समवेग रेषा : वारा हा हवामानाचा एक महत्त्वाचा घटक आहे. निरनिराळ्या उंचीवरील अथवा समदाब पृष्ठांवरील वाऱ्याची दिशा आणि वेग यांचे दोन किंवा चार वेळांचे नकाशे हवामान कार्यालयात रोज तयार केले जातात. या नकाशांवर हवेचे तात्कालिक प्रवाह दर्शविणाऱ्या रेषा काढल्या जातात. यास प्रवाह रेषा असे संबोधिले जाते. या नकाशावर वाऱ्याचा एक ठराविक वेग असलेल्या ठिकाणांस जोडणाऱ्या रेषेस समवेग रेषा असे म्हणतात. निरनिराळ्या वेगमूल्यांच्या रेषा नकाशावर काढून वाऱ्याच्या वेगाचे विश्लेषण केले जाते. सर्व उंचीवरील अथवा समदाब पृष्ठांवरील वाऱ्याच्या वेगाचे यांप्रमाणे विश्र्लेषण केले जाते. अशा विश्लेषणावरून झोतवारा नकाशाच्या वेळी कोणत्या उंचीवर आणि कोणत्या अक्षांशावर होता, हे कळून येते. त्याशिवाय झोतवाऱ्याच्या आसपास वाऱ्याचे आडवे आणि उदग्र (उभ्या दिशेतील) कर्तन किती आहे हे समजते. अशाच प्रकारे विश्र्लेषण केलेल्या आधीच्या दिवसांच्या नकाशांशी चालू नकाशाची तुलना करून झोतवारा जास्त किंवा कमी प्रभावी झाला आणि कोणत्या दिशेने किती सरकला, तसेच झोतवाऱ्याच्या आसपास आडव्या व उदग कर्तनांत किती बदल झाला हे समजते. अशा दैनिक नकाशांवरून झोतवाऱ्याच्या दैनंदिन बदलांसंबंधी माहिती मिळते. ही माहिती दैनंदिन विमान उड्डाणाकरिता फार उपयुक्त आहे. कारण साधारणपणे जेट विमाने ज्या उंचीवर उडतात त्या उंचीच्या आसपासच झोतवारे असतात. झोतवारे सु. १२ किमी. उंचीवर अक्षांश ३० च्या आसपास आढळतात. झोतवाऱ्यांच्या जलवायुविज्ञानीय अभ्यासाकरिता अशा प्रकारचे सरासरी मासिक नकाशे तयार करून त्यांवर समवेग रेषा काढून त्यांचे विश्र्लेषण करणे आवश्यक आहे. अशा नकाशांवरून झोतवाऱ्याच्या मासिक आणि ऋत्विक बदलांसंबंधी बरीच माहिती उपलब्ध होते. या माहितीचा विमान उड्डाणाच्या आयोजन कार्यात बराच उपयोग होतो.

गोखले, मो. ना. मुळे, दि. आ.