वादळ : वातावरणविज्ञानात वादळ ही सर्वसाधारण संज्ञा वातावरणीय क्षोभांना म्हणजे खळबळाटांना लावण्यात येते. वातावरणात कधीकधी निर्माण होणाऱ्या अस्थिरतेमुळे (उदा., हवामान, वारे, दाब वगैरेंमधील अस्थिरतेमुळे) क्षोभांची निर्मिती होते. क्षोभांचे क्षेत्रीय प्रमाण निरनिराळे असते. क्षोभांतील आविष्कार क्षोभांच्या क्षेत्रीय प्रमाणावर अवलंबून असतात. वादळांचे मुख्यतः पुढील चार प्रकार करता येतील : (१) प्रादेशिक स्वरूपाची वादळे. ही वादळे म्हणजे जोरात वाहणारे (तीव्र) वारेच असतात (२) लहान क्षेत्रावर होणारी वादळे (३) मोठ्या क्षेत्रावर होणारी उष्ण कटिबंधीय चक्री वादळे आणि (४) अतिविस्तृत क्षेत्रावर होणारे समशीतोष्ण कटिबंधातील अभिसारी चक्रवात.

प्रादेशिक स्वरूपाची वादळे : यांत वाऱ्याची गती कधीकधी हरिकेनमधील वाऱ्याएवढी तीव्र होते. विशेष म्हणजे वाऱ्यामुळे बरीच धूळ वा रेती उधळली जाऊन वाहून नेली जाते. ह्या धुळी वादळांत ईजिप्त व पूर्व सहारामध्ये ‘खामसिन’, उत्तर सहारामध्ये ‘शेखाली’, मध्य सहारात ‘हर्माटन’, आग्नेय सहारामध्ये ‘हबूब’, भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर ‘सिरोक्को’, आशिया मायनर व अरेबियात ‘सिमूम’ याप्रमाणे नावे आहेत. अशी वादळे दक्षिण सायबीरिया, रशिया, पश्चिम यूरोप, अमेरिकेची संयुक्त संस्थाने येथे होतात. तेथे यांस काळोखी वादळे असे संबोधिले जाते. सहारातील वादळांत धूळ व रेती बरीच दूरपर्यंत वाहून नेली जाते. [⟶ धुळी वादळ].

लहान क्षेत्रांवर होणारी वादळे : यांमध्ये गडगडाटी वादळ, ⇨ धुळी वादळ, ⇨ घूर्णवाती वादळ आणि जलशुंडा यांचा सामावेश होतो.

गडगडाटी वादळ आणि धुळी वादळ : अतिउंच वाढलेल्या गर्जन्मेघामुळे (क्युमुलोनिंबस ढगामुळे) गडगडाटी वादळ निर्माण होते. वातावरणात निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे हवेस उदग्र (उभ्या दिशेत) गती प्राप्त होते आणि हवा भूपृष्ठावरून वर जाते. त्यामुळे राशिमेघ (क्युमुलस) हे घनदाट ढग निर्माण होऊन त्यांची उंची वाढत जाते आणि त्यांचे रूपांतर गर्जन्मेघात होते. विजा चमकणे, गडगडाट, जोरदार वृष्टी, गारांचा पाऊस इ. आविष्कार ह्या वादळात निर्माण होतात. तसेच वर गेलेली आणि थंड झालेली हवा तीव्र गतीने (जोराने) खाली येऊन चंडवात [अल्पावधीत एकाएकी जोरावून नंतरच्या कित्येक मिनिटात क्रमशः मंद हात जाणारा वारा⟶ चंडवात] निर्माण होतो. गडगडाटी वादळाचे क्षेत्र सु. १५ किमी. x १५ किमी. एवढे असते आणि कालावधी अर्धा ते एक तास असतो परंतु कधीकधी एका वादळापासून जवळपास दुसरी वादळे निर्माण होऊन गडगडाटी वादळ २ ते ३ तासांपर्यंत चालू राहते आणि एकंदर वादळी क्षेत्राची वाढ होते. उष्ण कटिबंधीय प्रदेशांत ही वादळे प्रामुख्याने दुपारी वा संध्याकाळी होतात. समशीतोष्ण कटिबंधात ती शीत सीमापृष्ठाजवळ [उष्णार्द्र हवा व शीत शुष्क हवा विभक्त करणाऱ्या पृष्ठाजवळ⟶सीमापृष्ठ] होतात. कधीकधी वादळात पावसाऐवजी हिम पडते किंवा गारा पडतात. त्या वेळी त्यास हिम वादळ किंवा गारांचे वादळ असे संबोधिले जाते. धुळी वादळ गडगडाटी वादळासारखेच असते. यात हवा बरीच कोरडी असल्यामुळे पाऊस किंवा गारा पडत नाहीत पण धूळ मात्र बरीच उंच उधळली जाते आणि दृश्यमानता फारच कमी होते. [⟶ गडगडाटी वादळ धुळी वादळ].

घूर्णवाती वादळ : हे वादळ वावटळीसारखे असून यात हवेची गती चक्राकार असते. घूर्णनाची (वर्तुळाकार फिरण्याची) दिशा घड्याळाच्या काट्याप्रमाणे अथवा त्याच्या उलट अशी कोणतीही असते. ढगातून एक सोंडेसारखा भाग खाली आलेला असतो. कधीकधी तोंड भूपृष्ठापर्यंत पोहोचते. ही सोंड तीव्र गतीने गोल फिरणाऱ्या भोवऱ्यासारखी असते. ह्या सोंडेमुळेच फार विध्वंस होतो. वादळाच्या केंद्राजवळ हवेचा दाब बराच कमी असतो आणि हवेची उदग्र गती फार तीव्र असते. त्यामुळे अशा वादळाच्या सपाट्यात सापडलेली घरांची छप्परे, माणसे, गाई, म्हशी वर फेकल्या जातात. मालमत्ता आणि जीवित यांची बरीच हानी होते. या वादळाची रुंदी सु. २००-४०० मी. असते पण ती काही मीटरपासून २,००० ते ३,००० मी. एवढी असू शकते. उंची सरासरी ४०० मी.च्या आसपास असते पण ती ५० ते २,००० मी.पर्यंत असू शकते. वादळाच्या मार्गाची लांबी ५ ते ३० किमी. असते. यात वाऱ्याची गती ३०० ते ५०० किमी./तास इतकी असू शकते. वादळाची गती सु. १५ ते ५० किमी./तास एवढी असते. अशी वादळे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या मध्य भागामध्ये उन्हाळ्यात बरीच होतात. त्यामुळे फार नुकसान होते. या वादळात जोराची वृष्टी, विजा चमकणे, गडगडाट, गारा इ. आविष्कार होतात [⟶ घूर्णवाती वादळ].


जलशुंडा : सागरावर होणारा हा आविष्कार घूर्णवाती वादळासारखा असून साधारणपणे तो उष्ण कटिबंधात होतो. ढगांतून एक सोंडेसारखा भाग खाली येतो. या सोंडेचा खालचा भाग खाली येऊन तुषारांच्या ढगात शिरतो. तुषारांचा स्तंभ ६-१० मी. व्यासापासून ५०-६० मी.व्यासापर्यंत असू शकतो. ढगाचा तळ ६० ते ३०० मी. उंच असू शकतो. जलशुंडेचा कालावधी १० ते ३० मिनिटे असतो. वारा चक्राकार असून वाऱ्याची गती तीव्र असते. [⟶ जलशुंडा].

उष्ण कटिबंधीय चक्री वादळे : या वादळात हवेला भोवऱ्यासारखी चक्राकार गती असते. हे वादळ म्हणजे उष्ण कटिबंधातील एक न्यून दाब (कमी दाबाचे) क्षेत्र असते. न्यून दाबाची तीव्रता एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे पोहोचली म्हणजे न्यून दाब क्षेत्राला चक्री वादळ असे संबोधिले जाते. चक्री वादळाची तीव्रता न्यून दाब क्षेत्राशी संबंधित असलेल्या वाऱ्याच्या गतीवरून ठरविली जाते. उदा., चक्री वादळात वाऱ्याची गती ३४ नॉट (१ नॉट= १.८४ किमी./तास) किंवा ६३ किमी./तास एवढी वा जास्त असते, तीव्र चक्री वादळात ती ४८ नॉट वा ८८ किमी./ तास वा अधिक असते आणि हरिकेन, टायफून, सायक्लोन, विलीविली यांमध्ये ती ६४ नॉट वा ११८ किमी./तास वा जास्त असते.

निर्मितीचे क्षेत्रे आणि गमनमार्ग : चक्री वादळे सागरावर ५ ते २० ह्या अक्षांशीय पट्ट्यात निर्माण होतात. फक्त दक्षिण अटलांटिक महासागरात चक्री वादळे निर्माण होत नाहीत. चक्री वादळाचा उगम २६-२७ से. तापमान असलेल्या सागरी पृष्ठावर होतो. अती तीव्र चक्री वादळांना निरनिराळी स्थानिक नावे आहेत. उदा., पश्चिम अटलांटिक महासागरात ⇨हरिकेन, पश्चिम पॅसिफिक महासागरात ⇨टायफून, दक्षिण हिंदी महासागर, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर येथे सायक्लोन, ऑस्ट्रेलियाच्या आसपासच्या सागरी प्रदेशात विलीविली.

उत्तर गोलार्धात ही वादळे प्रथम पश्चिमेकडे, नंतर वायव्येकडे, नंतर उत्तरेकडे आणि शेवटी ईशान्येकडे सरकतात. ईशान्येकडे सरकल्यानंतर ती समशीतोष्ण कटिबंधात प्रवेश करतात आणि तेथे त्यांचे समशीतोष्ण कटिबंधीय अभिसारी चक्रवातात रूपांतर होते. दक्षिण गोलार्धात सुरुवातीला पश्चिमेकडे, नंतर नैर्ऋत्येकडे, नंतर दक्षिणेकडे आणि शेवटी आग्नेयीकडे सरकल्यावर त्यांचे समशीतोष्ण कटिबंधीय अभिसारी चक्रवातात रूपांतर होते.

चक्री वादळांचा ऋतू : उत्तर गोलार्धात साधारणपणे ही वादळे जून ते नोव्हेंबर या कालावधीत उगम पावतात. निर्मितीचे प्रमाण सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सर्वांत जास्त असते. दक्षिण गोलार्धात चक्री वादळे डिसेंबर ते एप्रिल या कालावधीत उगम पावतात आणि निर्मितीचे प्रमाण जानेवारी ते मार्चमध्ये सर्वांत जास्त असते. चक्री वादळांची सरासरी वार्षिक व मासिक वारंवारता ‘चक्रवात’ या लेखात दिली आहे.

वादळनिर्मितीचे अभिज्ञान किंवा ओळख : सागरावर असलेल्या न्यून दाब अथवा न्यूनतर दाब क्षेत्रावर हवामान कार्यालयातील अधिकारी लक्ष ठेवतात. विशेष निरीक्षणांची गरज भासली, तर त्या भागातील जहाजांना व संबंधित किनाऱ्यावरील वेधशाळांना विनंती करून दर तासाला हवामान विषयक निरीक्षणे मागवितात. ही निरीक्षणे नकाशावर मांडून त्यांचे विश्लेषण केले जाते. अशा प्रकारे दर तासाला केलेल्या विश्लेषणाच्या आधारे चक्री वादळाच्या निर्मितीसंबंधी कळते. त्याशिवाय ढगाचे जागतिक छायाचित्रण कृत्रिम उपग्रहाकडून प्राप्त होते. त्यावरूनही चक्री वादळ निर्माण झाल्याचे कळू शकते. चक्री वादळाशी संबंधित ढगाचे वलयाकार पट्टे ढगाच्या छायाचित्रात दिसतात. ज्या सागरावर जहाजांचे दळणवळण फार कमी आहे त्या सागरावर चक्री वादळ निर्माण झाले, तर ढगाच्या जागतिक छायाचित्रावरूनच ते कळू शकते. चक्री वादळ तीव्र होऊन त्यचे हरिकेन किंवा टायफूनमध्ये रूपांतर झाले म्हणजे या छायाचित्रात ढगाचे वलयाकार पट्टे फार स्पष्ट झालेले दिसतात. 


निर्मितीची कारणे : सागरावर न्यून दाब क्षेत्र बऱ्याच वेळा आढळते. सागराचे तापमान जास्त असल्यास वातावरणाच्या खालच्या भागास सागरापासून उष्णता व बाष्प प्राप्त होते. बाष्पाच्या संद्रवणामुळे (पाण्यात रूपांतर झाल्यामुळे) वातावरणास संद्रवणाची सुप्त उष्णताही प्राप्त होते. अशा रीतीने न्यून दाब क्षेत्रावर वातावरणाचा खालचा भाग तापतो. अशा वेळी न्यून दाब क्षेत्रावर वरच्या पातळीत एखाद्या दाब प्रणालीमुळे अपसारण (हवा केंद्रापासून दूरवर नेली जाण्याची क्रिया) निर्माण झाले, तर हवा खालच्या पातळीवरून वर जाण्यास सुरुवात होते. त्यामुळे खालच्या भागात हवा आसपासच्या प्रदेशावरून न्यून दाब क्षेत्रात येते आणि अभिसरणाचे प्रमाण वाढून न्यून दाब क्षेत्राची तीव्रता वाढते. अशा रीतीने न्यून दाब क्षेत्राचे न्यूनतर दाब क्षेत्रात रूपांतर होते. अशा वेळी न्यूनतर दाब क्षेत्राशी संबंधित असलेल्या वाऱ्याची गती वाढून १७ ते ३३नॉटच्या दरम्यान होते. ह्याच पद्धतीने न्यूनतर दाबाची तीव्रता वाढून त्यांचे चक्री वादळात रूपांतर होते काही चक्री वादळांची तीव्रता त्यांचे रूपांतर तीव्र चक्री वादळात होते पण अशा चक्री वादळांचे प्रमाण बरेच कमी आहे. फारच थोड्या प्रमाणात तीव्र चक्री वादळांचे रूपांतर अतितीव्र चक्री वादळात म्हणजे हरिकेन, टायफून, सायक्लोन किंवा विलीविलीमध्ये होते. त्यामुळे असे दिसून येते की, एखादी विशिष्ट वातावरणीय परिस्थिती असली किंवा निर्माण झाली म्हणजेच अतितीव्र वादळाची निर्मिती होते. ही अनुकूल परिस्थिती जुळून येण्यास नक्की कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते, हे अद्याप समजू शकले नाही. 

वादळाची संरचना : चक्री वादळाची संरचना त्याच्या विकासाच्या अवस्थेवर अवलंबून असते. विकासाच्या दृष्टीने खाली दिल्याप्रमाणे त्याच्या चार अवस्था आहेत. 

() आरंभावस्था : जेव्हा पृष्ठभागीय नकाशावर बंद वर्तुळाकार समदाब रेषा (सारखा वातावरणीय दाब असणाऱ्या ठिकाणांतून जाणाऱ्या रेषा) निर्माण होतात, तेव्हा ती अवस्था सुरू होते आणि सायक्लोन किंवा हरिकेन निर्माण होतो तेव्हा ही अवस्था संपते. 

() तीव्रता वाढीची अवस्था : मध्यवर्ती हवेचा दाब कमीत कमी होईपर्यंत तसेच तीव्रता अधिकतम होईपर्यंत ही अपरिपक्व अवस्था चालू असते. समदाब रेषा वर्तुळाकार होत जातात, तसेच रेषांची संख्या वाढत जाते. 

() परिपक्व अवस्था : या अवस्थेनंतर सायक्लोनच्या तीव्रतेत वाढ होत नाही. समदाब बाहेरच्या बाजूस पसरून सायक्लोनचे क्षेत्र विस्तृत होते. थोड्या प्रमाणात तीव्रता कमी होण्यास सुरुवात होते. 

() ऱ्हासावस्था : किनाऱ्यावर आदळल्याबरोबर सायक्लोनचा झपाट्याने ऱ्हास होऊ लागतो. समुद्रावर असतानाही कधीकधी विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सायक्लोनचा ऱ्हास होत जातो. 

चक्री वादळाची व्याप्ती व्यास ८० किमी. इतकी कमी असू शकते. तसेच ती ३,००० किमी. इतकी मोठी असू शकते. निरनिराळ्या सागरी प्रदेशांवर व्याप्तीच्या बाबतीत बरेच मोठे फरक दिसून येतात. त्याशिवाय वादळाची व्याप्ती वादळाच्या तीव्रतेवरही अवलंबून असते. तीव्रतम वादळात ‘नेत्र’ म्हणजे वादळाचा वैशिष्ट्यपूर्ण गाभा निर्माण झालेला असतो. नेत्राचा सरासरी व्यास २० ते २५ किमी. असतो पण एखाद्या तीव्रतम चक्री वादळात हा व्यास १० किमी. इतका कमी तसेच ४५ किमी. इतका जास्त असतो. यास नेत्र म्हणण्याचे कारण असे की, या भागावर ढगाचे प्रमाण फारच कमी असल्यामुळे ह्या भागातून आकाश दिसते. या भागात वारा मंद वाहतो, तापमान आसपासच्या भागांपेक्षा जास्त असते आणि हवेस मंद अधोगती असते. नेत्राच्या भोवतालच्या क्षेत्रात त्याच्या मध्यभागापासून सु. २०० किमी.पर्यंत अतितीव्र वारे वाहतात व जोरदार पाऊस पडतो. त्यापुढे ५०० ते ८०० किमी.पर्यंत वाऱ्याची गती, ढगाचे आणि पावसाचे प्रमाण कमी होत जाते आणि शेवटी वारा मंद होतो, ढगाचे प्रमाण बरेच कमी होते आणि पाऊस बंद झालेला असतो. चक्री वादळाचे हरिकेनमध्ये रूपांतर झालेले नसेल, तर केंद्रापासून सु. २०० किमी.पर्यंत तीव्र वारा वाहतो आणि जोराचा पाऊस पडतो. त्यापलीकडे वाऱ्याची व पावसाची तीव्रता कमी कमी होते आणि ५०० ते ६०० किमी. अंतरावर वारा मंद झालेला असतो तसेच पाऊस बंद झालेला असतो. नेत्राचा भाग सोडल्यास चक्री वादळाच्या क्षेत्रावर तीव्र अभिसारण (हवा केंद्राकडे जाण्याची क्रिया) असून १ ते २ किमी. उंचीपर्यंत तीव्र ऊर्ध्व (वरच्या दिशेतील) गती असते. ती कमी होत जाऊन ६ किमी. उंचीवर अपसारण सुरू होते. अपसारणाची तीव्रता १०-१२ किमी. उंचीपर्यंत वाढत जाते. ह्या अपसरणामुळे वादळी क्षेत्राच्या आसपासच्या प्रदेशावर हवेस अधोगती प्राप्त होते. अशा प्रकारे वातावरणाच्या खालच्या थरात आसपासच्या प्रदेशावरून हवा वादळाच्या क्षेत्रात शिरते. वादळाच्या क्षेत्रात एकत्र आलेली हवा वर जाते आणि ती वरच्या पातळीवर पसरते आणि नंतर खाली सरकून सायक्लोनच्या आसपास भूपृष्ठावर येते.  


हरिकेनच्या नेत्रात हवेचा दाब साधारणपणे ९०० ते ९४० मिलिबार असतो. एका हरिकेनमध्ये तो ८७० मिलिबार इतका कमी आढळलेला आहे. चक्री वादळाचे आयुष्य ते सागराच्या कोणत्या भागात निर्माण झाले आहे यावर, तसेच त्याच्या गतीवर अवलंबून असते. उष्ण कटिबंधीय चक्री वादळाचे जास्तीत जास्त आयुष्य १२ दिवस आढळले आहे. चक्री वादळ कधीकधी स्थिर राहते. उष्ण कटिबंधात त्याची गती साधारणपणे १० ते २० नॉट असते पण उष्ण कटिबंधातून समशीतोष्ण कटिबंधात प्रवेश केल्यानंतर चक्री वादळाचे समशीतोष्ण कटिबंधीय अभिसारी चक्रवातात रूपांतर होऊन त्याची गती २०-३० नॉट होते. 

चक्री वादळ म्हणजे वातावरणात चक्राकार फिरणारा तसेच पुढे सरकणारा एक स्तंभ असतो. त्यामुळे या स्तंभाच्या आसपास वातावरणातील हवेची जी गती असते त्या गतीवर चक्री वादळ सरकरण्याची गती अवलंबून राहते. साधारणपणे वादळ सरकण्याची गती वातावरणात ६ ते ९ किमी. उंचीवर असलेल्या गतीच्या ६० ते ८० टक्के असते, असे अभ्यासावरून दिसून आले आहे. वादळाच्या पुढील क्षेत्रावर असलेली वाऱ्याची गती मागील क्षेत्रावरच्या वाऱ्याच्या गतीपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे वादळाची गती दर्शविते.

चक्री वादळातील आविष्कार आणि त्यामुळे होणारा विध्वंस : झंजावात किंवा सोसाट्याचा वारा : यात वाऱ्याची गती सामान्यतः ४० ते १०० नॉट असते पण अतितीव्र चक्री वादळात ती २०० नॉट अथवा त्यापलीकडे पोहोचली असल्याचा निष्कर्ष अभियंत्यांनी झालेल्या विध्वंसावरून काढलेला आहे. वेगमापकाने जास्तीत जास्त मापलेली गती सु. १५० नॉट आहे, त्यापेक्षा वेगवान वाऱ्यापुढे वेगमापक टिकू शकत नाही. चक्री वादळातील अतितीव्र वाऱ्याच्या गतीची मापने व त्याचे अंदाज जमिनीवर घेतलेले आहेत. समुद्रावर यासंबंधी अंदाज घेणे फार कठीण आहे. भूपृष्ठ समुद्रपृष्ठापेक्षा बरेच खडबडीत असते, त्यामुळे समुद्रावरील अतितीव्र वादळी वारा जमिनीवरील अतितीव्र वादळी वाऱ्यापेक्षा जास्त वेगवान असतो. अतितीव्र वाऱ्यामुळे जीविताची व मालमत्तेची बरीच हानी होते.

पूर : चक्री वादळातील अखंड मुसळधार पावसामुळे जोरदार पूर येतो. ह्या पुरामुळे मालमत्तेची हानी तसेच प्राणहानी फार होते [⟶ पूर]. 

चक्री वादळ निर्मित लाट : चक्री वादळ अतितीव्र असते तेव्हा त्यात मध्यभागी नेत्र असतो. येथे हवेचा दाब फारच कमी असतो. ह्या भागात समुद्राची पातळी वर उचलली जाते. त्यामुळे जेव्हा अतितीव्र चक्री वादळ समुद्रकिनाऱ्यावर आदळते, तेव्हा समुद्रकिनाऱ्यावर व आतील भागात पाण्याचा मोठा लोंढा पसरतो. त्यामुळे भयंकर प्राणहानी आणि मालमत्तेची हानी होते. ही लाट ३ ते ६ मी. उंच असू शकते. 

चक्री वादळ निर्मित भरती  : अतितीव्र वाऱ्यामुळे समुद्रकिनाऱ्याजवळ भरती येते. अशी भरती १ ते ३ मी. उंच असू शकते. नेहमीची भरती आणि चक्री वादळामुळे निर्माण झालेली भरती यांची वेळ जुळून आली, तर भरतीमुळे अतोनात नुकसान होते. आर. एल्. सदर्न ह्या शास्त्रज्ञांनी १९६४ ते १९७८ या १४ वर्षात उष्ण कटिबंधीय चक्री वादळे, तसेच भूकंप व त्याने निर्माण होणाऱ्या लाटा, पूर, घूर्णवाती व तीव्र स्थानिक वादळे, हिमलोट, भूमिपात, ज्वालामुखी उद्रेक, उष्णतेची वा थंडीची लाट वगैरे इतर नैसर्गिक आपत्तींमुळे जगात झालेल्या प्राणहानीची, तसेच प्रत्येक प्रकारच्या एका आपत्तीत जास्तीत जास्त प्राणहानी किती झाली याचीही माहिती गोळा केली आहे. या माहितीवरून असे दिसून येते की, उष्ण कटिबंधीय चक्री वादळामुळे सर्वांत जास्त प्राणहानी होते. 

समशीतोष्ण कटिबंधीय अभिसारी चक्रवात : ह्यांची निर्मिती  उत्तर व दक्षिण गोलार्धातील समशीतोष्ण कटिबंधांत (अक्षांश ३५ ते ६५) होते. साधारणपणे हे पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकतात आणि यांची क्षेत्रीय व्याप्ती बरीच मोठी असते (२,००० ते ४,००० किमी. व्यास). कधीकधी उष्ण कटिबंधीय चक्री वादळ समशीतोष्ण कटिबंधात शिरते, तेव्हा त्याचे रूपांतर समशीतोष्ण कटिबंधीय चक्रवातात होते.  


उच्च अक्षांशांस वायुराशी [ज्याची हवामानविषयक वैशिष्ट्ये, विशेषतः तापमान वा आर्द्रता यांचे वितरण, ही क्षैतिज पातळीत जवळजवळ एकसारखी असते अशा वातावरणाचा विस्तृत भाग ⟶ वायुराशि] थंड व कोरडी असून तिची घनता जास्त असते. याच्या उलट मध्य अक्षांशांस वायुराशी उबदार असते आणि हवेची घनता कमी असते. कधीकधी एखाद्या भागातील उबदार हवेचे थंडगार हवेवर आक्रमण होऊन वातावरणात अस्थिरता निर्माण होते. ह्या अस्थिरतेमुळे एक न्यून दाब क्षेत्र निर्माण होते. वातावरणातील काही घडामोडींमुळे, विशेषतः वातावरणाच्या वरच्या थरातील, न्यून दाब क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे अभिसारी चक्रवातात रूपांतर होते. [⟶ चक्रवात].

अभिसारी चक्रवातात खालील गोष्टी आढळतात.

(अ) उबदार सीमापृष्ठ : उबदार हवा शीत हवेवर चढते. यामुळे अक्रमी शीतलीकरण होऊन ढग व पाऊस वा हिम यांची निर्मिती होते. [⟶ सीमापृष्ठ].

(आ) उबदार विभाग :  उबदार व दमट हवेत स्थिरता असल्यामुळे येथे आकाश निरभ्र असते किंवा धुके अथवा तुषारवृष्टी होते.

(इ) शीत सीमापृष्ठ : शीत हवा उबदार हवेला पुढे आणी वर ढकलते. त्यामुळे उबदार हवा थंड हवेवर चढते. जमिनीस लागून असलेल्या थंड हवेची गती घर्षणामुळे कमी होते पण वाढत्या उंचीबरोबर घर्षणाचा प्रभाव कमी होऊन ठराविक उंचीपर्यंत हवेची गती वाढत जाते. त्यामुळे थंड हवा नाकासारखा आकार धारण करते. नाकाच्या टोकाजवळील हवेत बरीच अस्थिरता निर्माण होऊन गर्जन्मेघ, गडगडाटी वादळ, जोरदार पाऊस वा हिम, गारा, चंडवात (कधीकधी तीव्र चंडवात) इ. आविष्कार निर्माण होतात. थंड हवेचे नाक पुढे सरकून गेल्यावर ढगाचे प्रमाण कमी होऊन थंड वायुराशीप्रमाणे आकाश निरभ्र होते.

पहा : गडगडाटी वादळ घूर्णवाती वादळ चंडवात चक्रवात जलशुंडा टायफून धुळी वादळ वावटळ हरिकेन.

संदर्भ : 1. Anthes, R. A. Tropical Cyclones : Their Evolution, Structure and Effects, Boston, 1982.

           2. Dunn, G. E. Tropical Cyclones, Boston, 1951.

           3. Dunn, G. E. Miller, B. I. Atlantic Hurricances, Louisiana, 1964.

           4. Nalivkin, D. V. Hurricanes, Storms, Tornadoes, New Delhi, 1982.

           5. Riehl, H. Tropical Meteorology, New York, 1954.

           6. Tanehill, I. R. Hurricanes, Their Nature and History, Princeton, 1945.

 

मुळे, दि. आ.