सहिम वृष्टि : पाऊस आणि बर्फ यांच्या मिश्रणाच्या वृष्टीस ‘सहिम वृष्टि’ असे संबोधिले जाते. यात बर्फाचे कण पारदर्शक आणि गोल असून त्यांची निर्मिती साधारणपणे थंड हवेत पावसाचे थेंब गोठल्यामुळे होते. कधीकधी वितळलेले बर्फाचे कण पृथ्वीपृष्ठालगतच्या थंड हवेच्या थरातून पडताना गोठतात आणि सहिम वृष्टी निर्माण होते. मेघकण अत्यल्प आकारमानाचे असतात. ते काही ठराविक प्रक्रियांमुळे मोठे होतात आणि त्यांचे पावसाच्या बारीक थेंबात किंवा बर्फाच्या कणांत रूपांतर होते. आकारमानाच्या एका ठराविक मर्यादेपर्यंत हे थेंब वा बर्फाचे कण हवेत तरंगत राहतात. ह्या मर्यादेच्या पलीकडे आकारमान वाढल्यावर पावसाचे थेंब वा बर्फाचे कण खाली पडू लागतात आणि भूपृष्ठावर पाऊस किंवा बर्फ पडतो. भूपृष्ठावर पाऊस पडेल किंवा हिमवृष्टी होईल किंवा सहिम वृष्टी होईल हे ढगांचे तापमान, भूपृष्ठ व ढग यांमधील हवेचे तापमान आणि ढगांची उंची या गोष्टींवर अवलंबून असते. ढगांचे आणि हवेचे तापमान शून्य अंश से. पेक्षा जास्त असेल तर पाऊस पडेल.

जेव्हा ढगांचे तापमान शून्य अंश से. पेक्षा कमी पण एका ठराविक तापमानापेक्षा जास्त असते तेव्हा ढगांमध्ये पाण्याचे थेंब व हिमकण हे दोन्हीही असतात. अशा परिस्थितीत हवेचे तापमान शून्य अंश से. पेक्षा जास्त झाल्यास आणि भूपृष्ठावर येईपर्यंत हिमकण वितळले नाहीत तर सहिम वृष्टी होईल परंतु सर्व हिमकण पृथ्वीपृष्ठावर येईपर्यंत वितळले तर भूपृष्ठावर पाऊस पडेल. हवेचे देखील तापमान शून्य अंश से. पेक्षा कमी असेल आणि पाण्याचे सर्व थेंब भूपृष्ठावर येईपर्यंत गोठले नाहीत, तर सहिम वृष्टी होईल, आणि जर सर्व थेंब गोठले तर हिमवृष्टी होईल.

ढगाचे तापमान एका ठराविक तापमानापेक्षा कमी झाल्यामुळे जर ढगात फक्त हिमकणच असतील आणि अशा परिस्थितीत हवेचे तापमान शून्य अंश से. पेक्षा कमी असेल, तर भूपृष्ठावर हिमवृष्टीच होईल. याउलट ज्यावेळेस हवेचे तापमान शून्य अंश से. पेक्षा जास्त असेल आणि सर्व हिमकण भूपृष्ठावर येईपर्यंत वितळले नाहीत, तर सहिम वृष्टी होईल आणि जर सर्व हिमकण पूर्णपणे वितळले, तर भूपृष्ठावर पाऊस पडेल.

हिमकण वितळण्याचे प्रमाण अथवा पाण्याचे थेंब गोठण्याचे प्रमाण ढगाची उंची, ढगाचे तापमान आणि ढग व भूपृष्ठ यांमधील निरनिराळ्या थरांतील तापमान या गोष्टींवर अवलंबून असते. सहिम वृष्टी साधारणपणे समशीतोष्ण कटिबंधात आढळते. उष्ण कटिबंधात ती उंच पर्वतीय क्षेत्रावरच आढळते. आर्क्टिक प्रदेशात ती हिवाळा सोडून इतर ऋतूंत होऊ शकते.

पहा : वर्षण हिम.

संदर्भ : Ralphe, E. H., Ed., Glossary of Meteorology, Boston, 1959.

गद्रे, कृ. म. मुळे, दि. आ.