हवामान नकाशा : ज्या नकाशात एखाद्या मोठ्या क्षेत्रावरील निरनिराळ्या निरीक्षण केंद्रांभोवती तेथील एखाद्या विशिष्ट वेळेच्या हवा-मानविषयक निरीक्षणांचे आलेखन केलेले असते, त्या नकाशास हवामानाचा नकाशा असे संबोधिले जाते. हवामान कार्यालयात रोज ठरलेल्या वेळांकरिता, एखाद्या विशिष्ट क्षेत्राकरिता अथवा गोलार्धाकरिता अथवा संपूर्ण पृथ्वीकरिता भूपृष्ठीय निरीक्षणांचे आणि वातावरणातील निरनिराळ्या पातळ्यांवरील निरीक्षणांचे असे नकाशे तयार केले जातात. अशा प्रकारच्या एखाद्या मोठ्या क्षेत्रावरील निरीक्षण केंद्रांच्या एखाद्या विशिष्ट वेळेच्या हवामान निरीक्षणांचे आलेखन केलेल्या नकाशास निरीक्षणाधारित (एक-कालीय) हवामानाचा नकाशा असे म्हणतात. या नकाशांच्या विश्लेषणा-वरून नकाशाच्या वेळेस असलेली नकाशाच्या क्षेत्रावरील वातावरणाची स्थिती समजते. निरनिराळ्या वेळांच्या नकाशांचा अभ्यास करून निरनिराळ्या भागांवर वातावरणाच्या स्थितीत कसा व किती बदल होत आहे, हे कळून येते. मोठ्या हवामान कार्यालयात दिवसाच्या निरनिराळ्या वेळांचे अनेक प्रकारचे नकाशे तयार केले जातात. लहान कार्यालयात तयार केलेल्या नकाशांचे प्रमाण कमी असते.

हवामानाची निरीक्षणे : निरीक्षणांचे साधारणपणे दोन प्रकार केले जातात : (१) भूपृष्ठीय निरीक्षणे व (२) उपरी वातावरणातील निरनिराळ्या पातळ्यांवरील निरीक्षणे. [→ वातावरणविज्ञान वातावरणीय उपकरणे].

(१) भूपृष्ठीय निरीक्षणे : यात हवामानाच्या पुढे दिलेल्या घटकांची निरीक्षणे घेऊन त्यांची मूल्ये निश्चित केली जातात : हवेचा दाब, हवेचे कोरडे व ओले तापमान, हवेचे दवबिंदू तापमान, हवेचे २४ तासांतील कमाल/किमान तापमान, वाऱ्याची दिशा व गती, ढगांची एकूण व्याप्ती, निम्न/मध्यम/उच्च पातळीवरील ढगांचे प्रकार, निम्नतर पातळीवरील ढगांचे प्रमाण व त्या ढगांच्या तळपृष्ठाची उंची, हवामानाचा तत्कालीन आविष्कार, गेल्या ६ तासांत घडलेला हवामानाचा मुख्य आविष्कार व तज्जन्य वर्षण, गेल्या २४ तासांत हवेच्या दाबात झालेला बदल व हवेच्या दाबाची प्रवृत्ती इत्यादी.

जमिनीच्या प्रदेशावरील वातावरणविज्ञानीय वेधशाळांत ही निरीक्षणे ठराविक वेळी रोज घेतली जातात. सागरी पृष्ठावर ही निरीक्षणे ठरलेल्या वेळी व्यापारी जहाजावर, तसेच काही सागरी ठिकाणांवर स्थापन केलेल्या स्थिर जहाजांवर अथवा तरंगत्या लाकडी ठोकळ्यांवर रोज घेतली जातात. ही निरीक्षणे किनाऱ्यावरील जवळच्या हवामान कार्यालयात बिनतारी संदेशाने प्राप्त होतात. सागरी पृष्ठावरून निरीक्षणे प्राप्त करून घेण्यातील अडचणी व लागणारा मोठा खर्च आणि भूपृष्ठावर असलेले सागराचे सु. ७०% प्रमाण या कारणांमुळे सागरी पृष्ठावरील निरीक्षणांचे प्रमाण जमिनीवरील निरीक्षणांच्या मानाने बरेच कमी आहे. जमिनीवरील मोठ्या वेधशाळा दिवसांतून आठ वेळा [००००, ०३००, ०६००, ०९००, १२००, १५००, १८०० व २१०० ग्रिनिच माध्य वेळ (ग्रि. मा. वे.) ] निरीक्षणे घेतात परंतु बाकीच्या बहुतेक वेधशाळा यांपैकी दोन वेळा (०००० अथवा ०३०० आणि १२०० ग्रि. मा. वे.) निरीक्षणे घेतात. सागरावरील निरीक्षणांच्या वेळा ००००, ०६००, १२०० व १८०० ग्रि. मा. वे. याप्रमाणे आहेत.

(२) उपरी वातावरणातील निरनिराळ्या पातळ्यांवरील निरीक्षणे : यांमध्ये १०००, ८५०, ७००, ५००, ३००, २०० आणि १०० हेक्टोपास्काल अथवा मिलिबार या समदाब पातळ्यांवरील तसेच दाबाच्या इतर मूल्यांवरील निरीक्षणांचा समावेश होतो. ही निरीक्षणे समदाब पातळ्यांची उंची, या समदाब पातळ्यांवरील हवेचे तापमान व दवबिंदू तापमान, वाऱ्याची दिशा व गती यांसंबंधी असतात. या निरीक्षणांच्या वेळा ००००, ०६००, १२०० व १८०० ग्रि. मा. वे. याप्रमाणे आहेत. मोठ्या वेधशाळा या चार वेळा निरीक्षणे घेतात परंतु बहुतेक वेधशाळा ०००० व १२०० ग्रि. मा. वे. या दोन वेळा निरीक्षणे घेतात.

हवामान कार्यालयात पाठविले जाणारे निरीक्षण संदेश : देशातील प्रत्येक क्षेत्रातील सर्व वेधशाळा त्या क्षेत्राच्या मुख्य केंद्रास निरीक्षणे पाठवितात. प्रत्येक मुख्य केंद्र आपल्या क्षेत्रातील सर्व निरीक्षणे इतर मुख्य केंद्रांस संदेशाद्वारे पाठविते. अशा विविध प्रकारांनी देशातील सर्व निरीक्षणे प्रत्येक हवामान कार्यालयास उपलब्ध केली जातात. प्रत्येक देशात एक केंद्र असते. या केंद्रात निरनिराळ्या देशांतील निरीक्षणे संदेश यंत्रणेने उपलब्ध होतात आणि ती देशातील निरनिराळ्या हवामान कार्यालयांना पाठविली जातात.

वातावरण विज्ञानीय वेधशाळेने निश्चित केलेल्या अनेक विधवातावरणीय घटकमूल्यांचे पृष्ठभागीय हवामान नकाशात संक्षिप्त सांकेतिक चिन्हांनी निरीक्षण केंद्राभोवती आलेखन करण्याची विशिष्टपद्धती.


दिवसाच्या ठरलेल्या वेळी एखाद्या ठिकाणी घेतलेली हवामान घटकांची निरीक्षणे सांकेतिक अंकांनी पाच आकड्यांच्या अनेक गटांत निबद्ध करून त्याचा एक कूट निरीक्षण संदेश तयार केला जातो. असे संदेश हवामान कार्यालयात विविध संदेश यंत्रणेने प्राप्त होतात. भारतात ०३०० व १२०० ग्रि. मा. वे. यांच्या भूपृष्ठीय निरीक्षणांचे संदेश पुढे दिल्याप्रमाणे निबद्ध केलेले असतात :

यांतील अनेक सांकेतिक अक्षरांचे व अंकांचे अर्थ आ. १ मध्ये दिलेले आहेत. निरीक्षणाच्या ज्या घटकांचे भूपृष्ठीय नकाशात आलेखन केले जात नाही, त्यांचे अर्थ पुढे दिले आहेत : DL – नीचतम पातळीवरील मेघाची सरकण्याची दिशा DM–मध्य पातळीवरील मेघाची सरकण्याची दिशा TnTn– २४ तासांतील किमान तापमान (हे ०३०० ग्रि. मा. वे. च्या संदेशात अंतर्भूत केले जाते) TnTn– २४ तासांतील कमाल तापमान (हे १२०० ग्रि. मा. वे. च्या संदेशात अंतर्भूत केले जाते) RRR–गेल्या २४ तासांत पडलेला पाऊस (०३०० ग्रि. मा. वे. च्या संदेशात) ०३०० ग्रि. मा. वे. पासून पडलेला पाऊस (१२०० ग्रि. मा. वे. च्या संदेशात ).

हवामानाची घटकमूल्ये कोठे लिहायची हे इंग्रजी अक्षरांच्या साहाय्याने आ. १ मध्ये दाखविले आहे. मेघांचे प्रकार व हवामानीय आविष्कारांचे आलेखन सांकेतिक चिन्हांद्वारे केले जाते. इतर गुणधर्मांसाठी सांकेतिक अंकच लिहिले जातात.

आणखी काही महत्त्वाची माहिती असल्यास ती वरील भूपृष्ठीय संदेशात पाच आकड्यांचे गट घालून शेवटी जोडली जाते. निरनिराळ्या समदाब पातळ्यांवरील निरीक्षण संदेशात त्या पातळ्यांवरील हवेचे तापमान, हवेचे दवबिंदू तापमान, वाऱ्याची दिशा व गती आणि समदाब पातळ्यांची उंची दिलेली असते.

निरीक्षण संदेशांचे नकाशावर आलेखन : भूपृष्ठीय निरीक्षण संदेशांतील प्रत्येक हवामान घटकाच्या माहितीचे आलेखन न का शा व र त्या निरीक्षण केंद्राच्या आसपास कोठे व कसे केले जाते हे आ. १ मध्ये दाखविले आहे. अशा प्रकारे प्रत्येक निरीक्षण केंद्राच्या हवा-मानाच्या घटकासंबंधीच्या माहितीचे निरीक्षण केंद्राभोवती नकाशावर आलेखन केले जाते. अशा नकाशास त्या विशिष्ट वेळेचा भूपृष्ठीय हवामान नकाशा असे संबोधिले जाते. रोज निरनिराळ्या वेळांचे भूपृष्ठीय नकाशे हवामान कार्यालयात तयार केले जातात. यांशिवाय २४ तासांत हवेच्या दाबात झालेला बदल, हवेच्या दाबाचा सरासरी दा बा पा सू न फरक, कमाल/किमान तापमान आणि त्यांत होणारा बदल, कमाल/किमान तापमानाचा सरासरी कमाल/किमान तापमानापासून फरक, दवबिंदू तापमानात २४ तासांत होणारा बदल आणि पाऊस यांसंबंधीचे नकाशेही हवामान कार्यालयात तयार केले जातात. वातावरणातील निरनिराळ्या समदाब पातळ्यांवरील निरनिराळ्या निरीक्षण केंद्रांच्या हवामानविषयक माहितीच्या संदेशांत पातळ्यांवरील वाऱ्याची दिशा व गती यांसंबंधी माहिती असते. यांपैकी काही निरीक्षण केंद्रात रेडिओसाँड/रेविन या यंत्रणेच्या साहाय्याने निरनिराळ्या पातळ्यांवरील हवेचे तापमान व दवबिंदू तापमान, समदाब पातळ्यांची उंची ही माहिती देखील ठराविक वेळी रोज प्राप्त केली जाते. त्यामुळे या निरीक्षण केंद्राच्या संदेशात ही माहिती आणि वाऱ्यासंबंधी माहिती असते. निव्वळ वाऱ्याचे मापन करणारी केंद्रे बरीच आहेत परंतु रेडिओसाँड / रेविन यंत्रणा असलेली निरीक्षण केंद्रे त्यामानाने बरीच कमी आहेत. या माहितीचे नकाशावर केंद्राच्या आसपास कशा प्रकारे आलेखन केले जाते हे आ. २ मध्ये दाखविले आहे.

आ. २. वातावरणातील निरनिराळ्या समदाब पातळ्यांवरील निरी-क्षणांचे आलेखन : (अ) वारा (आ) वारा, हवेचे तापमान, दवबिंदू तापमान, समदाब पातळीची सस.पासूनची उंची व या उंचीत २४ तासांत होणारा बदल.

हवामान नकाशांचे विश्लेषण : नकाशांचे विश्लेषण करून महत्त्वाच्या गोष्टी नकाशावर ठळकपणे दाखविल्या जातात. सागरी पातळीवरील हवेच्या दाबाचे भूपृष्ठीय नकाशावर आलेखन केलेले असते. दाबाचे एक ठराविक मूल्य असलेल्या ठिकाणांतून नकाशावर काढलेल्या रेषेस त्या मूल्याची समदाब रेषा असे म्हणतात. नकाशावर दोन मिलिबारच्या अंतराने समदाब रेषा काढल्या जातात आणि न्यूनदाब (ङ) व उच्चदाब (क) क्षेत्रे दर्शविली जातात. दाब-उतार कोणत्या क्षेत्रांवर तीव्र आहे हे अशा विश्लेषणावरून कळते. हवेच्या दाबातील बदलाच्या नकाशावर तसेच दाबाच्या सरासरी दाबापासून फरकाच्या नकाशावर सममूल्य रेषा काढून न्यूनदाब क्षेत्र कोठे सरकेल याचा अंदाज बांधता येतो आणि न्यूनदाब/उच्चदाब यांची तीव्रता कळते. दवबिंदू तापमानाच्या विश्लेषणाने हवेतील आर्द्रता कोणत्या भागांत वाढली अथवा कमी झाली हे कळते. कमाल/किमान तापमानाच्या सरासरीपासून फरकाच्या विश्लेषणावरून उष्णतेची/थंडीची लाट कोणत्या भागांवर आहे हे समजते.

निरनिराळ्या समदाब पातळ्यांवरील नकाशांच्या विश्लेषणावरून कोणत्या भागांवर वाऱ्याचे भ्रमण अभिसारी व कोणत्या भागांवर ते अपसारी आहे हे समजते आणि त्यावरून हवेच्या ऊर्ध्वगमनीय व अधोगमनीय क्षेत्रांचा अंदाज लावता येतो. समदाब नकाशांचे विश्लेषण करताना वाऱ्याच्या प्रवाहरेषा काढल्या जातात. वाऱ्याच्या तत्काल (नकाशाच्या वेळेच्या) दिशेस स्पर्श रेखीय असणाऱ्या रेषेस प्रवाहरेषा म्हणतात. समदाब नकाशावर वाऱ्याची दिशा व गती, तापमान, दवबिंदू तापमान, समदाब पातळीची उंची व त्यात २४ तासांत झालेला बदल ही माहिती जेव्हा आलेखित असते, तेव्हा विश्लेषण करताना समतापमान रेषा, सम-उंची रेषा, प्रवाहरेषा आणि गरज भासल्यास वाऱ्याच्या समगतिरेषा काढल्या जातात.


आ. ३. भारत व आसपपसचा प्रेदश या क्षेत्राचे विश्र्लेषण केलेला भूपृष्ठीय हवामान नकाशाचा एक नमुना (न्यूनदाब L व उच्चदाब H या इंग्रजी अक्षरांनी नकाशावर दाखविले आहे.)

 

आ. ३ मधील भूपृष्ठीय हवामान नकाशात पंजाब राज्यावरील न्यूनदाब तीव्र आहे. या न्यूनदाब क्षेत्रास तीव्रतेच्या दृष्टीने न्यूनभार असे म्हणता येईल. असे न्यूनभार भारतात पश्चिमेकडून येतात किंवा वायव्य भारतावर निर्माण होतात. न्यूनभारामुळे पंजाबात, उत्तर भारतात आणि बांगलादेशात आकाश दाट ढगांनी पूर्णपणे व्याप्त असून भारताच्या वायव्य भागांत बऱ्याच ठिकाणी नकाशाच्या वेळी पाऊस पडत आहे. अगदी दक्षिणेकडच्या बंगालच्या उपसागरात तेथील न्यूनदाबामुळे हवा ढगाळ असून काही ठिकाणी पाऊस पडत आहे. म्यानमार, भारतातील तसेच पाकिस्तानातील इतर भाग, या प्रदेशांवर आकाश जवळजवळ निरभ्र आहे.

आ. ४. हेक्टोपास्काल (मिलिबार) समदाब पातळीवरील वारे व वाऱ्याच्या प्रवाहरेषा असलेल्या नकाशाचा एक नमुना (वाऱ्याचे अभिसारी भ्रमण C व अपसारी भ्रमण A या इंग्रजी अक्षरांनी नकाशावर दाखविले आहे.)

 

आ. ४ मधील समदाब पातळीवरील नकाशात पंजाबवर वाऱ्याचे अभिसारी भ्रमण (उ) व पश्चिम किनाऱ्याच्या मध्य भागावर अपसारी भ्रमण (अ) दाखविले आहेत. पंजाबवरील न्यूनभारामुळे उत्तर भारत व मध्य भारत या भागांवर वाऱ्याची गती वाढलेली आहे.

एका पाठोपाठ निरनिराळ्या वेळांच्या तयार केलेल्या हवामान नकाशांच्या अभ्यासावरून कोणत्या क्षेत्रावर महत्त्वाचे बदल होत आहेत, त्याचप्रमाणे न्यूनदाब व उच्चदाब क्षेत्रे कोणत्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे याचा अंदाज करता येतो. एखादे चक्री वादळ निर्माण झाले असल्यास ते कोणत्या दिशेने व कोणत्या गतीने पुढे सरकेल यांसंबंधी पूर्वकल्पना देणे आणि किनारपट्टीवरील क्षेत्राला धोक्याच्या सूचना देणे शक्य झाले आहे.

हवामान नकाशाच्या विश्लेषणात संगणकाचा उपयोग : संगणक व संगणक तंत्रज्ञान यांत १९५५ सालानंतर पुष्कळ प्रगती झाली. अवाढव्य स्मरणशक्ती असलेले द्रुतगती संगणक निर्माण झाले. असंख्य निरीक्षणांचे संकलन व संस्करण संगणकांच्या साहाय्याने होऊ लागले. हवामान नकाशांचे संगणकाने विश्लेषण करण्याचे तंत्र विकसित करण्यात आले. हल्ली मोठ्या हवामान कार्यालयांत संगणकाने नकाशांचे फार कमी वेळात विश्लेषण केले जाते. त्यामुळे बरेच मनुष्यबळ वाचते. वातावरणाची प्रतिकृती व संगणक यांचा वापर करून हवामानाची संख्यात्मक पूर्वानुमाने केली जातात.


सर्व संस्कारित निरीक्षणे, विश्लेषण झालेले हवामानाचे नकाशे आणि हवामानाची पूर्वानुमाने चुंबकीय फितीवर विशिष्ट पद्धतीने मुद्रांकित करून या फिती अभिलेखागारात सुरक्षित ठेवल्या जातात. यांपैकी बरीच माहिती संगणकाच्या स्मृतिकोशात साठविली जाते आणि भावी काळात आवश्यकतेनुसार तिचा उपयोग करण्यात येतो.

कृत्रिम उपग्रहांपासून प्राप्त होणारी हवामानासंबंधी माहिती : वातावरणविज्ञानाला १९६० पासून कृत्रिम उपग्रहांनी पाठविलेल्या छाया-चित्रांची मदत मिळू लागली आहे. त्यांच्यापासून वातावरणातील मेघ व चक्री वादळांचे स्थान यांसंबंधी माहिती प्राप्त होते. ज्या सागरी भागांतून निरीक्षणे प्राप्त होऊ शकत नाहीत अशा भागांत चक्री वादळ निर्माण झाले, तर त्यासंबंधी पटकन माहिती मिळण्यास कृत्रिम उपग्रहापासून प्राप्त झालेल्या छायाचित्रांचा फार उपयोग होतो.

पहा : चार्ट; जागतिक हवामान निरीक्षण योजना; नकाशा; मानचित्रकला; वेधशाळा, वातावरणविज्ञानीय.

संदर्भ : 1. Ahrens, C. D. Meteorology Today with Infotrac : An Introduction to Weather, Climate and the Environment, 1999.

           2. India Meteorological Department, Weather Code (1955), 1962.

           3. Williams, J. The USA Today Weather Almanac, 1995.

चोरघडे, शं. ल.; मुळे, दि. आ.