धूसर : जेव्हा हवेतील गढूळपणामुळे दृश्यमानता (सामान्य दृष्टीच्या निरीक्षकाला नुसत्या डोळ्यांनी जास्तीत जास्त दूरच्या वस्तू नीट ओळखू येतील असे अंतर) २,००० ते ५,००० मी.पर्यंत असते व त्यापलीकडील वस्तू नुसत्या डोळ्यांना स्पष्ट दिसत नाहीत. असा वातावरणीय आविष्कार. हवेतील गढूळपणा हा तीत तंरगणारी धूळ, वाळू, लवणे, पराग अगर बाष्पाचे किंवा पाण्याचे सूक्ष्म कण यांमुळे निर्माण होतो. या कणांचा व्यास ०·१μ ते २μ (१μ म्हणजे मायक्रॉन = १०-३ मिमी.) असतो. एक घन सेंमी. मध्ये असे दशलक्षापेक्षा अधिक कण असतात. धूसरतेमुळे भूदृश्यावर विस्तीर्ण आवरण पसरल्यासारखे वाटते. धूसरतेमुळे वस्तूंचे रंग मंद होतात. निळसर पर्वतांच्या किंवा काळसर रंगाच्या पार्श्वभूमीवर धूसरतेला निळसर रंगाची छटा येते. हिमाच्छादित पर्वतांच्या, क्षितिजावरील शुभ्र ढगांच्या किंवा सूर्यप्रकाशाच्या पार्श्वभूमीवर धूसरतेला पिवळसर किंवा नारिंगी छटा येते.

उत्पन्न होण्याची कारणे : (१) रेताड जमीन उन्हाळ्यात उन्हाने बरीच तापल्यामुळे हवेत ऊर्ध्वगामी (वर जाणारा) प्रवाह सुरू होतात व प्रवाहाबरोबर जमिनीवरचे धुळीचे सूक्ष्म कण वर जाऊन हवेत बराच वेळ तरंगत राहतात. (२) शहरातील रहदारीमुळे रस्त्यावरील धूळ उडून हवेत दीर्घकालपर्यंत तरंगत राहते. (३) कारखान्यांच्या धुराड्यातून बाहेर पडणारा धूर व लवणे हवेत पसरून ती बराच वेळ वातावरणात तरंगत राहतात. (४) वेगवान वाऱ्यांमुळे महासागरांतील जलपृष्ठाजवळची हवा घुसळली जाऊन पाण्यात अनेक बुडबुडे निर्माण होतात. ते समुद्रपृष्ठावर येताच फुटतात, पाण्याचे बाष्पीभवन होते व त्यांतील लवणांचे कण मुक्त होऊन वाऱ्यावर तरंगत राहतात. (५) दऱ्यांतून किंवा नदी अगर समुद्रावर काही वेळा जलबाष्पाचे सूक्ष्म बिंदू किंवा जलीय कण हवेत तरंगत राहतात. हे बाष्पकण जलपृष्ठभागावरून होणाऱ्या बाष्पीभवनामुळे, तर जलीय कण हवेतील बाष्पाच्या संद्रवणामुळे (द्रवात रूपांतर झाल्यामुळे) तयार होतात. या कारणांमुळे धूसर निर्माण होते.

प्रकार : अमेरिकेमध्ये १९३८ सालापासून दमट धूसर व कोरडी धूसर अशी दोन नावे प्रचारात आहेत. दमट धूसर हवेतील जलबाष्पामुळे उत्पन्न होते व कोरडी धूसर हवेतील धूळ, धूर किंवा लवणांच्या कणांनी बनलेली असते. पुष्कळदा धूसरता दोन्ही प्रकारच्या क्रियांमुळे निर्माण झालेली असते. ग्रेट ब्रिटनमधील धूसर मुख्यतः दमट असते व तिला ‘विरल धुके’ किंवा ‘झाकळ’ म्हणतात. वाळवंटी प्रदेशात वाऱ्यांमुळे व जमिनीवरील ऊर्ध्व प्रवाहांमुळे वाळूचे व धुळीचे सूक्ष्म कण हवेच्या वरील थरांत पसरल्यामुळे धूसर निर्माण होते. ती कोरडी असते. तिचा प्रभाव ४,००० ते ६,००० मी. उंचीपर्यंत दिसू शकतो. उन्हाळ्यात शुष्क भूपृष्ठ खूपच तापते. त्यामुळे निकटवर्ती हवेचे थरही तापतात. त्यांची घनता सारखी बदलत असते. ऊर्ध्व प्रवाह निर्माण होतात व त्यांमुळे थरथरणारे अस्पष्ट दृश्य दिसते, ह्या अस्पष्टतेला ‘दृक्-धूसर’ असे म्हणतात.

भारतात जेव्हा हवेतील सापेक्ष आर्द्रता ६५ टक्क्यांपेक्षा कमी असून दृश्यमानता २,००० ते ५,००० मी. पर्यंत असते तेव्हा तिला धूसर म्हणतात. ही धूसरता कोरड्या स्वरूपाची असते. आर्द्रता उत्तरोत्तर अधिक होत गेल्यास हवेतील आर्द्रताग्राही (जलशोषक) कणांवर जलबाष्पाचे संद्रवण होत जाते आणि तसतशी दृश्यमानताही कमीकमी होत जाते आणि क्रमशः दाट धूसर, झाकळ व दाट धुके हे आविष्कार प्रतीत होतात. दाट धुक्यात दृश्यमानता १,००० मी. पेक्षा खूपच कमी असते.

पहा : झाकळ धुके.

गद्रे, कृ. म.