हवामान : कोणत्याही भौगोलिक क्षेत्रावर किंवा पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणी अनेक वातावरणीय आविष्कार एकाच वेळी घडून आल्यामुळे वातावरणाला जी स्थिती प्राप्त होते, त्या स्थितीला त्या वेळेचे हवामान असे म्हणतात. वातावरणाची ती तत्कालीन स्थिती असते. वातावरणीय दाब, वाऱ्यांची दिशा व वेग, तापमान, ढगांचा विस्तार, ढगांच्या तळपृष्ठाची उंची आणि त्यांचे प्रकार, आर्द्रता, वर्षण आणि त्याचे विविध प्रकार, दृश्यमानता इ. भौतिक घटकांवर व त्यांच्यातील क्रिया-प्रक्रियांवर हवामान अवलंबून असते. हे भौतिक घटक सातत्याने बदलत असतात. हवामानही त्याप्रमाणे सारखे बदलत असते. निरनिराळ्या ऋतूंत वृष्टी, हिमवर्षाव, अंधुकता, वीजवादळ, चंडवात व तडिताघात हे साधारणपणे नेहमी प्रत्ययाला येणारे हवामानाचे आविष्कार आहेत. प्रतिवर्षी थोड्याफार अंतराने त्यांची पुनरावृत्ती होत असते.

 

प्रत्येक वातावरणीय घटक वातावरणाचे विशेष गुणधर्म दर्शवितो. निरनिराळ्या घटकांमुळे व आविष्कारांमुळे वातावरणाला एक प्रकारचे भौतिक स्वरूप प्राप्त झालेले असते, त्याला हवामान-संहती किंवा वातावरणीय आविष्कारांचा समूह (वेदर सिस्टीम) असे म्हणतात. त्यात भूपृष्ठावरील तसेच उच्च वातावरणातील सर्व पातळ्यांवर प्रतीत होणाऱ्या आविष्कारांचा समावेश करण्यात येतो. मानवी व्यवहारांचा हवामानाशी फार घनिष्ठ संबंध असतो. मानवी व्यवहारांचे असे एकही अंग किंवा उपांग नाही की, ज्याचा हवामानाशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध घडून येत नाही. या दृष्टीने हवामानाच्या निरीक्षणांत सूर्यप्रकाशाचे प्रमाण, उष्णतेच्या किंवा थंडीच्या लाटा, समुद्रपृष्ठावरील लाटांची उंची व तरंगलांबी आणि भूमिपृष्ठावर निर्माण होणारे महापूर यांसारख्या घटनाही अंतर्भूत केल्या जातात. काही वातावरणीय घटकांशी तडित्, ध्रुवीय प्रकाश, सौर आणि चांद्र किरीट (कोरोना) किंवा तेजोवलय, प्रभामंडल (हॅलो) इत्यादींसारखे विवक्षित प्रकाशीय आणि विद्युत् आविष्कार निगडित झालेले असतात. त्यांचीही हवामान निरीक्षणांत नोंद केली जाते.

 

विविध वातावरणीय घटकांत सातत्याने क्रिया-प्रक्रिया चालू असतात. त्यांतूनच हवामानाच्या आविष्कारांची शृंखला निर्माण होते. उदा., एखाद्या विस्तीर्ण प्रदेशावर तापमान घटले, वातावरणीय दाब वाढला आणि आर्द्रता कमी झाली की, तेथे उच्च दाबाचे विस्तृत क्षेत्र किंवा अपसारी चक्रवात अस्तित्वात येतो. अशा प्रदेशावर पृष्ठभागीय वारे मंदावतात. उपरी वारेही क्षीणतर झालेले असतात. उच्चतम दाबाच्या केंद्राभोवती उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने (सव्य), तर दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने (अपसव्य) चक्रवातातील हवा परिभ्रमण करू लागते. अशा परिसंचरणात आर्द्रता लक्षणीय प्रमाणात कमी झालेली असते. उच्च पातळीवरील हवा भूपृष्ठाकडे येऊन ती तप्ततर होते आणि चक्रवातातून निसटून बाहेर पसरू लागते. पर्जन्य-दायक मेघनिर्मितीचे सामर्थ्य अशा हवेत नसते. त्यामुळे अनेक दिवस त्या क्षेत्रावर हवामान पर्जन्यविरहीत, आकाश स्वच्छ किंवा किंचित ढगाळलेले असते. ऋतूप्रमाणे दैनिक तापमानाच्या अभिसीमा अधिक मूल्यांकनाच्या असतात. याउलट, भूमिपृष्ठ तापून तेथील हवा वर जाऊ लागली की, तेथे नीच वातावरणीय दाबाचे क्षेत्र निर्माण होते. विविध प्रकारचे आर्द्रतेने भारावलेले वातप्रवाह नीच दाबाच्या क्षेत्राकडे ओढले जातात. नीचतम वातावरणीय दाबाच्या केंद्राभोवती हवा परिभ्रमण करीत प्रदेशाकडे येऊन ती वर जाऊन थंड होऊ लागते. अशा रीतीने अभिसारी चक्रवात अस्तित्वात येतो. त्यामुळे विस्तीर्ण क्षेत्रावर मेघनिर्मिती होऊन जोरदार पर्जन्य किंवा हिमवृष्टी होते. अभिसारी चक्रवाताच्या केंद्राभोवती वारे उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने, तर दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने फिरू लागतात. [→चक्रवात वारे].

 

एका राष्ट्रावरची हवा, चक्रवात, वादळे व सीमापृष्ठे अन्य राष्ट्रांत जाऊन तेथे हवामानाचे विविध आविष्कार घडवून आणू शकतात. अशा आपत्तींची पूर्वकल्पना करून घेण्यासाठी निकटवर्ती देशांतील वातावरणाची निरीक्षणे अत्यावश्यक असतात. या सर्व निरीक्षणांत एकप्रमाणता आणि एकसूत्रता हवी असते. त्यामुळे वातावरणविज्ञान हे आंतरराष्ट्रीय सहकार्यानेच उपयुक्त, समृद्ध व यशस्वी होणारे शास्त्र बनले आहे. सर्व राष्ट्रांतील सर्व वेधशाळांनी दिवसाच्या विशिष्ट वेळीच, विवक्षित पद्धतींनीच हवामानाची निरीक्षणे करावीत आणि त्यांचे विशिष्ट रीतीनेच पद्धतशीर वितरण करावे. विशिष्ट पद्धतींनीच हवामानस्थिती निदर्शक नकाशे व आलेख तयार करावेत आणि हवामानाची पूर्वानुमाने द्यावीत, यासंबंधी सर्व वातावरणवैज्ञानिक कार्यालयांना आदेश देणारी जागतिक वातावरणवैज्ञानिक संघटना १९५१ मध्ये स्थापन झाली. या आधी ही कार्ये १८७३ मध्ये निर्माण केलेली वातावरणवैज्ञानिक संघटना करीत असे. या दोन्हीही संस्थांनी जगातील

 

सर्व राष्ट्रांच्या संमतीने हवामानाच्या निरीक्षणांत आणि अभ्यासात एकसूत्रता व सुसंबद्धता आणली आहे. जलीय किंवा आकाशीय वर्षणाचे (हायड्रोमिटिऑर्सचे) अनेक विभाग-उपविभाग पाडले आहेत. पर्जन्य, हिम, गारा, हिमतुषार (तुहिन), दव व धुके यांसारख्या जलीय आविष्कारांचे अनेक प्रकार दिले आहेत. आकाशीय वर्षणात धुळी-वादळे व धूम्रकण प्रसरण यांचाही समावेश केला आहे. उत्पत्तीप्रमाणे मेघांचे ३६ प्रकारात विभाजन केले आहे आणि हवामानाच्या आविष्कारांचे सु. ९९ प्रकार दिले आहेत. जागतिक वातावरणवैज्ञानिक संघटनेचा भारत सभासद आहे. भारतातील सर्व वातावरणवैज्ञानिक कार्यालये या संघटनेच्या आदेशानुसार हवामानीय निरीक्षणे करणे, त्यांचे संकलन व विश्लेषण करणे, हवामानाचे नकाशे तयार करणे व हवामानाचे अंदाज वर्तविणे इ. कामे करतात.

 

पहा : जलवायुविज्ञान वातावरणविज्ञान वेधशाळा, वातावरणविज्ञानीय.

संदर्भ : 1. Aguado, E. Burt, J. E. Burt, J. Understanding Weather and Climate, 3rd ed. 2003.

          2. Ahrens, C. D. Meteorology Today With Infotrac : An Introduction to Weather, Climate and the Environment, 6th ed. 1999,

            3. Barry, R. C. and Chorley R. J. Atmosphere, Weather and Climate, 8th ed. 2003.

            4. Byers, H. R. General Meteorology, New York, 1944.

            5. Cotton, W. R. Pielke, R. A. Human Impacts on Weather and Climate, 1995.

            6. Petterssen, S. Introduction to Meteorology, New York, 1969.

            7. Willett, H. C. Sanderr, F. Descriptive Meteorology, New York, 1959.  

चोरघडे, शं. ल.