मॉन्सून वारे: विशाल भूखंड व त्यालगतचे समुद्र यांच्या तापमानांत हिवाळ्यात व उन्हाळ्यात होणाऱ्या फरकांमुळे प्रचलित वाऱ्यांच्या दिशांत व्युत्क्रमण निर्माण होते (म्हणजे ऋतूंप्रमाणे उलट सुलट दिशांनी वाहणारे वारे निर्माण होतात) यास मॉन्सून वारे म्हणतात. विस्तीर्ण भूखंडीय भागावरील जलवायुमानावर (दीर्घकालीन सरासरी हवामानावर) या विशाल पवनव्यूहाचा प्रभाव पडत असतो. अरबी समुद्रावर हिवाळ्यात ईशान्येकडून व उन्हाळ्यात नैर्ऋत्येकडून वाहणाऱ्या ऋतुकालिक वाऱ्यांना प्रथम अरबांनी मॉन्सून हे नाव दिले. अरबी भाषेत ‘मौसीम’ म्हणजे ऋतू. त्यावरून मॉन्सून हे नाव पडले. या वाऱ्यामुळे केवळ अरबी समुद्रावरीलच नव्हे, तर लगतच्या आफ्रिकेच्या भागावरील व संपूर्ण दक्षिण आणि विशेषतः आग्नेय आशियाच्या विशाल क्षेत्रावरील पवनदिशांत व हवामानात ऋतूंप्रमाणे मूलभूत स्वरूपाचे बदल घडून येतात. पृथ्वीच्या वातावरणात उष्णतेचे फार मोठ्या प्रमाणावर परिवहन घडविणारी यंत्रणा म्हणजे मॉन्सून वारे होत. मॉन्सून वाऱ्यांपासून मिळणाऱ्या पावसाचा संबंध जगातील निम्म्या लोकांच्या जीवनाशी पोहोचतो.

नीच अक्षवृत्तांवरील उत्तर ऑस्ट्रेलिया, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील गल्फ किनारपट्टी, मध्य आणि दक्षिण आफ्रिका, दक्षिण अमेरिका यांसारख्या विस्तीर्ण भूखंडीय प्रदेशांवरही आशियाई मॉन्सूनसारखे लाक्षणिक जलवायुमान प्रत्ययास येते. त्यांना ‘मॉन्सूनसम वाऱ्यांचे प्रदेश’ म्हणून निर्देशिले जाते.

मॉन्सून पवनव्यूहांची निर्मिती : भूमी आणि पाणी यांवर सौर प्रारणांचा (तरंगरूपी ऊर्जेचा) भिन्न प्रकारे परिणाम होतो. याची दोन प्रमुख कारणे आहेत. एक कारण असे की, पाण्याची उष्णता धारण करण्याची क्षमता (एक अंश तापमान वाढविण्यास द्यावी लागणारी उष्णता) अधिक असते. यामुळे एकाच मूल्याचे सौर प्रारण सारख्याच वस्तुमानाच्या भूमीवर व पाण्यावर पडल्यास भूमीच्या तापमानातील वाढ ही पाण्याच्या तापमानातील वाढीच्या जवळजवळ दुप्पट असते. दुसरे कारण म्हणजे मिसळण्याची प्रक्रिया फक्त पाण्यातच सहज होत असते. यामुळे पाण्याच्या पृष्ठभागाला मिळालेली उष्णता पाण्यात होणाऱ्या हालचालींमुळे खालच्या थरांना वाटली जाते. हिवाळ्यात पृष्ठभागी थंड झालेले पाणी अधिक घनतेमुळे खाली जाऊन त्याची जागा खालच्या थरांतील उष्ण पाणी घेते. यामुळे महासागरांच्या तापमानात ऋतुमानानुसार मोठे फरक पडत नाहीत. महासागर एक प्रकारे उष्णता साठवणाऱ्या प्रचक्राचे (एखाद्या यंत्राला प्राप्त होणारी वा त्यापासून मिळणारी ऊर्जा बदलत असेल, तर त्याची गती इष्ट मर्यादेत राखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विशिष्ट रचनेच्या चक्राचे) काम करतात. याउलट भूमी उन्हाळ्यात जलद व खूप तापते आणि हिवाळ्यात थंड होते. अशा तऱ्हेने हिवाळ्यात विशाल भूखंडे थंड होतात. लगतचे महासागर त्यामानाने उष्ण असतात. भूखंडांवर हवेच्या उच्च दाबाचे क्षेत्र प्रस्थापित होते, तर महासागरावर न्यून (कमी) दाबाचे क्षेत्र प्रस्थापित झालेले असते. अशा परिस्थितीत वारे उच्च दाबाच्या क्षेत्रापासून न्यून दाबाच्या क्षेत्राकडे म्हणजे भूपृष्ठाकडून महासागराकडे वाहू लागतात. उन्हाळ्यात भूपृष्ठ अत्यंत तप्तायमान होते, त्यांवर न्यून दाबाचे क्षेत्र प्रस्थापित होते. महासागर तौलनिक दृष्ट्या शीत असतात. त्यांवर उच्च दाबाचे क्षेत्र प्रस्थापित होते. अशा परिस्थितीत वारे उलट दिशेने म्हणजे महासागरावरून भूपृष्ठाकडे वाहू लागतात. त्यामुळे महासागरावरून येताना आर्द्रतेने भारावले जात असलेल्या या वाऱ्यामुळे मुख्यत्वेकरून उन्हाळ्यातच पाऊस पडतो. विशाल भूप्रदेश व विस्तीर्ण महासागर यांच्यामधील ऋतुकालिक तापमानभिन्नता हेच मॉन्सून वाऱ्यांच्या निर्मितीचे प्राथमिक कारण देण्यात येते. पृथ्वीचा पृष्ठभाग संपूर्णपणे जमीन किंवा समुद्र असता, तर मॉन्सून वारे निर्माण झाले नसते.

समुद्रकिनारी प्रदेशांत अगदी लहान प्रमाणात दररोज अशाच कारणाने वारे निर्माण होतात. दिवसा समुद्रकिनाऱ्यावरील जमीन तापल्यामुळे व लगतचा समुद्र थंड असल्यामुळे मध्यान्हींनंतर सागरी (खारे) वारे भूपृष्ठाकडे वाहू लागतात. रात्री जमीन खूपच थंड झाल्यामुळे व लगतचा समुद्र उष्ण असल्यामुळे मध्यरात्रीनंतर मतलई वारे भूपृष्ठाकडून समुद्राकडे वाहू लागतात. खारे व मतलई वारे आणि मॉन्सून वारे यांत काही फरकही आहेत. खारे व मतलई वारे यांवर पृथ्वीच्या अक्षीय परिभ्रमणाचा लक्षणीय परिणाम होत नाही. मॉन्सून वाऱ्यांच्या दिशेत बदल होतो. त्याचप्रमाणे मॉन्सून वारे पाण्याचे बाष्परूप अवस्थेतून द्रवरूप अवस्थेत फार मोठ्या प्रमाणावर स्थित्यंतर घडवत असतात.

सौर उष्णता मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या नीच अक्षवृत्तांवरील प्रदेशांच्या बाबतीत असाच आविष्कार प्रकर्षाने दिसून येतो. मध्यम अक्षवृत्तांवरील महासागर व विशाल भूखंडीय प्रदेश यांच्यामध्येही ऋतुमानानुसार लक्षणीय स्वरूपात तापमानभिन्नता निर्माण होते व तेथे मॉन्सूनसम ऋतुकालिक दिशा व्युत्क्रमण असणारे पवनव्यूह अस्तित्वात येतात परंतु या अक्षवृत्तांना आपाती सौर प्रारण उष्ण व उपोष्ण कटिबंधांच्या मानाने बऱ्याच कमी प्रमाणात मिळत असल्यामुळे तेथील मॉन्सूनसम वारे जागतिक पवन प्रणालींच्या मानाने बरेच सौम्य असतात व ते तेथील पश्चिमी वाऱ्याच्या परिसंचरणांत अल्पशी विकृती निर्माण करतात. विषुववृत्तीय पट्ट्यात भूपृष्ठ जलपृष्ठाच्या मानाने फार तापत नाही किंवा विशेष थंड होत नाही. त्यामुळे दिशा-व्युत्क्रमण असणारे मॉन्सूनसारखे पवनव्यूह निर्माण होण्याचा तेथे प्रश्नच उद्‌भवत नाही. अंटार्क्टिकाच्या सतत बर्फाच्छादित असलेल्या क्षेत्रातही मॉन्सूनसारखे प्रभावी पवनव्यूह निर्माण होण्याची शक्यता नसते.


आ. १. उन्हाळी मॉन्सूनआशियाई मॉन्सून पवनव्यूह: आशिया खंडात ४५° उ. अक्षवृत्ताच्या दक्षिणेला मॉन्सूनचा प्रभाव प्रकर्षाने दिसून येतो. आशियाई मॉन्सूनचे ऋतुकालिक परिसंचरण महत्त्वाचे होण्याचे कारण त्याच्याशी निगडीत झालेले वृष्टीचे वितरण व प्रमाण, क्वचित अवर्षण आणि गडगडाटी वादळे, चंडवात (अल्पावधित एकाएकी जोरावून नंतरच्या कित्येक मिनिटांत क्रमशः मंद होत जाणारा वारा), अभिसारी चक्रवात (ज्यात केंद्रीय प्रदेशाकडे हवा जात असते व भूपृष्ठापासून अनेक मीटर उंचीपर्यंत वारे चक्राकार पद्धतीने फिरत असतात असे चक्रवात), पर्जन्यवृष्टिस्फोट (अल्पावधीत एकाएकी पडणारा स्थानिक स्वरूपाचा मुसळधार पाऊस) यांसारख्या अनेक वातावरणीय आविष्कारांच्या घटना हे होय. भारत व आग्नेय आशिया हे भाग विषुववृत्ताच्या जवळचे भूखंड आहेत. मेजून महिन्यांत साधारणपणे २५° ते ३०° अक्षवृत्तीय पट्ट्यात अरबस्तानापासून उत्तर भारतापर्यंत विशाल न्यून वायुदाबाचे क्षेत्र प्रस्थापित झालेले असते. त्यातील न्यूनतम वातावरणीय दाब ९९० मिलिबार वायव्य भारतावर असतो. अनेक दिशांनी त्यात हवा प्रवेश करते. याच वेळी हिवाळी गोलार्धातील ऑस्ट्रेलिया खंड व हिंदी महासागर हे भाग शीतसर होत जातात. त्यांवर उच्च दाबाचे क्षेत्र प्रस्थापित झालेले असते. त्यातून निसटलेली हवा विषुववृत्त ओलांडल्यानंतर भारतावरील अभिसारी परिसंचरणात ओढली जाते. त्याचप्रमाणे ती आग्नेय चीनपर्यंतच्या आग्नेय आशियातील द्वीपसमूहावर जाते. हा वातप्रवाह हिमालय पर्वतामुळे अडविला जाऊन हिमालयाच्या पायथ्याशी पर्जन्यमान वाढते पण उत्तरेकडील तिबेट पठार मात्र कोरडे राहते. भारतातील सर्वाधिक वार्षिक पर्जन्य (१,०२५ सेंमी. हून अधिक) आसाम व पूर्व हिमालयात पडतो. अशा रीतीने हिवाळी गोलार्धातील आर्द्रतेने भारावलेली हवा उन्हाळी गोलार्धातील भारत व आग्नेय आशियावर येऊन मोठ्या प्रमाणात पाऊस पाडावयास कारणीभूत होते (आ. १).

आ.२. हिवाळी मॉन्सून.

नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत उत्तर गोलार्धात हिवाळ्याला सुरुवात होते. सायबीरियावर विशाल अपसारी चक्रवात (वरच्या पातळीवरील हवा भूपृष्ठाकडे येऊन केंद्रीय प्रदेशातून बाहेर निघून इतरत्र पसरते असा चक्रवात) प्रस्थापित झालेला असतो. त्याचा केंद्रीय भाग ४८° उ. १०५° पू. या अनुक्रमे अक्षवृत्ताच्या व रेखावृत्ताच्या जवळपास असतो. जगातील सर्वाधिक वातावरणीय दाब (&gt १०३५ मिलिबार) याच भागावर जानेवारी महिन्यात आढळतो. [→ जलवायुविज्ञान]. या अपसारी चक्रवाताच्या पूर्वभागातून निघालेली अतिशीत हवा उत्तर किंवा ईशान्येकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या स्वरूपात आशियाई पूर्व किनाऱ्यावरील प्रदेशांवरून सातत्याने वाहत असल्यामुळे तेथे तीव्र हिवाळी परिस्थिती प्रत्ययास येते. हा आशियाई अपसारी चक्रवात सरासरी स्थानापासून पश्चिमेकडे सरकल्यास त्यातून निघालेली हवा पूर्व व आग्नेय दिशांनी वाहणाऱ्या वाऱ्यांच्या स्वरूपात पूर्व यूरोप व स्कँडिनेव्हियावर पसरून तेथील हिवाळा तीव्रतम करते. कधीकधी हे अतिशीत वारे ब्रिटिश बेटांपर्यंत पोहोचतात. आशियाई अपसारी चक्रवातातील अतिशीत हवा हिमालय पर्वताच्या विशाल व उत्तुंग रांगांमुळे अडविली जात असल्यामुळे ती भारतातील उत्तरेकडील प्रदेशांवर अंमल गाजवू शकत नाही. तिबेटचे पठार व त्याच्या उत्तरेकडील व पूर्वेकडील भागांवर मात्र कडाक्याची थंडी पडते. ह्या हवेचा उगम भूपृष्ठावर झाल्यामुळे तापमान अतिशय कमी असते व हवेतील जलांशही अत्यल्प असतो. यामुळे पाऊस पडण्याचे प्रमाण अत्यल्प असते. अपसारी चक्रवातांत उच्च थरांतील अतिशीत हवा खालील भूपृष्ठावर उतरत असते. उत्तरोत्तर ती शुष्कोत्तर व उष्णतर होत जाते. मेघनिर्मितीचे सामर्थ्य तिच्यात नसते. त्यामुळे हिवाळी गोलार्धात मॉन्सूनमुळे पडणारा भूखंडावरील पर्जन्य अल्पतम असतो. अपसारी चक्रवाताच्या पूर्वेकडील अतिबाह्य सीमेतून निघणारी हवा ईस्ट इंडीजवर, लगतच्या पश्चिम पॅसिफिक महासागरातील बेटांवर आणि उत्तर हिंदी महासागरातील बेटांवर ईशान्य दिशेने आक्रमण करते. ही हवा समुद्रावरून दीर्घ गतिमार्गाने येत असल्यामुळे तीत भरपूर जलांश शिरलेला असतो. त्यामुळे ह्या भागाला हिवाळ्यात बराच पाऊस मिळतो. ईशान्येकडून किंवा पूर्वेकडून येणाऱ्या या वातप्रवाहाचा काही भाग दक्षिण भारतीय द्वीपकल्प व श्रीलंकेपर्यंतही येऊन थडकतो. हिवाळ्यात या भारतीय क्षेत्रावर पाऊस पडण्याचे मुख्य कारण म्हणजे आशियाई अपसारी चक्रवाताच्या बहिर्सीमा भागातून निसटलेली शुष्क हवा समुद्रावरील दीर्घ मार्ग आक्रमिल्यामुळे आर्द्रतायुक्त होते व ती ईशान्य किंवा पूर्व दिशेने या क्षेत्रावर आक्रमण करते हेच होय (आ. २).

आशिया खंडात आणखी एक मॉन्सून वाऱ्यांचे क्षेत्र आहे. त्यात मध्यपूर्व आशिया, पूर्व भूमध्यसमुद्र आणि अती आग्नेयी यूरोप यांचा समावेश केला जातो. उन्हाळ्यात या क्षेत्रावर सातत्याने भूमिखंडावरून येणारे शुष्क तप्त वारे उत्तरेकडून येऊन दक्षिणेकडे वाहत जातात. हिवाळ्यात याच क्षेत्रावरील प्रचलित पवनदिशा जवळजवळ दक्षिण-उत्तर अशी असते.

 आशिया खंडावर मॉन्सून वाऱ्यांचा प्रभाव ज्या लक्षवेधी प्रमाणात दिसून येतो त्या प्रमाणात जगातील इतर भूखंडांवर व्युत्क्रमी मॉन्सूनसम वाऱ्यांचा प्रभाव दिसून येत नाही. उत्तर अमेरिकेत उन्हाळ्यात कॅलिफोर्नियाच्या किनारपट्टीवर सातत्याने वायव्येकडून वारे वाहणे, मेक्सिकोच्या आखातातून उन्हाळ्यात उष्णार्द्र हवा आत शिरून अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या मध्यवर्ती व पूर्वेकडील भागांपर्यंत पोहोचणे व मार्गात आलेल्या प्रदेशांवर विस्तृत प्रमाणावर पर्जन्य पडणे आणि त्याच क्षेत्रावर हिवाळ्यात उत्तरेकडील शुष्क व अतिशीत हवेचे आगमन होऊन वेगळ्याच प्रकारचे हवामान निर्माण होणे यांसारख्या आविष्कारांच्या स्वरूपात मॉन्सूनसम वाऱ्यांचे परिणाम प्रत्ययास येतात. अटलांटिक महासागराच्या बहुतेक किनारपट्टीवर प्रचलित वाऱ्यांशी दिशा उन्हाळ्यात नैर्ऋत्य व हिवाळ्यात वायव्य अशी बदलत असते. दक्षिण आशिया खंडावरील वाऱ्यात आढळून येणारे ऋतुकालिक दिशा-व्युत्क्रमित्व उत्तर अमेरिकेतील प्रचलित वाऱ्यांत आढळत नाही. ते नुसते परिवर्तन असते. 


भारताच्या जलवायुमानावरील मॉन्सून वाऱ्यांचा प्रभाव: भारतावर हिवाळ्यात उच्च दाबाचा प्रदेश निर्माण होऊन भारतीय द्वीपकल्पावरील हवेत अपसारी चक्रवात प्रस्थापित होतो. या चक्रवातामुळे उत्तर भारतात वारे पश्चिमेकडून, मध्यवर्ती व पूर्वेकडील काही भागात उत्तरेकडून व द्वीपकल्पाच्या दक्षिण भागात ईशान्येकडून येतात. अरबी समुद्रावरून व बंगालच्या उपसागरावरून वाहताना प्रचलित वाऱ्यांची दिशा मुख्यत्वेकरून ईशान्य असल्यामुळे भारतीय हिवाळ्याला ‘ईशान्य मॉन्सूनचा ऋतू’ असे म्हणतात. उन्हाळ्यात हे चित्र संपूर्णतया बदलते. उत्तर भारतातील भूमिपृष्ठावर कमी दाबाचा प्रदेश निर्माण होतो व त्याच्या परिसंचरणात हिंदी महासागर, अरबी समुद्र व बंगालचा उपसागर यांवरील आर्द्रतेने भारावलेली हवा ओढली जाते. अरबी समुद्रावर व बंगालच्या उपसागरावर प्रचलित वाऱ्यांची दिशा नैर्ऋत्य असल्यामुळे जून ते सप्टेंबरच्या कालावधीला ‘नैर्ऋत्य मॉन्सून ऋतू’ असे म्हणतात. भारतीय द्वीपकल्पावरील वारे नैर्ऋत्येकडून येतात, पूर्वभागात ते दक्षिणेकडून व उत्तर भारतात ते पूर्वेकडून वाहतात. अशा रीतीने भारतातील बहुतेक ठिकाणी हिवाळ्यातील व उन्हाळ्यातील प्रचलित वाऱ्यांच्या दिशेत संपूर्णपणे व्युत्क्रमित्व आढळून येते. मॉन्सूनचे हे अभिलक्षण भारतातच प्रकर्षाने प्रत्ययास येते. जगात इतरत्र हा प्रकार क्वचितच आढळतो.

नैर्ऋत्य मॉन्सून ऋतू म्हणजे भारतीय पावसाळी ऋतू. भारतातील पर्वतरांगांची दिक्‌स्थिती व भूमिस्वरूप या दोन घटनांचा भारतीय पर्जन्याच्या वितरणावर महत्त्वपूर्ण परिणाम होतो. सह्याद्रीच्या पश्चिमेकडील किनारपट्टीवर, आसामच्या डोंगराळ प्रदेशावर व हिमालयाच्या पायथ्याच्या प्रदेशावर अतिशय पाऊस पडतो, तर डोंगरांच्या वातविमुख भागांवर पर्जन्यछाया (पावसाचे प्रमाण कमी असलेले भाग) निर्माण होतात. तसेच उत्तर भारतात वर जे अवदाब क्षेत्र (न्यून वायुदाबाचे क्षेत्र) प्रस्थापित झालेले असते ते कधीच स्थिर नसते. अनेक कारणांमुळे ते दक्षिण किंवा उत्तर दिशेने सरकत असते. या अवदाब क्षेत्राच्या स्थानांतरावरही भारतीय पर्जन्याचे प्रमाण अवलंबून असते. या अवदाब क्षेत्राचा पूर्वेचा भाग जर दक्षिणेकडे झुकून बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागापर्यंत पोहोचत असला, तर भारतात सर्वत्र विस्तृत प्रमाणावर पाऊस पडतो पण हेच अवदाब क्षेत्र उत्तरेकडे सरकून हिमालयाच्या पायथ्याशी जवळजवळ समांतर स्थितीत असले, तर भारताचा ईशान्य भाग सोडून इतरत्र पावसाचे प्रमाण अतिशय कमी होते. वृष्टीत अनेक दिवस खंड पडतो. नैर्ऋत्य मान्सूनच्या ऋतूत प्रतिवर्षी भारतात सर्वत्र सारखा पाऊस पडला असे कधीच होत नाही. दरवर्षी पर्जन्याचे प्रमाण व वितरण सारखे बदलत असते. काही वर्षी विपुल वृष्टी होऊन महापूर येतात, काही वर्षी सरासरी पर्जन्यापेक्षा कमी पाऊस पडतो, तर काही वर्षी अवर्षण किंवा दुष्काळ पडून अन्नाप्रमाणेच पिण्याच्या पाण्याचे व जलविद्युत् केंद्रे बंद पडण्याचे प्रश्न निर्माण होऊन नागरी जीवनावर विपरीत परिणाम घडून येतात.

नैर्ऋत्य मॉन्सून वाऱ्याच्या वेगानुसार नैर्ऋत्य मॉन्सूनचा प्रभावीपणा ठरविला जातो. तथापि, वाऱ्यांचा वेग व पावसाचे प्रमाण यांच्यातील परस्पर संबंध घनिष्ट किंवा साध्या स्वरूपाचे असल्याचे आढळून आलेले नाही. 

नैर्ऋत्य मॉन्सूनच्या ऋतूत उत्तर भारतावर प्रस्थापित झालेले अवदाब क्षेत्र हे उष्ण अवदाब क्षेत्र असते. वाढत्या उंची प्रमाणे ते क्षीणतर होत जाते. ८,००० मी. पातळीच्यावर तर उत्तर भारतावर उच्च  दाबाचा प्रदेश निर्माण होतो. उत्तर भारतापासून दक्षिणेस विषुववृत्तापर्यंत उच्च पातळीवरील वारे पूर्वेकडून येऊन पश्चिमेकडे जात असतात. 

उत्तर भारतावरील अवदाब क्षेत्र नित्याच्या स्थानापेक्षा दक्षिणेकडे सरकून त्याचा पूर्व भाग बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागापर्यंत पोचत असल्यास व त्याच वेळी पूर्वेकडून एखादा अवदाब तरंग तेथे आल्यास बंगालच्या उपसागराच्या शिरोभागी अभिसारी चक्रवात निर्माण होतो. तो वायव्येच्या दिशेने जाऊ लागतो व थरच्या वाळवंटापर्यंत जाताच क्षीण किंवा निष्प्रभ होतो. पावसाळ्यातील एका महिन्यात असे ३ ते ४ ‘मॉन्सून चक्रवात’ निर्माण होतात व मार्गात आलेल्या क्षेत्रावर विपुल पर्जन्य पाडतात. चक्रवाताच्या नैर्ऋत्य वर्तुळखंडात अधिकतम पाऊस पडतो. मॉन्सून चक्रवातांमुळे भारतीय पश्चिम किनारपट्टीवरही पावसाचे प्रमाण वाढते. तथापि मॉन्सून चक्रवात निर्माण होण्याचे स्थान, त्यांची संख्या, त्यांचे गमन मार्ग व त्यांची तीव्रता यांमध्ये प्रतिवर्षी बदल होत असल्यामुळे भारतावरील एकूण पर्जन्यवृष्टीतही बदल झालेला आढळतो. भारतीय अर्थव्यवस्थेत व भारताची अन्नधान्य समस्या सोडविण्यात मॉन्सूनच्या पावसाचा महत्त्वाचा वाटा असतो. भारताला मिळणाऱ्या वार्षिक पर्जन्यापैकी ७० टक्के पर्जन्य नैर्ऋत्य मॉन्सूनच्या कालावधीत मिळतो [→ चक्रवात पर्जन्य].

भारतीय मॉन्सूनवरील संशोधन : नैर्ऋत्य मॉन्सूनच्या पावसाळी वाऱ्यांचा उद्‌भव कोठे व कोणत्या कारणप्रणालीमुळे घडून येतो, ते समजून घेण्यासाठी आधुनिक काळात आंतरराष्ट्रीय सहकार्याने पद्धतशीर संशोधन केले जात आहे. अमेरिकेच्या सहकार्याने १९६३ मध्ये व संयुक्त राष्ट्रांच्या प्रोत्साहनाने १९६५ मध्ये आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय हिंदी महासागर मोहीम (IIOE-इंटरनॅशनल इंडियन ओशन एक्स्‌पीडिशन) व रशियाच्या सहकार्याने आयोजित केलेले १९७३ मधील मोनेक्स-७३ (मॉन्सून एक्स्‌पेरिमेंट-Monex) व १९७७ मधील मॉन्सून-७७ हे प्रकल्प, यांसारख्या शास्त्रीय मोहिमांत अनेक वातावरण विज्ञांनी व महासागरतज्ञांनी सुसज्ज जहाजांच्या साहाय्याने समुद्रावरील वातावरणाच्या स्थितीची असंख्य निरीक्षणे केली आहेत. १९७९ मध्येही मोनेक्स-७९ ही मोहीम मॉन्सूनवर संशोधन करण्यासाठी आखली गेली.


मॉन्सून अभिसरणातील अनेक घटना पर्जन्यमानावर परिणाम करीत असलेल्या आढळतात. मोनेक्स मोहिमेत सारख्याच उंचीवर राहून तरंगत जाणारा एक फुगा सेशेलपासून निघून विषुववृत्त ओलांडून थेट ब्रह्मदेशापर्यंत गेला. यावरून मॉन्सूनचा उगम अरबी समुद्रावर नसून दक्षिण गोलार्धात आहे या कल्पनेस पुष्टी मिळते. मॉन्सून अभिसरणाचे कार्य चालविणारी महत्त्वाची प्रेरणा सौर प्रारण होय. यामुळे वातावरणास मिळणाऱ्या उष्णतेचा विचार करताना पृथ्वी व वातावरण यांमधील प्रारण समतोल पहावा लागतो. यासाठी पाण्याची वाफ, कार्बन डाय ऑक्साइड वायू व ओझोन यांमुळे होणारे प्रारण शोषण, धूळ, ढग, पृथ्वी व समुद्र यांवरून होणारे परावर्तन वगैरे अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. मॉन्सून कालावधीत निर्माण होणाऱ्या अवदाब पट्ट्याचे स्थान, बंगालच्या उपसागराच्या उत्तर टापूत निर्माण होणारे चक्रवात, २ ते ६ किमी. उंचीवरील वातावरणात गुजरातच्या जवळ होणारे अवदाबाचे क्षेत्र पश्चिम किनारपट्टीजवळ उद्‌भवणारे भोवरे, त्याचप्रमाणे उष्ण कटिबंधीय अभिसारी क्षेत्राचे पूर्व पॅसिफिक महासागरावरील स्थान वगैरे घटना पर्जन्यमानावर परिणाम करतात. अशा क्षेत्रावरील तापमानात उच्च क्रमिकता असल्याचे मोनेक्स मोहिमेत आढळले. पर्जन्य अधिक झाल्यास त्यापासून निर्माण झालेली सुप्त उष्णता अभिसरणास प्रेरणा पुरवून ते अधिक प्रभावी होते. क्षितिजसमांतर व ऊर्ध्व (उभ्या) पातळींतील वाऱ्यांची क्रमिकता एका ठराविक मर्यादेहून अधिक झाल्यास कोणत्या तरी कारणाने चक्रवात निर्माण होतो. उच्च व मध्य उंचीवरील वाऱ्यांमधील फरक कमी झाल्यास संनयनात (उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या संक्षोभामुळे हवा ऊर्ध्व दिशेने जाण्याच्या क्रियेत) वाढ होऊन मेघ निर्मिती वाढते. पूर्व आफ्रिकेच्या किनाऱ्यालगत काही उंचीवरील वातावरणात एक प्रभावी वाऱ्याचा स्त्रोत (सोमाली स्त्रोत) निर्माण होत असतो. या स्त्रोताचा प्रभावीपणा व तेथील ऊर्ध्वसारी सागर प्रवाहाचा संबंध आहे. यामुळे किनाऱ्यालगत थंड पाण्याचा सागरी प्रवाह दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहात असतो. हा प्रवाह त्यावरील हवेतील उष्णता कमी करीत असतो व यामुळे तेथील हवेत मेघनिर्मिती कमी होते. मात्र भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळील उष्ण समुद्र वातावरणास उष्णता देऊन मेघनिर्मिती वाढवीत असतो या उष्णतेच्या देवघेवीचा परिणाम अभिसरणावर होतच असतो मात्र या घटना प्रत्येक वेळी पर्जन्यावर परिणाम करतातच, असेही नाही.

यामुळे मोनेक्ससारखे एका प्रकल्पाने उन्हाळी मॉन्सूनचे संपूर्ण स्वरूप कळून येईल, अशी अपेक्षा बाळगून चालणार नाही. १ मे १९७९ ते ३१ ऑगस्ट १९७९ या १२३ दिवसांच्या छोट्या कालावधीत प्रगत देशांच्या सहकार्याने विस्तृत क्षेत्रावरील वातावरणासंबंधी निरनिराळ्या प्रकारची माहिती गोळा करण्याचा तो एक संयुक्त प्रयत्न होता. मॉन्सूनची गणितीय प्रतिकृती [→ प्रतिकृति] अधिक वास्तव बनविण्यासाठी या माहितीचा उपयोग भावी संशोधनास होणार आहे. अशा प्रतिकृतीच्या साहाय्याने पर्जन्यमानावर परिणाम करणाऱ्या अनेक घटनांतील प्रमुख घटना शोधणे शक्य होईल. अशा गणितीय प्रतिकृतीच्या उपयोगाने संशोधन केल्याशिवाय मॉन्सूनविषयीचे ज्ञान व पर्जन्याचे पूर्वानुमान वर्तविण्याची क्षमता यांत लक्षणीय प्रगती होण्याची अपेक्षा ठेवता येणार नाही. [→ मोनेक्सप्रकल्प].

संदर्भ : 1. Das, P. K. The Monsoons, New Delhi, 1968.

             2. India Meteorological Department, Forecasting Manual 1 -2, Climate of India, Poona,               1968.

             3. Pedlaborde, P. The Monsoons, London, 1963.

             4. Ramage, C. S. Monsoon Meteorology, New York, 1971.

नेने, य. रा. चोरघडे, शं. ल.