भोवरा – १ : मध्यवर्ती अक्षाभोवती चक्राकार गतीने फिरणारा द्रायू (प्रवाही पदार्थ). असे भोवरे निसर्गामध्ये वातावरणात व नदीच्या किंवा सागरी प्रवाहात निर्माण होतात. मुक्त भोवऱ्यांच्या केंद्रीय भागात चक्राकार गतीने फिरणाऱ्या द्रायूचा योग महत्तम असतो व दाब किमान असतो. केंद्रापासूनच्या अंतराच्या व्यस्त प्रमाणात वेग कमी होत जातो [वेग ¥ /अंतर]. भोवरे भूपृष्ठावर ⇨घूर्णवाती वादळाच्या (टॉर्नेडोच्या) स्वरूपात व जलपृष्ठावर ⇨जलशुंडेच्या स्वरूपात अनुभवास येतात. यात गर्जन्मेघातून (ऊर्ध्व – उभ्या – दिशेने राशीप्रमाणे वाढणाऱ्या व या वाढण्याच्या प्रक्रियेत भिन्न प्रकारचे विद्युत् भार निर्माण होऊन विद्युत् विसर्जन झाल्यामुळे गर्जना करणाऱ्या मेघातून) विशेष प्रकारचा शुंडायुक्त (सोंड असलेला) भाग बाहेर येतो. त्यात वेगवान वारे (ताशी १६० ते ४५० किमी. वेगाचे वारे) चक्राकार गतीने फिरत असतात. शुंडायुक्त भागातील हवा वरही जात असते. भूपृष्ठावरील शहरांवरून किंवा वनश्रीयुक्त भागवरून जेव्हा घूर्णवाती वादळ जाऊ लागते तेव्हा त्याच्या शुंडायुक्त भागात मोठ्या इमारतींची छपरे, झोपड्या, झाडे, लहान वाहने, प्राणी, माणसे इ. सापडून वर ओढली जातात. जलशुंडेत लहान जहाजे अडकल्यास त्यांची उलथापालथ होऊन ती बुडतात. अशा प्रकारच्या उग्र भोवऱ्यांमुळे प्रचंड प्रमाणावर वित्तहानी व प्राणहानी होते.

नदीच्या प्रवाहात अडथळे आल्यास प्रवाहाची दिशा बदलते व भोवरे निर्माण होतात. त्यात मध्यभागी खळगा उत्पन्न झालेला स्पष्ट दिसतो. नद्यांवरील पुलांच्या खाली अनेकदा भोवरे निर्माण होतात. जेव्हा पाण्याचे भिन्न गतीचे दोन प्रवाह एकत्र येतात तेव्हाही भोवरे निर्माण होतात. नद्यांच्या संगमाच्या ठिकाणी असे भोवरे आढळतात. प्रवाहास विशेष ओढ नसेल, तर भोवरे संगमाच्या खालच्या अंगास लांबपर्यंत आढळतात. काही वेळा भोवऱ्यांची मालिकाच निर्माण झालेली दिसते. भोवऱ्यातील पाण्यास कोनीय वेग बराच असू शकतो. त्यामुळे जलवाहतुकीस अडथळा येतो. भोवऱ्यात सापडलेला मनुष्य आत ओढला जातो.

उन्हाळ्यात दुपारी पवनहीन तप्त शुष्क क्षेत्रात धुळीची छोटी वातचक्रे किंवा लहान आवर्त निर्माण होतात. हा भोवऱ्यांचाच एक प्रकार आहे. ह्या लहान धूलि-आवर्ताचा व्यास साधारणपणे ३-३० मी. व उंची १०० ते ४०० मी. असते. त्यात चक्राकार गतीने फिरणाऱ्या वाऱ्यांचा वेग ताशी १५ ते ८० किमी. इतका असतो. केंद्रभागी वातावरणीय दाब बराच कमी असतो. अशा ह्या लहान स्वरूपाच्या भोवऱ्यात शुष्क जमिनीवरची धूळ, डबर, दगडांचे लहान तुकडे, वाळूचे कण भूपृष्ठापासून बऱ्याच उंच पातळीपर्यंत उचलले जातात. ह्या अपारदर्शक वस्तूंमुळे धूलि-आवर्त एका मोठ्या नसराळ्यासारख्या किंवा टॉर्नेडोच्या छोट्या प्रतिमेसारखा दिसू लागतो. त्यात क्वचितच विध्वंसक शक्ती असते.

साधारणपणे वातावरणात निर्माण झालेल्या न्यून दाबाच्या क्षेत्राभोवती वारे ⇨समदाब रेषांना (दिलेल्या संदर्भ पृष्ठावरील समान वातावरणीय दाब असणारी ठिकाणे-बिंदू-जोडणाऱ्या रेषांना) कोन करून वाहत असतात. त्यामुळे त्यांच्या प्रवाहाच्या दिशेत वक्रता निर्माण होते. न्यून दाबाच्या क्षेत्रात हवा केंद्रभागाकडे जात असते. तशीच पृथ्वीच्या अक्षीय परिभ्रमणामुळे ती वरही नेली जाते. त्यामुळे अभिसारी चक्रवात [⟶ चक्रवात] व मेघनिर्मिती होऊन पाऊस पडतो. पृथ्वीवर विशिष्ट अक्षवृत्तांत न्यून दाबाची क्षेत्रे निर्माण होतात. ही क्षेत्रे म्हणजे मुक्त वातावरणातील विशाल भोवरेच होत.

पहा : द्रायुयामिकी.

गद्रे, कृ. म. चोरघडे, शं. ल.