जलशुंडा : (वॉटरस्पाउट). सागर, नदी किंवा सरोवरावर निर्माण झालेल्या गडगडाटी वादळाच्या प्रभावी राशिमेघाच्या (ऊर्ध्व दिशेने राशीप्रमाणे वाढणाऱ्या मेघाच्या) तळापासून निघून जलपृष्ठापर्यंत पोहोचणारा, द्रुतगतीने परिवलन करणारा, नसराळ्यासारखा ढग किंवा जलस्तंभ ⇨घूर्णवाती वादळाशी निगडित असलेल्या शुंडामेघासारखाच (सोंड असलेल्या राशीमेघासारखाच) हाही प्रकार आहे. हा आविष्कार फक्त समुद्रावरच आढळतो. घूर्णवाती वादळात जसे मेघकण, धूलिकण व हवेचे कण वर खेचले जातात, त्याप्रमाणे पाण्याच्या पृष्ठावर निर्माण झालेल्या ह्या आविष्कारातील शुंडामेघात पाण्याचे तुषार वर खेचले जातात व पाण्याचा एक स्तंभच निर्माण होतो म्हणून त्यास जलशुंडा असे म्हणतात. जलशुं डा दोन प्रकारांनी निर्माण

जलशुंडाहोतात. (१) भूपृष्ठावर निर्माण झालेले उग्र घूर्णवाती वादळ सरकत सरकत जेव्हा जलपृष्ठावर येऊन पोहोचते तेव्हा जलशुंडा तयार होतात. अशा वेळी त्यांचा आकार, वर्तन, गुणधर्म, उत्पत्तीची कारणे आणि परिणाम घूर्णवाती वादळांच्या शुंडामेघाप्रमाणेच असतात. (२) सामान्यपणे परिचित अशा दुसऱ्या प्रकारच्या जलशुंडा आकारमानाने लहान असून उष्ण व उपोष्ण कटिबंधीय सागरी प्रदेशांवरील किंवा विस्तीर्ण सरोवरांवरील उन्हाळ्यातील ऊर्ध्व राशिमेघांच्या किंवा गर्जन्मेघांच्या (ऊर्ध्व राशीप्रमाणे वाढणाऱ्या व तसे करताना भिन्न प्रकारचे विद्युत् भार निर्माण झाल्यामुळे गर्जना करणाऱ्या मेघांच्या) तळापासून पोकळ नसराळ्याच्या आकाराचे ढगांचे जे भाग लोंबकळत बाहेर पडतात व जलपृष्ठापर्यंत पोहोचतात त्यामुळे तुरळक प्रमाणावर त्या निर्माण होतात.

शुंडामेघ किंवा जलशुंडा निर्माण होण्यास वातावरणात प्रभावी ऊर्ध्व प्रवाहास पोषक असे तीव्र ऊष्मागतिक अस्थैर्य (उष्णताजन्य गतीमुळे निर्माण होणारी अस्थिरता) अल्पशा क्षेत्रावर असावे लागते. उष्ण कटिबंधीय महासागरांवरील आर्द्रतायुक्त हवेत अशी परिस्थिती आढळत असल्यामुळे बहुसंख्य जलशुंडा उष्ण कटिबंधातच निर्माण होतात. तथापि काही जलशुंडा उच्च अक्षांशावरील सागरी प्रदेशांवर किंवा भूखंडावरील मोठ्या सरोवरांवरही उन्हाळ्यात उद्‍भवतात.

राशिमेघ किंवा गर्जन्मेघ तयार झाल्यानंतर त्याच्या तळामधून क्वचित प्रसंगीशुंडेच्या आकाराचा भाग बाहेर येऊन लोंबकळू लागतो. जेव्हा या शुंडामेघाच्या खालच्या टोकाचा भाग समुद्राच्या पृष्ठभागाजवळ येतो, तेव्हा समुद्राच्या पाण्याचा इतका खळखळाट होतो की, तेथे तुषारलेल्या पाण्याचा एक ढगच निर्माण होतो. शेवटी ह्या तुषारढगाच्या मध्यवर्ती भागापर्यंत शुंडेचे टोक येऊन पोहोचते, द्रुतगतीने परिवलन करणाऱ्या मेघ-नलिकेत समुद्राचे पाणी ओढले जाते आणि अल्पावकाशात बहुतेक संपूर्ण नलिका जलमय होते. अशा जलस्तंभाच्या नलिकेची लांबी क्वचित प्रसंगी शेकडो मी. असते. व्यास काही मी.पासून शेकडो मी.पर्यंत असतो. जलशुंडेशी निगडित असलेल्या गर्जन्मेघाची उंची ६,५०० मी.हून अधिक असते. ह्या अविष्काराचा कालावधी साधारणपणे अर्धा तास किंवा त्याहून थोडा जास्त असतो. नलिकेच्या माथ्याकडील व तळाकडील मेघवस्तूच्या व वाऱ्यांच्या परिवलनाचा वेग भिन्न असल्यामुळे जलनलिका किंवा जलस्तंभ निर्माण झाल्यानंतर काही ठिकाणी त्याला पीळ पडलेला व तो वाकलेला आढळतो. शेवटच्या अवस्थेत जलस्तंभ ढगापासून मोकळा होतो आणि लगेच समुद्रात कोसळतो. जलस्तंभाच्या आजूबाजूच्या भागांत वारे विशेष जोराने वाहू लागतात. जलपृष्ठही खवळलेल्या स्थितीत असते. समुद्रावर मिश्र व जटिल (गुंतागुंतीच्या) स्वरूपाच्या लाटा निर्माण होतात. छोटी जहाजे उलटविण्याचे किंवा बुडविण्याचे सामर्थ्य ह्या अविष्कारात असते. तथापि जमिनीवर उत्पन्न होणाऱ्या घूर्णवाती वादळांपेक्षा जलशुंडांची विध्वंसकता बरीच कमी असते. अल्प प्रमाणात राशिमेघांनी व्याप्त झालेल्या पर्जन्यविरहित हवामानाच्या दिवशी, ढगांची उंची ६,००० मी.पेक्षा अधिक नसताना सुद्धा, १५ ते ३० मी. उंचीच्या लहानशा जलशुंडा अनेकदा समुद्रावर निर्माण झालेल्या दिसतात. काही चिमुकल्या जलशुंडांचे स्वरूप उन्हाळ्यात अतितप्त भूपृष्ठामुळे निकटवर्ती थरातील हवा गरम होऊन तज्जन्य आत्यंतिक अस्थिरतेमुळे ज्या वायधुळी (धुळीचे भोवरे) निर्माण होतात त्यांच्यासारखेच असते, असे समजतात.

संदर्भ : 1. Burnett, R. W. Lehr, P. E. Zim, H. S. Weather, Golden Press, New York, 1957.

   2. Weather, Vol. 23, pp. 103–114, London, 1968.

 नेने, य. रा.