आर्द्रता : आर्द्रता म्हणजे ओलावा. हवेमध्ये नेहमीच अल्पप्रमाणात बाष्प स्वरूपात पाण्याचा अंश असतो. ज्या हवेमध्ये जाणवण्याजोगे बाष्प असते तिला आर्द्र हवा म्हणतात.  आर्द्रतेचे प्रमाण वाढले म्हणजे हवा दमट झाली असे आपण म्हणतो.  दमट, उष्ण हवामानाच्या प्रदेशांत हवेतील बाष्पाचे प्रमाण अधिक असते परंतु अशा परिस्थितीतही बाष्प साधारणतः हवेच्या एकूण घनफळाच्या मानाने शेकडा ४ हून अधिक नसते. थंड हवेच्या प्रदेशात व वालुकामय प्रदेशात, वातावरणामध्ये बाष्प अत्यल्प प्रमाणात असते.

हवा आर्द्र कशी बनते : हवेतील बाष्पाचे प्रमाण सारखे बदलत असते.एकीकडे समुद्र, नद्या, सरोवरे, हिम यांच्या पृष्ठापासून व वनस्पती, प्राणी, जमीन यांच्यापासून होणाऱ्या बाष्पीभवनामुळे ते वाढत असते तर दुसरीकडे धुके, पर्जन्य, गारा, हिम यांच्या स्वरूपात संद्रवमाने (द्रव वा घनरूपात बदलल्याने) ते कमी होत असते.  हवेचे तपमान, वातावरणातील बाष्पसंचय व काही प्रमाणात वातावरणीय दाब यांवर बाष्पीभवनाचे प्रमाण अवलंबून असते.  त्याचप्रमाणे ज्या पृष्ठावरून बाष्पीभवन होते त्या पृष्ठाच्या स्वरूपावरही ते अवलंबून असते.  वनस्पतींनी  आच्छादिलेल्या पृष्ठापासून होणारे बाष्पीभवन केवळ पाण्याच्या पृष्ठापासून होणाऱ्या बाष्पीभवनापेक्षा अधिक त्वरेने होते.  उच्च तपमान, उच्च पवनवेग, कमी आर्द्रता व कमी हवेचा दाब या गोष्टी बाष्पीभवनाचे प्रमाण वाढविण्यास उपयुक्त ठरतात.

बाष्पीभवनमापक : बाष्पीभवनाचे मूल्य मोजण्याच्या साधनास बाष्पीभवनमापक म्हणतात. हे साधन म्हणजे वृत्तचितीच्या आकाराचे (दंडगोलाकार) जमिनीमध्ये सुमारे अर्धा मीटर खोल पुरलेले एक पाण्याचे टाकेच असते. सुरुवातीस हे टाके पाण्याने काठोकाठ भरतात. पाण्याची पातळी जमिनीच्या सपाटीबरोबर ठेवतात. प्रत्येक दिवशी पाण्याची खोली किती कमी होते हे मोजतात व त्यावरून बाष्पीभवनाचे दैनिक मूल्य समजते. या कालात पाऊस पडला असल्यास शेजारीच ठेवलेल्या पर्जन्यमापकाच्या नोंदीवरून बाष्पीभवनमापकाच्या नोंदीला शुद्धी (नोंद अचूक करण्यासाठी मूळ नोंदीत मिळवावी लागणारी राशी) लावता येते.

संपृक्त, अतिसंपृक्त व असंपृक्त हवा : प्रत्येक तपमानास व वातावरणीय दाबास हवेमध्ये बाष्प सामावण्याची एक कमाल मर्यादा असते.  हवेमध्ये या मर्यादेइतके बाष्प असल्यास हवा संपृक्त झाली असे म्हटले जाते.  कमाल मर्यादेपेक्षा बाष्प कमी असल्यास हवा असंपृक्त आहे असे म्हणतात.  हवा शुद्ध असेल, तर संपृक्तीपेक्षाही अधिक बाष्प सामावू शकते.  अशा हवेस अतिसंपृक्त हवा म्हणतात.

आर्द्रतादर्शक प्रचल : हवेचीआर्द्रता सांगण्यासाठी पुढील ५ प्रचलांपैकी (विशिष्ट परिस्थितीत अचल राहणाऱ्या राशींपैकी) कोणताही एक उपयोगात आणला जातो.

(१) बाष्पदाब : हवेतील बाष्प हे एक प्रकरचा वायूच आहे.  हवेच्या एकूण दाबात बाष्पाचाही वाटा असतो.  वायूंच्या मिश्रणाचे ठराविक आयतन (घनफळ) घेतल्यास त्यातील एखाद्या घटक वायूने ते संपूर्ण आयतन व्यापिले असता, त्याचा जो दाब होईल त्याला त्या वायूचा आंशिक दाब म्हणतात.  मिश्रणातील सर्व घटक वायूंचा आंशिक दाब माहीत झाल्यास मिश्रणाचा दाब मिळतो.  हवेच्या एकूण दाबापैकी बाष्पाचा आंशिक दाब मोजला म्हणजे हवेत पाण्याचा अंश किती आहे हे समजू शकते.  हवेचा दाब ज्या एककात मोजतात त्याच एककात बाष्पदाबही सांगितला जातो.

(२) निरपेक्ष आर्द्रता : हवेच्या प्रति-एकक आयतनात जलांशाचे जे वस्तुमान असते त्यास निरपेक्ष आर्द्रता म्हणतात.  जलाशांचे वस्तुमान भागिले हवेचे आयतन म्हणजे निरपेक्ष आर्द्रता असल्यामुळे ती एक प्रकारे आंशिक बाष्प घनताच ठरते. निरपेक्ष आर्द्रता, ग्रॅम प्रति-घन मीटरामध्ये सांगण्याचा प्रघात आहे.

(३) विशिष्ट आर्द्रता: वातावरणीय हवेच्या प्रति-एकक वस्तुमानात जलांशाचे जे वस्तुमान असेल, त्यास विशिष्ट आर्द्रता म्हणतात.  ती ग्रॅम प्रति-ग्रॅममध्ये अथवा ग्रॅम प्रति-किलोग्रॅममध्ये सांगितली जाते.

(४) आर्द्रता मिश्रण गुणोत्तर : कोरड्या हवेच्या वस्तुमानागणिक त्याच्या साहचर्याने असणाऱ्या जलांशाचे जे वस्तुमान असते त्याला आर्द्रता मिश्रण गुणोत्तर म्हणतात.  ते ग्रॅम प्रति-ग्रॅममध्ये किंवा ग्रॅम प्रति-किलोग्रॅममध्ये सांगितले जाते.

(५) सापेक्ष आर्द्रता : आर्द्रता सांगण्याचे जे चार प्रचल वर दिलेले आहेत त्या प्रत्येकाचे हवा संपृक्त झाली असता एक विशिष्ट मूल्य असते.  कोणत्याही एका आर्द्रता दर्शविणाऱ्या प्रचलाचे प्रत्यक्ष मूल्य व त्याच तपमानातील हवेचे संपृक्तिमूल्य यांचे गुणोत्तर शेकडेवारीत काढले म्हणजे त्यास सापेक्ष आर्द्रता म्हणतात.

दवबिंदू तपमान (दवांक) : दाब व जलांश स्थिर ठेऊन असंपृक्त हवा थंड केली, तर ती ज्या तपमानास संपृक्त होते त्या तपमानास दवबिंदू तपमान म्हणतात.  हवा कोरडी असता कोरड्या हवेचे तपमान व दवबिंदू तपमान यांमध्ये अधिक फरक असतो.  हवेतील जलांशाच्या वाढीबरोबर हा फरक कमी होत जाऊन हवा संपृक्त झाली म्हणजे हा फरक शून्य होतो.

आर्द्रतामापन : वातावरणविज्ञानात त्याचप्रमाणे कित्येक औद्योगिक क्षेत्रांत हवेतील  आर्द्रतेचे ज्ञान आवश्यक असते. आर्द्रतामापनासाठी वेगवेगळ्या तत्त्वांवर विविध साधने (आर्द्रतामापके) बनविण्यात आलेली आहेत.

पाऊस, धुके वगैरे आविष्कारांचा आगाऊ अंदाज करता येण्यासाठी आर्द्रतामापनाची अत्यंत आवश्यकता आहे.  कित्येक औद्योगिक प्रक्रिया कार्यक्षमतेने चालण्यासाठीही तेथे हवेतील आर्द्रतेचे मापन व नियंत्रण करणे जरूर असते.  उदा., सूत काढण्याच्या गिरण्यांमध्ये सूत काढताना कोरड्या हवेत घर्षणामुळे विद्युत् भार उत्पन्न होऊन धाग्याला चांगला पीळ बसू शकत नाही तसेच धागा कोरडा राहून पीळ देताना तो वारंवार तुटतो.  पण आर्द्र हवेत त्या अडचणी उद्भवत नाहीत आणि म्हणून अशा गिरण्यांतून आर्द्रतेचे प्रमाण कृत्रिम पद्धतीने उच्च ठेवण्यात येते.

आ. १. केश आर्द्रतामापक : (१) केस बांधावयाचे टोक, (२) केसांची बट, (३), (४), (५) कप्प्या, (६) वृतितचिती, (७) स्प्रिंग, (८) दर्शककाटा.

आर्द्रतामापके : (१) केश आर्द्रतामापक : जिलेटीन कागद, जनावराच्या आतड्याचा वळलेला दोरा, मानवी केस व तत्सम पदार्थ यांना विशिष्ट ताण दिला असता, त्यांची लांबी त्यांनी शोषून घेतलेल्या बाष्पाच्या प्रमाणात बदलते. ही लांबी शोषून घेतलेल्या हवेतील बाष्पाच्या सापेक्ष आर्द्रतेवर अवलंबून असते.  केश आर्द्रतामापकामध्ये या तत्त्वाचा उपयोग हवेच्या सापेक्ष आर्द्रतेची सतत नोंद करण्यासाठी व आर्द्रतालेखक तयार करण्याकरिता करतात. त्याची रचना पुढे दिल्याप्रमाणे असते (आ.१). वीस ते पंचवीस केसांची तेलकट नसलेली एक स्वच्छ बट घेऊन तिचे एक टोक (१) येथे घट्ट बांधलेले असते. दुसरे टोक (३), (४), व (५) या कप्प्यांवरून व (६) ह्या वृत्तचितीवरून घेऊन (७) ह्या स्प्रिंगला बांधतात. वृत्तचितीवर (८) हा दर्शककाटा बसविलेला असतो. तो एका वर्तुळाकृती शतांश भाग दाखविणाऱ्या मोजपट्टीवर फिरू शकतो.

हवेतील आर्द्रता बदलल्यास केसांच्या लांबीत फरक पडतो व त्यामुळे केसपुंजातील ताण बदलतो. लांबी वाढली, तर वृत्तचिती दर्शककाट्यासह सव्य दिशेने (घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने) आणि लांबी कमी झाल्यास अपसव्य दिशेने (सव्याच्या विरुद्ध दिशेने) फिरते.  मोजपट्टीचे एखाद्या प्रमाण आर्द्रतमापकाच्या साहाय्याने अंशन (अंश वा भाग पाडणे)  केलेले असते.  दर्शककाट्याच्या स्थितीवरून हवेची सापेक्ष आर्द्रता मोजता येते.  या उपकरणाचा वापर वातानुकूलित जागेतील आर्द्रतेचे नियंत्रण करण्यासाठी विशेषेकरून करतात. आर्द्रतेमध्ये होणारे फेरबदल फार जलद असले तर ते या साधनाने दाखविले जात नाहीत.


आ.२. रासायनिक आर्द्रतामापक : (१), (२), (३) तोट्या, (४) कॅल्शियम क्लोराइड असलेली यू-नलिका, (५) फॉस्फरस पेंटॉक्साइडयुक्त भांडे, (६) वातचोषकातील पाणी.

(२) रासायनिक आर्द्रतामापक : (आ.२). यात दोन किंवा दोहोंपेक्षा जास्त एकमेंकीना जोडलेल्या यू-नलिकांमध्ये (इंग्रजी U या अक्षराच्या आकारासारख्या असलेल्या नलिकांमध्ये) निर्जल कॅल्शियम क्लोराइडाचे थोडे खडे घेतात.  मग (२) आणि (३) या तोट्या बंद करून नलिकांचे वजन ()  घेतात.  नंतर ह्या नलिका आकृतीत दाखविल्याप्रमाणे, वातचोषकास (हवा शोषणाऱ्या उपकरणास) जोडतात आणि (१), (२) आणि (३) तोट्या उघडून वातचोषकातून पाणी हळूहळू बाहेर पडू देतात.  त्यामुळे झालेली पोकळी भरून काढण्याकरिता वातावरणातील हवा यू-नलिकांवाटे वातचोषकात शिरते.  वाटेत कॅल्शियम क्लोराइड ह्या हवेतील बाष्प शोषून घेते.  वातचोषकातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा वेग कमी ठेऊन हवा संथपणे यू-नलिकांतून जाऊ देतात व त्यामुळे कॅल्शियम क्लोराइडला बाष्प शोषण्यास पुरेसा वेळ मिळतो.  पाणी किती बाहेर पडले हे मोजल्यावर किती घ.सेंमी. हवा यू-नलिकांतून गेली ते कळते.  (२) व (३) या तोट्या बंद करून यू-नलिकांचे पुन्हा वजन () करतात.  -ब ही वजनातील वाढ म्हणजेच यू-नलिकांतून गेलेल्या हवेतील शोषलेल्या बाष्पाचे वस्तुमान होय. यावरून हवेची निरपेक्ष आर्द्रता खालील समीकरणाने काढतात (वजन ग्रॅममध्ये).

निरपेक्ष आर्द्रता =

(ब-ब)  १०

यू-नलिकांतून गेलेल्या हवेचे घनफळ (घ. सेंमी.)

शेजारील वातचोषकातील पाण्यावरील हवेत असलेली आर्द्रता यू-नलिकांत शोषली जाऊ नये म्हणून यू-नलिका व वातचोषक यांच्या दरम्यान फॉस्फरस पेंटॉक्साइड आत असलेले आणखी एक लहान भांडे आकृतीत दाखविल्याप्रमाणे जोडतात. या योजनेमुळे वातचोषकातील आर्द्रता फॉस्फरस पेंटॉक्साइडाने शोषली जाते.

हा आर्द्रतामापक अचूक असला तरी वापरण्यास अत्यंत त्रासदायक व फार वेळ घेणारा असल्याने तो फक्त प्रयोगशाळांत वापरतात.

(३) दवबिंदू आर्द्रतामापक : दवबिंदू निश्चित करून त्यावरून सापेक्ष आर्द्रता काढण्यासाठी अनेक प्रकारचे आर्द्रतामापक बनविलेले आहेत.  उदा., डाइन आर्द्रतामापक, डॅनियल आर्द्रतामापक वगैरे.  या प्रकारच्या आर्द्रतामापकात एखाद्या चकचकीत भांड्याचे तपमान काही उपायांनी हळूहळू उतरवीत नेतात.  त्यामुळे भांड्याभोवतालची हवाही हळूहळू थंड होत जाते परंतु तिच्यामधील बाष्पाचे प्रमाण मात्र बदलत नाही.  शेवटी ती हवा अशा एका तपमानाला येऊन पोचते की, तिच्यामध्ये प्रारंभी असलेल्या बाष्पानेच ती संपृक्त होते.  हे कमी होणारे तपमान ह्या बिंदूच्या थोडेही जरी खाली गेले , तरी दवाचे बारीक बारीक थेंब भांड्यावर जमा होतात व त्याचा पृष्ठभाग धुरकट दिसू लागतो.  हीच दवबिंदू तपमान प्राप्त झाल्याची खूण होय.  अशा प्रकारांपैकी रेनॉल्ट आर्द्रतामापक (आ.३) हा उत्तम आहे.  या साधनात (१) व (२) या दोन काचेच्या परीक्षा नलिकांच्या तळाचा सु. ४ सेंमी. उंचीचा भाग [(३) आणि (४)] चांदीचा केलेला असतो.  (५) ही तळापर्यंत जाणारी वक्र नलिका व (८) हा तपमापक (२) च्या बुचात बसविलेला असून (२) ला (६) ही नळी बाजूला जोडलेली असते.  (१) मध्येही एक तपमापक (७) ठेवलेला असतो.  त्याच्यावरून वातावरणाचे तपमान मिळते.

आ. ३ रेनॉल्ट आर्द्रतामापक : (१), (२) परीक्षा नलिका, (३), (४) चांदीचा भाग, (५) वक्रनलिका, (६) नळी, (७), (८) तपमापक.

(२) मध्ये थोडा ईथर ओतून (६) वातचोषकाला जोडतात. वातचोषकातून पाणी बाहेर सोडल्यावर तयार होणारी पोकळी भरून काढण्यासाठी (५) मधून हवा आत शिरते व ईथरनमध्ये बुडबुडे निर्माण होतात.  त्यामुळे ईथराचे बाष्पीभवन होते व त्यासाठी लागणारी सुप्त उष्णता ईथरामधून घेतली जाते.  त्यामुळे ईथर, (४) हे चांदीचे टोपण व त्याभोवतालची हवा थंड होते व शेवटी दवाचे सूक्ष्म बिंदू तयार होऊ लागले की, (४) हे चांदीचे टोपण धुरकट दिसू लागते.  त्यावेळी (८) ने दाखविलेले तपमान हेच दवबिंदू तपमान होय.

नंतर तयार मिळणाऱ्या कोष्टकावरून वातावरणीय तपमानाचा आणि दवबिंदूचा संपृक्त बाष्पदाब काढतात आणि

सापेक्ष आर्द्रता=

दवबिंदूचा संपृक्त बाष्पदाब 

X १००

वातावरणीय तपमानाचा संपृक्त बाष्पदाब 

ह्या सूत्रावरून हवेतील सापेक्ष आर्द्रता निश्चित केली जाते.  सापेक्ष आर्द्रता नेहमी शतमान (शेकडा) प्रमाणातच दाखविली जाते.  हे साधनही दैनंदिन मापनासाठी सोयीचे नसल्याने फक्त प्रयोगशाळांत वापरतात.

(४) विद्युत्‌ आर्द्रतामापक : या प्रकारचे आर्द्रतामापक दूर अंतरावरील हवेच्या आर्द्रतेचे मापन करण्यासाठी विशेष उपयोगी आहेत.  उदा., हायड्रोजन भरलेल्या फुग्याच्या साहाय्याने रेडिओसाँडसारखी उपकरणे हवेत सोडून वरच्या वातावरणातील आर्द्रतेच्या नोंदी रेडिओने खाली पाठविल्या जातात.  तेव्हा रेडिओसाँडमध्ये विद्युत् आर्द्रतामापकाचा उपयोग करतात.

आ. ४. ओला-सुका तपमापक : (१) सुका तपमापक, (२) ओला तपमापक.

या प्रकारच्या आर्द्रतामापकात मुख्य भाग म्हणजे लिथियम क्लोराइड या रसायनाचे पुट दिलेली एक कापडाची किंवा प्लॅस्टिकची पट्टी असते.  हे रसायन आर्द्रताशोषक आहे व आर्द्रताशोषणाने त्याचा विद्युत्‌ रोध बदलतो.  रोधातील हा बदल हवेच्या सापेक्ष आर्द्रतेवर अवलंबून असतो.  वेळोवेळी रोधाचे मापन करून त्यावरून तेथील सापेक्ष आर्द्रता काढता येते. 

याशिवाय अवरक्त किरणांपैकी (वर्णपटातील तांबड्या रंगाच्या पलीकडील अदृश्य किरणांपैकी) काही विशिष्ट तरंगलांबीच्या किरणांचे बाष्पाकडून विवेचनात्मक (निवडकपणे) शोषण होते.  या तत्त्वावर आधारलेला अवरक्त किरण आर्द्रतामापक तयार केलेला असून तो वरील प्रकारांपेक्षा अनेक दृष्टींनी सरस आहे.

(५) ओला-सुका तपमापक : या पद्धतीचा आर्द्रतामापक वापरण्यास फार सोपा असतो व काही विशिष्ट योजना केल्यास त्याची अचूकताही उत्तम असते.  याचा वापर फार मोठ्या प्रमाणात होतो.  यामध्ये दोन तंतोतंत एकसारखे तपमापक शेजारी शेजारी बसविलेले असून त्यांपैकी एकाचा फुगा एका पातळसर कापडाने आच्छादिलेला असतो.  हे कापड सदैव ओले ठेविले जाते म्हणून याला ओला तपमापक म्हणतात.  दुसऱ्या तपमापकाला ही व्यवस्था नसते म्हणून त्याला सुका (कोरडा) तपमापक म्हणतात.  हा कोरडा तपमापक नेहमी वातावरणीय तपमान दाखवितो.  (आ.४).

ओल्या तपमापकाच्या फुग्यावरील ओल्या कापडातून पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने फुगा थंड होतो व त्यामुळे सामान्यतः ओल्या तपमापकाने दाखविलेले तपमान कोरड्या हवेच्या तपमानापेक्षा (म्हणजे वातावरणीय तपमानापेक्षा) कमी असते. ह्या दोन तपमानांतील फरक बाष्पीभवनाच्या त्वरेवर अवलंबून असतो आणि बाष्पीभवनाची त्वरा ही (१) वातावरणाची सापेक्ष आर्द्रता आणि (२) तपमापकांच्या फुग्यांवरून वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग या दोन गोष्टींवर अवलंबून असते. परंतु प्रयोगांती असे दिसून आले आहे की, हा वाऱ्याचा वेग प्रति-सेंकदाला ५ मी. किंवा त्याहून जास्त असला. तर मग दोन तपमापकांच्या तपमानांतील फरकावर वाऱ्याच्या वेगाचा काहीही परिणाम होत नाही. यावरून हे स्पष्ट होईल की, या साधनाने आर्द्रतेचे विश्वसनीय मापन होण्यासाठी तपमापकांचे वायुवीजन (भोवतील हवा खेळती राहणे)  चांगले असणे जरूर आहे.  सर्वांत चांगला उपाय म्हणजे एखाद्या साधनाने तपमापकांच्या फुग्यांवरून  ५ मी. प्रति-सेंकदाच्या वेगाचा वाऱ्याचा प्रवाह कृत्रिमरित्या सोडणे.  वातावरणविज्ञानीय खात्यात वापरले जाणारे सायक्रोमीटर हे साधन याच प्रकारचे असते.


(६) सायक्रोमीटर (वायुवीजित आर्द्रतामापक) : हे वातावरणातील पाण्याच्या बाष्पाचे प्रमाण मोजण्याचे एक सुटसुटीत व सुवाह्य साधन असून त्याची रचना ओल्या-सुक्या तपमापकासारखीच व आर्द्रतामापनाची पद्धतीही साधारण तशीच आहे.  परंतु सोईसाठी ह्या साधनात हे तपमापक एकमेंकाच्या जवळ बसविलेले असतात. उपयोग करण्याच्या वेळी ओल्या फुग्यावरील कापडाचे आच्छादन स्वच्छ (ऊर्ध्वपातित म्हणजे उकळून वाफ थंड केलेल्या किंवा जमवून ठेवलेल्या पावसाच्या) पाण्याने चांगले भिजवून घ्यावयाचे  असते. दोन्ही तपमापकांच्या फुग्यांवरून व्यवस्थित वायुवीजन घडवून आणल्यास ते वातावरणाचे ओले व कोरडे तपमान दाखवितात. वायुवीजनाने ओल्या कापडावरील पाण्याचे बाष्पीभवन होऊन त्यासाठी जरूर असणारी सुप्त उष्णता (तपमानात बदल न होता पदार्थाच्या स्थितीत बदल करण्यासाठी लागणारी उष्णता) ओल्या तपमापकाच्या सन्निध असणाऱ्या हवेतून घेतली गेल्यामुळे ती हवा थंड होऊन ओला तपमापक सामान्यतः कमी तपमान दाखवितो. म्हणजेच एक तपमापक हवेचे कोरडे (वातावरणीय) तपमान व दुसरा बाष्पीभवनाने हवा किती थंड झाली ते तपमान दाखवितो. वातावरणाची सापेक्ष आर्द्रता  ही या दोन तपमापकांनी दाखविलेल्या तपमानांतील फरक व काही अंशी फुग्यांवरून जाणाऱ्या हवेच्या वेगावर अवलंबून असते.  त्यांचा संबंध खालील सूत्रात दाखविला आहे.

बा =  दसं –  अद  (तको –  त)

आणि सापेक्ष आर्द्रता =

बा

X १००

को

येथे द = वातावरणाचा दबा (मिमि.), दबा = वातावरणातील बाष्पदाब (मिमी.), दसं = ओल्या तपमानास संपृक्त करणाऱ्या वातावरणातील बाष्पदाब (मिमी.), अ = एक गुणक,   तको = कोरडे तपमान (सें.), त= ओले तपमान (सें.), दको = कोरडया तपमानास संपृक्त करणाऱ्या वातावरणातील दाब (मिमी.).

कोरड्या व ओल्या तपमानांतील फरकावरून हवेच्या कोरडेपणाविषयी माहिती मिळते.  हवा बाष्पाने संपृक्त असताना हा फरक शून्य असून हवेतील बाष्प कमी होऊन ती जसजशी कोरडी  होईल, तसतसा हा फरक वाढत जातो.  कोरड्या व ओल्या तपमानांवरून सापेक्ष आर्द्रता व दवबिंदू तपमान दाखविणारी अनेक कोष्टके व तक्ते प्रसिद्ध झालेली आहेत.

सायक्रोमीटर आर्द्रतामापकाचे मुख्यतः तीन प्रकार आहेत : (अ) चोषण आर्द्रतामापक, (आ) आस्मन आर्द्रतामापक आणि (इ) फिरकीचा आर्द्रतामापक.

आ. ५. फिरकीचा सायक्रोमीटर : (१) मूठ, (२) ओला तपमापक, (३) सुका तपमापक.

(अ) चोषण आर्द्रतामापक  : घड्याळाच्या यंत्रणेचा उपयोग करून एका पंख्याच्या साहाय्याने तपमापकांच्या फुग्यांवरून हवा ओढून घेऊन वायुवीजन घडविले जाते.

(आ) आस्मन आर्द्रतामापक : वरील प्रकारच्या यंत्रात थोडा बदल करून आस्मन यांनी बनविलेल्या आर्द्रतामापकात तपमापकांचे फुगे सौर किंवा अन्य प्रारणाने तापू नयेत म्हणून सुरक्षित केलेले असतात.  यामुळे हे साधन सूर्यप्रकाशात उघड्यावरही वापरता येते.  ह्या आर्द्रतामापकाचा उपयोग शेतांवरील पिकातील किंवा अडचणीच्या जागेतील तपमान व आर्द्रता मोजणीसाठी व्यापक प्रमाणावर केला जातो.

(इ) फिरकीच्या आर्द्रतामापकात ओली-सुकी तपमापके एकाच पट्टीवर (विशेषतः लाकडी) बसवून तपमापकांचे फुगे असलेल्या टोकांच्या विरुद्ध टोकास पट्टी गरगर फिरवता यावी अशी व्यवस्था करून तेथे पट्टीच्या काटकोनात एक मूठ बसविलेली असते (आ.५).  फुग्यावरून वायुवीजन घडविण्यासाठी मुठीला धरून तपमापकांसह पट्टी गरगर फिरवून नंतर लगेच ओल्या व कोरड्या तपमानांची नोंद करतात व त्यावरून आर्द्रता काढतात. पट्टी फिरविण्यास मोकळी जागा लागत असल्यामुळे या साधनाचा उपयोग मर्यादित असतो.

विमानातील हवेच्या आर्द्रतामापनासाठी विमानाच्या गतीचा वायुवीजनासाठी उपयोग होईल, अशा तर्‍हेने ओली-सुकी तपमापके बसवितात.  काही आर्द्रतामापकांत रबरी फुग्यांच्या साहाय्याने तपमापकांभोवती वायुवीजन केले जाते.

(७) आर्द्रतालेखक : आर्द्रतेतील होणाऱ्या चढउतारांची अखंड नोंद आपोआप करण्यासाठी आर्द्रतालेखकाचा उपयोग करतात.  एका वृत्तचितीच्या पृष्ठभागावर आलेखपत्र बसवून ती वृत्तचिती त्यातील घड्याळासारख्या यंत्रणेने फिरती ठेवलेली असते. केशआर्द्रतामापकाशी किंवा विद्युत् आर्द्रतामापकाशी संलग्न केलेल्या व विशिष्ट शाईने ओल्या केलेल्या लेखणीचे टोक वृत्तचितीवरील आलेखपत्रावर टेकून ठेवलेले असते.  आर्द्रतेतील चढउतारानुसार लेखणीचे टोक वरखाली होते व त्यामुळे फिरत्या आलेखपत्रावर आर्द्रतेचा आलेख आपोआप कालानुसार काढला जातो.

संदर्भ: 1. Penman, H. L. Humidity, New York, 1959.

         2. Wexier, L. Humidity and Moisture, New York, 1964-65.

गोखले, मो. ना. फाटक, मो. पु. नेने, य. रा.