धुके : ज्यात दृश्यमानता (सामान्य दृष्टीच्या निरीक्षकाला नुसत्या डोळ्यांनी जास्तीत जास्त दूरच्या वस्तू नीट ओळखू येतील असे अंतर) १,००० मी. पेक्षा कमी असते असा जमिनीच्या किंवा पाण्याच्या पृष्ठाला स्पर्श करणारा स्तरमेघ (क्षैतिज विस्ताराच्या मानाने जाडी कमी असलेला ढग). दृश्यमानता १,००० मी. पेक्षा अधिक असल्यास ह्याच ढगाला ⇨ झकळ (विरल धुके, मिस्ट) म्हणतात. हा ढग जमिनीला स्पर्श न करता जमिनीजवळच तरंगत असला, तर त्याला धुके न म्हणता स्तरमेघ म्हणतात. दऱ्याखोऱ्यांत स्तरमेघ निर्माण झाल्यास पर्वतमाथ्यावरील निरीक्षकाला त्याच्याभोवती धुके पडल्यासारखे दिसेल, तर खालील निरीक्षकाला हेच धुके स्तरमेघासारखे दिसेल.

ध्रुवीय क्षेत्रात किंवा समुद्रावर निर्माण झालेल्या धुक्यात बहुतांशी संद्रवित (द्रवरूप) झालेले जलबाष्पकण किंवा अतिसूक्ष्म हिमस्फटिक असतात परंतु भूपृष्ठावर निर्माण झालेल्या धुक्यात धूलिकण, कार्बन कण, धूम्रकण, लवणकण इत्यादींसारखी हवेत सामान्यतः उपस्थित नसणारी आर्द्रताग्राही द्रव्ये असू शकतात. लंडन, लॉस अँजेल्स, टोकिओ, पिट्सबर्ग यांसारख्या औद्योगिक शहरांवरील हवेत जलबाष्पाप्रमाणेच धूलिकण व धूम्रकणही पुष्कळ प्रमाणात असतात. त्यांच्यामुळे विषारी व अपायकारक सधूम धुक्याचा (स्मॉगचा) प्रादुर्भाव होतो. लंडन येथे १९५२ च्या डिंसेबर महिन्यात प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या सधूम धुक्यात ४,००० च्या वर लोक मृत्यूमुखी पडले.

समुद्रकिनाऱ्याजवळील प्रदेशांत, विस्तीर्ण सरोवरांजवळील भागात, पर्वतांवर, भरपूर जलबाष्प असलेल्या दऱ्याखोऱ्यांत, तसेच पृष्ठभागाजवळचे पाणी थंड असते अशा सागरपृष्ठावर धुके निर्माण होते. जमिनीच्या पृष्ठभागावर धुके बहुधा सकाळच्या वेळी दिसते. सूर्योदयानंतर भूपृष्ठ थोडेसे तापते व पृष्ठभागीय वारे साधारणपणे अधिक प्रबल होतात. त्यामुळे निकटवर्ती हवेत संक्षोभ आणि उदग्र (उभे) वायुप्रवाह निर्माण होतात व धुके वर उचलेले जाते. अशा ढगांना नीचस्तरीय मेघ असे म्हणतात. नीचस्तरीय मेघ किंवा धुके निर्माण होणे हे केवळ वातावरणातील संक्षोभजन्य परिस्थितीवर अवलंबून असते.

भौतिक लक्षणे : अनेक अपद्रव्ये विपुल प्रमाणात असलेली (उदा., शहरांवरील प्रदूषित) हवा थंड होत गेली, तर तिची सापेक्ष आर्द्रता [ → आर्द्रता] वाढते. ती ७० टक्क्यांपेक्षा थोडी कमी असली, तर हवेतील धूलिकण बव्हंशी कोरडेच राहतात व शुष्क धूसरता अनुभवास येते. अशा धूसरतेतून दूरस्थ वस्तूंचे रंग मंद झाल्यामुळे नीट ओळखता येत नाहीत. आकाशाच्या प्रकाशमान पार्श्वभूमीवर अशा वस्तूंचे नुसते तिमिरचित्र किंवा त्यांची कृष्णवर्णी रूपरेखाच दिसते. हवेतील सापेक्ष आर्द्रता ७० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यास मोठ्यातल्या मोठ्या व जास्तीत जास्त क्रियाशील असलेल्या कणांवर जलबाष्पाचे संद्रवण होण्यास सुरूवात होते. अशा हवेचे तापमान कमी झाल्यास तिची सापेक्ष आर्द्रता व धूसरताही वाढते आणि त्या क्षेत्रावर करड्या रंगाची झाकळ निर्माण होते. हवा ह्यापेक्षा अधिक थंड झाल्यास व सापेक्ष आर्द्रता ९५ टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास झाकळीचे धुक्यात रूपांतर होऊ लागते. या वेळी दृश्यमानता १,००० मी. पेक्षाही कमी असते. धुक्यात सापेक्ष आर्द्रता १००% असलीच पाहिजे असे नाही मात्र साधारणपणे ती ९५ टक्क्यापेक्षा अधिक असते म्हणजे हवा जवळजवळ संतृप्त अवस्थेत असते. शहरांवरील प्रदूषित हवेत धुक्याचा प्रादुर्भाव होतो तेव्हा अंधुकता, धूसरता, झाकळ आणि धुके असा अनुक्रम आढळतो. झाकळीचे धुक्यात होणारे रूपांतर हे अंशतः संद्रवित कणांचे आकारमान वाढल्यामुळे व बव्हंशी कणांची संख्या वाढल्यामुळे होते. हवेतील सापेक्ष आर्द्रता ७०% होताच लवणकण चिघळतात व त्यामुळे सापेक्ष आर्द्रता ७५% ते ९५% असतानासुद्धा समुद्रावर धुके पडलेले असते.

विविध क्षेत्रात धुके पडले असताना हवेत पाण्याचा अंश किती असू शकतो, याबद्दल काही महत्त्वाची निरीक्षणे करण्यात आली आहेत. ध्रुविय क्षेत्रात, समुद्रपुष्ठावर किंवा भूपृष्ठावर निर्माण झालेल्या धुक्यात हवेतील पाण्याचा अंश सारखाच असला, तरी धुक्यातील घटक कणांच्या आकारमानाचा व संख्येचा दृश्यमानतेवर परिणाम होतो. समुद्रावरील धुक्यात संद्रवित कण संख्येने कमी पण आकारमानाने मोठे असतात व शहरांवरील प्रदुषित हवेत धुक्याचे कण संख्येने अधिक पण आकारमानाने लहान असतात. ह्यामुळे दोन्ही प्रकारच्या धुक्यांत जलांश समान असला, तरी समुद्रावरील धुक्यात शहरी धुक्यापेक्षा दृश्यमानता अधिक असते. धुक्यातील जलांश निश्चित स्वरूपाचा असा कधीच नसतो. विस्तृत मर्यादांत तो सारखा बदलत असतो. ३० मी. इतकी अतिशय कमी दृश्यमानता असलेल्या समुद्रावरील घनदाट धुक्यात १ घ. मी. हवेत ३ ग्रॅ. इतके द्रवरूप पाणी असू शकते, तर साधारणपणे ९०० मी. दृश्यमानता असलेल्या शहरांवरील प्रदूषणजन्य सामान्य धुक्याला प्रारंभ होताच पाण्याचा अंश दर घ. मी. हवेत ०·०२ ग्रॅ. इतका अल्पतम असू शकतो. औद्योगिक क्षेत्रावरील धुक्यात पाण्याचे प्रमाण याहूनही कमी असल्याचे आढळले आहे.

प्रकाशभिन्नतेनुरूप व स्थलभिन्नतेनुरूप धुक्यातील संद्रवित कणांचे आकारमान (व्यास) वेगवेगळे असते. शहरांवरील धुक्यात क्रियाशील कणांची संख्या जास्त असते व त्यांचा व्यास ३० मायक्रॉन (१ मायक्रॉन = १०-३ मिमी.) पेक्षा बराच कमी असतो. समुद्रावरील धुक्यात कणांचा सरासरी व्यास १० ते १५ मायक्रॉन असला, तरी अशा धुक्यातील बहुतेक जलांश ४० मायक्रॉन व्यासांच्या कणांनीच बनलेला असल्याचे आढळले आहे. काही प्रारूपिक (नमुनेदार) सागरी धुक्यात ८० ते १०० मायक्रॉन व्यास असलेले संद्रवित कण धुक्याच्या तळाजवळील भागात आढळले आहेत.

धुके आणि भूपृष्ठाजवळील वातावरणात मुक्तपणे तरंगणारे मेघ यांत वस्तुतः विशेष फरक नसतो. धुक्यामुळे सहसा वर्षण होत नाही. क्वचित वर्षण झालेच, तर ते अत्यल्प प्रमाणात अत्यंत मंदगतीने होते. धुके आणि वर्षण न करणारे मेघ हे कलिलीय (एखाद्या माध्यमात अतिसूक्ष्म कण लोंबकळत असलेल्या विशिष्ट मिश्रणाच्या अवस्थेच्या) दृष्टीने स्थिरावस्था प्राप्त झालेले मेघ असतात. त्यांतील संद्रवित कण इतर कणांशी संमिलित होऊन स्वतःचे आकारमान वाढवून पर्जन्यबिंदूंच्या आकारमानाचे (६०० ते २,००० मायक्रॉन) होत नाहीत. धुक्यात एका घ. सेंमी. मध्ये १०० पेक्षा अधिक कण बहुतेक नसतात. धुक्यातील लहान आकारमानाचे बहुसंख्य कण प्रकाशकिरणांचे अधिक प्रभावीपणे अभिशोषण करीत असल्यामुळे अधिक उंचावरील मेघापेक्षा धुकेच अधिक घनदाट असल्याचा प्रत्यय येतो. हिमांकाच्या खाली तापमान गेल्यास धुक्याला आवश्यक एवढे जलबाष्प हवेत शिरू शकत नाही. यामुळे शीत जलवायुमानाच्या (दीर्घकालीन सरासरी हवामानाच्या) प्रदेशात धुके पडण्याची वारंवारता कमी असते. – ९·४° से. तापमान असलेल्या जागी जलबिंदूमुळे निर्माण झालेले धुके क्वचितच पडते. खंडांतर्गत प्रदेशातील काही ठिकाणी हवेचे तापमान – २६·१° सें. पर्यंत पोहोचते. या ठिकाणी धुक्यासारखे आविष्कार कधीच आढळत नाहीत. – ३०° सें. सारखे तापमान असलेल्या हिमाच्छादित क्षेत्रांत, शहरांच्या आसपास, विमानतळांच्या आसमंतात किंवा अतिशीतित जलीय पृष्ठभागावर हिमकणयुक्त धुके पडते. विमानांत हायड्रोकार्बनी इंधन वापरले जात असल्यामुळे ज्वलनानंतर त्यांतून बरेचसे जलबाष्प बाहेर पडते. हिमधुक्याला हे जलबाष्प पुरेसे असते. अलास्का व उत्तर कॅनडा यांसारख्या प्रदेशांत अनेक महिने तापमान खूपच खाली जात असल्यामुळे व अशा परिस्थितीतून अनेक वेळा हिमकणयुक्त धुके निर्माण होत असल्यामुळे दैनंदिन कठीण समस्या उद्‌भवतात. हिवाळ्यात आर्क्टिक क्षेत्रांतील हिमाच्छादित पृष्ठभागांवर तुहिन किंवा हिमतुषारनिर्मित अंधुकता दीर्घकालपर्यंत असते. प्रदीर्घ ध्रुवीय रात्री ही अंधुकता भूपृष्ठावरही कित्येक किमी. पर्यंत पसरलेली असते.


अतितीव्र अंधुकतेच्या ह्या आविष्काराला निर्मितिप्रकारानुरूप शीतलीकरण धुके, उच्चस्तरीय धुके, तापापवर्तनीय धुके किंवा स्तरमेघ, सागरी धूर, बाष्पीभवन धुके, हिमकणयुक्त धुके, अभिवहन धुके, प्रारणजन्य धुके, पर्वतीय किंवा आरोही धुके सीमापृष्ठीय किंवा वर्षाजन्य धुके यांसारख्या संज्ञा दिल्या आहेत.

भूपृष्ठावर धुके शरद ऋतूत व हिवाळ्यात पडते समुद्रपृष्ठावर ते वसंत ऋतूत व उन्हाळ्यात पडते. नीच कटिबंधीय प्रदेशापेक्षा मध्यम कटिबंधीय व उच्च कटिबंधीय प्रदेशांत धुक्याची वारंवारता अधिक असते. जमिनीवरील धुक्यांचा ऊर्ध्व विस्तार भूपृष्ठापासून २२५ मी. पर्यंत असतो. तर समुद्रावरील धुक्याचा ऊर्ध्व विस्तार १५० मी. पर्यंत असतो.

निर्मितीस कारणीभूत होणाऱ्या प्रक्रिया व प्रकार : भूपृष्ठालगतची आर्द्र हवा थंड होऊन तिचे तापमान दवांकाखाली (वातावरणीय स्थिर दाबाच्या आणि तापमानाच्या परिस्थितीतील हवा थंड केली असता ज्या तापमानावर तिच्यातील ओलावा संतृप्त अवस्थेला पोहोचतो व त्यामुळे बाष्पाचे संद्रवण सुरू होते त्या तापमानाखाली) गेल्यास बहुधा धुके निर्माण होते. काही प्रसंगी पृथ्वीवरील उष्ण पाणी बाष्पीभवन क्रियेने जवळील शुष्क थंड हवेत शिरून हवा संतृप्त झाल्यासही धुके संभवते. अशा रीतीने शीतलीकरण (तापमान कमी होणे) व बाष्पीभवन (हवेत बाष्प शिरणे) ह्या दोन क्रियांमुळे धुके पडते. ज्या वेळी जी परिस्थिती धुके निर्माण होण्यास अनुकूल असेल तीनुसार धुक्याचे प्रकार केले जातात.

शीतलीकरण धुके : वेगवेगळ्या प्रक्रियांनी आर्द्र हवेतील उष्णता निघून जाऊन ती थंड होऊ शकते. वारा नसलेल्या निरभ्र रात्री प्रारणक्रियेने (तरंगरूपी ऊर्जेच्या रूपाने बाहेर टाकण्याच्या क्रियेने) भूपृष्ठातून उष्णता अवकाशात उत्सर्जित झाल्यास भूपृष्ठ थंड होते. त्यामुळे लगतची हवाही थंड होते. ह्या हवेत योग्य प्रमाणात आर्द्रता असल्यास अशा शीतलीकरणाने ती लवकरच दवांक किंवा संतृप्त बिंदू गाठते व धुके निर्माण होते. अशा प्रकारे निर्माण झालेल्या धुक्याला ‘प्रारणजन्य धुके’ असे म्हणतात. दुसऱ्या प्रकारात समुद्रावरून येणारा उष्णार्द्र हवेचा प्रवाह रात्री क्रमाक्रमाने थंड होत जाणाऱ्या भूपृष्ठावरून किंवा शीततर समुद्रपृष्ठावरून संथपणे वाहत गेल्यास ही उष्णार्द्र हवा खालच्या भूपृष्ठाला उष्णता देते व उत्तरोत्तर थंड होत होत दवबिंदु तापमानाच्या खाली जाऊन भूपृष्ठावर किंवा समुद्रपृष्ठावर धुक्याची निर्मिती होऊ शकते. ह्या प्रकारच्या धुक्याला ‘अभिवहन धुके’ (क्षैतिज दिशेने जाणाऱ्या वातप्रवाहात निर्माण झालेले धुके) असेही म्हणतात. जेव्हा पर्वताच्या वाताभिमुख बाजूवर आढळणारा उष्णार्द्र हवेचा प्रवाह पर्वताची चढण आक्रमिताना अक्रमी प्रक्रियेने (जीत बाहेरून उष्णता शिरत नाही किंवा जीतून उष्णता बाहेर जात नाही अशा प्रक्रियेने) थंड होऊन शेवटी दवांक व संतृप्तावस्था गाठतो, तेव्हा पर्वताच्या काही ठराविक उंचीवर धुके निर्माण होण्यास सुरुवात होते. ह्या प्रकारच्या धुक्यांना ‘पर्वतीय’ किंवा ‘आरोही धुके’ म्हणतात. हे उंचीवरचे धुके अर्थातच पर्वताच्या पायथ्याजवळच्या निरीक्षकाला स्तरमेघच वाटेल.

महासागरांवर दैनिक तापमानाची अभिसीमा (दैनिक उच्चतम व नीचतम तापमानांतील फरक) केवळ ०·५° से.च्या जवळपास असते. त्यामुळे प्रारणजन्य धुके महासागराच्या पृष्ठभागावर कधीच निर्माण होऊ शकत नाही. सागरी पृष्ठांवर जे धुके निर्माण होते ते अभिवहन धुके असते. उष्णतर सागरी प्रवाहावरील वातावरणातील हवेचे झोत शीत सागरी प्रवाहाच्या दिशेने जाऊ लागतात तेव्हा असे अभिवहन धुके उद्‌भवते. भूपृष्ठावर मात्र प्रारणजन्य व अभिवहन असे दोन्ही प्रकारचे धुके निर्माण होऊ शकते. भूपृष्ठावरील बहुसंख्य धुक्यांत प्रारण व अभिवहन अशा दोन्ही प्रक्रिया घडून येत असतात. जलपृष्ठावरील उष्णार्द्र हवेचा प्रवाह भूपृष्ठाकडे वळल्यास (अभिवहन) आणि नंतर रात्रीच्या वेळी भूपृष्ठाचे तापमान दवांकाच्या खाली गेल्यास (प्रारण) दाट धुके निर्माण होते. सागरी (खाऱ्या) वाऱ्यांमुळेही असे धुके निर्माण होते.

बाष्पीभवन धुके : उच्चतर तापमानाच्या पाण्याचे शुष्क थंड हवेत बाष्पीभवन झाले आणि जर हवेत संद्रवण घडवून आणणारी आर्द्रताग्राही केंद्रके भरपूर प्रमाणात असली, तर काही वेळाने हवेला संतृप्तावस्था प्राप्त होऊन धुके निर्माण होते. अशा प्रक्रियेने निर्माण झालेल्या धुक्यास ‘बाष्पीभवन धुके’ म्हणतात. हे धुके दोन प्रकारांनी तयार होते.

पहिल्या प्रकारात जेव्हा थंड शुष्क हवेचा प्रवाह बऱ्याच उच्च तापमानाच्या जलपृष्ठावरून जाऊ लागतो, तेव्हा बाष्पीभवन धुके निर्माण होते. यासाठी हवेच्या आणि पाण्याच्या तापमानात खूपच (जवळजवळ १०° ते २०° से.) फरक असावा लागतो. जेव्हा हिमाच्छादित आर्क्टिक क्षेत्रावरील शीत हवा विस्तृत उष्ण जलपृष्ठावरून वाहू लागते.तेव्हा बर्फाच्या व हिमकणांच्या थरांनी आच्छादिलेल्या आर्क्टिक क्षेत्राच्या कडांवर बाष्पीभवन धुके पसरलेले आढळते. ह्या धुक्याला ‘आर्क्टिक सागरी धूर’ असे नाव दिले आहे.

दुसऱ्या प्रकारात जेव्हा काही उंचीवरील उष्ण हवेतून निघालेले पर्जन्यबिंदू भूपृष्ठालगतच्या कमी जाडीच्या व थंड हवेच्या थरात शिरून खाली पडू लागतात, तेव्हा उष्ण पर्जन्यबिंदूचे शुष्क थंड हवेत बाष्पीभवन होऊन धुके निर्माण होते. अशा धुक्याला ‘वर्षाजन्य धुके’ म्हणतात. उच्च पातळीवरील उष्णार्द्र हवा व भूपृष्ठालगतची शीत शुष्क हवा विभागणाऱ्या सीमापृष्ठाजवळील क्षेत्रात अशी परिस्थिती निर्माण होते. म्हणून ह्या वर्षाजन्य धुक्याला ‘सीमापृष्ठीय धुके’ अशीही संज्ञा आहे.

हिवाळ्यात थंड शुष्क हवेचा प्रवाह सरोवरातील उष्ण जलपृष्ठावरून जात असल्यास पाण्यातून वाफा किंवा जलपृष्ठावरून धूर निघाल्यासारखे दिसते. हा बाष्पीभवन धुक्याचाच प्रकार असतो.

बहुतेक धुकी प्रारणजन्य वा अभिवहन प्रकारची असतात. धुक्यांच्या काही प्रारूपिक प्रकारांचे वर्णन पुढे दिले आहे.

प्रारणजन्य धुके : आदल्या दिवशीच्या पावसामुळे आणि ओल्या जमिनीतून झालेल्या बाष्पीभवनामुळे भूपृष्ठाजवळच्या हवेच्या थरांत भरपूर जलबाष्प शिरले असेल, भूपृष्ठीय वाऱ्यांचा वेग अतिशय मंद असेल आणि आकाश निरभ्र असेल, तर रात्रीच्या प्रारणामुळे प्रारणजन्य धुके निर्माण होते.

रात्रीच्या वेळी बाहेरून येणाऱ्या प्रारणापेक्षा भूपृष्ठाकडून होणारे प्रारण अधिक असल्यामुळे रात्री भूपृष्ठ उत्तरोत्तर थंड होत जाते. भूपृष्ठालगतची हवाही उत्तरोत्तर थंड होत जाते. वारे मंदगतीचे असल्यास जमिनीजवळची हवा ढवळली जात नाही. त्यामुळे जमिनीलगतच्या काही थरांत उंचीप्रमाणे हवेचे तापमान कमी न होता काही थरांपर्यंत ते उंचीप्रमाणे वाढत जाते. अशा परिस्थितीला तापापवर्तन असे म्हणतात. रात्री जसजसे भूपृष्ठाचे तापमान कमी होऊ लागते तसतसे हे तापापवर्तन अधिकाधिक तीव्र होत जाते. त्याच वेळी हवेतील जलबाष्प बाहेर निघून दवाच्या रूपाने थंड भूपृष्ठावर पडू लागते व भूपृष्ठालगतच्या हवेतील जलांश कमी होऊ लागतो. तथापि तापमान बरेच कमी झाल्यामुळे हवेची सापेक्ष आर्द्रता वाढत जाते. हवेत इष्ट तेवढी संद्रवण केंद्रके असल्यास प्रथम झाकळ निर्माण होते. जसजशी रात्र पुढे सरकते व रात्रीच्या प्रारणामुळे तापमान कमी होऊ लागते, तसतसे झाकळीचे धुक्यात रूपांतर होते.


प्रारणजन्य धुक्यात भूपृष्ठाच्या लगतच्या हवेत तापापवर्तन प्रस्थापित होऊन उंचीप्रमाणे तापमान वाढते. भूपृष्ठावर दव पडल्यामुळे तेथे जलबाष्प-घनता नीचतम असते, तर नीचतम तापमानमुळे भूपृष्ठावरील सापेक्ष आर्द्रता महत्तम असते. रात्रीच्या उत्तरार्धात प्रारणजन्य धुक्याची जाडी वाढते. अशा धुक्याने व्यापिलेल्या थरात तापमान सर्वत्र जवळजवळ सारखे होऊ लागते. सूर्योदयानंतर भूपृष्ठ व हवा गरम होते आणि धुके हळूहळू वितळू लागते. साधारणपणे सूर्योदयानंतर भूपृष्ठीय वारे प्रबल होतात व भूपृष्ठालगतच्या हवेत ऊर्ध्व दिशेने जाणारे आवर्त (भोवरे) निर्माण होतात. त्यामुळे कधीकधी सबंध धुक्याचा थर भूपृष्ठापासून वर उचलला जातो. त्यात नंतर अनेक खंड पडून त्यांचे स्तरमेघांत रूपांतर होते. ते वाऱ्यांबरोबर वाहत जातात व कालांतराने नाहीसे होतात.

अभिवहन धुके : उष्ण प्रदेशातील हवेचे शीत प्रदेशांकडे क्षैतिज दिशेने परिवहन झाल्यास अभिवहन धुक्याचा प्रादुर्भाव होतो. समुद्र किनाऱ्याजवळील परिस्थिती अभिवहन धुक्यांना अनुकूल असते. हिवाळ्यात रात्री भूखंड थंड असते, तर समुद्रपृष्ठ उष्णतर असते. अशा वेळी काही अनुकूल परिस्थितीत समुद्रावरून भूपृष्ठाकडे उष्णार्द्र हवेचे क्षैतिज परिवहन झाल्यास जमिनीवर अभिवहन धुके निर्माण होऊ शकते. साधारणपणे जमिनीवरील तापमानाची दैनिक अभिसीमा अधिक असल्यामुळे असे धुके रात्रीच्या पूर्वार्धात तयार होऊ लागते. उत्तररात्री आणि पहाटेपूर्वी घनदाट होते व सूर्योदयानंतर नाहीसे होते. अशा धुक्याच्या निर्मितीत अभिवहन क्रियेपेक्षा भूपृष्ठाच्या रात्रीच्या प्रारणक्रियेचा फार मोठा वाटा असतो. त्यामुळे त्यांना प्रारणजन्य धुकेच समजणे अधिक उचित ठरेल. खरे अभिवहन धुके समुद्रपृष्ठावरच निर्माण होते. समुद्रपृष्ठावर तापमानाची दैनिक अभिसीमा ०·५° सें. पेक्षाही कमी असते. रात्रीच्या प्रारणक्रियेने समुद्रपृष्ठ शीततर होण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही. तथापि काही विशिष्ट परिस्थितींत भूपृष्ठावरील उष्णार्द्र हवा शीततर समुद्रपृष्ठावरून वाहू लागली किंवा उष्णतर सागरी क्षेत्रावरील हवा शीततर सागरी क्षेत्रावर येऊ लागली, तर तेथे खऱ्या अर्थाने केवळ अभिवहन क्रियेने धुके निर्माण होते. मतलई वाऱ्यांमुळेही समुद्रावर अभिवहन धुके उद्‌भवते. जेथे उष्ण व शीत समुद्रप्रवाह जवळजवळ असतात अशा सागरी क्षेत्रांवर बहुशः अभिवहन धुके उद्‌भवते. अटलांटिक महासागरातील उष्ण गल्फ स्ट्रीम व अतिशीत लॅब्रॅडॉर प्रवाह उ. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या ईशान्येकडील ग्रँड बँक्स या भागात एकमेकांसमीप वाहत असतात तेथे अनेकदा अभिवहन धुके निर्माण होते. अशा धुक्याचा २१० मी. उंचीपर्यंत विस्तार होतो. धुक्यातील मेघकणांचा पतनवेग साधारणपणे दर सेकंदाला २·५ सेमीं. इतका असतो. अभिवहन धुक्यातील कणांचे आयुष्य सरासरीने २–२·५ तास असते.

बाष्प धुके : अत्यंत कमी तापमान व कमी संतृप्त बाष्पदाब असलेली थंड शुष्क हवा उच्च तापमान व उच्च संतृप्त बाष्पदाब असलेल्या जलपृष्ठावरून वाहू लागते. तेव्हा थंड शुष्क हवा गरम होते. तापमान वाढल्यामुळे ही हवा अधिक जलबाष्प धारण करू शकते. त्यामुळे तिच्यात द्रुत गतीने जलबाष्प शिरू लागते व जलपृष्ठाच्या लगतच्या हवेचा थर धुक्याच्या कणांनी लगेच भरून जातो. हवा आणि पाणी यांच्या तापमानांतील फरकामुळे असे बाष्प–धुके उद्‌भवते. हे धुके कमी जाडीचे असते. ऊर्ध्व दिशेने त्यांचा विस्तार ३० मी. पेक्षा अधिक नसतो. तथापि ती जहाजांच्या वाहतुकीत व्यत्यय आणू शकतात. हिवाळ्यात रात्री थंड भूपृष्ठावरील हवा उष्ण नद्यांवर किंवा विस्तीर्ण जलाशयांवर आल्यास बाष्प-धुके निर्माण होते.

वर्षाजन्य धुके : उच्च पातळीवरील उष्ण हवेतून पर्जन्यबिंदू निघून भूपृष्ठाकडे येताना जर त्यांना भूपृष्ठालगतच्या थंड हवेच्या थरातून जावे लागले, तर काही वेळाने थंड हवेचा दवांक वाढतो, जलबाष्पाचे त्या थंड हवेतील केद्रकांवर संद्रवण होते व परिणामी धुके निर्माण होते. भिन्न गुणधर्माच्या दोन प्रकारच्या वायुराशी विभागणाऱ्या सीमापृष्ठाच्या जवळपास अशी परिस्थिती आढळते. त्यामुळे अशा धुक्याला ‘सीमापृष्ठीय धुके’ असेही म्हणतात. तापापवर्तनाच्या खाली असलेल्या थंड हवेतून पाऊस पडत असतानासुध्दा असे धुके निर्माण होते. शुष्क हवेच्या थरांतून पाऊस पडताना होणाऱ्या बाष्पीभवनामुळे किंवा पावसाने भिजून ओल्या झालेल्या जमिनीतून होणाऱ्या बाष्पीभवनामुळेही वर्षाजन्य धुके संभवते. पृष्ठभागीय वारे प्रबलतर असल्यास धुक्याऐवजी नीच स्तरमेघ निर्माण होतो.

आरोही धुके : पर्वताच्या वाताभिमुख बाजूला असे धुके उद्‌भवते. पर्वतांनी अडविलेले वारे पर्वताची चढण चढू लागताना वर जाणाऱ्या हवेचे अक्रमी प्रसरण होते, त्यामुळे तिचे तापमान कमी होते आणि पर्वताच्या काही उंचीवर तापमान दवांकाच्या खाली गेले की, आरोही धुके निर्माण होते. वारे प्रबल असल्यास हे धुके बराच वेळ टिकून राहते. पाऊस पडत असल्यास जलबाष्पाचा पुरवठा होणे आणि पर्वताची चढण पार केल्यामुळे व रात्रीच्या प्रारणामुळे तापमान कमी होणे या तीन प्रक्रियांच्या संयुक्त परिणामामुळे दीर्घावधीचे आरोही धुके निर्माण होऊ शकते.

धुक्यावर परिणाम करणाऱ्या काही घटना : नुसत्या एकाच प्रक्रियेने जमिनीवर क्वचितच धुके निर्माण होते. जमिनीवरील बहुतेक धुकी अभिवहन, प्रारण, हवेची आरोही गती, पर्जन्यवृष्टी, बाष्पीभवन इ. क्रियाप्रक्रियांच्या संयोगामुळे उद्‌भवतात. जमिनीवरील बहुसंख्य धुकी हिवाळ्यात प्रत्ययास येतात. उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यातच भूपृष्ठ अधिक थंड असते आणि रात्री दीर्घावधीच्या असल्यामुळे धुक्याला अनुकूल असे रात्रीचे प्रारण अधिक काळपर्यंत होत असते.

काही प्रकारच्या धुक्यांवर पृष्ठभागीय वाऱ्यांचा तत्काळ परिणाम होतो. प्रारणजन्य धुके निर्माण होण्यासाठी इतर सर्व घटक अनुकूल असले पण पृष्ठभागीय वारा प्रबलतर झाल्यामुळे प्रतिकूल असेल, तर भूपृष्ठाजवळचे हवेचे थर ढवळून निघतील, तापापवर्तन नाहीसे होईल व धुक्याऐवजी स्तरमेघ निर्माण होईल. पृष्ठभागीय वारे थोडे गतिमान असले, तरी त्यांचा अभिवाहन व इतर प्रकारच्या धुक्यांवर विषेश प्रभाव पडू शकत नाही. प्रारणजन्य धुक्याला द्रुतगती वारे प्रतिकूल ठरतात. आदल्या दिवशी पाऊस पडून गेल्यानतंर आकाश निरभ्र झाले, तरी पृष्ठभागीय वारे ताशी १० किमी. पेक्षा अधिक वेगवान असतील, तर दुसऱ्या दिवशी सकाळी प्रारणजन्य धुके निर्माण होणार नाही.

प्रारणजन्य धुक्यात भूपृष्ठालगतच्या हवेचे तापमान साधारणपणे तासाला १° सें. इतक्या मंदपणे कमी होते. क्षैतिज वारे मंदगती असल्यास हळूहळू हे शीतलीकरण हवेच्या वरच्या काही थरांत जाऊन पोहोचते. हवेपेक्षा भूपृष्ठ अधिक त्वरेने थंड होत असते. त्यामुळे तापपवर्तन निर्माण होते. ह्या स्थिर स्तरातच प्रारणजन्य धुके उद्‌भवते. अशा धुक्याच्या थराची जाडी अधिक नसते. वारे प्रबल झाल्याबरोबर ही सर्व यंत्रणा ढासळते. त्यात शीतलीकरणापेक्षा संमिश्रणक्रिया अधिक प्रभावी बनते. अभिवहन धुक्यात वारे जोरदार असले, तरी संमिश्रणापेक्षा शीतलीकरण क्रिया अधिक प्रभावी बनते. अशा धुक्यात उष्ण क्षेत्रातील हवा शीत जलपृष्ठावरून वाहू लागल्यामुळे अल्पावकाशात बरीच थंड होते व धुके निर्माण करते. थंड झालेल्या थराची जाडी प्रारणजन्य धुक्याच्या जाडीपेक्षा बरीच अधिक असते. पृष्ठभागीय वारे प्रबल झाले, तर हवेत संक्षोभ उत्पन्न होऊन त्यामुळे ऊर्ध्व आवर्त निर्माण होतात. त्यामुळे खालील थरांतील थंड झालेले हवेचे कण वरील थरापर्यंत जातात व एका दृष्टीने अभिवहन धुके टिकविण्यास मदतच करतात. आरोही धुके निर्माण करण्यात व ते टिकविण्यात प्रबलतर वाऱ्यांचा बराच मोठा भाग असतो.


बहुतेक सर्व प्रकारची धुकी तापनक्रियेमुळे लय पावतात. धुक्याची संख्या सकाळच्या वेळी अधिकतम असते दुपारी ती न्यूनतम असते. जास्त जाडीच्या धुक्यापेक्षा कमी जाडीचे धुके लवकर वितळते. प्रारणजन्य धुके उथळ असते. सूर्योदयानंतर काही तासांनी ते नाहीसे होते. आरोही धुक्याची जाडी बरीच अधिक असते. त्याच्यावर दैनिक तापनाचा परिणाम होत नाही. समुद्रावरील हवेचे तापमान दुपारी सहसा ०·५° सें. पेक्षा अधिक वाढत नाही. त्यामुळे समुद्रावर निर्माण झालेल्या जास्त जाडीच्या अभिवहन धुक्यावर दैनिक तापमानाचा परिणाम होत नाही. उष्णतर भूपृष्ठावरील धुके सकाळ होताच लवकर नाहीसे होते. शीततर भूपृष्ठावर (विशेषतः हिवाळ्यात) निर्माण झालेले धुके दुपार होऊन दैनिक तापमान वाढले, तरी सहजासहजी नष्ट होत नाही. हिमाच्छादित प्रदेशात बर्फ वितळत असताना निर्माण होणारे धुके दुपार झाली, तरी टिकून राहते.

जागतिक वितरण : मध्यम आणि उच्च अक्षवृत्तांतील सागरी क्षेत्रात उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या धुक्यांची संख्या महत्तम असते. उष्ण हवा समुद्राच्या शीत पाण्यावर वाहताना ती उद्‌भवतात. लॅब्रॅडॉर आणि ओयाशियो किंवा ओखोट्स्क या शीत सागरी प्रवाहांवरून निकटवर्ती प्रदेशांवरील उष्ण हवा जाऊ लागल्यास जास्त जाडीचे दाट अभिवहन धुके निर्माण होते. न्यू फाउंडलंडच्या ग्रँड बँक्स क्षेत्रात वारंवार होणाऱ्या धुक्यांमुळे व हिमनगांमुळे नाविक वाहतूक वर्षातून अनेकदा धोक्यात येते. लॅब्रॅडॉर सागरी प्रवाहामुळे उत्तरेकडील हिमांकाइतक्या तापमानाचे थंड पाणी दक्षिणेकडे येते. हा अतिशीत पाण्याचा प्रवाह गल्फ स्ट्रीम या उष्ण सागरी प्रवाहाजवळून वाहू लागतो. हिवाळ्यात दक्षिणेकडून (उष्ण क्षेत्रापासून शीत क्षेत्राकडे) वारे वाहू लागल्यास धुक्याचा प्रादुर्भाव होतो. उन्हाळ्यात कॅनडाच्या भूमिपृष्ठीवरून वाहणारी उष्ण हवा लॅब्रॅडॉरच्या शी सागरी प्रवाहावरून जाऊ लागते तेव्हाही धुक्याचा प्रादुर्भाव होतो. वर्षभर ही अभिवहन धुकी निर्माण होत असली, तरी उन्हाळ्यात त्यांची संख्या महत्तम असते. लॅब्रॅडॉर पासून मॅसॅचूसेट्सचा किनारा, कॅरोलायना किनारा, ग्रीनलंड सागरी प्रवाह, नॉर्वेजियन समुद्राचा उत्तर विभाग, बॅरेंट्स समुद्र या सर्व विभागांत धुक्याची वारंवारता लक्षात घेण्यासारखी आहे. उन्हाळ्यात भूखंडांवरील उष्ण हवा उत्तरेकडील शीत जलपृष्ठांकडे जाताना अनेकदा विस्तृत प्रमाणावर जाड अभिवहन धुके निर्माण होते. आर्क्टिक क्षेत्रावरही धुकी निर्माण होतात हिवाळ्यात हिमाच्छादित आर्क्टिक क्षेत्राच्या कडांवर, तर उन्हाळ्यात संपूर्ण आर्क्टिक क्षेत्रावर धुकी पडतात. जेथे उष्ण कुरोसिवो आणि शीत ओयाशियो सागरी प्रवाह जवळजवळ वाहतात, तेथेही मोठ्या संख्येने धुकी निर्माण होतात. हे शीत सागरी प्रवाह बेरिंग समुद्र व ओखोट्स्क समुद्रांवरून येत असतात. ग्रँड बँक्सपेक्षाही येथील धुक्यांची संख्या अधिक असते. हिवाळ्यात अतिशीत भूपृष्ठावर अधूनमधून अभिवहन धुक्यांचा प्रादुर्भाव होतो.

डोंगराळ भागात, विस्तीर्ण सरोवरांच्या आसमंतात आणि समुद्र किनाऱ्यांच्या निकटवर्ती क्षेत्रात धुक्यांची संख्या अधिकतम असते.

दोन्ही गोलार्धांतील महासागरांवर मध्यम अक्षवृत्तांत प्रचंड स्वरूपाचे अपसारी चक्रवात [ → चक्रवात] असतात. त्यांच्या पूर्वेकडच्या भागात खंडांच्या पश्चिम किनाऱ्याला लागून उच्च अक्षवृत्ताकडून विषुववृत्ताकडे वारे वाहत असतात. ते किनाऱ्याजवळचे समुद्राचे पाणी किनाऱ्यापासून पश्चिमेकडे लांब फेकून देतात. किनाऱ्याजवळ पाण्यात पोकळी निर्माण होते. ती भरून काढण्यासाठी समुद्राच्या खालील थरांतील अतिशीत पाणी पृष्ठभागी येते. समुद्रतळाचे शीत पाणी मोठ्या प्रमाणावर पृष्ठभागी येण्याच्या ह्या क्रियेला ‘उत्सारण’ असे म्हणतात. द्रुतगती वाऱ्यांच्या भागातही हा प्रकार अनुभवास येतो. त्यामुळे खंडांच्या पश्चिमेकडील समुद्रपृष्ठाच्या विस्तीर्ण क्षेत्रावर अतिशीत पाणी पसरविले जाते. तेथेच मोठ्या संख्येने धुकी निर्माण होतात. उ. अमेरिकेच्या पश्चिमेचा कॅलिफोर्निया प्रवाह, द. अमेरिकेचा पेरू व चिली या देशांच्या किनाऱ्यांना लागून वाहणारा हंबोल्ट किंवा पेरू प्रवाह, द. आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याजवळील बेंग्वेला प्रवाह, वायव्य आफ्रिकेच्या किनाऱ्यालगतचा कॅनरीज प्रवाह व प. ऑस्ट्रेलियाच्या जवळील पश्चिम ऑस्ट्रेलियन प्रवाह यांची शीतजलीय पृष्ठे बहुसंख्य धुक्यांच्या निर्मितीस कारणीभूत होतात. साधारणपणे द. अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याजवळील ४° ते ३१° सें. द. अक्षवृत्तातील प्रदेशात ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये, उ. आफ्रिकेच्या कॅसाब्लांका ते सेनेगलच्या पश्चिम किनारी प्रदेशात उन्हाळ्यात व द. आफ्रिकेच्या ८° ते ३२° द. अक्षवृत्तातील किनारी प्रदेशात जून ते ऑगस्टमध्ये कित्येक धुकी संभवतात.

दक्षिण गोलार्धात अंटार्टिकाच्या हिमाच्छादित क्षेत्रात वारंवार धुकी संभवतात. उत्तर गोलार्धातील न्यू फाउंडलंडच्या ग्रँड बँक्स क्षेत्रात जशी धुकी घडून येतात तशी धुकी दक्षिण गोलार्धातील द. अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील रीओ दे ला प्लातापासून दक्षिणेकडे जुलै ते सप्टेंबरमध्ये आणि आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील केप गार्डाफुईपासून दक्षिणेकडे जून ते सप्टेंबर महिन्यांत निर्माण होतात. उष्णतर हवा ह्या क्षेत्रांवरील शीत समुद्रकिनारी प्रवाहावरून वाहत जात असल्यामुळे ही धुकी उद्‌भवतात.

भूमिपृष्ठावरील धुकी बव्हंशी प्रारणजन्य असतात. ती मध्यम अक्षवृत्तांत हिवाळ्यात व शरद ऋतूत, उच्च अक्षवृत्तांत उन्हाळ्यात आणि उष्ण कटिबंधात पावसाळ्यात व हिवाळ्यात उद्‌भवतात. मुख्यत्वेकरून दऱ्याखोऱ्यांत, दलदलीच्या प्रदेशांत व नीच पातळीवरील प्रदेशांत ती पडतात. ही धुकी कमी जाडीची व अल्पावधीची असतात.

उपोष्ण कटिबंधांत अनेक अभिसारी चक्रवात [ → चक्रवात] पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असतात. त्यांत शीत सीमापृष्ठे व उष्ण सीमापृष्ठे [ → सीमापृष्ठ] निर्माण होऊन पर्जन्यवृष्टी होत असते. उष्ण पाऊस खालील शीत हवेत शिरल्यामुळे धुके निर्माण होते. उष्ण सीमापृष्ठाशी निगडित झालेल्या पावसामुळे निर्माण होणारे धुके शेकडो किमी.पर्यंत पसरलेले असते. हवाई वाहतुकीला हे धुके धोकादायक असते.

भारतात धुकी मुख्यत्वेकरून हिवाळ्यात निर्माण होतात. बहुतेक धुकी उत्तर भारतातच पडतात. हिवाळ्यात भारतात पश्चिमेकडून अभिसारी चक्रवात प्रवेश करतात. पूर्वेकडे किंवा ईशान्येकडे निघून जाताना त्यामुळे ती हिवाळी पिकांना उपयुक्त अशी वृष्टी होते. एखाद्या ठिकाणी पाऊस पडल्यानंतर अभिसारी चक्रवात पूर्वेकडे निघून गेल्यावर त्या ठिकाणी शुष्क व अतिशीत हवेचे लोट येतात आणि प्रारणजन्य धुके निर्माण होते. दक्षिण भारतात १६° उ. अक्षवृत्ताच्या खाली धुके पडतच नाही. मुंबई, दिल्ली, कानपूर, कलकत्ता यांसारख्या औद्योगिक शहरांत प्रदूषणजन्य धुकी निर्माण होतात. ईशान्य भारतात धुक्यांची संख्या सर्वाधिक असते. पावसाळ्यानंतर एकदोनदा धुके पडते.

विकिरणाचे कृत्रिम उपाय : धुक्यामुळे विमानवाहतूक धोक्यात येते. वैमानिक दुर्घटनांपैकी अधिकतम दुर्घटना धुक्यामुळे घडून आल्या आहेत. दुसऱ्या महायुध्दानंतर कृत्रिम उपायांनी धुके वितळवून हवाई व नाविक वाहतूक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने अनेक प्रयोग केले गेले. धुके दोन प्रकारांनी निष्प्रभ करता येते : (१) धुक्याच्या प्रभावाखाली आलेली हवा उष्ण करून धुक्याच्या कणांचे बाष्पीभवन करणे व (२) धुक्याचे कण मोठे करून ते पर्जन्याच्या रूपाने काढून घेणे. जगात सर्वत्र अतिशीतित धुके वितळविण्यासाठी गोठलेल्या कार्बन डायऑक्साइडाचे किंवा सिल्व्हर ओयोडाइडाचे कण विमानांतून खालील धुक्यात सोडतात. हे कण धुक्यातील अतिशीतित जलकणांशी संयोग पावून हिमवृष्टी होऊन धुके निष्प्रभ होते. यासाठी फ्रान्समध्ये द्रवीभूत प्रोपेन तर रशियात लेड आयोडाइड वापरण्यात आलेले आहे. अशा प्रयोगांमुळे हमखास यश येते असा अनुभव आहे. उष्ण धुक्याच्या बाबतीत अशी खात्री देता येत नाही.


हिमतुषारांकापेक्षा (ज्या तापमानाला हवा थंड केली असता हिमतुषार किंवा तुहिन निर्माण होते त्या तापमानापेक्षा) अधिक तापमान असलेले उष्णतर धुके सहजासहजी नष्टप्राय करता येत नाही. धुक्यात अनेक ठिकाणी जाळ करून धुके तापविणे, कॅल्शियम क्लोराइडासारख्या आर्द्रताग्राही पदार्थांचे कण विस्तृत प्रमाणावर धुक्यात विखरून टाकणे, विमानांच्या प्रचालकांद्वारे (पंख्यांद्वारे) ऊर्ध्व दिशेत हवेचे स्रोत्र फेकून धुक्याखाली असलेल्या हवेचे नीचतम थर ढवळणे, विमानतळाच्या धावपट्टीवर जेट विमाने ओळीने उभी करून जेट एंजिनांनी उष्ण हवेचे फवारे धुक्यात सोडणे, द्रुतगतीने जलसंयोग साधणाऱ्या अनेक विद्युत् विच्छेद्य पदार्थांचे कण धुक्यात विखरून टाकणे इ. प्रक्रियांनी उष्ण धुके वितळविण्याचे अनेक प्रयोग करण्यात आले आहेत. उष्ण धुक्यात पाण्याचे फवारे सोडून धुक्याचे कण मोठे करून पर्जन्याच्या रूपाने ते जमिनीवर आणण्याच्या दृष्टीनेही अनेक प्रयत्न झाले आहेत. काही प्रयोगांत काजळी जास्त असलेल्या कोळशाचे कण ढगात सोडण्यात आले. सूर्यकिरणांची उष्णता स्वतः शोषून घेऊन कालांतराने धुक्याचे तापमान वाढवून ते वितळवायचे हा त्यात उद्देश होता. अजून तरी कृत्रिम उपायांनी उष्ण धुके निष्पभ्र करण्याचा एकही समाधानकारक निश्चित मार्ग सापडलेला नाही.

पहा : झाकळ धूसर.

संदर्भ : 1. Byers, H. R. General Meteorology, New York, 1959.

            2. Malone, T. F., Ed. Compendium of Meteorology,Boston, 1951.

            3. Petterssen, S. Weather Analysis and Forecasting, New York, 1956.

नेने, य. रा. चोरघडे, शं. ल.