हरिकेन : उत्तर अटलांटिक महासागराचा पश्चिम विभाग आणि वेस्ट इंडीज बेटांचा परिसर, मेक्सिकोचे आखात व मेक्सिकोच्या पश्चिम किनाऱ्याजवळील पॅसिफिक महासागराचा भाग या सागरी भागांवर निर्माण होणाऱ्या उग्र उष्णकटिबंधीय चक्री वादळाला साधारणपणे हरिकेन असे म्हणतात. या वादळात वाऱ्याची गती ६४ नॉट (११८ किमी./ तास) किंवा त्यापेक्षा जास्त असते. हरिकेन क्षेत्राचा व्यास ३००–१,०००किमी. एवढा असतो. [→ चक्रवात].

निर्मितीस अनुकूल परिस्थिती : सागरी पृष्ठाचे तापमान २६° से. किंवा त्यापेक्षा जास्त असावे लागते. तसेच सागरी पृष्ठालगतच्या हवेचे तापमान सागरी पृष्ठाच्या तापमानापेक्षा साधारणपणे ३°-४° से. एवढे जास्त असावे. सस.पासून सु. १.५ किमी. (सु. ५० मिलिबार) आणि सु. ६.० किमी. (सु. २०० मिलिबार) या उंचीतील वाऱ्याचे कर्तन कमी असले पाहिजे. या तीनही अनुकूल गोष्टींमुळे सागरापासून संवेद्य व सुप्त उष्णता हरिकेन क्षेत्रावर मुबलक प्रमाणात उच्च क्षोभावरणापर्यंत पोहोचू शकते. हरिकेन अक्षांश ५ उ. याच्या उत्तरेस निर्माण होतात. दक्षिण अटलांटिक महासागराचा पश्चिम विभाग आणि दक्षिण पॅसिफिक महासागराचा पूर्वेकडचा भाग या सागरी क्षेत्रावर हरिकेन निर्माण होत नाही.

ऋतू व वारंवारता : हरिकेनाचा ऋतू जून–नोव्हेंबर असा असून कमाल वारंवारता ऑगस्ट–ऑक्टोबर या कालावधीत असते. त्याची मासिक व वार्षिक वारंवारता कोष्टकात दिली आहे.

हरिकेनाची वारंवारता
जाने. फेब्रु. मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें. ऑक्टो. नोव्हें. डिसें. वार्षिक
* उत्तर

अटलांटिक

०·२ ०·२ ०·९ १·६ ०·८ ०·१ <०.०१ ३·८
* * उत्तर

पॅसिफिक

०·१ ०·२ ०·२ ०·५ ०·७ ०·५ २·२

* १८८७–१९५५ या कालावधीवर आधारित सरासरी प्रतिमास / वर्ष

* * मेक्सिकोच्या पश्चिम किनाऱ्याजवळील भागात १९१०–४० या कालावधीवर आधारित सरासरी प्रतिमास / वर्ष.

अवस्था : मुख्यत्वे हरिकेनाच्या अपरिपक्व, परिपक्व व र्‍हास अशा तीन अवस्था असतात. अपरिपक्व अवस्थेत हरिकेन वारे (गती &gt ६४ नॉट) लहान क्षेत्रावर (३०–५० किमी. त्रिज्येच्या आत) आढळतात. ढग (मेघ) व पाऊस यांचे गोलाकार परंतु केंद्राकडे वळणारे पट्टे निर्माण होतात. केंद्राजवळील हवेचा दाब कमी होत असतो. ही अवस्था सु. एक दिवस टिकते. परिपक्व अवस्थेत हरिकेन वाऱ्याचे क्षेत्र बरेच वाढते आणि २००–३०० किमी. त्रिज्येएवढे होते. केंद्रातील हवेचा दाब बराच कमी झालेला असतो. हरिकेनाला डोळा निर्माण झालेला असतो. या अवस्थेत केंद्रातील हवेचा दाब आणखी कमी होत नाही, तसेच वाऱ्याची गतीवाढत नाही. ही अवस्था एक आठवड्यापर्यंत टिकू शकते. हरिकेन किनाऱ्यावर आदळल्यानंतर जमिनीवरील जास्त घर्षणामुळे किंवा तापमान बरेच कमी असलेल्या सागरी पृष्ठावर सरकल्यामुळे हरिकेनाचा र्‍हासहोतो. समुद्रावर असताना देखील काही कारणांमुळे हरिकेनाचा र्‍हास सुरू होतो. र्‍हासावस्था सुरू झाल्याबरोबर केंद्रातील हवेचा दाब वाढू लागतो आणि वाऱ्याची गती झपाट्याने कमी होत जाते.

भूपृष्ठावरील रचना : हवेचा दाब : केंद्रातील हवेचा दाब सरासरी हवेच्या दाबापेक्षा ५–१० टक्क्यांनी कमी होऊ शकतो. फ्लॉरिडाजवळील (अ. सं. सं.) हरिकेनात २ सप्टेंबर १९३५ रोजी ८९२ मिलिबार हा सर्वांत कमी केंद्रीय हवेचा दाब आढळला. हवेचा दाब-उतार ०.३–१.२मिलिबार / किमी. एवढा असतो.

तापमान : केंद्राकडे जाणाऱ्या हवेचे वर्चस् तापमान वाढत जाते. तीव्र वाऱ्यामुळे सागर खवळलेला असतो आणि हवेत बरेच तुषार उडतात व त्यांचे बाष्पीभवन होते. त्याशिवाय सागरी पृष्ठावरही बाष्पीभवन होत असते. त्यामुळे हरिकेनाच्या क्षेत्रास बरीच सुप्त उष्णता प्राप्त होते. उबदार सागरापासून हवेस संवेद्य उष्णताही प्राप्त होते.

हरिकेनाच्या केंद्राभोवती भूपृष्ठाजवळील सरासरी वाऱ्याची दिशा व गती.

वारा : वाऱ्याची गती १२०–२५० किमी./तास एवढी असते.सु. १९० किमी./तास या गतीच्या पलीकडे गतिमापक यंत्रे वाऱ्याने उध्वस्त होतात. त्यामुळे अशा परिस्थितीत वाऱ्याच्या गतीचा अंदाज उध्वस्त झालेल्या वस्तूंवरूनच करावा लागतो. हरिकेन वारे डोळ्याचा भाग सोडून २०० किंवा ३०० किमी. त्रिज्येच्या कंकणाकृती भागात असतात. कमाल तीव्रतेचे वारे हरिकेनाच्या उजव्या व मागील चतुर्थांशांत आढळतात. आकृतीमध्ये हरिकेनाच्या केंद्राभोवती भूपृष्ठाजवळील सरासरी वाऱ्याची दिशा व गती दाखविली आहे. केंद्रापासून अक्षांशाचे ५° (सु. ५००किमी.) हरिकेनाच्या सरकण्याच्या दिशेत, ५° विरुद्ध दिशेत, ४° उजवीकडे आणि ४° डावीकडे एवढ्या क्षेत्रावरील वारा व प्रवाह रेषा पुढील आकृती मध्ये दाखविल्या आहेत.

पाऊस : मुसळधार पाऊस हरिकेनाच्या डोळ्याच्या सीमेपासून ५०–१०० किमी. अंतरापर्यंत डोळ्याच्या भोवतालच्या प्रदेशावर पडतो. या प्रदेशात हवेचा दाब-उतार सर्वांत जास्त असतो. या प्रदेशाच्या पलीकडे ३०० किमी. पर्यंत पाऊस झपाट्याने कमी होतो आणि त्याच्या पलीकडे वाढत्या अंतराबरोबर तो हळू-हळू कमी होत जातो. एखाद्या ठिकाणी पाऊस किती पडेल हे केंद्रापासून त्या ठिकाणाचे अंतर, हरिकेनाची सरकण्याची गती व दिशा आणि हरिकेनाची तीव्रता या गोष्टींवर असते. हरिकेनामुळे एखाद्या ठिकाणी ५० सेंमी. पाऊस पडणे अगदी साधारण आहे, परंतु थोड्या सेंमी. पासून २५० सेंमी. पर्यंत पाऊस हरिकेनाच्या क्षेत्रातील एखाद्या ठिकाणी पडू शकतो.

 


हरिकेनाच्या डोळ्याची वैशिष्ट्ये : परिपक्व हरिकेनामध्ये डोळ्याचा सरासरी व्यास २५–५० किमी. एवढा असतो. एखाद्या हरिकेनात डोळ्याचा व्यास ६–४० किमी. असू शकतो. आकार बहुधा गोलाकार असतो; परंतु कधीकधी लांबटही असतो. वाऱ्याची गती ताशी सु. २५ किमी. पेक्षा कमी असते; परंतु डोळ्याच्या मध्यभागी वाऱ्याची गती ताशी ८ किमी. पेक्षा कमी असते. ढगाचे प्रमाण कमी असते. डोळ्याच्या प्रदेशावर हवा हळूहळू खाली घसरते, त्यामुळे पाऊस पडत नाही. डोळ्याचे निश्चित ठिकाण कृत्रिम उपग्रहापासून प्राप्त झालेल्या ढगाच्या चित्रावरून कळते. तसेच डोळा ४०० किमी. अंतराच्या आत असताना रडारच्या पडद्यावरील चित्रावरून त्याचे निश्चित ठिकाण कळते.

सागराची स्थिती : तीव्र वाऱ्यामुळे हरिकेनाच्या क्षेत्रात लाटा (कधीकधी १०–१५ मी. उंचीच्या) निर्माण होतात. या लाटांचा एका दिवसात सु. १,५०० किमी. अंतराचा प्रवास होतो; परंतु हरिकेनाचा एका दिवसात ३००–५०० किमी. अंतराचा प्रवास होतो. त्यामुळे किनारपट्टीवर या लाटा आधी पोहोचत असल्यामुळे मागून येणाऱ्या हरिकेनाची चाहूल लागते.

भूपृष्ठाच्या वर वातावरणातील रचना : अभिसारण व अपसारण : हरिकेनात अभिसारण साधारणपणे ३–५ किमी. पर्यंत खाली असते आणि अपसारण उच्च क्षोभावरणात असते. त्याची ऊर्ध्वगती साधारणपणे ९ किमी. पर्यंत असते; परंतु काही हरिकेनात ती १२ किमी. पर्यंतही आढळते. त्याच्यावर अधोगती आढळते.

ढग : [→ मेघ]. उच्च वातावरणातील तंतुमेघ (सीरस, Ci) हरिकेन दूर असताना दिसू लागतात. हरिकेन जसे एखाद्या ठिकाणाजवळ येऊ लागते, तसे तंतुस्तर मेघ (सीरोस्ट्रेटस, Cs), मध्यराशिमेघ (अल्टोस्ट्रॅटस, As) व मध्यस्तरी मेघ (अल्टोक्युम्युलस, Ac)  हे मेघ त्या ठिकाणाजवळ येऊ लागतात. हरिकेन त्या ठिकाणी आले म्हणजे १५०–७५० मी. उंचीवरील दाट व लगातार स्तर मेघ (स्ट्रॅटस, St) येतात. कृत्रिम उपग्रहापासून प्राप्त झालेल्या चित्रात तसेच रडारच्या पडद्यावर केंद्राकडे झुकलेले मेघाचे गोलाकार पट्टे स्पष्टपणे दिसतात.

तापमानीय रचना : पावसाच्या क्षेत्रात निरनिराळ्या उंचीवर असलेले हवेचे तापमान आसपासच्या हवेच्या तापमानाच्या मानाने सर्वांत जास्त असते. डोळ्याच्या क्षेत्रावर निरनिराळ्या उंचींवरील तापमान सरासरी तापमानापेक्षा १°-२° से. जास्त असते. डोळ्याच्या क्षेत्रावर वाढत्या उंचीमुळे होणारा तापमान र्‍हास बराच कमी असतो. त्यावरून हे स्पष्ट होते की, डोळ्याच्या क्षेत्रावर वातावरणीय स्थिरता बरीच असते.

सरकण्याची गती : हरिकेन पूर्वेकडून पश्चिमेकडे १६–२४ किमी. प्रति तास या गतीने सरकते. त्याशिवाय उत्तर गोलार्धात उत्तरेकडे हळूहळू सरकते आणि अक्षांश ३० उ. याच्या जवळ पोहोचल्यावर सरकण्याच्या दिशेत बदल होऊन ते मध्य अक्षांशांत शिरते व पूर्वेकडे सरकू लागते. अशा प्रकारे हरिकेनाचे मध्य अक्षांशातील चक्रवातात रूपांतर होते.

भूपृष्ठ ते ३०० मिलिबार (सु. ९ किमी.) या थरातील हरिकेनाच्या केंद्राच्या दोन्ही बाजूंस ४०० किमी. अंतरापर्यंतच्या भागावरील सरासरी वाऱ्याची दिशा व गती याप्रमाणे हरिकेन सरकते, असे आढळून आले आहे.

विध्वंस : तीव्र वारा व मुसळधार पाऊस यांमुळे मोडतोड होऊनबरीच हानी होते. पाण्याच्या मोठमोठ्या लाटांमुळे बरीच माणसे व गुरेढोरे मृत्युमुखी पडतात आणि मालमत्तेचे फार नुकसान होते. हरिकेनाची लाट ३–६ मी. उंचीची असते. हरिकेन लाट हवेच्या कमी दाबामुळे निर्माण होते असा समज आहे. सागराची दिवसातील जास्तीत जास्त गुरुत्वीयभरती २-३ मी. एवढी असते. हरिकेन लाट व गुरुत्वीय भरती यांचे योग्य वेळी मीलन झाले, तर लाटांची उंची १० मी. पर्यंत वाढू शकते. अशा वेळी ज्या भागावर हरिकेन जाऊन आदळते, तो भाग सखल असेल व त्या भागावर नद्यांची मुखे समुद्रास मिळत असतील, तर त्या भागात पाण्याचा उंच लोंढा फार झपाट्याने शिरतो आणि जीवित व मालमत्ता यांची अतोनात हानी करतो.

हरिकेनातील वाऱ्याची गती सागरावर असताना फार तीव्र असते.एखादे जहाज या तीव्र वाऱ्याच्या कक्षेत ओढले गेले, तर जहाजाचीमोडतोड होऊन बरेच नुकसान व जीवित हानीही होते. किनाऱ्यावरील वातावरणविज्ञानीय कार्यालयातून संदेश पाठवून जहाजांना हरिकेनाच्या केंद्राचे ठिकाण आणि ते सरकण्याची दिशा व गती यांसंबंधी माहिती वेळोवेळी दिली जाते. या माहितीच्या आधारे जहाजे त्यांचा मार्ग बदलून हरिकेनाच्या केंद्रापासून दूर जातात.

किनारपट्टीच्या ज्या भागांवर हरिकेन आदळण्याची शक्यता असते, त्या भागांतील लोकांना धोक्याच्या सूचना दिल्या जातात. अशा सूचना मिळाल्यावर लोक किनाऱ्यापासून आत सुरक्षित अंतरावर जातात. अशा प्रकारे जीवित हानी कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.

पहा : चक्रवात वादळ.

संदर्भ : 1. Anthes, R. A. Tropical Cyclones : Their Evolution, Structure and Effects, American Meteorological Society, Met. Monograph Vol. 19, No. 41, Boston, 1982.

2. Dunn, G. E. Miller, B. I. Atlantic Hurricanes, Louisiana, 1964.

3. Riehl, H. Tropical Meteorology, New York, 1954.

चोरघडे, शं. ल.; मुळे, दि. आ.