दृश्यमानता : सर्वसाधारण दृष्टी असलेल्या निरीक्षकाला दुसरे कोणतेही साधन न वापरता ज्या जास्तीत जास्त अंतरावरच्या परिचित वस्तू नीट ओळखता येतील असे अंतर. परिचित वस्तूंमध्ये पर्वत, टेकड्या, इमारती, बुरुज, मनोरे, विजेचे स्थिर दिवे इत्यादिकांचा समावेश होतो. कोणत्याही वेळची दृश्यमानता ही त्या वेळेच्या वातावरणातील स्थितीवर अवलंबून असते. अनेक प्रकारच्या अपद्रव्यामुळे हवा अशुद्ध होते. धुके, झाकळ, धूसर, पाऊस, हिमवर्षाव, धूलिवादळे, इत्यादींसारख्या वातावरणीय आविष्कारांचे दृश्यमानतेवर परिणाम होतात व दृष्टिमर्यादा कमी होते. घनदाट धुक्यात काही मीटरांच्या पलीकडील वस्तू नीट दिसत नाहीत तथापि आर्क्टिक क्षेत्रांवरील विशुद्ध धूलिहीन हवेत १५० किमी. अंतरावरील पर्वतसुद्धा स्पष्टपणे दिसू शकतात.

भूपृष्ठावरील आडव्या प्रतलातील क्षितिजाच्या पार्श्वभूमीवर स्पष्टपणे उठून दिसणाऱ्या भेददर्शी रंगांच्या वस्तूंच्या निरीक्षकापासून असलेल्या महत्तम अंतराप्रमाणे दृश्यमानता ठरविली जाते. कोणत्याही वेळी अशा अंतरावर असलेल्या वस्तूचे दिसणे हे वातावरणीय घटकांप्रमाणेच त्या वस्तूंचा आकार, रंग, पार्श्वभूमी, वस्तूवरुन येणाऱ्या प्रकाशाची तीव्रता आणि निरीक्षकाच्या डोळ्यांची कार्यक्षमता ह्यांवर अवलंबून असते. या पद्धतीने काढलेल्या दृश्यमानतेने वातावरणाच्या प्रत्यक्ष पारदर्शकतेचे अचूक मापन होऊ शकत नाही. रात्रीच्या वेळी विशिष्ट दीप्तीचे दिवे ज्या अधिकतम अंतरावरून दिसू शकतात, ते अंतर म्हणजे रात्रीची दृश्यमानता होय.

विशेषतः वैमानिकांच्या आणि नाविकांच्या दृष्टीने दृश्यमानतेचे निरीक्षण अत्यंत महत्त्वाचे असते. विमानांचा किंवा जहाजांचा मार्ग निश्चित करताना, तो आक्रमित असताना आणि त्यातील धोके टाळताना दृश्यमानता उत्तम असणे आवश्यक असते. विमानतळ सोडताना किंवा विमानतळावर उतरताना, तसेच जहाजे बंदरात शिरताना किंवा बंदरातून बाहेर पडताना दृश्यमानता फार कमी असणे धोकादायक असते. सर्वसाधारणपणे कोणत्याही वेगवान वाहतुकीत वाहनांना त्यांचा मार्ग व थांबण्याची ठिकाणे स्पष्ट दिसावी लागतात. हल्लीच्या काळात रेडिओ, रडार वगैरे सोयींमुळे जरी मार्गातील धोका कळणे शक्य होत असले, तरी वेगवान वाहनांच्या रहदारीस कमी दृश्यमानतेमुळे धोका व अडथळा संभवतोच. कमी दृश्यमानतेमुळे विमाने डोंगरावर आढळून नष्ट झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. जहाजांच्या हिमनगांशी किंवा इतर जहाजांशी टकरी झाल्या आहेत. लंडन, टोकिओ, लॉस अँजेल्स, कलकत्ता यांसारख्या शहरांत दाट धुक्यामुळे अनेकदा रहदारी बंद ठेवावी लागते. एखाद्या विमानतळावर ठराविक मर्यादेपेक्षा दृश्यमानता कमी असल्यास तेथे येणाऱ्या विमानांना न उतरण्याचा सल्ला दिला जातो व ती इतर विमानतळांकडे वळविली जातात.

दृश्यमानता साधारणपणे नेहमी जमिनीवरील आडव्या प्रतलात मोजली जाते. तिला ‘क्षैतिज दृश्यमानता’ म्हणून निर्देशिले जाते. ‘ऊर्ध्व दृश्यमानता’ व ‘तिरपी दृश्यमानता’ यांसारख्या संज्ञा वैमानिक वाहतुकीच्या संदर्भात वापरतात. उंचीवरुन विमान खाली येऊनविमानतळावर उतरु लागते, तेव्हा वैमानिकाला काही विशिष्ट दिशांनी तिरप्या किंवा ऊर्ध्व दृश्यमानतेची जरुर लागते पण अशा रीतीने दृश्यमानता निश्चित करण्याच्या खात्रीलायक पद्धती सध्या तरी उपलब्ध नाहीत. जमिनीवर जेव्हा धुक्याचा किंवा हवेत धुळीचा अगर धुराचा एखादा कमी उंचीपर्यंतचा थर असतो तेव्हा हवेतून जमिनीकडील दृश्यमानता भूपृष्ठावरील क्षैतिज दृश्यमानतेपेक्षा अधिक असते. कारण बऱ्याच उंचीवरून जाणाऱ्या विमानातून जमिनीकडे पाहताना धुक्याच्या थरांची २००–२५० मी. जाडीच आड येते, पण जमिनीवरून जमिनीवरच्याच वस्तू पाहताना धुक्याच्या थराची कित्येक किमी. लांबी आड येते जमिनीपासून काही उंचीवर ढग वा धूळ असल्यास जमिनीवरील क्षैतिज दृश्यमानता हवेतून जमिनीकडील दृश्यमानतेपेक्षा बरीच अधिक असते.


परिणाम करणाऱ्या घटना : ज्या हवेत फक्त नेहमीचे घटक वायू व संद्रवण (द्रवीभवन) न झालेले जलबाष्प असते, त्या हवेची पारदर्शकता अधिकतम असते. अशा वातावरणात वैमामिकांना ३५० ते ४०० किमी. अंतरापर्यंतची पर्वतशिखरे दिसू शकतात परंतु अशी परिस्थिती क्वचितच आढळते. बहुतेक नेहमीच हवेत विविध आकारमानांचे अनेक पदार्थांचे असंख्य सूक्ष्म कण शिरत असतात. वातावरणातील घटक वायूंच्या रेणूंपेक्षा त्यांचे आकारमान बरेच मोठे असते. अशा सूक्ष्मकणांमुळे वातावरणात धूसरता निर्माण होते. समुद्रावरून येणाऱ्या खाऱ्या जलतुषारांचे बाष्पीभवन झाल्यानंतर उरलेले लवणकण, ज्वलनक्रियेमुळे निर्माण होणारे कार्बन व धूम्रकण, जोरदार वाऱ्यांमुळे इतस्ततः वाहत जाणारे सूक्ष्म धूलिकण व वालुकाकण वातावरणात शिरतात आणि ते सूर्यप्रकाशातील लाल रंगाच्या (दीर्घ तरंगलांबीच्या) प्रकाश तरंगांपेक्षा निळ्या रंगाच्या (लघुतर तरंगलांबीच्या) प्रकाश तरंगांचे अधिक प्रमाणात प्रकीर्णन (विखुरण्याची क्रिया) करतात. अशा घटनांमुळे निर्माण झालेल्या धूसरतेला काळ्या पार्श्वभूमीवर निळसर छटा प्राप्त होते.

धूसरता निर्माण करणारे बहुतेक सूक्ष्मकण आर्द्रताग्राही असतात. वातावरणात पुरेसे जलबाष्प असल्यास त्याचे ह्या सूक्ष्म कणांवर संद्रवण होते व त्यांचे आकारमान वाढू लागते. हे आकारमान ५ मायक्रॉन एवढे (१ मायक्रॉन = १०–३ मिमी.) झाले की, तो कण डोळ्यांना पांढऱ्या रंगाचा दिसू लागतो आणि अशा कणांची संख्या व आकारमान अधिक झाल्यावर धुक्यासारखा वातावरणीय आविष्कार उद्‌भवतो. धुक्यात दृश्यमानता १ किमी. पेक्षा कमी असते. दाट धुक्यात ती काही मीटर असते. झाकळ किंवा विरळ धुक्यात १ ते २ किमी.पर्यंतच्या वस्तू दिसू शकतात. धूसरतेत दृश्यमानता २ ते ५ किमी.पर्यंत असते [→ झाकळ धुके धूसर].

आर्द्रताग्राही नसलेले धूलिकण, वालुकाकण, सूक्ष्मजीव व कीटक धूलिवादळांसारख्या आविष्कारांमुळे वातावरणात शिरले, तर विस्तृत प्रमाणावर दृश्यमानता खूपच कमी होते. हिमवर्षाव किंवा जोरदार पर्जन्यवृष्टी होत असताना दृश्यमानता थोड्या मीटरांपर्यंत कमी होऊ शकते. भिन्न दिशांत दृश्यमानता भिन्न असू शकते. काही वेळा जमिनीवरील वस्तू काही उंचीवरुन पाहत असताना नीट दिसत नाहीत, पण त्याच वेळी जमिनीवरील दोन स्थानांमधील हवा मात्र स्वच्छ असून दृश्यमानता उत्तम असते. अशी स्थिती कारखाने असलेल्या शहराजवळील हवेत काही उंचीवर असलेल्या धुरकट स्तरांमुळे निर्माण होते. असे धुरकट स्तर मूळ ठिकाणापासून मंद वाऱ्याबरोबर केव्हा केव्हा १००–१२५ किमी. दूर जाऊन तेथील हवेची ऊर्ध्व किंवा तिरपी दृश्यमानता कमी करतात.

हवेच्या ज्या स्तरातून वस्तूंपासून निघालेला प्रकाश निरीक्षकाकडे येत असतो, त्या स्तराचे तापमान व त्याची आर्द्रता ही सर्व ठिकाणी सारखी नसल्यास दृश्यमानतेवर परिणाम होतो. दिवसा सूर्याच्या उष्णतेने तापलेल्या जमिनीवरील प्रक्षुब्ध हवेची दृश्यमानता ही सूर्यास्ताच्या वेळी वा पहाटेच्या वेळी असलेल्या दृश्यमानतेपेक्षा कमी असते. वाळवंटात असे नेहमी अनुभवास येते. ध्रुवप्रदेशांकडून विषुववृत्ताकडे सरकणाऱ्या हवेची दृश्यमानता साधारणपणे चांगली असते. याच्या उलट विषुववृत्ताकडून ध्रुवांकडे सरकणाऱ्या हवेची दृश्यमानता त्यामानाने कमी असते.

मापन : दृश्यमानतेच्या मापनासाठी २०, ४०, १००, २००, ४०० मी. व १, २, ४, ७, १०, २०, ३० व ५० किमी. अंतरावरील ठळकपणे दिसणाऱ्या वस्तूंची निवड करुन जी जास्तीत जास्त दूरची वस्तू स्पष्ट व नीट दिसते तिचे अंतर हे दृश्यमानतेचे माप समजून दृश्यमानता दोन सांकेतिक अंकांत दाखविली जाते. दिवसाची दृश्यमानता निश्चित करण्यासाठी निरीक्षकाच्या डोळ्यांपाशी साधारणपणे १/२° ते ५° चा कोन करणाऱ्या वस्तूंचीच निवड करतात. आकाशाच्या पार्श्वभूमीवर स्पष्टपणे दिसणारी धुराडी, मनोरे, लहान टेकड्या, उंच इमारती यांसारख्या वस्तूंचाही दक्षतापूर्वक उपयोग करता येणे शक्य आहे. रात्रीच्या वेळी दृश्यतामापनासाठी ठराविक अंतरावरील विशिष्ट तीव्रतेच्या दिव्यांचा उपयोग करतात. जास्तीत जास्त लांबचा दिवा पाहून त्याप्रमाणे दृश्यमानता निश्चित करतात. ह्याबाबतीत जागतिक वातावरणवैज्ञानिक संघटनेची पुढील शिफारस आहे. ‘एका ठराविक तापमानाच्या तेजस्वी दिव्याच्या समांतर किरण असलेल्या प्रकाशाचे तेज वातावरणाच्या ज्या लांबीतून गेल्यामुळे ०·०५ पटीने कमी होते, ती लांबी वातावरणाचा दृक्‌विषयक पल्ला समजावा. हवा स्वच्छ असताना हा पल्ला सर्वांत जास्त असून धूलिवादळांत किंवा दाट धुक्यात तो सर्वांत कमी असतो’.


रात्रीच्या वेळी दृश्यमानता निश्चित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रायोगिक दिव्यांचा प्रकाश निरीक्षकाच्या डोळ्यांना इष्ट प्रमाणात मिळणे, हे (१) प्रायोगिक दिव्यांच्या जवळपास इतर दिवे असणे, (२) पार्श्वभूमीचे प्रकाशन व (३) प्रायोगिक दिवे पाहण्यापूर्वी निरीक्षकाचा अंधारात असण्याचा कालावधी या गोष्टींवर अवलंबून असते. त्यामुळे विमानतळावर रात्रीची दृश्यमानता निश्चित करणे कठीण जाते. त्या मानाने दिवसा क्षितिजाच्या पार्श्वभूमीवर काळसर ठळक वस्तूंचे अंतर अजमावून दृश्यमानता ठरविणे सोपे जाते. पूर्ण चंद्राच्या प्रकाशात मोजलेली दृश्यमानता त्याच वातावरणातील दिवसाच्या दृश्यमानतेपेक्षा पाचपट कमी असलेली आढळली आहे.

मापके : एकामागून एक अशा अनेक वस्तूंची मालिका पाहून सर्वांत दूरच्या दिसणाऱ्या वस्तूचे अंतर हीच त्या वेळेची दृश्यमानता मानली जात असल्याने दृश्यमानता निश्चित करण्यासाठी क्वचितच यंत्रे–उपकरणे वापरण्यात येतात. तथापि पुढील काही दृश्यमानतामापके वापरात आहेत. (अ) हवेतील गढूळपणामुळे प्रकाशकिरणांचे शोषण व प्रकीर्णन होते आणि त्याचा दृश्यमानतेवर परिणाम होतो. या दोहोंपैकी शोषणाचा परिणाम अल्पसाच असतो. बव्हंशी प्रकीर्णनावरच दृश्यमानता अवलंबून असते. एका ठराविक जाडीच्या हवेच्या थरातून जाताना प्रकाशकिरणांची तीव्रता प्रकीर्णनामुळे किती कमी होते, ते प्रकाशमापकाच्या [→ प्रकाशमापन] साह्याने पाहून त्यावरून प्रकीर्णनांक काढतात व त्यावरुन दृष्टिमर्यादा निश्चित करतात पण ह्या पद्धतीने मिळविलेली माहिती विस्तृत प्रदेशावरील हवेची प्रातिनिधिक होत नाही. (आ) दुसऱ्या प्रकारच्या दृश्यमानतामापकात बऱ्याच अंतरावरील एका ठराविक दीप्तीच्या दिव्याच्या तीव्रतेत हवेतील गढूळपणामुळे होणारी घट एका प्रकाशविद्युत् घटाच्या (प्रकाश पडला असता ज्याच्या विद्युत् स्थितीत बदल होतो अशा प्रयुक्तीच्या) साह्याने मोजून तिचे दृश्यमानतेची प्रत दाखविण्यासाठी प्रमाणीकरण करतात. (इ) दृश्यमानतामापकात भिन्न पारदर्शकतेच्या तुषारित (पृष्ठभागावर बारीक वाळूच्या कणांचा मारा करून तयार केलेल्या) काचा वापरून ठराविक अंतरावरील खुणेची वस्तू ज्या पारदर्शकतेच्या तुषारित काचेने दिसेनाशी होते ते पाहून प्रकाशक्षीणनांक काढतात व त्यावरुन दृश्यमानता निश्चित करतात. ह्या प्रकारच्या दृश्यमानतामापकाचा उपयोग जहाजावरून समुद्रावरील दृश्यमानता ठरविण्यासाठी करतात.

संदर्भ : 1. Berry, F. A. Bollay, E. J. Beers, N. R. Handbook of Meteorology, New York, 1945.

            2. Kendrew, W. G. Climatology, Oxford, 1957.

नेने, य. रा.