिल्लक राहतोच आणि ह्या किरणोत्सर्गी अपशिष्टांची विल्हेवाट कशी लावावयाची, ही समस्या उद्‍भवते. ह्या त्याज्य पदार्थांतून आयनीकारक प्रारण बाहेर पडते. त्यामुळे कर्करोग उद्‍भवतो, मूलभूत जैव प्रक्रियांत बिघाड उत्पन्न होतो आणि सजीवांच्या विविध जातींत जननिक (आनुवंशिक वैशिष्ट्यांत) बदल घडून येतात (आयनीकारक प्रारणांचे द्रव्य पदार्थांवर व जीवसृष्टीवर होणाऱ्या परिणामासंबंधी अनुक्रमे ‘प्रारण’ व ‘प्रारण जीवविज्ञान’ या नोंदींत अधिक वर्णन दिले आहे). अणुऊर्जा प्रकल्पातून बाहेर निघणाऱ्या घन, द्रव किंवा वायुरूप किरणोत्सर्गी अपशिष्टांची पूर्णतया वेगळ्या अशा दोन मार्गांनी विल्हेवाट लावण्यात येते. पहिल्या पद्धतीत ही अपशिष्टे संहत करून विशिष्ट जागी बंदिस्त करून ठेवतात. दुसऱ्या पद्धतीत ही अपशिष्टे जलप्रवाहाच्या मदतीने विरल करून त्यांचे कालपरत्वे विकिरण करण्यात येते (विखुरण्यात येतात). दोन्ही पद्धतींत अंतिम दृष्टीने धोका अभिप्रेत व अटळ आहेच. अपशिष्टांचे विरलीकरण व विकिरण केल्यामुळे कालांतराने कणांचा किरणोत्सर्गी क्षय होतो परंतु ह्या प्रक्रियेला दीर्घ कालावधी लागतो. कणांचा किरणोत्सर्गी क्षय पूर्ण होण्यापूर्वीच अधिकाधिक अपशिष्टांची भर पाण्यात पडते व जलप्रवाह किंवा समुद्राचे पाणी उत्तरोत्तर प्रदूषित होत जाते. ह्या कारणामुळे किरणोत्सर्गी अपशिष्टांची विल्हेवाट लावण्याची पहिली पद्धत (संहतीकरण व बंदिस्तीकरण) अधिक खर्चाची असली, तरी अवलंबितात. सध्या अनेक राष्टांत अनेक ठिकाणी विद्युत् निर्मितीसाठी अणुऊर्जा निर्माण करणारे प्रकल्प योजिले जातआहेत. त्यांतून निघणाऱ्या अपशिष्टांचे प्रमाण एकसारखे वाढतच आहे. अणुकेंद्रीय इंधन प्रथम वापरल्यानंतर निर्माण झालेल्या घटकांवर पुन्हा प्रक्रिया करतात. त्यांतून जी द्रवरूप अपशिष्टे किंवा उपपदार्थ शिल्लक राहतात त्यांचीही किरणोत्सर्गक्षमता बरीच असते. ही अपशिष्टे सरळ समुद्रात फेकून देणे अत्यंत धोक्याचे असते. काही ठिकाणी द्रवरूप पदार्थांचे घनीभवन करून त्यांचे अंतिम आकारमान साधारणपणे दहा पटीने कमी करणारी साधने वापरली जात आहेत. ही घनीभूत झालेली अपशिष्टे एकत्र करून जाड मजबूत घातवीय दंडगोलांत (अथवा जाड काँक्रीटच्या अच्छादनात) खच्चून भरून ते दंडगोल खोल समुद्रात लोटून देतात किंवा मिठाच्या खाणीतील खोल जागेत पुरून ठेवतात. तथापि यापेक्षा अधिक सुरक्षित जागी ठेवल्याशिवाय अशा. आयनीकारक अपशिष्टांची विल्हेवाट पूर्णपणे लावता येणार नाही. या अपशिष्टांचा अर्धायुःकाल (किरणोत्सर्गी द्रव्याची मूळ क्रियाशीलता निम्मी होण्यास लागणारा काळ) दीर्घ असल्यामुळे अशा बंदिस्त स्थितीत ती किती वर्षे सुरक्षित राहू शकतील, हाही एक प्रश्नच आहे. किरणोत्सर्गी अपशिष्टांची विल्हेवाट लावण्याच्या इतरही विविध योजना (उदा., कृत्रिम खडकात अथवा विशिष्ट प्रकारच्या काचेत बंदिस्त करणे) सुचविण्यात आलेल्या आहेत तथापि पूर्णपणे सुरक्षित अशी समाधानकारक योजना अद्याप प्रत्यक्ष कार्यवाहीत आलेली नाही. 


(८) उष्णता : जलीय प्रदूषणात्मक अनेक घटकांपैकी उष्णता हा महत्त्वाचा घटक ठरू शकतो. सागरी पाण्याचे निर्लवणीकरण करणारी संयंत्रे, औष्णिक विद्युत् निर्मिती केंद्रे, विविध रसायने निर्माण करणारे कारखाने, पोलाद तयार करणारे कारखाने व विद्युत् निर्मितीसाठी वापरण्यात येणारे अणुकेंद्रीय विक्रियक यांसारख्या प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात पाणी आवश्यक असते. अशा कारखान्यांतून वा प्रकल्पांतून जे पाणी बाहेर पडते ते अनेकदा बरेच (सागरी पाण्यापेक्षा १२° ते १८° से. अधिक) उष्ण असते. हे उष्ण पाणी तलावांत, नद्यांत व समुद्रात गेले, तर ‘ऊष्मीय प्रदूषण’ निर्माण होते. उष्ण पाण्यामुळे तेथील परिसरातील विद्यमान परिस्थितिवैज्ञानिक संतुलन बिघडते. जीवनोपयोगी माशांचा मोठ्या प्रमाणावर संहार होतो. शैवलांसारख्या वनस्पती जोराने वाढू लागतात व त्याबरोबरच पाण्यातील ऑक्सिजनाचे साठे संपुष्टात येतात. आधुनिक औद्योगिकीकरणामुळे ऊर्जेचा वापर प्रतिवर्षी ३·५% अशा चक्रवाढ पद्धतीने वाढत आहे. प्रत्येक २० वर्षांनी हा ऊर्जा-व्यय दुपटीने वाढत आहे. ह्याच प्रमाणात ऊष्मीय प्रदूषणाची समस्याही तीव्रतर होणार आहे. अमेरिकेसारखा अतिप्रगत देशात ऊर्जा-व्यय प्रत्येक १२ वर्षांनी दुप्पट होत आहे. औद्योगिक क्षेत्रांतून निघणारे उष्ण पाणी प्रथम थंड करून नंतरच समुद्राकडे किंवा इतर जलाशयांत वळवावे आणि कोणत्याही परिस्थितीत जलाशयांतील किंवा समुद्राच्या पाण्याचे तापमान २° से. पेक्षा अधिक वाढणार नाही अशी खबरदारी घ्यावी, असे आदेश अमेरिकेच्या शासनाने संबंधित कारखानदारांना दिलेले आहेत. इतर देशांतील कारखानदारांनीही अशा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

(९) फ्ल्युओराडे : मानवी वसाहतींना पुरविलेल्या पिण्याच्या पाण्यात विशिष्ट प्रमाणात ल्युओराइडे असणे आवश्यक समजले जाते. पाण्यात फ्ल्युओराइडे योग्य प्रमाणात असल्यास दातांचा क्षय होण्यास प्रतिरोध होतो व दात सुस्थितीत राहतात परंतु हेच द्रव्य पाण्यात प्रमाणाबाहेर विरघळले गेले असल्यास दंतवल्कामध्ये (एनॅमलमध्ये) विविध रंगांचे डाग पडलेले आढळतात. या दंतविकृतीला ‘डेंटल फ्ल्युओरोसिस’ असे म्हणतात. पिण्याच्या पाण्यात दर लिटरमध्ये ०·७ ते १·२ मिग्रॅ. या मर्यादांत फ्ल्युओराइडे असलेच पाहिजे अशी दंतवैद्यांची शिफारस आहे. फ्ल्युओराइडाचे प्रमाण वसाहतीतील हवेच्या दैनंदिन उच्चतम तापमानाच्या वार्षिक सरासरीवर अवलंबून असते. ज्या पिण्याच्या पाण्यात ०·६ मिग्रॅ./लि. यापेक्षा कमी प्रमाणात फ्ल्युओराइड असेल ते पाणी कमी प्रतीचे, तर ज्या पाण्यात १·७ मिग्रॅ./लि. यापेक्षा अधिक फ्ल्युओराइडअसेल ते पाणी दातांच्या दृष्टीने विकृतिकारक समजण्यात येते.

(१०) खनिज व ज्वालाग्राही तेले: शहरांतून किंवा निरनिराळ्या प्रकारच्या औद्योगिक प्रकल्पांतून निघालेली अपशिष्टे बुद्धिपुरस्सर पाण्यात सोडल्यामुळे भौतिक, जैव व रासायनिक घटकांकरवी प्रदूषण कसे निर्माण होते ते वर नमूद केले आहे पण कधीकधी अनपेक्षितपणे समुद्रपृष्ठावर काही अपघात घडून येतात. त्यामुळे विस्तृत प्रमाणावर जलीय प्रदूषण उद्‍भवते. महासागरांवर अनेक जहाजे परिभ्रमण करीत असतात. खनिज व ज्वालाग्राही तेलांची आंतरराष्ट्रीय वाहतूक जहाजांद्वारेच करतात. अनेकदा त्यांतील तेलाच्या टाक्या फुटतात व तेल समुद्रपृष्ठावर पसरते. काही वेळा वजन कमी करण्यासाठीही जहाजातून अनेक टन तेल समुदात सोडले जाते. वाऱ्यांच्या व लाटांच्या समवेत हे तेल किनाऱ्याकडे वाहत येते त्यामुळे अगणित पक्षी, मासे, जलचर प्राणी मृत्युमुखी पडतात व सागरी वनस्पतिसंपदा नष्ट होते. समुद्रकिनाऱ्यावर उभारलेल्या खनिज तेलाचे परिष्करण करणाऱ्या (घटक अलग करणाऱ्या व ते शुद्ध करणाऱ्या) कारखान्यांतून, विहिरींतून व साठवणीच्या टाक्यांतूनही काही प्रमाणात तेल सारखे गळत वा पाझरत असते. शेवटी तेही समुद्रात प्रवेश करते. अशा दुर्घटनामुळे अनेक प्रकारच्या खाद्य माशांना धोका निर्माण होऊन ते बहुसंख्येने नामशेष होतात व अन्नसमस्या गंभीर स्वरूप धारण करते. तेल परिष्करणाच्या कारखान्याच्या परिसरात जलीय कवचधारी जीवांची निपज होऊशकत नाही. कच्चे खनिज तेल, पेट्रोल, रॉकेल, डांबर इत्यादींसारखे पदार्थ साठवणीच्या टाक्या स्वच्छ करताना अभावितपणे समुद्रकिनाऱ्यालगतच्या पाण्यात सरळ सोडून दिले जातात. त्यामुळे क्रिओसोल व फिनॉल यांसारखी विषारी द्रव्ये पाण्यात मिसळतात आणि प्रचंड प्रमाणावर मत्स्यसंहार घडवून आणतात. समुद्रपृष्ठावर तेल पसरल्यामुळे लगतच्या पाण्याच्या थरांना सौर प्रारण कमी प्रमाणात मिळते. त्यामुळे सागरी पाणी आणि वातावरण यांच्यात घडणाऱ्या ऑक्सिजन-विनिमयची त्वरा मंद होते. खनिज तेल रसायने माशांच्या पोटात गेल्यास त्यांच्या मांसाचा व त्वचेचा रंग बदलतो आणि ते सेवनास अयोग्य होतात.

 मोठे तेलवाहू जहाज फुटल्याने व त्यातील तेल सागरी पृष्ठावर पसरल्याने विस्तृत प्रमाणावर जलीय प्रदूषण निर्माण झाल्याची घटना ‘टॉरी कॅन्यन’ या जहाजाबाबत १८ मार्च १९६७ रोजी घडून आली. हे जहाज कुवेतमधील १,१८,००० टन कच्चे तेल घेऊन इंग्लंडच्या जवळपास येत असताना त्यावर गैरसमजुतीने बाँबहल्ला झाला व ते सेव्हन स्टोन्स रीफजवळ आले असताना जमिनीत रूतून बसले. त्यातील तेलाच्या सहा टाक्या फुटल्या व ६०,००० टन तेल जहाजाच्या दक्षिणेस सु. १३ किमी.पर्यंतच्या समुद्रपृष्ठावर पसरू लागले. २५ मार्च १९६७ नंतर हे तेल समुदकिनाऱ्याजवळ येऊ लागले व अनेक आठवडे ते किनाऱ्याकडे येतच होते. प्रक्षालके वापरून समुद्रकिनारा वारंवार स्वच्छ करावा लागत होता. कॉर्निश किनारपट्टीच्या सु. १६० किमी. लांबीच्या किनाऱ्यावर तेल पसरलेले होते. सिली बेटांमधील सेंट ॲग्नस येथील पक्षिवेधशाळेने ४०,००० सागरी पक्षी या दुर्घटनेत मेल्याचे प्रसिद्ध केले, तर तेल सांडल्यामुळे प्रदूषित व घाणेरड्या झालेल्या किनाऱ्याकडे पर्यटक कित्येक दिवस न फिरकल्यामुळे शासनाला लक्षावधी पौंडांचे नुकसान सोसावे लागले, असे ब्रिटिश शासनाने प्रसिद्ध केले. किनारा स्वच्छ करण्यासाठी आणि तेल घालविण्यासाठी उपयोगात आणलेल्या रसायनांमुळेच सागरी पक्ष्यांची अधिक हानी झाली, असेनंतर अधिकृपणे सांगण्यात आले. तैल-प्रदूषणामुळे ईशान्य ॲटलांटिक मध्ये १९७० साली ३,८०,००० तर १९७१ साली १२,००,००० सागरी पक्षी मृत्युमुखी पडले. अशा प्रदूषणाचे प्रसंग ‘टॉरी कॅन्यन’ शिवाय अनेक घडले आहेत आणि भविष्यातही तशाच अनेक दुर्घटना घडू शकतील. त्यांतून उद्‍भवणाऱ्या तैल-प्रदूषणाच्या समस्येवर काय उपाय योजायचे, याचा दूरदर्शीपणे विचार करणे अगत्याचे आहे.

वातावरणीय प्रदूषण : जलीय प्रदूषणाप्रमाणेच वातावरणीय प्रदूषणही वाढती लोकसंख्या, वाढती शहरे, वाढते औद्योगिकीकरण व इंधनाचा वाढत्या प्रमाणावर उपयोग यांच्याशी निगडित झालेले आहे. वातावरणीय प्रदूषण ही ऐतिहासिक कालापासून त्रस्त करणारी समस्या आहे. इंधनामुळे वातावरण विषारी होते हे लोकांना पूर्वीपासून ठाऊक होते. इंग्लंडमध्ये पहिल्या एडवर्ड राजांच्या कारकीर्दीत १२७३ साली धुराचे उपशमन करण्यासंबंधीचा कायदा प्रथम अंमलात आणला गेला तथापि कोळशाच्या धुरामुळे हवा विषारी होते, याची लोकांनी इतकी प्रदूषण धास्ती घेतली होती की, १३०६ साली लंडनमध्ये कोळशाच्या वापरास संपूर्ण बंदी घालणारा शाही जाहीरनामा काढला गेला. एका कारागिराने वातावरणीय प्रदूषण प्रतिबंधक संहितेचा भंग केला तेव्हा न्यायालयीन चौकशी अंती त्याला दोषी ठरविण्यात आले व त्याचा शिरच्छेद करण्यात आला. प्रदूषणाच्या गुन्ह्याबाबत देहांताची शिक्षा झाल्याची ही पहिलीच नोंद होय.

 वातावरणातील नेहमीच्या घटकांशिवाय वातावरणात विविध प्रक्रियांनी शिरणारे व मानव, मानवेतर प्राणी, वनस्पती किंवा काही निर्जीव जड वस्तूंवर मोजता येण्याइतका किंवा दृश्य स्वरूपात आढळण्याइतका परिणाम करू शकतील इतपत संहती असणारे इतर पदार्थांचे सूक्ष्म कण म्हणजेच वातावरणीय प्रदूषके, अशी सर्वसाधारणपणे वातावरणात प्रदूषण निर्माण करणाऱ्या घटकांची व्याख्या करण्यात येते. ह्या व्याख्येप्रमाणे कोणत्याही नैसर्गिक किंवा कृत्रिम कारणांनी वातावरणात प्रवेश करून वाऱ्याबरोबर भ्रमण करू शकणाऱ्या बाह्य वस्तुकणांना वातावरणीय प्रदूषकांच्या वर्गात टाकता येते. अशी प्रदूषके वायुरूप रेणूंच्या, द्रवबिंदूंच्या किंवा घनरूप वस्तुकणांच्या स्वरूपात असू शकतात. वातावरणीय प्रदूषकांचे पुढील दोन प्रकार करता येतात : (१) सहज ओळखता येतील अशी उगमस्थानांतून उत्सर्जित होणारे प्राथमिक प्रदूषक कण (२) दोन किंवा अधिक प्राथमिक प्रदूषक कणांमधील अन्योन क्रियेमुळे हवेत निर्माण होणारे कण किंवा वातावरणातील नित्याचे घटक व प्राथमिक प्रदूषक कण यांच्यात प्रकाश रासायनिक क्रियेच्या प्रभावाने किंवा प्रभावाशिवाय होणाऱ्या विक्रियेमुळे निर्माण होणारे दुय्यम प्रकारचे प्रदूषक कण.


 प्राथमिक वातावरणीय प्रदूषके : एकाच विस्तीर्ण औद्योगिक क्षेत्रात अनेक प्रकारचे कारखाने असल्यास प्रत्येक कारखान्यातून कोणत्या प्रकारचे प्रदूषक कण किती प्रमाणात बाहेर पडतात, हे निश्चित करता येते. तथापि निरनिराळ्या प्रदूषक कणांत भिन्न विक्रिया-प्रक्रिया होत असल्यामुळे अंतिम दृष्ट्या नक्की कोणती वातावरणीय प्रदूषके सजीवसृष्टीवर कोणत्या प्रकारचे घातक परिणाम करीत असतील, याबद्दलचे निश्चित अंदाज वरील माहितीवरून बांधता येत नाहीत. त्यासाठी निरनिराळ्या प्रकारच्या प्रदूषक कणांमध्ये घडून येणाऱ्या विक्रियाशृंखलांचा व परिणामांचा पूर्णतया अभ्यास करावा लागतो. त्यानंतरच प्राथमिक प्रदूषक कणांच्या उत्सर्जनावर नियंत्रण ठेवता येते वा त्यांचे उपशमन करण्याचे मार्ग योजिता येतात. कारखान्यातून उत्सर्जित होणाऱ्या अपशिष्टांत १०० μ (μ = मायक्रॉन = मिमी.चा हजारावा भाग) व्यास असलेले घन पदार्थांचे सूक्ष्म कण, १०० μ व्यासापेक्षा अधिक मोठे असलेले खडबडीत कण, गंधकयुक्त संयुगे, कार्बनी संयुगे, नायट्रोजनयुक्त संयुगे, ऑक्सिजनयुक्त संयुगे, हॅलोजनयुक्तसंयुगे आणि काही किरणोत्सर्गी संयुगे आढळतात. यांशिवाय औद्योगिक उत्सर्जनात अनेक प्रकारची अतिसूक्ष्म वायुकलिले (वातावरणात तरंगत किंवा आलंबित असणारे सूक्ष्म कण) आढळतात.

  

सूक्ष्म वायुकलिलांमध्ये कार्बन-कण, धातवीय धूलिकण, अनेक सिलिकेटे, फ्ल्युओराइडे, डांबरी पादार्थांचे कण, रेझीन, परागकण, कवकांचे कण, घनरूपात आढळणारी काही ऑक्साइडे, नायट्रेटे, सल्फेटे, क्लोराइडे, काही ॲरोमॅटिक संयुगे (ज्यांत बेंझीन वलय आहे किंवा बेंझिनाचे वैशिष्ट्य असणारी अणूंची संरचना आहे अशी संयुगे) आणि वरील वर्गवारीतील अनेक वर्गांत मोडणारी परस्पव्यापी विविध प्रकारची रासायनिक द्रव्ये सामाविलेली असतात. हे कण भौतिकीच्या नियमांप्रमाणे प्रकाशाचे प्रकीर्णन (विखुरले जाणे) करतात. अतिसूक्ष्म कणांच्या अवस्थेत त्यांचे विभाजन झाल्यामुळे इतर अधिशोषित (पृष्ठभागाशी धरून राहिलेल्या) प्रदूषकांमध्ये चालणाऱ्या मंदगती अन्योन्यक्रियांच्या बाबतीत ते कण उत्प्रेरकाची (प्रत्यक्ष विक्रियेत भाग न घेता ती जलदपणे वा कमी तापमानाला घडवून आणणाऱ्या पदार्थाची) भूमिका बजावून त्या विक्रियांचा वेग वाढवितात. कधीकधी ह्या कणांना स्थिर विद्युत् भार प्राप्त झालेला असतो. त्यामुळे ते इतर प्रकारच्या कणांचे संमीलन घडवून आणू शकतात. वायुरूप कणांचे संद्रवण (द्रवीभवन) घडवून आणण्यातही त्यांची मदत होते. कारखान्यांतून उत्सर्जित होणाऱ्या कणांतील विविध रासायनिक प्रकारांचे कण काही जनावरांच्या व वनस्पतींच्या बाबतीत अत्यंत विषारी असू शकतात. काही रासायनिक कण धातूंच्या वस्तूंवर गंज चढवू शकतात, त्यांना हळूहळू झिजवू शकतात किंवा त्यांच्या संर्वांगावर अतिसूक्ष्म छिद्रे पाडू शकतात. उर्त्सजनातील काही पदार्थांचे कण किरणोत्सर्गी असल्यास हवेतील आयनीकारक प्रारणाचे प्रमाण सह्य मर्यादेपेक्षा वाढते व तेथील परिसरात वावरणाऱ्या काही व्यक्तींना कर्करोग किंवा इतर असाध्य विकृती व विकार जडू शकतात. औद्योगिक उत्सर्जनात साधे धूलिकणच अधिकतम प्रमाणात व बहुसंख्येने उपस्थित असतात. या धुळीमुळे कपडे, फर्निचर, तैलचित्रे व इतर रंगीत चित्रे मलिन होतात. इमारतींना अवकळा येते. धूळ असलेल्या हवेत फार वेळ श्वसन केल्यास असह्य त्रास होतो. काही प्रदूषकांचा हवेतील जलबाष्पाशी संयोग झाल्यामुळे विरल अम्ले तयार होतात. त्यामुळे संगमरवरी पुतळे, प्रसिद्ध चित्रकारांच्या दुर्मिळ कलाकृती, दुर्मिळ जुने ग्रंथ, घरांच्या भिंती इ. वस्तू खराब होतात. उंची कपडे, रबराच्या व कातड्याच्या वस्तू यांचा टिकाऊपणा नष्ट होतो. झाडे खुरटतात, हवेतील दुर्गंध अस्वस्थ करतो. हवेत सातत्याने धूसरता असते. त्यामुळे दृष्टिक्षेप सीमित होतो. विद्युत् वाहक तारांवर बहुसंख्येने अम्लीय प्रदूषकांचे व धुळीचे कण जमा होऊन तारांचे विद्युत् यंत्रांशी संबंध तुटतात आणि संपूर्ण विद्युत् यंत्रणा विस्कळीत होते. अनेक प्रसंगी अम्लीय सधूम धुके निर्माण होते. त्यामुळे वनस्पतींचा विकास खुंटतो व त्यांना फळे-फुले येत नाहीत. धुरामुळे व धुक्यामुळे भूपृष्ठाला मिळणाऱ्या आपाती सूर्यप्रकाशात घट होते. त्यामुळे मानवी शरीरात उत्पन्न होणाऱ्या ड – जीवनसत्त्वात घट होते. फुप्फुसांत, श्वासनलिकांत व डोळ्यांत विक्षोभ आणि दाह निर्माण होतो. ह्या व्यथांचे पर्यवसन तंत्वात्मकता (कोशिकासमूह तंतुमय होणे) आणि कर्करोगांत होते. कोळशाच्या कणांमुळे अँथ्रॅकोसिस नावाचा फुप्फुसांचा रोग जडतो.

१०० μ व त्यापेक्षा अधिक व्यास असलेल्या खडबडीत कणांमुळे वर नमूद केल्याप्रमाणेच दुष्परिणाम घडून येतात परंतु प्रदूषक कणांचे आकारमान जास्त असल्यामुळे धुराड्यातून बाहेर आल्यानंतर अल्पावकाशातच ते कण गुरूत्वाकर्षणाने भूपृष्ठाकडे ओढले जातात. हवेतील भ्रमणकाळ बराच कमी असल्याने ह्या कणांमुळे उद्‍भवणाऱ्या दुष्परिणामांचे क्षेत्र, प्रमाण व तीव्रता बरीच कमी असते. मोठ्याआकारमानाचे कण बहुसंख्येने मानवी किंवा मानवेतर प्राण्यांच्या फुप्फुसांत प्रवेश करू शकत नाहीत अतिसूक्ष्म कणांप्रमाणे हे मोठे कण उगमस्थानापासून फार लांब अंतरापर्यंत प्रवास करू शकत नाहीत किंवा फार वेळ हवेत भ्रमण करू शकत नाहीत. उगमापासून निघाल्यानंतर लवकरच हे मोठे कण कोणत्या तरी जवळपासच्या वस्तूंवर येऊन बसतात व कालांतराने त्यांना मालिन्य आणतात.

औद्योगिक उत्सर्जनात गंधक व त्याची संयुगे लक्षवेधी प्रमाणात असतात. गंधकाची ऑक्साइडे अत्यंत क्षोभकारक असतात. हायड्रोजन सल्फाइड हा वायू तर विषारीच असतो. धुराड्यांतून निघणाऱ्या उत्सर्जनामुळे अनेक हायड्रोकार्बन संयुगे, ज्वलनामुळे निर्माण झालेली विविध संयुगे व हॅलोजनीकृत अनुजात (प्ल्युओरीन, ब्रोमीन, आयोडीन व क्लोरीन यांचा समावेश असलेली संयुगे) वातावरणात मिसळतात. मुख्यत्वेकरून ती वायुरूपात उत्सर्जित होत असली, तरी त्यांतील काही संयुगे घनरूप कणांच्या किंवा द्रवबिंदूच्या स्वरूपातही वातावरणात प्रवेश करतात. हायड्रोकार्बनापैकी काही संयुगांत कार्बन अणूंची षट्‌कोनी वलये किंवा पंचकोनी वलये तयार झालेली असतात. कार्बन अणू इतर मूलद्रव्यांच्या अणूंसहही बंद वलये तयार करून अनेक संयुगे निर्माण करू शकतात. धुराड्यांतून उत्सर्जित झालेल्या बहुवलयी ॲरोमॅटिक संयुगांमुळे दूषित झालेल्या हवेत राहणाऱ्या प्रायोगिक सस्तन प्राण्यांना कर्करोग जडल्याचे आढळून आले आहे. ह्या कर्करोगजनक संयुगांची वातावरणातील संहती वाढल्यास किंवा ती यथोचित प्रमाणाबाहेर गेल्यास त्याच वातावरणात वावरणाऱ्या मानवांनाही कर्करोगाची व्याधी जडू शकेल, हे उघड आहे. अनेक औद्योगिक प्रकल्पांच्या धुराड्यांतून अमोनिया आणि नायट्रोजनाची ऑक्साइडे फार मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. त्यांतील नायट्रोजन डाय-ऑक्साइड हवेत थोड्या प्रमाणात असले, तरी उपद्रवकारक व क्षोभकारक ठरते. नित्याच्या वातावरणीय प्रकाशसंश्लेषणात्मक विक्रियांत नायट्रोजनाची ऑक्साइडे कितपत उचित भाग घेतात यांवर त्यांचे प्रदूषणात्मक स्वरूप व प्रमाण ठरविण्यात येते. काही कारखान्यांच्या धुराड्यांतून किंवा मोटारगाड्यांतून कार्बनाने समृद्ध असलेल्या इंधनाच्या संपूर्ण किंवा अर्धवट ज्वलनक्रियेमुळे मोठ्या प्रमाणात अनुक्रमे कार्बन डाय-ऑक्साइड आणि कार्बन मोनॉक्साइड बाहेर पडून ते वातावरणात मिसळतात. मोटारींची संख्या प्रचंड असलेल्या कॅलिफोर्नियातील लॉस अँजेल्ससारख्या शहरात प्रति-दिनी एक कोटी किलोग्रॅम (सु. १०,००० टन) कार्बन मोनॉक्साईड हवेत मिसळतो त्यातील किमान ८०% कार्बन मोनॉक्साइडाचा भाग मोटारींतील पेट्रोलामधील कार्बनाच्या अपूर्ण ज्वलनामुळे उत्पन्न होतो. कार्बन डाय-ऑक्साइडाची संहती सह्य मर्यादेपेक्षा अधिक झाली, तर मानवी शरीरातील श्वसननियंत्रक यंत्रणा कोलमडते पण अशी दुर्घटना घडून येण्यासाठी वातावरणात विपुल प्रमाणात कार्बन डाय-ऑक्साइड असावा लागतो. जगात प्रत्यही औद्योगिकीकरण वाढत आहे आणि त्यासाठी अमाप कार्बनसमद्ध इंधन जाळण्यात येत आहे. दर २० वर्षांनी दुपटीने कार्बनी इंधन जाळले जाते, असा शास्त्रज्ञांनी अंदाज केला आहे. त्यामुळे पृथ्वीच्या वातावरणात अमाप प्रमाणात कार्बन डाय-ऑक्साइड वायू शिरला आहे. सौर प्रारणातील अवरक्त भागाची ऊर्जा कार्बन डाय-ऑक्साइड शोषून घेते. त्यामुळे वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइडाचे प्रमाण दुपटीने वाढले की, वातावरण अधिक तप्त होईल व पर्यायाने भूपृष्ठाचे तापमान ३·६° से. ने वाढेल. ध्रुव प्रदेशांवरील हिम वितळू लागेल, समुद्रपृष्ठाची पातळी वाढेल आणि जलवायुमानावर अपरिवर्तनीय विघातक परिणाम घडून येतील, असेही अंदाज व्यक्त केले गेले आहेत. कार्बन डाय-ऑक्साइडाच्या प्रमाणात बदल झाल्यामुळे भूवैज्ञानिक कालात पृथ्वीच्या जलवायुमानात अनेक स्थित्यंतरे झाली, हिमयुगे अवतरली व कालांतराने नाहीशी झाली असा एक सिद्धांत रूढ झाला आहेच. त्यामुळे हे अंदाज कदाचित खरे ठरण्याची शक्यता आहे. तथापि मानवनिर्मित उद्योगांमुळे व इंधन-ज्वलनामुळे जागतिक वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइडाची संहती दहा लाख भागांत फक्त १ किंवा २ भाग (किंवा सु. ०·०००२% पेक्षा कमी) या प्रमाणात वाढते. त्यातील काही भाग वनस्पतींच्या प्रकाशसंश्लेषणविक्रियेसाठी खर्ची पडतो. पृथ्वीच्या वातावरणात कार्बन डाय-ऑक्साइडाचे एकंदर प्रमाण दहा लाख भागांत ३०० भाग (किंवा ०·०३%) असल्यामुळे मानवी व्यवहारामुळे वातावरणात प्रतिवर्षी शिरणाऱ्या कार्बन डाय-ऑक्साइडाची भर अत्यल्प किंवा नगण्य अशीच ठरते. ह्या अधिक कार्बन डाय-ऑक्साइडाचा उपयोग सागरी व जमिनीवरील वनस्पती स्वपोषणासाठी व स्वसंवर्धनासाठी सहजगत्या करून घेऊन परिस्थितिवैज्ञानिक संतुलन साधू शकतील. त्यामुळे कार्बन डाय-ऑक्साइड हा वायू मोठ्या प्रमाणात आपत्तिमूलक प्रदूषक ठरू शकत नाही. ह्या बाबतीत अधिक संशोधनाची आवश्यकता आहे. मोटारींनी बाहेर टाकलेला किंवा अर्धवट जळलेल्या इंधनामुळे हवेत शिरणारा कार्बन मोनॉक्साइड हा वायू मात्र अल्प प्रमाणात असला, तरी प्राथमिक स्वरूपाचा प्रदूषक ठरू शकतो. रक्तातील हीमोग्लोबिनाची ऑक्सिजन पसरविण्याची क्षमता कार्बन मोनॉक्साइड निष्प्रभ करू शकतो. मोठ्या शहरांतील सु. ६०% वातावरणीय प्रदूषण मोटारींमुळे निर्माण होते.

धातुकर्म करणाऱ्या कारखान्यांतून व इतर विविध प्रकारच्या औद्योगिक प्रकल्पांतून हॅलोजन असलेली अनेक अकार्बनी संयुगे तयार होतात. त्यांतील हायड्रोजन फ्ल्युओराइडे व हायड्रोजन क्लोराइड ही द्रव्ये स्वभावतःच क्षोभकारक व क्षरणकारी असतात. काही धातवीय फ्ल्युओराइडे विषारी असतात. त्यामुळे अशा कारखान्यांच्या जवळपासच्या पिकांना व गुराढोरांना हानी पोहोचलेली आहे. अणुकेंद्रीय ऊर्जानिर्मितीची केंद्रे आणि अणुऊर्जा संशोधन प्रयोगशाळा यांची संख्या सापेक्षतः अद्याप कमी असल्यामुळे तज्जन्य प्रदूषणाच्या समस्येने अजून तीव्र स्वरूप धारण केलेले नाही. तथापि दिवसेंदिवस अणुऊर्जेचा वापर व अणुऊर्जानिर्मिती केंद्रांची संख्या वाढत असल्यामुळे निकटच्या भविष्यात किरणोत्सर्गी प्रदूषणाची समस्या उग्रतर होणार यात शंका नाही.


 दुय्यम वातावरणीय प्रदूषके : कोणत्याही शहरांवरून किंवा दाट लोकवस्ती असलेल्या क्षेत्रांवरून भ्रमण करणाऱ्या प्रदूषक वस्तुकणांनी भारावलेल्या वायुराशी रासायनिक व भौतिक दृष्ट्या अस्थिर असतात. त्यांत अनेक क्रिया-विक्रिया प्रत्यही घडून येतात व त्यांची परिणती दुय्यम वातावरणीय प्रदूषके निर्माण करण्यात होते. ह्या विक्रियांची त्वरा, मार्ग, त्यांतून निर्माण होणारी मध्यस्थ संयुगे व अंतिम प्रदूषके यांच्यावर विक्रिया घटकांची संहती, प्रकाश-सक्रियण (प्रकाशाच्या प्रभावाने उत्तेजित होण्याची क्रिया), वातावरणविज्ञानीय प्रेरणा व वातावरणीय आविष्कार, स्थानिक भूमिस्वरूप, तापमान व आर्द्रतेचे सापेक्ष प्रमाण इत्यादिकांचा प्रभाव पडतो. या विक्रियांमुळे हवेतील सल्फर डाय-ऑक्साइडापासून शेवटी काही सल्फेटे (मुख्यत्वे अमोनियम सल्फेट) तयार होणे किंवा त्याच हवेतील नायट्रोजन डाय-ऑक्साइडापासून नायट्रिक ऑक्साइड व मुक्त ऑक्सिजन मूलके (मुक्त मूलक म्हणजे ज्यात कमीत कमी एक जोडीरहित इलेक्ट्रॉन आहे असा व काही विशिष्ट परिस्थितीत मुक्त स्वरूपात अस्तित्वात असू शकणारा अणू वा द्विआणवीय किंवा बहुआणवीय रेणू) तयार होणे या घटना महत्त्वाच्या आहेत. दुय्यम विक्रियांमुळे अस्तित्वात येणारे वस्तुकण मुक्त मूलक विक्रियांची एक वेगळी शृंखला सुरू करतात. ती अविरतपणे चालू राहिल्यास दुय्यम वातावरणीय प्रदूषकांची सातत्याने निर्मिती होते. त्यांच्यावर कोणत्याच प्रकारचे नियंत्रण ठेवणे सहजासहजी शक्यनसते. दुय्यम वातावरणीय प्रदूषकांत ओझोन, फॉर्माल्डिहाइड, कार्बनी हायड्रोपर-ऑक्साइडे आणि इतर अत्यंत विक्रियाशील संयुगे व मुक्त मूलके यांसारखी प्रदूषके सामाविलेली असतात.

परिणाम : न्यूयॉर्क येथे करण्यात आलेल्या संशोधनांती कार्बन मोनॉक्साइड व काही वस्तुकणांचे हवेतील प्रमाण विशिष्ट मर्यादेबाहेर वाढले, तर ८ वर्षांच्या आतील मुलांमध्ये श्वसनविकृतीची लक्षणे दिसून आली आणि सतत धूम्रपानाची सवय असलेल्या माणसांना डोळ्यांची जळजळ आणि डोकेदुखीसारखे विकार जडल्याचे आढळून आले. वातावरणीय प्रदूषणामुळे चिरकारी (दीर्घकालीन) श्वासनलिकादाह, वायुकोशविस्फार (फुप्फुसातील वायुकोश मोठे होऊन फुटल्यामुळे वायुकोशांच्या मधल्या भागांतील कोशिकासमूहांत हवा शिरणे) व फुप्फुसांचा कर्करोग हे विकार जडण्याची शक्यता असते.

हृदयविकाराने पछाडलेल्या रूग्णांचे मृत्यूचे प्रमाण सधूम धुक्यांची वारंवारता अधिक असलेल्या क्षेत्रात अधिक असते. लॉस अँजेल्समध्ये १९५८ साली सधूम धुक्यांची संख्या अधिक असलेल्या क्षेत्रातील रूग्णालयांत आलेल्या हृदयरुग्णांपैकी २७·३% रुग्ण मृत्यु पावले. तर त्याच कालावघीत सधूम धुक्यांची संख्या कमी असलेल्या क्षेत्रातील रुग्णालयांत फक्त १९·१% हृदयरुग्ण दगावले. विपुल मोटारी असलेल्या लॉस अँजेल्ससारख्या शहरात वाढत्या प्रदूषणांबरोबरच मोटारींच्या अपघातांचीही संख्या वाढते, असे आढळले आहे. सल्फर डाय-ऑक्साइडासारख्या प्रदूषकाचे हवेतील प्रमाण ६०० ते ३,००० मायक्रोग्रॅम/मी. (दहा लाख भागांत सु. ०·२ ते १ भाग) असले, तर वनस्पतींचा विनाश होतो आणि हेच प्रमाण १,१००-२,८०० मायक्रोग्रॅम/मी. (किंवा हवेच्या दहा लाख भागांत सु. ०·४-१ भाग) वाढले, तर मानवांना दीर्घावधीचे असाध्य आजार जडतात व परिणामी मृत्यूचा धोका संभवतो, असे नेदर्लंड्समध्ये झालेल्या एका संशोधनात दिसून आले. वातावरणीय प्रदूषणामुळे अनेकदा मानवाचे सामाजिक जीवन व व्यवहार विस्कळीत होतात, करमणुकीचे कार्यक्रम स्थगित करावे लागतात व नागरी लोकसमूहांचे स्थलांतर करावे लागते.

वातावरणात भ्रमण करणाऱ्या प्रदूषकांमुळे जनावरांचा चारा व दाणावैरण दूषित होतात. काही औद्योगिक कारख्यान्यांतून निघणारी फ्ल्युओराइडे व आर्सेनिकाची संयुगे लगतच्या परिसरात राहणाऱ्या जनावरांच्या विनाशास कारणीभूत झाली आहेत. हवेतील प्रदूषकांमुळे वनस्पतींचा विकास खुंटतो. पाइनसारख्या झाडांना व अल्फाल्फासारख्या पिकांना शाकीय कालात हवेतील सल्फर डाय-ऑक्साइडामुळे मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचल्याचे आढळले आहे. हायड्रोजन फ्ल्युओराइड व नायट्रोजन डाय-ऑक्साइड या दोन्ही प्रदूषकांचे हवेतील प्रमाण वाढले असता मध्य फ्लॉरिडातील लिंबू वंशातील (सिट्रस) झाडांना अपाय होऊन त्यांची उत्पादनक्षमता मंदावल्याचे सिद्ध झाले आहे. शोभिवंत वनस्पतींनाही ह्या दोन द्रव्यांमुळे इजा पोहोचते. काही कारखान्यांतून हवेत फेकल्या जाणाऱ्या ओझोन व एथिलीन या वायूंमुळे अनेक जातींच्या वनस्पती नाश पावतात. वातावरणीय प्रदूषकांमुळे लोखंडाच्या आणि ॲल्युमिनियम, चांदी, तांबे, निकेल व जस्त यांसारख्या लोहेतर धातूंच्या वस्तूंची झीज होते इमारती सामान, चर्मवस्तू, रंग, कागदी वस्तू, दुर्मिळ ग्रंथ, चित्रे व पुस्तके, उंची कपडे, रबराच्या व चिनी मातीच्या वस्तू, मृत्तिकाशिल्पे, संगमरवरी पुतळे यांचेही हळूहळू क्षरण होते.

वातावरणीय प्रदूषणाचे हवामानावरही निरनिराळ्या प्रकारचे परिणाम होतात. औद्योगिक धुरामुळे दृश्यमानता मंदावते. पृथ्वीला सूर्यापासून मिळणाऱ्या प्रारणात घट होते. सधूम धुक्यांची संख्या व धुक्यांचा कालावधी वाढतो. वातावरणीय प्रदूषकांत आर्द्रताग्राहीसंद्रवण केंद्रे (आर्द्रता शोषून घेणारे व त्यामुळे जलबाष्पाचे द्रवरूपात अवस्थांतर करणारे कण) अधिक संख्येने असल्यास औद्योगिक परिसरातील पर्जन्यात वाढ होऊ शकते. इंडियानामधील गेअरी येथील धातुकर्म करणाऱ्या ओतशाळांतून उत्सर्जित होणाऱ्या वायुकलिलांतील अनेक संद्रवण केंद्रांमुळे प्रचलित वाऱ्यांच्या दिशेने खाली काही अंतरावर बसलेल्या ला पॉर्ट या ठिकाणच्या स्थानिक पर्जन्यात आणि पर्जन्यत्वरेत लक्षवेधी प्रमाणात वाढ झाल्याचे सांगण्यात येते. काही ठिकाणी (उदा नॉर्वेत व अमेरिकेत फ्लॉरिडाच्या उत्तरेस) पडणाऱ्या पावसात व हिमात सल्फूरिक अम्ल व नायट्रिक अम्ल यांचे प्रमाण सु. ५० पट वाढल्याचे आढळून आले असून जलाशयांतील व जमिनीवरील जीवसृष्टीवर या अम्लयुक्त वर्षणाचा विपरित परिणाम होत आहे.

वातावरणीय प्रदूषणजन्य दुर्घटना : वातवरणीय प्रदूषणामुळे अनेक दुर्घटना उद्‌भवल्या आहेत व त्यांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. बेल्जियममधील सरँ आणि वी या शहरांमधून वाहणाऱ्या म्यूज नदीच्या खोऱ्यातील टेकड्यांनी वेढलेल्या क्षेत्रात प्रदूषणजन्य पहिली दुर्घटना १९३० साली घडून आली. या क्षेत्रात अनेक पोलादाचे कारखाने, काचकामाचे कारखाने, ऊर्जानिर्मिती केंद्रे, चुन्याच्या भट्ट्या, सल्फ्यूरिक अम्ल तयार करणारा, रासायनिक खते बनविणारा कारखाना, कोळशापासून कोक तयार करणारे कारखाने, जस्त शुद्ध करणारे कारखाने असे विविध प्रकारचे प्रकल्प उभारलेले होते. येथील सर्व  इमारतीना कोळसा जाळूनच उष्णता पुरविण्यात येत असे.  या क्षेत्रात १ त ५ डिसेंबर १९३० च्या कालावधीत अनेक लोक एकाएकी आजारी झाले. त्यांतील ६० लोक मृत्युमुखी पडले. ह्यांत ज्यांना पूर्वींच हृदयाचे किंवा फुप्फुसाचे विकार जडले होते अशा वयस्क लोकांचाच जास्त भरणा होता. श्वासनलिकादाह, छातीत कळा येणे, खोकला, श्वसनरोध, डोळ्यांची जळजळ, श्लेष्मकलेचा (श्वासनलिका, आतडे इत्यादींसारख्या नलिकाकार पोकळ्यांच्या बुळबुळीत अस्तराचा) दाह यांसारख्या व्याधींनीच बहुसंख्य रुग्ण पछाडले गेले होते. अनेक कारखान्यांतून केवळ योगायोगाने एकाच वेळी उत्सर्जित झालेल्या प्रदूषकांनीच हे प्रदूषण निर्माण केले होते. त्यातच तीव्र हिवाळ्यात इमारतींना अधिक उष्णता पुरविण्यासाठी अधिक जाळलेल्या कोळशाच्या धुराची भर पडली. ह्या दुर्घटनेनंतर तेथील प्रदूषित हवेचे विश्लेषण केल्यानतर असे आढळून आले की, दुर्घटनेच्या वेळी स्थानिक वातावरणात ३० पेक्षा अधिक प्रदूषक घटक होते आणि त्यांपैकी गंधकाच्या बहुविध संयुगांच्या कणांमुळेच मोठ्या प्रमाणावर जीवितहानी घडून आली होती.

 दुसरी प्रसिद्ध दुर्घटना पॅसाडीनामधील डनॉरा येथे २७ ते ३१ ऑक्टोबर १९४८ या कालावधीत घडून आली. या दुर्घटनेत ६,००० माणसे आजारी झाली व त्यांतील २० माणसे दगावली. चारही बाजूंनी टेकड्या असलेल्या मध्यवर्ती द्रोणीत येथील औद्योगिक केंद्र वसले आहे. दुर्घटनेपूर्वी स्थानिक वातावरणात तापापवर्तन (हवेत उंचीप्रमाणे तापमान कमी न होता ते वाढणे) निर्माण झाले, ऊर्ध्व प्रवाह नसल्यामुळे हवा त्या द्रोणीतच साचून दीर्घ कालपर्यंत बंदिस्त अवस्थेत राहिली. ह्याच वेळी अनेक औद्योगिक प्रकल्पांच्या धुराड्यांतून निघालेली अनेकविध प्रदूषके त्या बंदिस्त हवेत मिसळली व त्यांनी स्थानिक वातावरण प्रमाणाबाहेर प्रदूषित केले. दुर्घटनेच्यावेळी सल्फर डाय-ऑक्साइडाचे ऑक्सिडीकरण झाल्यामुळे जी अनेक संयुगे तयार झाली त्यांच्या प्रभावाने व काही घनरूप विषारी कणांमुळे डनॉराचे प्रदूषण बव्हंशाने तीव्रतर झाले असले, तरी अनेक प्रदूषकांमधील परस्पर क्रियाविक्रिया किंवा विविध घटकांच्या वैयक्तिक प्रभावांची गोळाबेरीज यांनी ही प्रदूषणाची समस्या अधिक गंभीर व आपत्तिमूलक केली, असे सिद्ध झाले. 


तिसरी दुर्घटना मेक्सिकोमधील पोझा रीका दे हिदॅल्गो येथे २४ नोव्हेंवर १९५० रोजी घडली. तीत २२ माणसे मृत्युमूखी पडली,तर ३२० माणसांना ताबडतोब रुग्णालयात पाठविण्यात आले. खनिज तेल शुद्ध करण्याच्या उद्देशाने त्यातील सल्फर काढून टाकणारे उपकरण २१ नोव्हेंवर १९५० रोजी सुरू करण्यात आले व २४ तारखेला सकाळी ४ वाजल्यापासून त्या उपकरणातून हायड्रोजन सल्फाइड वायू निसटून वातावरणात पसरू लावला.ह्या वेळीही स्थानिक वातावरणात तापापवर्तन निर्माण झाले होते. हवा बंदिस्त अवस्थेत होती. हायड्रोजन सल्फाइड वायूचे प्रमाण सारखे वाढतच होते. सकाळी ४·५० पासून माणसे पटापटा आजारी पडू लागली. ५·१० वाजेपर्यंत सर्व अपप्रकार समजून आला व तातडीने उपाय अंमलात आणले गेले.

सर्वांत भीषण दुर्घटना लंडन शहरात ५ ते ९ डिसेंबर १९५२ या कालावधीत घडून आली. ब्रिटिश बेटांवर सर्वत्र दाट धुके पसरलेले होते. भूपृष्ठालगतच्या वातावरणात तापापवर्तन निर्माण झाले होते. त्या हवेत अनेक प्रदूषणात्मक घटक वाढत्या प्रमाणात शिरू लागले. तसतशी बृहत् लंडन भागातील माणसे आजारी पडू लागली. पुढील ३० दिवसांत ४,००० पेक्षा अधिक माणसे मृत्युमुखी पडली. मृत्यू पावलेल्या माणसांत ६० ते ७० वर्षे वय असलेल्यांचाच भरणा अधिक होता. ज्यांना हृदयाचे व श्वसनांगाचे विकार जडले होते असे ८० टक्के लोक त्यात होते. या धुक्याने सु. १,२०० चौ. किमी. क्षेत्र प्रभावित केले होते. हे धुक्के १५० मी. उंचीपर्यत पोहोचले होते. धुक्याच्या कालात प्रतिदिनी २,००० टन सल्फर डाय-ऑक्साइड व अर्धज्वलित इंधनामुळे व मोटारीमुळे सु. ८,००० टन कार्बन मोनॉक्साइड हवेत शिरत असे. वैद्यकीय विश्लेषणानंतर ह्या दुर्घटनेतील प्रचंड प्रमाणावरील मृत्युसंख्यचे कारण हवेत निर्माण झालेले सल्फ्यूरिक अम्ल व त्यामुळे उद्‌भवलेला श्वासनलिकादाह हे होते. अशा प्रकारच्या दुर्घटना लंडन शहरातच १९६२ पर्यत अनेकदा व टोकिओ, लॉस अँजेल्स इ. शहरांतही घडल्या आहेत.

बंद जागांतील वातावरणीय प्रदूषण : राहती घरे, कारखाने, कार्यालये, चित्रपटगृहे व अवकाशयाने यांसारख्या बंद जागांत प्रदूषके शिरून प्रदूषण निर्माण करू शकतात. काही विषारी बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणारे) द्रव पदार्थ व काही विषारी वायू बंदिस्त व सीमित असलेल्या क्षेत्रातील हवेत शिरल्यास त्वरेने ती हवा विषाक्त किंवा प्रदूषित होते. घन पदार्थाचाही कोणत्याही वातावरणीय तापमानाला अनुसरून अल्प पण मापनीय असा बाष्पदाब असतो. हा पदार्थ जर विषारी असेल, तर समाधानकारक वायुवीजनाची (हवा खेळती ठेवण्याची) सोय नसलेल्या सीमित व बंद जागेतील हवेत कालांतराने प्रदूषणात्मक गंभीर समस्या उत्पन्न होऊ शकते. अशा खोल्या किंवा दालने उबदार ठेवण्यासाठी जर जीवाश्मी इंधन जाळण्यात येत असले, तर अल्पावकाशात त्या क्षेत्रातील हवा धोक्याची पातळी गाठण्याइतकी प्रदूषित होऊ शकते. राहत्या घरात किंवा औद्योगिक क्षेत्रात साधारणपणे अनेक रासायनिक द्रव्ये व साधने-उपकरणे वापरात आणली जातात. त्यांच्यापासून निघणारे व बंदिस्त हवेत पसरणारे अनेक प्रकारचे कण हे भावी प्रदूषकच होत. रासायनिक कारखान्यात विषाक्त कण पसरविणारा एखादा अपघात झाल्यास तेथे वावरणाऱ्या लोकांना या कणांमुळे एकाएकी बेशुद्ध पडण्याचा किंवा दीर्घावधीचे आजार जडण्याचा धोका वाढतो.औद्योगिक क्षेत्रातील बंद जागेत प्रदूषक कणांची संहती किती असावी व त्याचे नियंत्रण कसे करावे, याबद्दल फार उपयुक्त व मार्गदर्शी संशोधन झाले आहे.

जेथे ऊर्जानिर्मिती होते किंवा ऊर्जा उपयोगात आणली जाते किंवा तिचे स्थित्यंतर होते त्या परिसरात काही पदार्थ, उप-पदार्थ वअपशिष्टे यांचे सूक्ष्म कण किंवा ऊर्जा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीत्या वातावरणात निसटते. अशा हवेत भ्रमण करणारे काही विषारी कण औद्योगिक परिसरातील कामगारांच्या प्रकृतीवर विघातक परिणाम करु शकतात. हा परिणाम प्रदूषण निर्माण करणाऱ्या कणांच्या संख्येवर किंवा संहतीवर आणि कामगार त्या परिसरात दिवसाचा किती वेळ, किती वर्षे घालवितात यांवर अवलंबून असतो. त्यामुळे काही विशिष्ट व्यवसायांशी विशिष्ट रोगांची मालिकाच निगडित झालेली असते. त्याचा नीट अभ्यास करून मानवी अनुभव जमेस धरुन, विविध कणांच्या बाबतीत मिळणाऱ्या शरीरक्रियात्मक प्रतिसादांचे मापन करून, त्या कणांची विषाक्तता पारखून व प्रायोगिक जनावरांवर प्रयोग करून अनेक देशांची औद्योगिक प्रदूषकांच्या परिणामांच्या व त्यांच्या सह्य मर्यादांच्या याद्या केल्या आहेत. अमेरिकेतील शासकीय औद्योगिक आरोग्यविज्ञान परिषदेने केलेली कामगारांच्या आरोग्यास बाधक असलेल्या ३२० पदार्थांची यादी सध्या सर्वत्र प्रमाणभूत धरली जाते. तीत अनेक वायू, अनेक पदार्थांचे बाष्प, त्यांचा धूर, धूलिकण व धूम्रपटले यांचा समावेश आहे. अमेरिकेत सर्वसाधारणपणे  कामगार प्रत्येक दिवशी ८ तास असे एका आठवड्यातून ५ दिवस त्या परिसरात काम करतो, असे ही यादी करताना गृहीत धरले आहे. जोपर्यत प्रदूषणकारी पर्दाथाची हवेतील संहती सह्य मर्यादांपेक्षा अधिक होत नाही तोपर्यत त्या परिसरात अनेक वर्षे वावरणाऱ्या कामगारांच्या आरोग्यात कोणत्याही प्रकारचा बिघाड होणार नाही, असा त्या यादीचा अर्थ आहे. काही पदार्थांच्या बाष्पाची वा धुळीच्या कणांची हवेतील सह्य संहती कोष्टक क्र. १ मध्ये दिली आहे.

 अशा याद्यांत दिलेल्या संहतीच्या सह्य मर्यादा फक्त एकाच विशिष्ट प्रकारच्या प्रदूषकापुरत्या असतात. तथापि एकाच औद्योगिक क्षेत्रात अनेक प्रकारचे प्रदूषणकारी कण एकाच वेळी असू शकतात. अशा वेळी प्रत्येक

कोष्टक क्र. १. काही पदार्थांच्या बाष्पाची वा धुळीच्या कणांची हवेतील सह्य संहती

हवेतील संहतीची सह्य मर्यादा

पदार्थकण

हवेच्या दशलक्ष भागांतील बाष्परूप पदार्थांचे भाग

एक घ. मी. हवेतील बाष्परूप पदार्थ (मिग्रॅ.)

एक घ. मी. हवेतील पदार्थांची कणसंख्या (दशलक्षामध्ये)

ॲसिटोन

५००

१,२००

बेंझीन

२५

८०

कार्बन मोनॉक्साइड

५०

५५

एथिल अल्कोहॉल

७५०

१,४००

हायड्रोजन सल्फाइड

२०

३०

पारा

३०

ओझोन

०·१

०·२

झिंक ऑक्साइडाचे बाष्प

ॲस्बेस्टसाची धूळ

१७५

संगजिऱ्याची धूळ

७००

पोर्टलंड सिमेंटची धूळ

१,७५०

प्रदूषकाचा वैयक्तिक परिणाम जमेस न धरता त्या सर्वांचे संमिश्र परिणाम काय होतील हे प्रथम पहाणे इष्ट ठरेल. हे परिणाम कदाचित सर्वथैव अनपेक्षित असू शकतील. शिवाय औद्योगिक कामगार आठवड्यातील फक्त ४० तास प्रदूषित परिसरात वावरतो, हे गृहीत धरुनच अशी कोष्टके तयार केलेली असतात, पण कधीकधीकाही कामगारांना विशिष्ट कामांसाठी प्रदूषकांनी भारावलेल्या वातावरणात अनेक तास घालवावे लागतात. अशा वेळी हवेत प्रदूषक कणांची संख्या अधिकतम असते व बहुसंख्य दुर्घटना या वेळीच घडून येतात.

 ध्वनि-प्रदूषण : मानवाच्या औद्योगिक प्रगतीने जसे जीवावरण, मृत्तिकावरण, जलावरण व वातावरण प्रदूषित करून जी अनेक संकटे निर्माण केली त्यात ध्वनि-प्रदूषणाचेही संकट निर्माण केले आहे. विशेषतः शहरी जीवनाला ह्या संकटामुळे उपद्रव होतो. शहरवासीयांच्या अनेकविध व्यवहारामुळे असंख्य प्रकारचे आवाज निर्माण होतात. विमाने, आगगाड्या, विविध प्रकारच्या मोटारगाड्या, मोटार सायकली, स्कूटर, ट्रॅम यांसारखी वाहने इमारतींच्या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या यांत्रिक हातोड्या व क्राँक्रीट मिश्रक यंत्रे, बुलडोझर, सुतारकाम व लोहारकाम करणाऱ्यांची यंत्रे, कारखान्यांतील विविध प्रकारची यंत्रे, गिरण्यांचे भोंगे, कार्यालयातील टंकलेखन यंत्रे, रेडिओ ध्वनिक्षेपक (लाउडस्पीकर), रस्त्यावरील लोक व फेरीवाले यांसारखे शहरी घटक सातत्याने गोंगाट निर्माण करीत असतात. या गोंगाटामुळे कित्येक शहरवासीयांचा मानसिक तोल कोलमोडतो, मनस्ताप वाढतो, पुष्कळांना हृदयविकार जडतो, श्रवणेंद्रिये बधिर होतात व परिणामी काही वर्षांनी माणूस पूर्णपणे बहीरा होतो. सतत गोंगाटी वातावरणात राहिल्यामुळे माणसांना मज्जाविकृती, विषष्णता, उद्वेग, भावनाविभंग, क्षोभ, सर्वसामान्य चिंता, मनोवृत्तीतील लहरी बदल, उच्च रक्तदाब, मळमळ, तीव्र डोकेदुखी, ग्रहणी व्रण (लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागात होणारे व्रण) किंवा क्षते, पोटशूळ, दमा, निद्रानाश, ॲलर्जी, नपुंसकता यांसारखे बव्हंशी असाध्य मानसिक वा शरीरक्रियात्मक विकार जडतात. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील अनेक शहरांतील ध्वनीची तीव्रता व महत्ता दर दहा वर्षांनी दुप्पट अशा त्वरेने वाढत आहे.गोंगाट प्रतिदिनी सारखा वाढत आहे गेल्या तीस वर्षांत तो ज्या प्रमाणात वाढला त्याच प्रमाणात तो वाढत राहिला, तर पुढील तीस वर्षांत गोंगाट प्राणघातक ठरू शकेल, अशी  धोक्याची सूचना कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधक व्हर्न नूडसेन यांनी अनेक प्रयोगानंतर केली आहे. प्रयोगशाळेत ठेवलेल्या उंदराचा १७५ डेसिबेल तीव्रतेच्या आवाजामुळे मृत्यू ओढवतो, असे निश्चितपणे आढळून आले आहे. 


८० डेसिबेल तीव्रतेचा आवाज होत असलेल्या कारखान्याच्या परिसरात दोन वर्षापेक्षा अधिक काळ किंवा १०० डेसिबेल तीव्रतेच्या आवाजाच्या परिसरात काही आठवडे राहिल्यास आणि कानांना योग्य संरक्षण न मिळाल्यास अशा कारखान्यातील कामगार शेवटी बहिरे होतात. त्यांना हदयविकार व नाक, कान आणि घसा यांचे विकार अधिक प्रमाणात होतात. विमानतळावरील जेट विमानाचे ११५ डेसिबेलपेक्षा अधिक तीव्रतेने आवाज १५ मिनिटांनंतरच आपत्तिमूलक ठरतात. स्वनातीत विमाने आवाजाचा वेग पार करताना वातावरणात आघात तरंग निर्माण करून १४० डेसिबेलपेक्षा अधिक तीव्रतेचा आवाज उत्पन्न करतात. अशा विमानांनीही ध्वनि-प्रदूषणाचा धोका वाढविला आहे. हृदयविकार, रक्तदोष इत्यादींनी ग्रस्त झालेलीमाणसे सातत्याने चालू असलेल्या गोंगाटामुळे दुर्बल, चिडखोर बनतात. अनपेक्षितपणे कर्कश, कर्णकटू आवाज कानांवर आदळल्यास माणसाची बुबुळे विस्फारतात, त्वचा निस्तेज व रक्तहीन होते, श्लेष्मल पटलांचे निश्चरण होते, आतडी अधूनमधून आवळली जाऊन पोटात कळा येतात, रक्तातील कोलेस्टेरॉलाचे प्रमाण वाढते, रक्तवाहिन्यांचे संकोचन होते., स्थायू आकुंचन पावून ताठर बनतात आणि ॲड्रेनॅलीन नावाचे हॉर्मोन (उत्तेजक स्राव) शरीरात त्वरेने उत्सर्जित होऊन रक्तप्रवाहात मिसळते. त्यामुळे शरीरातील यंत्रणेवर विघातक परिणाम होऊन मानसिक विक्षोभ व ताण निर्माण होतात.

सध्या महानगरे विराट स्वरूप धारण करीत आहेत. गोंगाटही त्याच प्रमाणात वाढत आहे. भारतातील मुंबईसारख्या शहरात गोंगाटाची उच्चतम तीव्रता १९७२ मध्ये दिवसा १०१ ते १०४ डेसिबेल आणि रात्री ९३ ते ९८ डेसिबेल अशी होती. दिल्ली शहरात गजबलेल्या भागात गोंगाटाची उच्चतम तीव्रता दिवसा ९८ डेसिबेल व रात्री ८९ डेसिबेल अशी होती. शहरातील गोंगाट कमी करणे अत्यंत महत्वाचे आहे. ‘मोठमोठ्या शहरांतील गोंगाट प्रतिवर्षी १ डेसिबेल या प्रमाणात वाढत राहिला, तर विसाव्या शतकाच्या अखेरीला तो १५० डेसिबेलची मर्यादा गाठील आणि त्यामुळे शहरातील सर्व माणसे बहिरी होतील,’ असे भाकित १९७१ साली जिनीव्हा येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय शास्रीय परिषदेत केले गेले. [⟶ गोंगाट].

प्रारणीय प्रदूषण : अनेक मानवी व्यवहारांत प्रारणनिर्मिती अटळ असते. वैद्यकीय चिकित्सेसाठी क्ष-किरण निर्माण करावे लागतात कर्करोगाच्या काही प्रकारांवर उपचार करण्यासाठी विशिष्ट किरणोत्सर्गी पदार्थांपासून उत्सर्जित होणारे प्रारण वापरावे लागते. रडार, दूरचित्रवाणी, रेडिओ व इतर विविध प्रकारची इलेक्ट्रॉनीय उपकरणे वापरण्यासाठी प्रारणनिर्मीती आवश्यक असते. शास्त्रीय संशोधनातही विविध प्रकारच्या प्रारणांचा उपयोग अटळ असतो. मानवनिर्मीत आयनीकारक प्रारणातील ९४ टक्के प्रारण वैद्यक व्यवसायात वापरले जाते. सर्वसाधारणपणे अनेक प्रकारांच्या प्रारणांनी प्रभावित झालेल्या वातावरणांशी सर्वानाच सामना द्यावा लागतो. वैद्यक व्यवसायासाठी निर्माण केलेले प्रारण सर्वव्यापी प्रारणाच्या ३० टक्क्यांपर्यत असू शकते. मानवनिर्मित आयनीकारक प्रारणाचे प्रमाण वाढले की, प्रारणीय प्रदूषण उद्‌भवते. अशा प्रदूषित वातावरणात माणूस फार वेळ राहिल्यास त्याला रक्तार्बुद किंवा श्वेतकोशिकार्बुद (रक्ताचा कर्करोग) किंवा इतर प्रकारचे कर्करोग जडतात. अशा प्रारणामुळे आनुवंशिकतेच्या दृष्टीने काही विघातक परिणाम घडून येणे किंवा काही जननिक घटकांचे उत्परिवर्तन (वारसारूपाने संततीत उतरू शकणाऱ्या वैशिष्ट्यात बदल होणे) शक्य असते. [⟶ प्रारण जीवविज्ञान].

 किरणोत्सर्गी अपशिष्टांमुळे उद्‍भवणाऱ्या धोक्याचे व पर्यायाने प्रारणीय प्रदूषणाचे प्रमाण सध्या जरी अल्प असले, तरी निकटच्या भविष्यात अणुऊर्जेच्या वाढत्या वापरामुळे ते लवकरच धोक्याची पातळी गाठेल, यात शंका नाही. सध्या विविध मार्गांनी जरी अशा प्रारणशील अपशिष्टांची विल्हेवाट लावण्यात येत असली, तरी त्यांच्यापासून उद्‌भवणारा धोका भविष्यात तीव्रतर होणार आहे. ह्या अपशिष्टांची किरणोत्सर्गक्षमता उच्च पातळीची असते व त्यांचा अर्धायुकालही दीर्घ असतो. उत्तरोत्तर ह्या अपशिष्टांचे आकारमान वाढतच जाणार असल्यामुळे ती कोठेही टाकली किंवा बंदिस्त करून ठेवली, तरी त्याच्यामुळे परिसरात निर्माण होणारा धोका चिरकालीन स्वरूपाचा व वाढत्या प्रमाणात राहील, हे उघड आहे.

प्रदूषणाचे इतर किरकोळ प्रकार: माणूस सातत्याने सौंदर्याच्या शोधात असतो. आपल्या जीवनात, आचारात, विचारांत व परिसरात सौंदर्य आणण्याचा तो नित्य प्रयत्‍न करीत असतो. सुंदरशहरे, सुंदर इमारती, सुशोभित रस्ते, उद्याने त्याला बघायला आवडते. केवळ नाविन्याची हौस भागविणाऱ्या ओबडधोबड किंवा तऱ्हेवाईक इमारती वास्तुशिल्पीय प्रदूषण निर्माण करतात. विद्युत ऊर्जा वाहून नेणाऱ्या खांबांवरील तारा, दूरध्वनीच्या तारांची जाळी, निऑनच्या दिव्यांच्या लखलखीत जाहिराती, भडक भित्तिपत्रके, मुख्य रस्त्याच्या जवळ असलेल्या बंगल्यांच्या किंवा इमारतींच्या आवारांच्या भिंतीची शोभा वाढविण्याचे ओंगळ प्रयत्‍न यांसारख्या गोष्टी सौंदर्यसक्त दृष्टिसुखाच्या आड येतात. त्यामुळे दृश्य प्रदूषण उद्‌भवते. कोणत्याही द्रव्यांशी किंवा भौतिक वस्तूंशी त्याचा संबंध नसतो.

जगातील मोठमोठ्या शहरांत रात्रीच्या वेळी सर्वत्र दीप्तिमान दिव्यांचा झगझगाट केलेला असतो. रस्त्यांतील तेजस्वी दिवे, जाहिरातींसाठी वापण्यात येणारे निऑन-नलिकांचे विविध आकाराचे चित्रविचित्र दिवे, अधूनमधून उघडझाप करणारे दिवे व अनेक प्रकारचे संकेत दिवे यांच्यापासून निघणाऱ्या प्रकाशामूळे ‘प्रकाशीय प्रदूषण’ निर्माण होते. प्रकाशीय प्रदूषणाचा वातावरणीय प्रदूषणाशी फार निकटचा संबंध असतो. हवेत पुरेशा संख्येने धूलिकण व इतर प्रकारचे सूक्ष्म वस्तुकण असल्यास दीप्तिमान प्रकाशातील जंबुपार भागाचे प्रकीर्णन होते. त्यामुळे क्षितिज उजळून निघते व ज्योतिर्विदांच्या संशोधनकार्यात व्यत्यत येतो. शहरांपासून ३०-५० किमी. अंतरावर खगोलीय  वेधशाळांची स्थापना केली, तरी रात्रीच्या शहरी प्रकाशामुळे खगोलीय अभ्यासात व संशोधनात अडथळे निर्माण होतातच. खगोलीय दुर्बिणी रात्री २०० कोटी किमी. अंतरावर असलेल्या ताऱ्यांचा क्षीण प्रकाश टिपून घेऊ शकतात. शहरी प्रकाशाची तीव्रता अधिक असल्यास दूरस्थ ताऱ्यांपासून निघालेला प्रकाश टिपण्यास त्या दुर्बिणी असमर्थ ठरतात. ताऱ्यांपासून निघालेल्या प्रकाशाची तरंगलाबी आणि शहरांतील प्रमुख रस्त्यांवरील पाऱ्याच्या बाष्पदीपांपासून निघणाऱ्या जंबुपार किरणांची तरंगलांबी जवळजवळ सारखीच असते. त्यामुळे अशा प्रकाशीय प्रदूषणाची समस्या अधिकच गंभीर झाली आहे. शहरांतील घराबाहेतील दिव्यांची तीव्रता, संख्या व वितरण या बाबतीत काही तरी निर्बध घालून दिलेले असावेत, अशी प्रतिपादने अनेक प्रसिद्ध ज्योतिर्विदांनी केलेली आहेत. 


प्रदूषणाच्या समस्येचे जागतिक स्वरूप : वातावरणीय प्रदूषण : पृथ्वीच्या सध्याच्या वातावरणात आकारमानाप्रमाणे २१% ऑक्सिजन व ०·०३२% कार्बन डाय-ऑक्साइड आहे. त्यांच्या आकारमानांचे गुणोत्तर ६५० : १ असे आहे. जीवाश्मी इंधन जाळणे, जंगलांचा विनाश करून मानवी वसाहतीसाठी जमिनी मोकळ्या करणे, चुनखडीपासून सिमेंट तयार करणे यांसारख्या मानवी व्यवहारांमुळे वातावरणीतील कार्बन डाय-ऑक्साइडाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. कार्बन-डाय-ऑक्साइडाचे हवेतील सापेक्ष संहतीचे प्रमाण जरी अत्यंत कमी असले, तरी पृथ्वीचे तापमान निश्चित करण्याच्या दृष्टीने किंवा त्यात फेरबदल घडवून आणण्याच्या दृष्टीने ते पुरेसे महत्वाचे असते. सौर प्रारणातील अवरक्त किरण व सूर्यप्रकाश आणि त्यांच्याशी निगडित असलेली उष्णता हवेतील कार्बन डाय-ऑक्साइडाकडून शोषिली जाते. पृथ्वीकडून उत्सर्जित किंवा परावर्तित झालेल्या उष्णतेचाही काही भाग कार्बन डाय-ऑक्साइडाकडून शोषिला जातो त्यामुळे वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइडाचे प्रमाण वाढले की, पृथ्वीचे सरासरी तापमान वाढते.

 जीवाश्मी इंधन जाळल्यामुळे निर्माण होणारा कार्बन डाय-ऑक्साइड वायू वातावरणात मिसळला, तर जागतिक तापमानात वाढ होण्याची शक्यता व त्यामुळे उद्‌भवणाऱ्या समस्यांची भीती १८९९ सालापासून शास्त्रज्ञ बोलून दाखवीत होते. आता वाढत्या लोकसंख्येमुळे, वाढत्या औद्योगिकीकरणामुळे व इंधनाच्या वाढत्या वापरामुळेह्या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. ऊर्जेसाठी पर्यायी इंधन शोधून न काढल्यास व केवळ जीवाश्मी इंधनावर अवलंबून राहिल्यास प्रतिवर्षी ५% अधिक जीवाश्मी इंधन जाळावे लागेल, वाढत्या प्रमाणात (दरवर्षी सु. ०·२ टक्क्यांनी) कार्बन डाय-ऑक्साइड वातावरणात मिसळत जाईल व परिणामी पृथ्वीचे तापमान वाढत जाईल, अशी चिन्हे आता स्पष्ट दिसत आहेत. मानवाने ऊर्जेसाठी १८६० पासून लक्षवेधी प्रमाणात जीवाश्मी इंधन जाळण्यास सुरुवात केली. त्या वेळी पृथ्वीचे जे तापमान होते त्यापेक्षा २०२० साली जीवाश्मी इंधनाच्या वाढत्या उपयोगामुळे पृथ्वीचे माध्य (सरासरी) तापमान २° से.ने वाढलेले असेल, असाही एक अंदाज केला गेला आहे. हा अंदाज जर खरा ठरला, तर ध्रुवीय हिमाच्छादित प्रदेशांवरील बर्फ वितळेल, समुद्राची पातळी १५-२० मी.नी वाढले आणि त्यामुळे समुद्रकाठावरील बहुतेक सर्व शहरे व महानगरे समुद्रात गडप होतील, हे उघड आहे. यावर उपाय म्हणजे जंगलांची पद्धतशीरपणे वाढ केली, तर हवेतील कार्बन डाय-ऑक्साइडाचे प्रमाण कमी पातळीवर आणता येईल, असे सुचविण्यात आले आहे. शक्य तेथे अणुकेंद्रीय ऊर्जा, सौरऊर्जा, भू-औष्णिक ऊर्जा (पृथ्वीच्या अंतर्गत भागातील उष्णता ऊर्जा), पवन ऊर्जा, सागरी लाटांची ऊर्जा अथवा अन्य ऊर्जा प्रकार वापरल्यास जीवाश्मी इंधनावरील ताण कमी होऊन वातावरणात शिरणाऱ्या कार्बन डाय-ऑक्साइडाचे प्रमाणही आटोक्यात आणता येईल, असेही सुचविले गेले आहे. १९०० ते १९६० या कालावधीत कार्बन डाय-ऑक्साइडाचे प्रमाण १३ टक्क्यांनी (दहा लाख भागांत ४० भागांनी) वाढले आहे. २,००० मध्ये ते २० टक्क्यांनी वाढलेले असेल.

उच्चतर वातावरणात (भूपृष्ठापासून सु. ५० किमी. पासून ते २,००० किमी. पर्यंतच्या वातावरणाच्या भागात) मानवाने नुकतीच स्वनातीत व जेट विमाने उडवायला सुरुवात केली आहे. त्यांच्या उड्डाणामुळे उच्च वातावरणात जलबाष्प व नायट्रिक ऑक्साइड शिरते व जलबाष्पामुळे स्तरावरणात ढग निर्माण होतात, तर नायट्रिक ऑक्साइडामुळे सौर प्रारणांतील जंबुपार प्रारण शोषणाऱ्या ओझोनाच्या थरांची जाडी कमी होते. स्वनातील विमानांच्या निष्कासनामुळे (इंधनाचे एंजिनातील कार्य संपल्यानंतर बाहेर टाकण्यात येणाऱ्या पदार्थांमुळे) इतर प्रकारचे वस्तुकणही स्तरावरणात प्रवेश करतात. ते जलवायुमानात अनिष्ट बदल घडवून आणू शकतात व स्तरवरणाबरोबर (भूपृष्ठापासून सु. १५ ते ५५ किमी. उंचीच्या दरम्यान असणाऱ्या वातावरणाच्या भागाबरोबर) पृथ्वीचे माध्य तापमान वाढवू शकतात. १९६५ सालानंतर जेट विमानांमुळे मुंबई, कलकत्ता व दिल्ली ह्या भारतातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानातळांवरील तंतुमेघांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. पुणे व दिल्ली या शहरांवरील उच्चस्तरीय वातावरणातील मालिन्याचे प्रमाणही प्रतिवर्षी वाढत असल्याचे दृष्टोत्पत्तीस आले आहे.

महासागरांचे प्रदूषण : भूपृष्ठाचा ७०% भाग महासागरांनी व्यापिलेला आहे. पर्यावरणात संतुलन साधण्यात व परिसर सुस्थितीत ठेवण्यात महासागरांची महत्त्वाची मदत होते परंतु याच महासागरात जगातील बहुतेक राष्ट्रे औद्योगिक अपशिष्टे, कचरा व अनुपयुक्त वस्तू टाकून ते प्रदूषित करतात. बहुतेक त्याज्य वस्तू समुद्रतळाशी जात असल्या तरी कचऱ्यातील बरेचसे घटक व तेले समुद्रपृष्ठावर तरंगत असतात. सागरी प्रवाहांबरोबर व वाऱ्यांबरोबर हे पदार्थ खूप दूरपर्यंत वाहात जातात. त्यातील काही घटक विषारी असल्यास विस्तृत सागरी क्षेत्रावर सागरी जीवसृष्टीचा संहार घडून येतो किंवा त्यांचे जननसामर्थ्य नामशेष होते. सागरी प्रदूषणामुळे पाण्यातील ऑक्सिजनाचा ऱ्हास होतो, कवचधारी जीवांचे उत्पादन कमी होते, सर्वत्रदुर्गधी पसरते, मच्छीमारीच्या धंद्यात अडथळे येतात, मनोरंजनासाठी समुद्राकाठाकडे येणारे हौशी लोक त्या बाजूला फिरकतही नाहीत.

अनंत प्रकारच्या त्याज्य वस्तू समुद्रात फेकण्यात येतात. शहरवासीयांचे मलसूत्र व सांडपाणी, पडलेल्या इमारतींचे अवशेष, बांधकामांतून उरलेल्या दगडमातीचे ढीग, डबर, चिखल, गाळ, काही स्फोटक द्रव्ये, विविध प्रकारची रसायने व किरणोत्सर्गी अपशिष्टे, कीटकनाशके, कागदाच्या कारखान्यांतून व तेल परिष्करण कारखान्यांतून निघणारी त्याज्य द्रव्ये यांसारख्या वस्तूंमुळे समुद्र प्रदूषित होतो. कालवे, नद्यांची मुखे किंवा काही ठिकाणचा सागरी तळ साफ करताना जहाजांच्या सहाय्याने जो गाळ समुद्रात जाऊन पडतो त्याच्यामुळेच अधिकतम सागरी प्रदूषण निर्माण होते. त्यानंतर औद्योगिक अपशिष्टांचा क्रमांक लागतो. विषारी त्याज्य वस्तू जाड धातवीय दंडगोलांत भरून ते दंडगोल समुद्रात बुडवितात. कधीकाळी ते फुटल्यास प्रदूषणाचा गंभीर धोका उद्‌भवण्याची शक्यता असते. अशा प्रदूषणाचा धोका टाळण्यासाठी त्याज्य वस्तूंवर पुन:संस्करण करून, त्यांतील उपयुक्त वस्तुकण परत मिळवून अपशिष्टे निर्धोक व खऱ्या अर्थाने त्याज्य केल्यानंतरच ती समुद्राकडे वळविणे हा सागरी प्रदूषण थांबविण्याचा एकमेव मार्ग आहे. समुद्रात फेकल्या जाणाऱ्या अनेक घन वस्तूंचा उपयोग जमिनीवर रस्ते तयार करण्यासाठी किंवा जमिनीवरील खळगे बुजवून ती सपाट करण्यासाठी केला जाऊ शकतो. किनाऱ्यावरील ज्वलनशील तेलाच्या टाक्या साफ केल्यामुळे व तेलवाहू जहाजे समुद्रावर भ्रमण करीत असताना फुटल्यामुळे विस्तृत प्रमाणावर तेल-प्रदूषण उद्‌भवते. अनेक मार्गांनी सागरपृष्ठावर दरवर्षी तेल पसरते. त्याच्या २० टक्के तेल एखादे मोठे तेलवाहू जहाज फुटल्यास समुद्रावर पसरते. पक्ष्यांना व सागरी जीवसृष्टीला अपाय पोहचविणाऱ्या अशा दुर्घटना टाळण्याचा पराकाष्ठेचा प्रयत्‍न करणे अगत्याचे ठरते. तेलाच्या टाक्या साफ करताना तेलमिश्रित पाणी समुद्रात पडू नये याबद्दलही दक्षता घेण्याचे आदेश अनेक राष्ट्रांनी आपापल्या शासनाला दिले आहेत. अनवधानाने समुद्रावर तेल सांडल्यास गवत, लाकडाचा भुसा किंवा पॉलियुरेथेनाचा फेस सागरपृष्ठावर पसरून तैलशोषण करता येते किंवा काही रसायने टाकून तेलाचे जेलीकरण किंवा घनीभवन करता येते. काही प्रक्षालके तैलपृष्ठावर टाकून किंवा त्वरेने पसरणाऱ्या तेलाला आग लावून तैल-प्रदूषण त्वरित थांबविता येते. तथापि यांतील बहुतेक मार्ग सागरी जीवसृष्टीला अपाय पोहचवितात. ते मार्ग अवलंबिण्यापूर्वी सर्व बाजूंनी त्यांच्या परिणामांचा विचार करणे महत्त्वाचे असते. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर तेलाद्वारे होणारे प्रदूषण ही राष्ट्रीय समस्या मानून तीविरुद्ध उपाययोजना करण्याचे प्रयत्‍न चालू झाले आहेत. 


जमिनीवर साचून ठेवलेल्या अनेक वस्तूंमुळे प्रदूषण उद्‌भवते. परिणामी, सर्व प्रदूषके पावसामुळे महासागरात जाऊन पोहचतात. रंगाचे डबे रिकामे झाल्यानंतर स्वच्छ न करता तसेच कचऱ्यात फेकले जातात. त्यामुळे १६,००० किग्रॅ.पारा, २२ लक्ष किग्रॅ.शिसे व ५ लक्ष किग्रॅ. क्रोमियम पाण्यात  मिसळले जाऊन ते प्रदूषित होते. आधुनिक मोटारगाडी ही जगातील सर्वांत मोठे दूषितीकारक वाहन म्हणून समजण्यात येते. तिच्यामुळे प्रचंड प्रमाणावर पेट्रोलमधील शिसे, गतिरोधकाच्या (ब्रेकच्या) अस्तरातील ॲस्बेस्टस, टायरमधील जस्त व गंधक आणि वंगणतेलातील जस्त मुक्त होऊन समुद्र, प्रदूषित करतात. समुद्रात गेलेले डीडीटीसारखे स्थिर द्रव्य शंभर वर्षेसुद्धा समुद्रात राहू शकते. पर्यायाने ते खाद्य प्राण्यांच्या शरीरात जाऊन अन्नशृंखला विषमय करते. आतापर्यंत तयार करण्यात आलेल्या ३ x १०१२ ग्रॅ. डीडीटीपैकी १५ टक्के डीडीटी महासागरात गेली असावी, अशी भीती प्रदर्शित केली जात आहे.

प्रदूषणाच्या समस्या सोडविण्याचे स्थानिक व जागतिक प्रयत्‍न : प्रदूषण ही जागतिक समस्या आहे. एका ठिकाणच्या प्रदूषणाचा परिणामी सर्वांनाच फटका बसतो. प्रचलित वाऱ्यांच्या प्रवाहाबरोबर एका देशातील प्रदूषके दुसऱ्या देशावरील वातावरणात जाऊन पोहचतात. सागरी प्रवाहांमुळे एका देशातील औद्योगिक अपशिष्टे दुसऱ्या देशापर्यंत जाऊन तेथील सागरी जीवसृष्टीचा विनाश घडवून आणतात. यूरोप-अमेरिकेतील प्रदीर्घ लांबीच्या नद्या अनेक राष्ट्रांतून वाहात असतात. अनेक औद्योगिक प्रकल्प त्यांच्या काठांवर उभारलेले आहेत. त्या सर्वांच्या अपशिष्टांमुळे संपूर्ण नद्या प्रदूषित होतात. प्रदूषके प्रांतिक,राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय किंवा भूखंडीय मर्यादा पाळीत नाहीत. यामुळे प्रदूषणाने निर्माण होणाऱ्या समस्या केवळ आंतरराष्ट्रीय सहकार्यानेच सोडविल्या जाऊ शकतात. सध्या असेच प्रयत्‍न होत आहेत.

जून १९६९ मध्ये फ्रँकफुर्टमधील एका रासायनिक कारखान्यातून नजरचुकीने कीटकनाशकांचे काही डबे ऱ्हाईन नदीत ओतले गेले. त्यामुळे लक्षावधी मासे मृत्युमुखी पडले व नेदर्लंड्सला पिण्याचे पाणी मिळणे दुरापास्त झाले. ऱ्हाईन नदी नेहमीच प्रदूषित अवस्थेत असते. आता त्या नदीच्या काठावरील फ्रान्स, पश्चिम जर्मनी, स्वित्झर्लंड व नेदर्लंड्स या चारही देशांनी ऱ्हाईन नदी स्वच्छ करुन सुस्थितीत ठेवण्याचा करार केला आहे. १९७५ मध्ये कॅनडा व अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांनीही त्यांच्या सरहद्दीवरील महासरोवरे स्वच्छ व प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय संयुक्त आयोग स्थापन केला आहे.

 धुरामुळे होणाऱ्या वातावरणीय प्रदूषणाची दखल जगात सर्वप्रथम शिकागो येथे १८८१ मध्ये शिकागो सिटी कौंन्सिलने धुराच्या उपद्रवासंबधी वटहुकूम काढून घेतली पण अजूनही मोटारींतून निघणाऱ्या विषारी धुरासंबंधी कोठेही कायदे करण्यात आलेले नाहीत. इंडियनामधील गेअरी येथील पोलादाच्या कारखान्यांतून निघणारा धूर प्रचलित वाऱ्यांच्या दिशेने ४३ किमी. अंतरावर असलेल्या शिकागो शहराला अनेकदा उपद्रवकारक ठरतो पण शिकागो सिटी कौंन्सिलचा धुरासंबंधीचा कायदा त्यावर नियंत्रण आणू शकत नाही. असे प्रश्न परस्पर सामंजस्यानेच सुटू शकतात. यूरोपातील एके काळची ‘नील डॅन्यूब’ नदी आता ‘काळी डॅन्यूब’ झाली आहे.अनेक औद्योगिक अपशिष्टे त्या नदीत सोडली जातात. खनिज तेलापासून अनेक उपयुक्त रसायने तयार करणाऱ्या एकाच कारखान्यातून प्रतिवर्षी १,२०० कोटी लिटर घाण या नदीत सोडली जाते. ही नदी स्वच्छ करून सुस्थितीत कशी ठेवायची हा तिच्या काठावर वसलेल्या यूरोपीय राष्ट्रांपुढे प्रश्न आहे. जगातील इतर अनेक नद्यांच्या बाबतीतही अशीच समस्या निर्माण झाली आहे. भारतातील नद्याही त्याला अपवाद नाहीत.

 प्रदूषणाचे उपशमन करण्यासंबंधीचे कायदे दोन प्रकारांनी करता येतात : (१) विशिष्ट प्रकारच्या इंधनाच्या व अकार्यक्षम साधनसामग्रीच्या वापरावर बंदी करणे आणि (२) औद्योगिक कारखान्यांतून उत्सर्जित होणाऱ्या प्रदूषकांच्या संहतीवर व परिमाणावर नियंत्रण ठेवणे. या गोष्टी लक्षात घेऊन इंग्लंडमध्ये १९५६ मध्ये व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत १९६३ मध्ये स्वच्छ हवेचा कायदा (क्लिन एअर ॲक्ट) करण्यात आला. अमेरिकेत १९६५ व १९७० मध्ये ह्या कायद्यात अनेक सुधारणा केल्या गेल्या. पाण्यासंबंधीही अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांनी जलीय गुणवत्ता कायदा (वॉटर क्वालिटी ॲक्ट) १९६५ मध्ये संमत करुन घेतला. पश्चिम जर्मनीतील रूर नदीच्या प्रदूषणाचे उपशमन सहकारी तत्त्वावर केले जाते. ह्या नदीचे पाणी वापरणाऱ्या सर्व प्रकल्पांना रूर रिव्हर व्हॅली ॲसोसिएशनचे सक्तीने सभासद व्हावे लागते. अशा १,२०० सभासदांनी निर्माणकेलेल्या निधीतून १०० वाहितमल-संस्करण संयंत्रे चालवून नदीचे ४,४०३ चौ. किमी.चे जलवाहन क्षेत्र सुस्थितीत ठेवले जाते.

प्रदूषण ही जागतिक समस्या असून कोणत्याही देशापुरती ती मर्यादित राहू शकत नाही, ही जाणीव आता बळावत चालली आहे. त्यामुळे १९६० सालानंतर अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांनी प्रदूषणाच्या उपशमनाचे मार्ग शोधण्याचे कार्य हाती घेतले आहे. जून १९६४ मध्ये अमेरिकेची संयुक्त संस्थाने, जपान व यूरोपातील १७ राष्ट्रे यांतील शास्राज्ञांनी फ्रान्समधील स्ट्रॅस्‌बर्ग येथे एकत्र येऊन वातावरणीय प्रदूषणाच्या प्रश्नावर चर्चा केली. त्याच वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात टोकिओ येथे दुसऱ्या आंतरराष्ट्रीय जलीय प्रदूषण संशोधन परिषदेचे अधिवेशन झाले. १९६५ मध्ये आंतरराष्ट्रीय जलवैज्ञानिक दशक सुरू झाले, पुढील दहा वर्षांच्या कालावधीत जागतिक सहकार्याने पृथ्वीवरील पाण्याच्या साठ्याचा शोध, विकास, वितरण व नियंत्रण करण्यासंबंधी काही निर्णय या वेळी घेण्यात आले. नॉर्थ ॲटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनच्या (नाटोच्या) काही शाखांकडून सागरी तैल-प्रदूषण व हवा प्रदूषित करणाऱ्या वाहनांमुळे उद्‌भवणारे प्रदूषण यांचा अभ्यास केला जात असून अनेक ठिकाणी प्रदूषणाचे मापनही केले जात आहे.

 संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली पहिली जागतिक मानवी परिसर परिषद स्टॉकहोम येथे ५ ते १६ जून १९७२ या कालवधीत भरली. आंतरराष्ट्रीय परिसराची शुद्धता व गुणवत्ता टिकविण्यासाठी यथोचित नियंत्रणाची आचारसंहिता तयार करणे, अनेक केंद्रांवर प्रदूषणाची पातळी मोजणे व प्रदूषण मर्यादांवर नियंत्रण ठेवणे, जगातील साधनसामग्रीच्या वापरावर देखरेख ठेवणे व ह्याबाबतीत योग्य ते प्रशिक्षण देणे, हे तिचे उद्दिष्ट होते. असीम औद्योगिकीकरणामुळे जागतिक प्रदूषण वाढते हे मान्य करूनही विकसनशील देशांतील औद्योगिक विकासयोजनांना परिसर बिघडणार नाही अशा रितींनी प्रोत्साहन व चालना देणे हेही त्या परिषदेचे आणखी एक उद्दिष्ट होते. जागतिक प्रदूषणाच्या समस्येच्या गंभीरतेची व अनिष्ट परिणामांची जाणीव लोकांना व्हावी आणि राष्ट्रीय, विभागीय व जागतिक पातळीवर प्रदूषण नाहीसे करण्यासाठी लोकांनी प्रवृत्त व्हावे या दृष्टीने दरवर्षी ५ जून हा ‘विश्वपर्यावरण दिवस’ म्हणून पाळला जातो. 


भारतात जलीय प्रदूषणाचे संशोधन नागपूर येथील नॅशनल एनव्हायरनमेंटल एंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (NEERI, नीरी) ही संस्था करीत आहे. वातावरणीय प्रदूषण समस्येचा अभ्यास नागपूर येथील नीरी, मुंबई येथील भाभा अणुसंशोधन केंद्र, भारतीय वातावरणवैज्ञानिक खाते आणि मुंबई महानगरपालिका यांच्याकडून होत आहे. नीरी या संस्थेने नागपूर, अहमदाबाद, कलकत्ता, दिल्ली, हैदराबाद, जयपूर, कानपूर, मद्रास आणि मुंबई यांसारख्या नऊ मोठ्या शहरांवरील हवेचे विश्लेषण केले आहे आणि त्या हवेतील सल्फर डाय-ऑक्साइड, नायट्रोजन डाय-ऑक्साइड, हायट्रोजन सल्फाइड यांचे व हवेत आलंबित (लोंबकळत्या) अवस्थेत असलेल्या धूलिकणांचे पद्धतशीर प्रमाणमापन केले आहे. या संस्थेने अनेकदा धूलिकणांचा भूपृष्ठावर पडण्याचा वेगही मोजला आहे. भाभा अणुसंशोधन केंद्राने तुर्भे येथील अणुकेंद्रीय विक्रियकाच्या परिसरातील हवेच्या दूषितीकरणाची सातत्याने निरीक्षणे करण्याचे काम सुरू केले आहे. भारतीय वातावरणवैज्ञानिक खात्याने अनेक ठिकाणी प्रारणीय संतुलन, हवेची पारदर्शकता, वातावरणीय मालिन्य, पृष्ठभागीय व उच्चस्तरीय पवनवेग व दिशा मोजणाऱ्या वेधशाळा स्थापन केल्या आहेत. पुणे व दिल्ली येथील पर्जन्याचे व हवेचे नमुने घेऊन त्यांचे अधूनमधून विश्लेषण केले जाते. पर्जन्यात सोडियम, पोटॅशियम व कॅल्शियम यांसारख्या ऋणायनांचे (विद्युत् विश्लेषणात ऋणाग्राकडे आकर्षित होणाऱ्या धन विद्युत् भारित कणांचे) प्रमाण आणि क्लोराइड, सल्फेट व नायट्रेट यांसारख्या धनायनांचे (विद्युत् विश्लषणात धनाग्राकडे आकर्षित होणाऱ्या ऋण विद्युत् भारित कणांचे) प्रमाण निश्चित केले जाते. हवेतील अमोनिया, क्लोरीन व नायट्रोजन डाय-ऑक्साइड यांसारख्या वायूंची प्रमाणनिश्चितीही पुणे व दिल्ली येथे केली जाते. जागतिक वातावरणवैज्ञानिक संघटनेने पुणे येथील प्रदूषण निरीक्षण केंद्राला ‘विभागीय पार्श्व-प्रदूषण निरीक्षण केंद्र’ म्हणून मान्यता दिली आहे. मुंबई महानगरपलिकेने एका खास विभागाद्वारे वातावरणीय प्रदूषणाचा सखोल अभ्यास करण्यास १९७७ साली सुरुवात केली आहे. त्यामध्ये विविध ठिकाणी प्रदूषकांची मोजणी व त्यांचे प्राणिजीवनावर होणारे परिणाम ह्यांचा अभ्यास केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने यासाठी अनुदान दिले आहे.

भारतातील प्रदूषण समस्या : भारतामध्ये प्रदूषणाचे स्वरूप अधिक भयावह आहे. भारतातील जलीय प्रदूषण मुख्यत्वे वाहितमल व औद्योगिक अपशिष्टे या दोन कारणांनी होते. औद्योगिक अपशिष्टांमुळे होणारे प्रदूषण मोठ्या शहरांत व काही औद्योगिक गावांतच आढळते पण वाहितमल हेच अधिक प्रमाणात प्रदूषक ठरले आहे. जलीय प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रणाच्या केंद्रीय मंडळाने १४२ प्रथम वर्गीय शहरांतील पाणीपुरवठा व वाहितमल व्यवस्था यांसंबंधी ऑक्टोबर १९७८ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, भारतातील ८०% जलीय प्रदूषण वाहितमलामुळे निर्माण होते आणि ९ मोठ्या शहरांखेरीज औद्योगिक अपशिष्टांमुळे निर्माण होणारे जलीय प्रदूषण लक्षणीय नव्हते. या ९ शहरांत मात्र औद्योगिक अपशिष्टांद्वारे होणारे प्रदूषण ६ ते १६ % असल्याचे आढळून आले. यामुळे गटारे व वाहितमल संस्करणाची योग्य व्यवस्था झाल्यास भारतातील जलीय प्रदूषणाची समस्या ८०% पर्यंत सुटू शकेल. कित्येक राज्यांत वाहितमलासाठी भुयारी गटार योजना नसल्यामुळे नदीनाल्यांत सहजगत्या घाण जात असते. त्यामुळे नद्यांच्या काठावरील शहरांत अनेक रोगांच्या जंतूंनी कायमचे ठाण मांडलेले असते. १९५५ मध्ये दिल्ली शहरामध्ये यमुनेच्या प्रदूषित पाण्यामुळे कावीळीसारख्या रोगाने कहर केला होता. अनेक माणसे व गुरे मृत्युमुखी पडली होती. औद्योगिक अपशिष्टे थंड व निर्धोक न करता गंगा नदीत टाकल्यामुळे १९६८ साली कित्येक दिवस उत्तर प्रदेशातील गंगा नदीचा काही भाग पेटल्यासारख्या अवस्थेत दिसत होता. कित्येक दिवस नदीचे पाणी वापरण्यास अयोग्य झाले होते.

 भारत हे विकसनशील राष्ट्र आहे. पुढील दहा वर्षांत अनेक नवीन उद्योगधंदे भारतात अस्तित्वात येणार आहेत. त्या प्रमाणात शहरे वाढणार आहेत. रासायनिक खतांचे उत्पादक पुढील काही वर्षांत १२ पटींनी वाढणार आहे. तेल परिष्करण कारखाने दुपटीने वाढणार आहेत. ऊर्जानिर्मितीसाठी कोळशासारखे जीवाश्मी इंधन आताच्या पेक्षा तीन पटींनी अधिक जाळावे लागणार आहे. या भावी घटनांची योग्य दखल न घेतल्यास भारतीय परिसर मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होईल, हे उघड आहे.

 भारतातील ८०% औद्योगिक उत्पादन या अफाट देशातील फक्त ८-१० औद्योगिक शहरांतून होते. त्यामुळे देशातील अनेक ठिकाणचा परिसर जरी बऱ्याचशा प्रमाणात निर्धोक असला, तरी या विशाल औद्योगिक केंद्रांभोवतालचे क्षेत्र प्रमाणाबाहेत प्रदूषित व असुरक्षित झालेले आहे. अशा क्षेत्रातच लोक मोठ्या संख्येने राहत असल्यामुळे त्यांना मिळणाऱ्या हवापाण्याच्या शुद्धतेच्या बाबतील अत्यंत दक्ष राहणे हे उद्योगपतींचे व शासनचे आद्य कर्तव्य ठरते. काही रासायनिक विक्रिया-प्रक्रियांनी थोड्याशा खर्चात पाणी शुद्ध व निर्धोक करता येते.विस्तृत क्षेत्रावरील दूषित हवा निर्धोक करण्यासाठी मात्र अतोनात खर्च येतो. त्यासाठी औद्योगिक प्रकल्पांतून उत्सर्जित होणाऱ्या वायुरूप व घनरूप अपशिष्टांवर नियंत्रण ठेवावे लागते किंवा ती सहजासहजी मुक्त वातावरणात मिसळणार नाहीत याबद्दल सदैव जागरूक राहवे लागते.

नवी दिल्ली, कलकत्ता व पुणे येथे केलेल्या काही वातावरणीय निरीक्षणांनुसार तेथील हवेत मालिन्य आणि आपाती सौर प्रारणात न्युनता असल्याचे आढळले आहे. नीरी या संस्थेने भारतातील काही प्रमुख शहरांवरील हवेच्या संघटनाच्या बाबतील निरीक्षणे केली आहेत. कोष्टक क्र. २ मध्ये ९ प्रमुख शहरांवरील हवेत आढळणारे सल्फर डाय-ऑक्साइडाचे व आलंबित वस्तुकणांचे प्रमाण दिले आहे.

 कोष्टक क्र. २. भारतातील विविध शहरांतील सल्फर डाय-ऑक्साइड व आलंबित वस्तुकण यांचे प्रमाण (१९७०-७२).

 

शहर

SO2 चे सरासरी प्रमाण (मायक्रोग्रॅम/मि.)

आलंबित वस्तुकणांचे प्रमाण (मायक्रोग्रॅम/मी.)

अहमदाबाद

१०·६६

३०३·६

मुंबई

४७·११

२४०·८

कलकत्ता

३२·८८

३४०·७

नवी दिल्ली

हैदराबाद

४१·४३

५·०६

६०१·१

१४६·२

जयपूर

४·१५

१४६·१

कानपूर

१५·९७

५४३·५

मद्रास

८·३८

१००·९

नागपूर

७·७१

२६१·६

मुंबई शहरातील चेंबूर-तुर्भेसारख्या भागात अनेक उद्योगसमूह केंद्रित झाले आहेत. अशा भागांतील प्रदूषकांचे प्रमाण मुंबईच्या सरासरीपेक्षा तीन ते सहा पटींनी अधिक असते. सल्फर डाय-ऑक्साइडाचे सर्वाधिक प्रमाण मुंबई शहरात आढळते व कलकत्ता हे भारतातील सर्वाधिक प्रदूषित झालेले शहर आहे, असे अभ्यासांती सिद्ध झाले आहे. तेथे अधिकतम वर्दळीच्या वेळी कार्बन मोनॉक्साइडाचे प्रमाण दहा लाख भागात ३५ भाग इतके असते, तर आलंबित वस्तुकणांचे प्रमाण ५३० मायक्रोग्रॅम/मी. ची उच्चतम सीमा गाठू शकते. गोरखपूर व अहमदाबाद येथील यूरिया व इतर रासायनिक खतांच्या कारखान्यांमुळे अमोनिया, कार्बन मोनॉक्साइड, सल्फर डाय-ऑक्साइड व धूळ वातावरणात प्रवेश करते. तमिळनाडूतील नेयवेली (नेव्हेली) येथील लिग्नाइटाच्या खाणींमुळे धूळ, धूर, वालुकाश्माचे कण, सल्फर डाय-ऑक्साइड व कार्बन मोनॉक्साइड वातावरणात शिरून ते प्रदूषित करतात (जवळपासच्या ओतशाळांमुळे, तसेच मथुरेजवळ उभारण्यात आलेल्या खनिज तेल परिष्करणाच्या कारखान्यामुळेही आग्र्याचा सौंदर्यसंपन्न ताजमहाल काळवंडण्याची व झिजण्याची भीती उत्पन्न झाली आहे). जेथे खाणकाम व खनिज उद्योग चालू असतात व जेथे इंधन जाळून औष्णिक ऊर्जा निर्माण केली जाते तेथेही ह्याच प्रकारचे प्रदूषक कण मोठ्या संख्येने वातावरणात शिरतात. राउरकेला, भिलाई, दुर्गापूर आणि जमशेटपूर येथील पोलादाच्या कारखान्यांतील झोतभट्ट्यांमुळे हवेत प्रचंड प्रमाणात धूम्रकण, वालुकाकण व धूलिकण फेकले जातात. अशा प्रकारच्या वातावरणीय प्रदूषणाचे उगमस्थानापाशीच उपशमन करण्याचे मार्ग ज्ञात किंवा उपलब्ध असते, तरी भारतात ते अजूनही वापरात आणले गेलेले नाहीत. 


 जलीयप्रदूषणाच्या बाबतीतही भारतात समस्या गंभीर असली, तरी ती सर्व बाजूंनी सोडविण्याचे प्रभावी प्रयत्‍न अजून झालेले नाहीत.औद्योगिक अपशिष्टे, गटारांतील घाण व मानवी मलमूत्र यांमुळे अजूनही भारतातील नद्या, नाले, सरोवरे व किनाऱ्यालगतचे समुद्राचे भाग प्रत्यही व उत्तरोत्तर प्रदूषित होत आहेत. पश्चिम बंगालमधील दामोदर नदीचे उदाहरण या बाबतीत देता येईल. दुर्गापूर ते असन्सोलपर्यंतच्या उद्योगप्रधान पट्ट्यातील अनेक शहरांना, कृषिकार्यांना व उद्योगधंद्याना ही नदी पाणी पुरविते. ह्या नदीच्या किनाऱ्यालगत उभारलेल्या आठ औद्योगिक प्रकल्पांतून प्रतिदिनी सु. १,६०,००० घ.मी. घाण पाणी किंवा एक लक्ष लोकसंख्या असलेल्या शहरातून जितके मानवी मलमूत्र बाहेर पडते तितके मैलापाणी या नदीत सोडले जाते. त्यातील कार्बनी अपशिष्टांचे जीवरासायनिक ऑक्सिडीकरण करण्यासाठी ४३,००० किग्रॅ. ऑक्सिजन नदीच्या पाण्यातून घेतला जातो. नदीत जाणाऱ्या अपशिष्टांबरोबर काही सायनाइडे, फिनॉल, अमोनिया इत्यादिकांसारखे पदार्थ नदीच्या पाण्यात मिसळून ते प्रदूषित व विषारी करतात. ही अपशिष्टे व द्रव्ये पाण्यातून काढून ते पूर्वीच्या शुद्ध स्वरूपात आणण्यासाठी दर दिवशी दोन कोटींहून अधिक रुपये खर्च होतील, असा अंदाज केला गेला आहे. ह्या आठ प्रकल्पात ४०० कोटींपेक्षा अधिक रुपयांची गुंतवणूक झाली आहे. त्यांनी उत्सर्जित केलेले प्रदूषित पाणी विशिष्ट व संमत प्रमाणात शुद्ध करण्यासाठी दर दिवशी गुंतवणुकीच्या भांडवलाचा ०·५% भाग किंवा वर्षातून १८०% भाग खर्च करावा लागेल, हे उघड आहे. भारतातील कोणत्याही उद्योगसमूहाला पाण्याच्या शुद्धीकरणाचा खर्च झेपेल अशी परिस्थिती सध्या तरी भारतात शक्य नाही. हुगळी नदीवरील शेवटच्या १०० किमी. क्षेत्रात ३५० मलाधिवाहिन्यांतून (मल वाहून नेणाऱ्या प्रमुख मार्गांतून) प्रती दिवशी २० X १० घ.मी. औद्योगिक अपशिष्टे, विषारी वस्तुकण व मानवी मलमूत्र नदीत फेकले जातात. हुगळी नदी सदोदित प्रदूषितावस्थेतच असते. अशा रीतीने भारतातील बहुतेक सर्वच प्रमुख नद्या वाढत्या लोकसंख्येमुळे व वाढत्या उद्योगधंद्यामुळे प्रदूषित होत आहेत. महापूर आल्यास ही सर्व घाण समुद्रात वाहून जाऊ शकते पण भारतात पावसाळ्याचा कालावधी तीन ते चार महिन्यांचाच असतो. पावसाळा संपल्यानंतर जलीय प्रदूषणाची समस्या हळूहळू अतिगंभीर स्वरूप धारण करते. उदा., उल्हास नदीत एकेकाळी येणारा दुर्मिळ पाला (हिल्सा) मासा आता मिळेनासा झाला आहे. कारण कल्याणच्या परिसरातील नायलॉन व रंगांचे कारखाने यांतील अपशिष्टे या नदीत येतात. काळू नदीतील प्रदूषणाने तिच्यातील प्राणी तर मेलेच, पण आसमंतातील काही वनस्पतीही नष्ट झाल्या आहेत. मांडवी नदीचे संपूर्ण पाणी एका साखर कारखान्यामुळे दूषित झाले व त्यामुळे नदीच्या पाण्यास घाण वास येत होता. ही दुर्गंधी बराच काळ टिकून होती. या दूषितीकरणामुळे अनेक मासेही मेले. जुवारी (झुआरी) नदी व तिच्या आसमंतातील विहिरींचे पाणी तेथील एका खत कारखान्यामुळे दूषित होत आहे व त्यावर उपाययोजना केली जात आहे. गुजरातमधील नद्यांतील प्रदूषण रासायनिक, कागद, खत इत्यादींच्या कारखान्यांमुळे वाढले असून त्या नद्या व त्यांच्या मुखांजवळील भागातील खेकडे, मासे इत्यादींच्यावर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. मध्य प्रदेशातील क्षिप्रा नदी भोपाळ, इंदूर व उज्जैन या भागांतील कारखान्यांमुळे प्रदूषित झाली आहे. नीरी या संस्थेच्या मध्यवर्ती मंडळाने १९७४ मध्ये प्रदूषणप्रतिबंध आणि प्रदूषण-नियंत्रण करण्याबाबत काही नियम सुचविले आहेत.

 भारतातील सु. ११ कोटी लोक शहरांत राहतात. ते प्रतिवर्षी घन स्वरुपात असलेल्या १·५ कोटी टन त्याज्य वस्तू निर्माण करतात. त्या एकत्र करून त्यांची विल्हेवाट लावण्यास प्रतिवर्षी २५ कोटी रुपये खर्च येतो. भारतातील बाकीची ५० कोटी जनता खेड्यांत, गावांत किंवा लहान लहान शहरांत राहते. त्याज्य वस्तूंची निर्मितीत्यांच्याकडूनही होत असते आणि त्यांमुळे जमीन व पाणी सातत्याने प्रदूषित होत असतात. घन स्वरूपातील घाण, कचरा व अपशिष्टे एकत्र आणून, त्यांतील पुनर्प्राप्य वस्तू काढून घेऊन त्या पुनःपुन्हा वापरात आणणे, हा प्रदूषणाची समस्या सोडविण्याचा एक चांगला मार्ग आहे. द्रव व वायू स्वरूपांतील अपशिष्टांवर संस्करण करून, त्यांतील आरोग्यविघातक घटक किंवा उपयुक्त वस्तुकण बाजूला काढून घेतल्यानंतरच ती निर्धोक व त्याज्य अपशिष्टे नदीत किंवा समुद्रात फेकल्यास प्रदूषणाच्या समस्येची तीव्रता बऱ्याच प्रमाणात कमी होईल. काही औद्योगिक प्रकल्पांतून बाहेर पडणाऱ्या पाण्यावरही काही संस्कार करून ते पुन्हा वापरात आणणे शक्य आहे. हे सर्व उपाय त्वरित कार्यवाहीत आणावयास हवेत.

पुण्याजवळील पिंपरी येथील एका रासायनिक उद्योगप्रकल्पातून निघालेले त्याज्य व प्रदूषित पाणी शुद्ध करून घेणारे एक संयंत्र फेब्रुवारी १९७७ पासून कार्यांवित झाले आहे. या योजनेत प्रदूषित पाणी एका ठिकाणी साठविण्यात येते. त्यात पंप व नलिकांच्या साह्याने संपीडित (दाबाखालील) हवा सोडून साखा व पाणी यांचे मिश्रण ढवळले जाते. कालांतराने पाण्यात सूक्ष्मजंतूंच्या वसाहती निर्माण होऊ लागतात. ते जंतू हवेतून ऑक्सिजन व पाण्यातून कार्बनी वस्तू घेऊन स्वपोषण करू लागतात. अशा रीतीने प्रदूषित पाणी हळूहळू शुद्ध होते. हवेतील प्रदूषणाचे स्वरूप व प्रमाण तपासण्यासाठी मुंबईच्या राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स या सार्वजनिक क्षेत्रातील कारखान्याने सप्टेंबर १९७९ मध्ये अमेरिकेहून आणलेली एक खास फिरती प्रयोगशाळा स्थापन केली आहे. ह्या फिरत्या प्रयोगशाळेमुळे तुर्भे व त्याच्या आसमंतातील भाग, मुंबई शहर व अलिबाग या भागांतील वातावरणीय प्रदूषणाची निरीक्षणे घेतली जाऊन प्रदूषणाचे मंदायन किंवा निर्मूलन करण्याचे मार्ग शोधणे शक्य होणार आहे.

 बडोदा व त्याच्या आसपासच्या औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांनी तेथील अपशिष्टे खंबायतच्या आखातात खोलवर सोडण्यासाठी ५६ किमी. लांबीचा खास तयार केलेल्या विटांनी बांधलेला वाहकमार्ग तयार करण्याचे ठरविले आहे. या क्षेत्रातील सर्व प्रमुख कारखाने आपापल्या अपशिष्टांवर काही किमान संस्करण करुन मगच ती या वाहकमार्गात सोडणार आहेत. या अपशिष्ट पाण्याचा उपयोग चारा व पिके काढण्यासाठी करता येईल की काय, याचा अभ्यास मार्गातील काही निवडक ठिकाणे करण्यात येणार आहे. बडोद्याजवळील ४०० कोटी रुपये गुंतवणुकीच्या खनिज तेल रसायनाच्या कारखान्यात वातावरण, जमीन, ध्वनी व गंध यांच्या प्रदूषणासंबंधी मोठ्या प्रमाणावर काळजी घेण्यात येत आहे. निरनिराळ्या उद्‌गमांपासून येणाऱ्या अपशिष्ट पाण्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया कराव्या लागत असल्यामुळे ते वेगवेगळे ठेवण्यात येते. जीवविज्ञानीय विक्रियकांत सहा जलाशयांमध्ये प्रचंड पात्यांच्या चक्रांनी हे पाणी ढवळत ठेवण्यात येते आणि या विक्रियकांत पाणी सोडण्यापूर्वी त्यातील तरंगणारी तेले व आलंबित वस्तुकण काढून टाकण्यात येतात. घनरूप अपशिष्टांवर वेगळे संस्करण करून ती पावसानंतर पाण्याच्या  नैसर्गिक प्रवाहावर परिणाम होणार नाही अशा रीतीने जमिनीच्या भरावासाठी वापरण्यात येतात. सर्व विषारी द्रव्ये खास भट्टीत जाळून टाकतात. तेलातील राहिलेला साखा वेगळ्या भट्टीत जाळण्यात येतो. वातावरणीय प्रदूषण टाळण्यासाठी बाष्पित्रांच्या (बॉयलर्सच्या) धुराड्यांची उंची १०० मी. पेक्षाही जास्त ठेवण्यात आली आहे. सर्व अपशिष्टांवर योग्य प्रकारे संस्करण करण्यात येते की नाही, हे तपासण्यासाठी खास प्रयोगशाळा उभारण्यात आलेली आहे. 


 महाराष्ट्रात राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका, इंडियन इन्स्टिट्यूटऑफ टेक्नॉलॉजी, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, महाराष्ट्र विज्ञान वर्धिनी (पुणे), व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट यांसारख्या शिक्षण संस्था, भाभा अणुसंशोधन केंद्र, तसेच सोक्लीनसारख्या (सोसायटी फॉर क्लीन एनव्हायरनमेंटसारख्या) विविध सामाजिक व व्यावसायिक संघटना आणि अनेक कारखानदार (उदा., सीबा, बेक, बायर, मर्क-शार्प इ.) प्रदूषणाविषयी संशोधन किंवा प्रदूषणाच्या प्रतिबंधासंबंधी प्रचारकार्य करीत आहेत. महाराष्ट्र राज्यात जलीय प्रदूषणासंबंधी महाराष्ट्र जलीय प्रदूषण प्रतिबंध अधिनियम, १९६९ व जलीय (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, १९७४ हे अधिनियम लागू करण्यात आलेले असून भारतातील इतर राज्यांतही असे अधिनियम करण्यात आलेले आहेत. १९७४ च्या अधिनियमानुसार एक केंद्रीय मंडळ स्थापन करण्यात आलेले असून प्रत्येक राज्यामध्ये राज्य-मंडळे स्थापन करण्यात आली आहेत. केंद्रीय मंडळाने राज्यमंडळांच्या कार्यात एकसूत्रता आणून त्यांना तांत्रिक साहाय्य व मार्गदर्शन करावे आणि जलीय  प्रदूषणासंबंधी पाहाणी व संशोधन करण्यास चालना द्यावी, तसेच जलीय प्रदूषणाला प्रतिबंध करण्यासाठी व त्याचे नियंत्रण करण्यासाठी देशव्यापी कार्यक्रम आखण्याची जबाबदारीही केंद्रीय मंडळावर सोपविलेली होती. केंद्रीय मंडळात १७ सदस्य असून त्यांत उद्योगधंदे, कृषी, मत्स्योद्योग व इतर क्षेत्रांचे एकूण ३ प्रतिनिधी समाविष्ट आहेत. या अधिनियमामध्ये खालील मुख्य तरतुदी आहेत : (१) राज्यामधील जलप्रवाहांचे संरक्षण करुन ते नैसर्गिक स्थितीत राखण्याविषयी राज्य सरकारांना सल्ला देणे. (२) प्राणी, वनस्पती व जलचर यांच्या संरक्षणासाठी आणि घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, शेती, क्रीडा व इतर कायदेशीर उपयोग यांसाठी पाण्याच्या गुणवत्तेचे रक्षण करणे, ती टिकविणे व तिच्यात सुधारणा घडवून आणणे. (३) सांडपाणी व पाण्याची गुणवत्ता यांकरिता मानके निश्चित करणे, विविध उद्योगांमुळे व घरगुती अपशिष्टांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणांसंबंधीच्या कमाल सह्य मर्यादा निश्चित कराव्यात व त्यासंबंधीची आचारसंहिता केंद्रीय मंडळाने तयार करावी, अशीही वरील अधिनियमात तरतूद आहे. विशिष्ट कारखान्यांतून (उदा., खत कारखाने, कातडी कमावण्याचे कारखाने, कापडाच्या गिरण्या इ.) बाहेत येणाऱ्या सांडपाण्यासाठी काही नियमावली तयार करण्यात येत आहे आणि त्यासाठी समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्रामध्ये वरील अधिनियमानुसार सर्व महत्त्वाच्या नद्यांची खोरी जलीय प्रदूषण प्रतिबंधक क्षेत्रे म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. कोणत्याही कारखान्याला या नद्यांच्या पाण्यामध्ये प्रदूषणकारक अपशिष्टे पाण्यात सोडावयाचे असल्यास जलीय प्रदूषण मंडळाची परवानगी घ्यावी लागते. अधिनियमातील तरतुदींचा भंग करून प्रदूषणकारक अपशिष्टे पाण्यात सोडल्यास संबंधित कारखान्यावर खटला भरण्याची आणि व्यवस्थापकास दंड व तुरुंगवासाची शिक्षा देण्याची अधिनियमात तरतूद आहे. १९८० सालापर्यंत भारतात राष्ट्रीय व राज्य पातळीवर वातावरणीय प्रदूषणासंबंधी कोणताही व्यापक अधिनियम अस्तित्वात नव्हता. कारखान्यातून निर्माण होणाऱ्या धुरामुळे होणारे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी धूम्र-उपद्रव अधिनियमाच्या तरतुदींचा उपयोग करण्यात येत आहे. त्यानुसार कारखान्यांच्या चिमण्यांची उंची योग्य तितकी ठेवण्याची सक्ती करण्याचा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना अधिकार दिलेला आहे.

 किरणोत्सर्गी अपशिष्टांची विल्हेवाट लावण्याचे भारतातील प्रयत्‍न : भारतात तारापूर येथील दोन व राजस्थानमधील राणा प्रताप सागर येथील एक असे तीन अणुकेंद्रीय विक्रियक कार्यान्वित झालेले आहेत. यांशिवाय उत्तर प्रदेशातील नरोरा येथे व तामिळनाडूमधील कल्पकमयेथे अणुकेंद्रीय विक्रियक स्थापन केले जात आहेत. यांशिवाय तुर्भे (मुंबई) येथे प्रायोगिक अणुकेंद्रीय विक्रियक काम करीत आहेच. भारतात इतरत्रही विविध कार्यांसाठी किरणोत्सर्गी समस्थानिकांचा उपयोग केला जात आहे. या सर्व प्रकल्पांतून निघालेल्या अपशिष्टांची समाधानकारक रीतीने विल्हेवाट लावली जाणे अत्यावश्यक आहे.

 तुर्भे येथे द्रवरूप अपशिष्टांचे घनीभवन व उदासिनीकरण करुन ती दीर्घकालपर्यंत ठेवण्यासाठी एक संचय-कोशिका क्षेत्र उभारले गेले आहे. भारतात समस्थानिकांचा वापर करणाऱ्यांनी आपापली किरणोत्सर्गी अपशिष्टे येथे पाठविल्यास त्यांचीही विल्हेवाट लावण्यात येते. तुर्भेच्या भाभा अणुसंशोधन केंद्राने व कलकत्त्याच्या सेंट्रल ग्लास अँड सेरॅमिक रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेने उच्च क्रियाशीलता असलेली किरणोत्सर्गी अपशिष्टे कमी वितळबिंदू असलेल्या, पण दीर्घकाळपर्यंत टिकणाऱ्या काचेत बंदिस्त करून ठेवण्याची पद्धत शोधून काढली आहे. ह्या पद्धतीप्रमाणे स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात ९००° ते १,१००° से. तापमान असताना काचाभ द्रव्यात किरणोत्सर्गी अपशिष्टे सोडून त्यांच्या अनेक प्रकारच्या व्यूहरचना केल्या जातात. काचाभ द्रव्य थंड झाल्यावर अशा बंदिस्त अवस्थेत दीर्घकालपर्यंत ही अपशिष्टे साठवून ठेवणे शक्य असते. तारापूर येथेही विक्रियकातून निघालेल्या किरणोत्सर्गी अपशिष्टांना बंदिस्त करुन व द्रवरूप अपशिष्टांचे घनीभवन करून ती संचय-कोशिकांत सक्त निरीक्षणाखाली बंदिस्त ठेवण्याची व्यवस्था केली जात आहे.

 तुर्भे येथे निःसारित जलप्रवाहांतून किरणोस्तर्गी प्रदूषक कण काढून व पाण्यावर काही संस्करण करून ते शुद्ध व निर्धोक करण्याचे मार्ग उपलब्ध केले गेले आहेत. तारापूरलाही अशीच व्यवस्था कार्यवाहीत आणली गेली आहे. अणुकेंद्रीय विक्रियकातून निघणाऱ्या आयोडीन, झेनॉन व क्रिप्टॉन या मूलद्रव्यांच्या समस्थानिकांचे किरणोत्सर्गी कण वातावरणात मिसळू न देता ते बंदिस्त करून संचय-कोशिकांत साठवून ठेवण्याचे प्रयोग तुर्भे येथे चालू आहेत. त्यासाठी विविध प्रकारच्या द्रव्यांच्या गाळण्या उपयोगात आणल्या जात आहेत. त्यांपैकी काही गाळण्यांची कार्यक्षमता ९९·९७ टक्क्यांपेक्षाही अधिक असलेली आढळली आहे. अधिक प्रमाणात किरणोत्सर्ग करणारी घनरूपातील अपशिष्टे पोलादाचे अस्तर असलेल्या काँक्रीटच्या नळांत साठविली जातात.

इ.स. २००० पर्यंत भारतात ३३,००० लक्ष क्यूरी इतके प्रारण बाहेर फेकणारी किरणोत्सर्गी अपशिष्टे साठविली गेलेली असतील. अमेरिकेतील संयुक्त संस्थानांत यापेक्षा १०० पटींनी अधिक अपशिष्टे साचलेली असतील. भारतातील द्रवरूपातील किरणोत्सर्गी अपशिष्टांचे आकारमान ११,७०० घ.मी. इतके असेल.

सध्याच्या तंत्रशास्त्रातील विविध प्रक्रियांमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषके निर्माण होतात. त्यांचे उपशमन करण्यात अतोनात खर्च होतो. तो न करता त्याच पैशांतून अल्पतम प्रदूषके उत्पन्न करणारी नवीन तंत्रे शोधली व त्यांचे अवलंबन केले, तर प्रदूषणाची समस्या आपोआपच सुटेल, असा दूरदर्शी उपाय भारतात सुचविला गेला आहे. (चित्रपत्र ).

पहा : औद्योगिक अपशिष्ट परिस्थितिविज्ञान पाणीपुरवठा वाहितमल संस्करण व विल्हेवाट.

  

संदर्भ :  1. American Institute of Chemical Engineers, Pollution and Environmental Health, New York, 1961.

            2. BesseLievre, E. B. The Treatment of Industrial Waste, New York, 1969.

            3. Carson, R. Silent Spring, Boston, 1962.

            4. Kneese A. V. Water Pollution, Washington, 1962.

            5. Maddox, J. Doomsday Syndrome, London, 1972.

            6. Meethan, A. R. Atmospheric Pollution- Its Origin and Prevention, London, 1964.

            7. National Research Committee on Pollution, WasteManagement and Control, Washington, 1966.

            8. National Society for Clean Air, Clean Air Year Book, London, 1961.

            9. Scorer, R. Air Pollution, Oxford, 1968.

          10. Stern, A. C. Ed., Air Pollution, 3 Vols., New York, 1968.

          11. World Health Organisation, Monograph Series, Air Pollution, No. 46, Geneva, 1961.

          12. World Health Organisation, Air Pollution : A Survey of Existing Legislation, Geneva, 1963.

  

चोरघडे, शं. ल. गजेंद्रगडकर, सु. कृ.