चक्रवात : चक्रवातांचे दोन प्रकार आहेत. (१) अभिसारी चक्रवात व (२) अपसारी चक्रवात.

अभिसारी चक्रवात : वादळी हवामान असलेल्या क्षेत्रावर पृथ्वीपृष्ठापासून अनेक मीटर उंचीपर्यंत वारे चक्राकार पद्धतीने फिरत असतात. अशा वातरचनेला अभिसारी चक्रवात असे म्हणतात. अभिसारी चक्रवाताने व्यापलेल्या क्षेत्रावर हवेचा दाब भोवतालपेक्षा केंद्रभागी बराच कमी असतो.

अभिसारी चक्रवातात उष्णार्द्र हवा केंद्रिय प्रदेशाकडे जात असते व पृथ्वीच्या परिवलनामुळे (अक्षीय परिभ्रमणामुळे) ती ऊर्ध्व (उभ्या) दिशेने वर उचलली जात असते. हवेच्या या ऊर्ध्व गतीमुळेच अभिसारी चक्रवातांच्या क्षेत्रावर वादळी हवामान निर्माण होते. दैनिक हवामाननिदर्शक नकाशांवर असे चक्रवात मीलित (एकमेकांना मिळणाऱ्या) वक्र समदाब रेषांनी (सारखा वातावरणीय दाब असणाऱ्या ठिकाणांतून जाणाऱ्याच रेषांनी) दाखविले जातात [ → समदाब रेषा ]. त्यांच्या केंद्रभागी वातावरणीय दाब न्यूनतम असतो. उत्तर गोलार्धात अभिसारी चक्रवातातील वारे अपसव्य दिशेने (घड्याळाच्या काट्यांच्या हालचालीच्या विरुद्ध दिशेने) वाहतात व दक्षिण गोलार्धात ते सव्य दिशेने (घड्याळाच्या काट्यांच्या हालचालीच्या दिशेने) वाहतात. अभिसारी चक्रवातांचा व्यास सु. १००—१,५०० किमी. इतका असतो. अशा चक्रवाताच्या केंद्राकडे वारे जोरदार असतात व केंद्रापासून जसजसे बाहेर यावे तसतसे वारे कमजोर चालू होतात.

वातावरणविज्ञानाच्या दृष्टीने अभिसारी चक्रवातांचे दोन प्रकार केले जातात : (१) उष्ण कटिबंधीय किंवा उपवैषुव (दोन्ही गोलार्धांतील ५ ते १८ अक्षवृत्तांच्या पट्ट्यांत निर्माण होणारी चक्रीवादळे व (२) उपोष्ण कटिबंधीय अभिसारी चक्रवात. स्थानभेदाप्रमाणे उष्ण कटिबंधीय चक्री वादळांस निरनिराळी नावे प्राप्त झाली आहेत. पश्चिम पॅसीफिक महासागरात त्यांना टायफून, पश्चिम ऑस्ट्रेलियात विली-विली व पश्चिम अटलांटिक महासागरात हरिकेन म्हणतात. [ → टायफून हरिकेन ].

उपोष्ण कटिबंधीय अभिसारी चक्री वादळांची तीव्रता उष्ण कटिबंधीय चक्री वादळांच्या मानाने बरीच कमी असते. प्रचलित पश्चिमी वाऱ्यांच्या दिशेप्रमाणे उपोष्ण कटिबंधीय अभिसारी चक्रवात पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. मध्यम कटिबंधीय व उपध्रुवीय प्रदेशांत त्यामुळे विस्तृत प्रमाणावर पर्जन्यवृष्टी किंवा हिमवृष्टी होते. हिवाळ्यात काही उपोष्ण अभिसारी चक्रवातांचे मार्ग २७ अक्षवृत्ताइतके खाली येतात. त्यांच्यामुळे उत्तर भारतात विस्तृत प्रमाणावर पाऊस पडतो. केंद्र भागातील वातावरणीय दाब ९९०–१,००० मिलिबार (१ बार = ७५·००७ सेंमी. पाऱ्याच्या स्तंभाचा दाब, १ मिलिबार = १०-३ बार) इतका असतो.

वातावरणात हवेच्या गुणधर्माच्या दृष्टीने काही सीमारेषा ओलांडून गेल्यानंतर फरक पडलेला आढळतो. ही गोष्ट एकोणिसाव्या शतकातील वातावरणविज्ञांना माहीत होती. वायुराशींचे सीमापृष्ठ (उष्णार्द्र हवा व शीत शुष्क हवा विभक्त करणारे पृष्ठ) आणि अभिसारी चक्रवात यांच्यातील निकट संबंध स्पष्ट करणारा ध्रुवीय सीमापृष्ठ सिद्धांत नॉर्वेतील बर्गेन येथील भूभौतिकीय संशोधन संस्थेतील व्ही. ब्यॅर्कनेस, जे.ब्यॅर्कनेस वगैरे वातावरणविज्ञांनी प्रथम मांडला व दैनिक हवामान निदर्शक नकाशांवर तो पडताळून पाहिला. या सिद्धांताप्रमाणे ध्रुवीय प्रदेशातून येणारे कोरडे शीत ईशान्य वारे आणि नीच अक्षवृत्तांवरून येणारे उष्ण व आर्द्र नैर्ऋत्य वारे यांच्यामधील समाईक ध्रुवीय सीमापृष्ठावर निर्माण होणाऱ्या तरंगातून उपोष्ण कटिबंधीय अभिसारी चक्रवात निर्माण होतात [ → सीमापृष्ठ ]. कित्येकवेळा ध्रुवीय सीमापृष्ठावर एकाच वेळी अनेक ठिकाणी तरंग निर्माण होऊन अनेक अभिसारी चक्रवातांचे एक कुलच जन्मास येते. ही अभिसारी चक्रवातकुले सामान्यपणे पश्चिमेकडून पूर्वेकडे किंवा नैर्ऋत्येकडून ईशान्येकडे सरकत जातात. अशा चक्रवातांत थंड सीमापृष्ठ व उष्ण सीमापृष्ठ स्पष्टपणे दिसू शकतात. केव्हा केव्हा उपोष्ण कटिबंधीय अभिसारी चक्रवातांचा जन्म उष्ण कटिबंधात वायुराशींचे सीमापृष्ठ नसलेल्या जागीही होतो. असे चक्रवात फिरता फिरता उपोष्ण कटिबंधात येतात. कालांतराने त्यांच्या अभिसरणात थंड व उष्ण सीमापृष्ठे निर्माण होतात आणि ते अभिसारी चक्रवात पश्चिमेकडून पूर्वेकडे असा मार्ग आक्रमू लागतात. नीच अक्षवृत्तांतून उपोष्ण कटिबंधात येतात त्यांचे स्वरूप बदलते, ते सीमापृष्ठीय अभिसारी चक्रवातांसारखे वागू लागतात. उत्तर गोलार्धातील कोणत्याही ठिकाणी पृष्ठभागीय वाऱ्यांची दिशा क्रमाक्रमाने बदलून ती आग्नेयीपासून वायव्येपर्यंत कोणतीही राहणे, वाऱ्याचा वेग वाढणे, वातावरणीय दाब क्रमाक्रमाने कमी होणे, ढगांचे आवरण वाढणे,त्यांच्या तळाची उंची कमी होणे आणि पर्जन्याला प्रारंभ होणे ह्या घटना त्या ठिकाणाकडे उपोष्ण कटिबंधीय अभिसारी चक्रवातांचे आगमन सुचवितात. चक्रवाताचा केंद्रीय भाग पूर्वेकडे निघून गेल्यानंतर पाऊस थांबतो, वातावरणीय दाब वाढू लागतो आणि वाऱ्यांची दिशा नैर्ऋत्येपासून उत्तरेपर्यंत कोणतीही अशी राहते. उत्तरेकडील अतिशीत प्रदेशावरील वारे त्या ठिकाणी येतात व त्यामुळे थंडीची लाट येते. सारांश, उपोष्ण कटिबंधीय अभिसारी चक्रवातांच्या मार्गातील कोणत्याही स्थानावर सुरुवातीला उष्णार्द्र हवा येते पण चक्रवाताचे केंद्र पूर्वेकडे निघून गेले की, त्याच्यापासून उत्तरेकडील आर्द्रताहीन थंड जोरदार वारे ताबडतोब त्या ठिकाणी येतात. उपोष्ण कटिबंधीय अभिसारी चक्रवातांत शुष्क थंड आणि उष्ण आर्द्र हवेचे प्रवाह असतात. उपोष्ण कटिबंधीय अभिसारी चक्रवातात कोणत्याही वेळी उष्ण सीमापृष्ठ व शीत सीमापृष्ठ अशी दोन्हीही प्रकारची सीमापृष्ठे दृग्गोचर होतात आणि हेच त्यांचे वैशिष्ट्य असते. उष्ण कटिबंधीय चक्रीवादळात ह्या सीमापृष्ठांचा पूर्णपणे अभाव असतो. उपोष्ण कटिबंधीय अभिसारी चक्रवातात केंद्राच्या सभोवतालच्या प्रदेशात तापमान, आर्द्रता, वातावरणीय घनता व पर्जन्य यांचे वितरण सर्वत्र सारखे नसते.


उष्ण कटिबंधीय चक्री वादळांची उगमस्थाने व मार्ग : (आकृतीच्या आतील आकडे समुद्रपृष्ठाचे उष्ण ऋतूतील तापमान दर्शवितात ).

उष्ण कटिबंधीय चक्री वादळे उपोष्ण कटिबंधात निर्माण होणाऱ्या अभिसारी चक्रवातांपेक्षा काहीशी भिन्न असतात. त्यांत सीमापृष्ठे नसतात. ही चक्री वादळे विषुवृत्ताच्या दोन्ही अंगांस, ५° उ. ते ५° द.या पट्ट्यात जन्मास येत नाहीत. त्याबाहेरील १८° उ. किंवा १८° द. अक्षवृत्तापर्यंतच्या सागरी प्रदेशांवर सामान्यपणे उन्हाळा-पावसाळा व पावसाळा-हिवाळा यांच्यामधील संक्रमण काळात ती निर्माण होतात. सागरी प्रदेशावर जेथे तापमान २६° ते २७° सें. असेल त्या क्षेत्रात त्यांचा उगम मुख्यत्वेकरून होत असल्याचे आढळून आले आहे. विस्तृत प्रमाणावर बाष्पाचे पर्जन्यात रूपांतर झाल्यामुळे मुक्त झालेल्या अमर्याद सुप्त उष्णतेमुळे चक्री वादळांना विध्वसंक ऊर्जा लाभलेली असते. उष्ण कटिबंधीय चक्री वादळांच्या केंद्राजवळील काही समदाब रेषा जवळजवळ पूर्ण वर्तुळाकार असतात. केंद्रासभोवतीच्या प्रदेशात वातावरणीय दाबाचे व पर्जन्याचे वितरण सर्व बाजूंस सारखेच असते. उपोष्ण कटिबंधीय अभिसारी चक्रवातांच्या मानाने उष्ण कटिबंधीय चक्री वादळांचा विस्तार बराच कमी असतो, व्यासही सु. / असतो. वारे मात्र अधिक वेगवान असतात. केव्हा केव्हा ते ताशी १००—१५० किमी. हून अधिक वेगाचे असतात. उष्ण कटिबंधीय चक्री वादळांची उगमस्थाने व मार्ग नकाशात दाखविले आहेत. ही चक्री वादळे प्रथम पश्चिमेकडे, नंतर वायव्येकडे, त्यानंतर उत्तरेकडे आणि शेवटी ईशान्येकडे अशा अन्वस्तीय [पॅराबोलिक, → अन्वस्त] मार्गाने जातात. कधीकधी किनारा ओलांडून ती भूखंडीय प्रदेशांवर येतात. जमिनीवर आल्यावर त्यांचा झंझावती वेग मंदावतो व ती झपाट्याने क्षीण होतात. चक्री वादळे समुद्रांवर असताना त्यांच्या गाभ्याच्या क्षेत्रात वारे नसतात अथवा असलेच तर ते अगदी मंद असतात. तेथे आकाश जवळजवळ निरभ्र असते, पर्जन्यही नसतोच. या गाभ्यास चक्री वादळाचा ‘नेत्र’ म्हणतात. नेत्राचा व्यास, सरासरी पाहता, सु. २० किमी. असतो. पूर्ण विकसित तीव्र चक्री वादळांच्या ह्याच भागात ३ ते ४ मी. उंचीपर्यंत पाणी साठलेले असते. चक्री वादळाबरोबरच पाण्याचा हा प्रचंड स्तंभ प्रवास करीत असतो. चक्री वादळे जेव्हा किनाऱ्यावर येतात तेव्हा समुद्रावर उठणाऱ्या प्रचंड लाटांमुळे आणि उधाणामुळे मोठ्या प्रमाणावर हानी होते. मध्यवर्ती भागातील पाणीही किनाऱ्यालगतच्या प्रदेशात पसरते आणि अल्पावकाशात महापूर येतात. साधारणतः उष्ण कटिबंधीय चक्री वादळांतील केंद्रीय विभागातील वातावरणीय दाब ९५० ते ९६० मिलिबार असतो. अशाच एका वादळात न्यूनतम वातावरणीय दाब ८८७ मिलिबार इतका कमी आढळल्याची नोंद आहे. जगातील विविध प्रदेशांत निर्माण होणाऱ्या उष्ण कटिबंधीय चक्री वादळांची वारंवारता कोष्टकामध्ये दिली आहे.

उष्ण कटिबंधीय चक्री वादळांची वारंवारता 

   

प्रतिशत मासिक वारंवारता 

 

सरासरी वार्षिक 

संख्या 

जाने. 

फेब्रु. 

मार्च 

एप्रिल 

 मे 

जून 

जुलै 

ऑगस्ट 

सप्टेंबर 

ऑक्टोबर 

 नोव्हेंबर 

 डिसेंबर 

वेस्ट इंडिज 

६ 

० 

० 

० 

० 

० 

७ 

७ 

१६ 

३२ 

३१ 

६ 

१ 

चीनचा समुद्र 

२२ 

४ 

१ 

२ 

३ 

५ 

६ 

१५ 

१६ 

१९ 

१५ 

९ 

५ 

अरबी समुद्र 

२ 

४ 

० 

० 

५ 

११ 

२५ 

७ 

० 

४ 

२२ 

१८ 

४ 

बंगालचा उपसागर 

१० 

० 

० 

० 

२ 

५ 

११ 

१८ 

१९ 

१५

१५

१०

दक्षिण हिंदी महासागर

(मॉरिशस इ.)

२१

२९

२०

१३

दक्षिण पॅसिफिक महासागर (फिजी बेटे, क्वीन्सलँड इ.)

२३

१८

२२


चक्रवातांचा आणखी एक प्रकार आहे. तो म्हणजे ‘ऊष्मीय न्यूनदाबक्षेत्र’ हा होय. भूखंडावरील वैराण भूप्रदेश विशेषत: उन्हाळ्यात चांगलाच तापतो. त्या ठिकाणचे वातावरणही तप्त होऊन तेथे हवेचे ऊर्ध्व प्रवाह सुरू होतात. त्याचबरोबर ४-५ किमी. उंचीवर हवेचे अपसारण सुरू होऊन (हवा दूरवर नेली जाऊन) हवेच्या स्तंभाचे वजन कमी होते व जमिनीवर न्यून (कमी) दाबाचा विस्तीर्ण प्रदेश निर्माण होतो. केवळ जमिनीच्या तापण्यामुळे निर्माण झालेले हे न्यूनदाबाचे प्रदेश अचल असतात. वायुराशींची सीमापृष्ठे नसलेल्या स्थानी ते उन्हाळ्यात निर्माण होतात. हिवाळ्यात जमीन थंड असते पण सागरी प्रदेश उष्ण असतात. त्यामुळे हिवाळ्यात सागरी प्रदेशांवर न्यूनदाबक्षेत्रे निर्माण होतात. हिवाळ्यात दिसणारे उत्तर अटलांटिक महासागरावरील ‘आइसलँडिक न्यूनदाबक्षेत्र’ आणि उत्तर पॅसिफिक महासागरावरील ‘ॲल्यूशियन न्यूनदाबक्षेत्र’ हे ऊष्मीय स्वरूपाचेच विस्तीर्ण अभिसारी चक्रवात होत. उन्हाळ्यात सागर थंड तर जमीन तापलेली असते. तेव्हा ही न्यूनदाबक्षेत्रे जमिनीकडे सरकून जमिनीवरच आपले वास्तव्य करतात. जागतिक हवामानाच्या नकाशात उत्तर गोलार्धात उन्हाळ्यात न्यून वातावरणीय दाबाचा एक विस्तीर्ण पट्टा सहारा वाळवंटापासून थरचे वाळवंट अथवा उत्तर भारतापर्यंत पसरलेला दिसतो. त्याचे स्वरूप ऊष्मीय न्यूनदाबक्षेत्रासारखेच आहे.

गोखले, मो. ना.

अपसारी चक्रवात : वादळी हवामानाने ग्रासलेल्या अभिसारी चक्रवातामध्ये ज्या चक्राकार पद्धतीने उपरिवारे (वातावरणातील विविध पातळ्यांवर वाहणारे वारे) भ्रमण करीत असतात, त्याच्या अगदी उलट पद्धतीचे वाऱ्यांचे अभिसरण अपसारी चक्रवाताने व्यापलेल्या क्षेत्रांवर दिसून येते. अपसारी चक्रवातात वरच्या पातळीवरील हवा भूपृष्ठाकडे येऊन केंद्रीय प्रदेशातून बाहेर निघून इतरत्र पसरते. पृष्ठभागावरील दैनिक हवामाननिदर्शक नकाशावर अपसारी चक्रवात सहज दिसून येतात. अशा क्षेत्रात मध्यभागी हवेचा दाब सर्वाधिक असून परिघाकडे तो कमीकमी होत जातो. समदाब रेषा वर्तुळाकार किंवा लंबवर्तुळाकार असून केंद्राजवळील रेषा सर्वांत जास्त वातावरणीय दाब दर्शविते. चक्री वादळाच्या अथवा अभिसारी चक्रवाताच्या विरुद्ध गुणधर्म असलेल्या या वातचक्रास फ्रान्सिस गॉल्टन यांनी १८६१ मध्ये ‘अँटिसायक्लोन’ म्हणजे अपसारी चक्रवात असे नाव सुचविले. हे चक्रवात हजारो चौ. किमी. क्षेत्रफळ व्यापतात. त्यांची सरासरी त्रिज्या ३५०—२,००० किमी. इतकी असते. त्यांच्या गाभ्याभोवती वारे उत्तर गोलार्धात सव्य दिशेने, तर दक्षिण गोलार्धात ते उलट म्हणजे अपसव्य दिशेने वाहतात. साधारणपणे अपसारी चक्रवाताच्या गाभ्यात वातावरणीय दाब १,०२०—१,०३० मिलिबार इतका जास्त असतो. ज्या ठिकाणी हिवाळ्यातील रात्रीचे प्रारण दीर्घावधीचे असते अशा उत्तर ध्रुवीय प्रदेशात कधीकधी वातावरणीय दाब १,०५०—१,०८० मिलिबारची कमाल मर्यादा गाठतो. परिघाकडे जाताना क्रमाक्रमाने तो कमी होतो.

अभिसारी चक्रवातामध्ये चोहोबाजूंनी भिन्न गुणधर्मांच्या वायुराशी केंद्रप्रदेशाकडे येतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे त्यांना ऊर्ध्व गती मिळते आणि त्यांचे अभिसरण होऊन वादळी हवामान उद्‌भवते. याच्या उलट अपसारी चक्रवातात उंचीवरील हवा भूपृष्ठाच्या मध्यभागाकडे प्रतिदिवशी १०० ते ५०० मी. अशा वेगाने संथपणे खाली येते आणि तिचे अपसरण होऊन (वातचक्रातून निसटून) ती भूपृष्ठावर चोहोबाजूंना फैलावते. त्यामुळे वावटळी वारे, मेघव्याप्त आकाश व जोरदार वृष्टी ही चक्री वादळांची वैशिष्ट्ये असतात तर मंदगती वारे, नाममात्र आर्द्रता, निरभ्र आकाश आणि पर्जन्याचा अभाव ही अपसारी चक्रवाताशी निगडीत असलेल्या हवामानाची लक्षणे असतात. बऱ्याच उंचीवरील हवा खाली येणाऱ्या क्रियेस अधोगमन असे म्हणतात.

पृथ्वीवरील स्थिर स्वरूपाचे महत्त्वाचे अपसारी चक्रवात दोन्ही गोलार्धांतील महासागरांवर ३० अक्षांशाच्या जवळपास आढळतात. आकाराने ते लंबवर्तुळाकृती असून त्यांचा विस्तार त्याच अक्षवृत्तावरील महासागरांच्या रुंदीइतका असतो. त्यांतील उच्चतम दाबाचा मध्यवर्ती प्रदेश ह्या वातचक्राच्या भौमितिक केंद्राच्या थोडासा पूर्वेकडेच झुकलेला असा असतो. पृथ्वीच्या बहुतेक सर्व अक्षवृत्तांवरील हवामानाचे अंदाज वर्तविण्याच्या दृष्टीने ह्या अपसारी चक्रवातांच्या जागा आणि त्यांची तीव्रता ह्या गोष्टींना फार महत्त्व असते. त्यामुळेच पृथ्वीवरील वाऱ्यांच्या सर्वसाधारण अभिसरणाचा अभ्यास करताना ह्या मध्यवर्ती विभागांचा क्रियामध्य किंवा क्रियाकेंद्रे म्हणून उल्लेख केला जातो.

गाभ्यातील हवेच्या तापमानानुसार अपसारी चक्रवातांचे दोन प्रकार संभवतात. एक थंड व दुसरा उष्ण. हिवाळ्यात अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा वायव्य भाग व पूर्व सायबीरियासारख्या विषुववृत्तापासून अतिदूरच्या अक्षवृत्तावरील शीत भूखंडीय प्रदेशावर थंड अपसारी चक्रवात निर्माण होतात. पृथ्वीच्या पृष्ठभागातून व लगतच्या वातावरणातील थरांतून रात्रीच्या प्रारणक्रियेमुळे व उष्णता अवकाशात विलीन झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या ह्या चक्रवातांना उष्मीय अपसारी चक्रवात म्हणतात. आशियाई हिवाळी मॉन्सूनच्या हवामानाचे बरेचसे वैशिष्ट्य पूर्व सायबीरियावरील वातचक्रातून अपसृत होणाऱ्या वातप्रवाहांवरच अवलंबून असते. उन्हाळ्यात हे भूखंडीय अपसारी चक्रवात भूपृष्ठावरून नाहीसे होतात आणि त्यांची जागा भूखंडीय ऊष्मीय न्यूनदाब क्षेत्रांनी घेतली जाते. तथापि उच्चस्तरीय वातावरणात त्यांचे अस्तित्व दिसू शकते. त्या वेळी ते थोडेसे विषुववृत्ताकडे सरकलेले असतात.

सागरी अपसारी चक्रवात बव्हंशी उष्ण असतात. अशा चक्रवातांत फिरणारी हवा पृष्ठभागालगतचे काही थर सोडल्यास बव्हंशी उष्ण असते. त्यांना ‘गतिमान अपसारी चक्रवात’ असेही म्हणतात. कधीकधी वाढत्या उंचीप्रमाणे त्यांच्या वेगाची तीव्रता वाढत असली, तरी त्यांच्या तीव्रतेत बरीच स्थिरता आढळते.

थंड अपसारी चक्रवातात क्षोभावरण (ज्या थरात वाढत्या उंचीप्रमाणे तापमान कमी होते असा वातावरणातील सर्वांत खालच्या संक्षोभयुक्त थर) थंड आणि स्तरावरण (जेथे वाढत्या उंचीप्रमाणे तापमान वाढते व ज्यात संक्षोभ भिन्न तापमानाचे अनेक स्तर निर्माण झालेले असतात असे वातावरणातील क्षोभावरणाच्या नंतरचे आवरण) उष्ण असून क्षोभसीमा ६ ते ८ किमी. इतक्या कमी उंचीवर आढळते. तेथील तापमान -५० ते -६५ से. असते. उष्ण अपसारी चक्रवातात (कधीकधी पृष्ठभागाजवळील काही थरांत थंड हवा परिभ्रमण करीत असली तरी) क्षोभावरण उष्णतर असते. स्तरावरणातील खालचा भाग थंड असतो, क्षोभसीमा १२ ते १७ किमी. उंचीवर असते आणि तेथील तापमान -६५ ते -८० से. असते. अपसारी चक्रवातांच्या थंड व उष्ण अशा दोन वर्गांशिवाय एक तिसरा मिश्र स्वरूपाचा वर्ग आहे. त्यात भूपृष्ठापासून पुष्कळ उंचीपर्यंत ( थंड अपसारी चक्रवातांसारखी) थंड हवा खेळत असते, पण क्षोभसीमेचे बहुतेक स्वरूप उष्ण अपसारी चक्रवातात आढळून येणाऱ्या क्षोभसीमेसारखे असते.

थंड अपसारी चक्रवात उथळ असतात. अशा चक्रवातात जसजसे वर जावे तसतसा वातावरणीय दाब झपाट्याने कमी होत जातो. शेवटी माथ्यावरील उच्च वातावरणात न्यूनदाबाचे क्षेत्र निर्माण होते. उष्ण अपसारी चक्रवात उथळ नसतात. वातावरणात बऱ्याच उंचीपर्यंत ते आढळतात. दक्षिण गोलार्धातील सागरांवर २० ते ४० अक्षांशाच्या पट्ट्यात कायम स्वरूपाचे उष्ण अपसारी चक्रवात आढळतात. ऋतुमानाप्रमाणे त्यांची जागा थोडीशी बदलते, पण बव्हंशी ते त्याच अक्षवृत्तीय पट्ट्यात राहतात. उत्तर गोलार्धात अपसारी चक्रवात उन्हाळ्यात सागरी प्रदेशांवर तर हिवाळ्यात विस्तृत भूखंडीय प्रदेशांवर निर्माण होतात. ऋतू बदलले की, अभिसारी चक्रवाताच्या ठिकाणी अपसारी चक्रवात निर्माण होतात आणि अपसारी चक्रवातांच्या ठिकाणी अभिसारी चक्रवात निर्माण होतात. असे चक्रवात ऋतुस्थायी अभिसारी वा अपसारी चक्रवात म्हणून निर्देशिले जातात.

नेने, य. रा.

संदर्भ : 1. Byers, H. R. General Meteorology, New York, 1959.

           2. Kendrew, W. G. Climatology, Oxford, 1957.

           3. Petterssen, S. Weather Analysis and Forecasting, Vol. I, New York, 1956.