पर्जन्य : संनयनी क्रियेने (भूपृष्ठापासून ऊर्ध्व दिशेने जाण्याच्या क्रियेने) वर जाणाऱ्‍या आर्द्र हवेला सातत्याने जलबाष्पाचा पुरवठा होत असताना निर्माण झालेल्या बऱ्‍याच जाडीच्या ढगातून होणाऱ्‍या ⇨ वर्षणाचा एक प्रकार. कधीकधी हे वर्षण घनरूपात (हिमवर्षावाच्या स्वरूपात) सुद्धा होते. वातावरणात वाढत्या उंचीप्रमाणे वातावरणीय दाब कमी होत जातो व हवा विरल होत जाते. विशिष्ट तापमान ऱ्‍हासाच्या परिस्थितीत आर्द्रतायुक्त अस्थिर हवा वर जाऊ लागली, तर ती प्रसरण पावून तिचे अक्रमी शीतलन (ज्यात बाहेरून उष्णता शिरत नाही किंवा ज्यातून उष्णता बाहेर जात नाही अशा प्रक्रियेने थंड होणे) तिची सापेक्ष आर्द्रता (वातावरणाच्या एकक आकारमानातील ओलावा आणि त्या आकारमानात संतृप्तावस्था येईपर्यंत म्हणजे जास्तीत जास्त प्रमाण होईपर्यंत मावेल एवढा ओलावा यांचे गुणोत्तर) वाढते. कालांतराने विशिष्ट उंचीवर ती हवा संतृप्त बिंदू (ज्या तापमानाला हवेतील बाष्पाचे प्रमाण अधिकतम असते ते तापमान) गाठते व हवेत पुरेशा संख्येने आर्द्रताग्राही संद्रवण (द्रवीकरण) केंद्रके उपस्थित असल्यास त्यांवर जलबाष्पाचे संद्रवण होऊन मेघकण तयार होतात व मेघनिर्मिती होते. ह्या उंचीनंतर जलबाष्पाचा सारखा पुरवठा होत गेला आणि हवा वर चढतच गेली, तर तिचे तापमान कमी होत जाते, तिची जलबाष्पधारणशक्ती कमी होते तथापि ती हवा संतृप्तावस्थेतच राहते. ढग उंच वाढतच असतो त्यामुळे अतिरिक्त जलबाष्पाचे भिन्न आकारमानाच्या असंख्य जलबिंदूत किंवा हिमस्फटिकांत रूपांतर होते. ते या उंच वाढणाऱ्‍या ढगात ऊर्ध्व आणि क्षैतिज प्रवाहांबरोबर इतस्ततः भ्रमण करीत असतात. साधारणपणे उष्ण कटिबंधात १,८५० मी. पेक्षा कमी जाडी असलेल्या ढगातून पाऊस पडत नाही. ढगांची जाडी जसजशी वाढते तसतशी त्यांची वर्षणक्षमता वाढते. ३,६५० मी. पेक्षा अधिक जाडी असलेल्या ढगांतून पाऊस नक्की पडतोच. न वर्षणाऱ्‍या ढगात एका घ. सेंमी. मध्ये साधारणपणे ०.०१ मिमी. व्यासाचे शेकडो कण असतात.

अशा ह्या ऊर्ध्व दिशेने वाढणाऱ्‍या क्रियाशील ढगात सूक्ष्म मेघकणांचे किंवा हिमस्फटिकांचे मोठ्या पर्जन्यबिंदूत रूपांतर करण्यासाठी आवश्यक असणाऱ्‍या प्रक्रिया सहजगत्या उपलब्ध झालेल्या असतात. त्यांत सर्वांत प्रभावी प्रक्रिया म्हणजे जलबाष्पयुक्त हवेचे ऊर्ध्वगतीवर पाऊस किती पडेल हे अवलंबून असते, असे आधुनिक वातावरणवैज्ञानिक संशोधनान्ती सिद्ध झाले आहे. पाऊस केव्हा आणि कोठे पडेल हे प्रश्न त्या मानाने गौणच ठरतात. प्रारण (तरंगरूपी ऊर्जेच्या स्वरूपात उष्णता वाहून नेणे), संवहन (प्रत्यक्ष कणांची हालचाल न होता उष्णता एका कणाकडून दुसऱ्‍याकडे वाहून नेली जाणे) आणि संमिश्रण ह्या प्रक्रियाही ढगात सातत्याने घडतच असतात पण ऊर्ध्व प्रवाहांना न जुमानता सूक्ष्ममेघकणांपासून भूपृष्ठावर पडणाऱ्‍या मोठ्या पर्जन्य बिंदूंच्या निर्मितीच्या बाबतीत त्यांची कार्यक्षमता कमीच असते. दव, हिमतुषार (तुहिन), धुके, मंद तुषारवृष्टी यांसारखे कमी लक्षवेधी आविष्कारच ते निर्माण करू शकतात.

साधारणपणे मेघकणांचा व्यास २० μ ते ४०μ (१μ=१०–३ मिमी.) असतो. आणि त्यांचा पतनवेग (वातावरणातून खाली येण्याचा वेग) ०.०१ ते ५.०० सेंमी./से. असतो. हे कण पर्जन्यरूपाने खाली पडू शकत नाहीत. मंद तुषारवृष्टीत जलबिंदूचा व्यास साधारणपणे २००μ किंवा  ०.२ मिमी. असतो. मात्र तो ०.५ मिमी. पेक्षा अधिक नसतोच. हे कण साधारणपणे हवेच्या मंद प्रवाहांबरोबर भ्रमण करीत असताना दिसतात. पर्जन्यबिंदूचा व्यास १ ते ६ मिमी. या अभिसीमेत पण सरासरीने २ मिमी. असतो. मोठ्या पर्जन्यबिंदूचा व्यास ६०००μ (०.६ सेंमी.) एवढा असू शकतो आणि त्यांचा पतनवेग ७० सेंमी. / सेंमी./ से. ते ९ मी./ से. असा असतो. पर्जन्यबिंदू व मेघकण यांच्या वस्तुमानाचे गुणोत्तर १०:१ असे असते. पावसाच्या एका थेंबात १० लक्ष मेघकण सामाविले जाऊ शकतात. मेघकण वाढून मोठा झाला की, पाऊस पडणे शक्य होते. आर्द्रतम हवा वर जाऊ लागल्यास मेघकणही वर खेचले जातात. ते एकमेकांवर आदळू लागतात. कधीकधी ते फुटतात तर कधीकधी ते फुटतात तर कधीकधी त्यांचे संमीलन होते. अशा ‘आघात व संमीलन’ क्रियेमे परिणामी थेंबाचा आकार वाढतो. त्यांचा पतनवेगही वाढतो. हा पतनवेग ढगातील ऊर्ध्व प्रवाहाच्या वेगापेक्षा अधिक झाला की, ते थेंब पर्जन्यरूपाने खाली पडू लागतात. खाली पडताना ते थेंब लगतची हवाही ओढतात. त्यामुळे अधःप्रवाह निर्माण होतात. कधीकधी त्यांना द्रुतप्रवेगी ⇨ चंडवातांचे स्वरूप येते. काही शीत ढग हिमरेषेपेक्षा (वातावरणात ०° से. तापमान असलेल्या पातळीपेक्षा) उंच वाढतात. त्यांत बर्फकण व अतिशीतित पाण्याचे थेंब निर्माण झालेले असतात. ते समोरासमोर आले की, बर्फकणांवर अतिशीतित जलबिंदूचे आक्रमण होते. बर्फकण आकारमानाने वाढू लागतात. ते फार मोठे झाले की, खाली पडू लागतात. बर्फाच्या स्वरूपात जमिनीकडे येणाऱ्‍या घनीभूत जलबिंदूचे खालील हवेच्या अधिक तापमानामुळे पाण्यात रूपांतर होते आणि पाऊस पडू लागतो. हिमरेषेच्या खाली असलेल्या उष्णतर ढगांतील पर्जन्यबिंदू  ‘आघात व संमीलन’ क्रियेनेच मोठे होतात व पाऊस पडतो. पाऊस पडण्यास ढगांतील ऊर्ध्व प्रवाह विशेषकरून कारणीभूत होतात.


वर्षणत्वरेचा हवेच्या ऊर्ध्व दिशेने जाणाऱ्‍या वेगाशी फार निकटचा सहसंबंध आहे. ऊष्मीय दृष्ट्या अस्थिर हवेला [⟶ वातावरणीय अक्रमी प्रक्रिया] अल्पशी चालना मिळाली, तर विस्तृत प्रमाणावर गतिमान ऊर्ध्व प्रवाह निर्माण होतात. आर्द्र हवा वर नेली जाते आणि अल्पावकाशात प्रचंड राशीमेघ व अधूनमधून गर्जन्मेघ (ऊर्ध्व दिशेने राशीप्रमाणे वाढणारा व त्याच वेळी भिन्न प्रकारचे विद्युत् भार निर्माण होऊन विद्युत् विसर्जन झाल्यामुळे गर्जना करणारा मेघ) वातावरणात तयार होतात व मुसळधार पर्जन्यवृष्टीस प्रारंभ होतो. पुरेशा जलबाष्पयुक्त हवेचा व मुसळधार पर्जन्यवृष्टीस प्रारंभ होतो. पुरेशा जलबाष्पयुक्त हवेचा सतत पुरवठा झाल्यास काही तास जोरदार पावसाच्या सरीवर सरी कोसळतात.

हवेत ऊर्ध्व प्रवाह निर्माण करणाऱ्‍या घटना : अस्थिर व आर्द्र हवा अनेक परिस्थितींत वर नेली जाऊ शकते. (१) सौर प्रारणामुळे भूपृष्ठ तप्त झाल्यास निकटवर्ती थरांतील आर्द्र हवा गरम होऊन हलकी होते. त्यामुळे स्वाभाविकतः संनयनी वातप्रवाह निर्माण होऊन ती आर्द्र हवा वर जाऊ लागते. उत्तरोत्तर तिचे तापमान कमी होते व एका विशिष्ट पातळीवर तिचे संद्रवण होऊन मेघकण तयार होऊ लागतात. ह्या उंचीनंतरच्या हवेचा तापमान ऱ्‍हास १० से./किमी. अशा शुष्क अक्रमी तापमान ऱ्‍हासापेक्षा अधिक असेल [⟶ वातावरणीय अक्रमी प्रक्रिया], तर उत्तरोत्तर ऊर्ध्वगामी हवा अधिकच त्वरेने वर जाऊ लागते व अल्पावकाशात उत्तुंग गर्जन्मेघ तयार होऊन मोठ्या जलबिंदूची वृष्टी होते. असा प्रकार विशेषतः पर्वतमाथ्याजवळ पहावयास मिळतो. साधारणपणे पर्वतांच्या पायथ्याजवळ पहावयास मिळतो. साधारणपणे पर्वतांच्या पायथ्याजवळील भागांपेक्षा शिखराजवळचे भाग दिवसा अधिक तप्त होतात. अशा वेळी वाताभिमुख बाजूची आर्द्र हवा पर्वतांची चढण चढून शिखरभागांकडे गेल्यानंतर तिला तेथील तप्ततर पृष्ठभागांमुळे अधिकच वर जाण्याची प्रेरणा मिळते त्यामुळे अनेकदा डोंगरमाथ्यावर उंच वाढणारे ढग व क्वचित प्रसंगी गर्जन्मेघ निर्माण झालेले दिसतात. पर्जन्यवृष्टीही तेथेच अधिक होते. (२) आर्द्रतायुक्त हवेचे प्रवाह जेव्हा तप्ततर भूपृषृष्ठावरून किंवा तप्ततर जलपृष्ठावरून जाऊ लागतात तेव्हा खालच्या थरांतील हवा तापून हलकी होते. तिच्यात अस्थिरता येऊन उंच वाढणारे राशिमेघ किंवा गर्जन्मेघ. निर्माण झाल्यामुळे पाऊस पडू शकतो. (३) जेव्हा एखादा शीत वातप्रवाह उष्ण वातप्रवाहाला येऊन मिळतो, तेव्हा शीत वातप्रवाह वस्तुमानाने जड असल्यामुळे तो उष्णतर हलक्या हवेच्या खाली जाऊन तिला वर उचलू शकतो किंवा उष्णतर हलक्या हवेचा प्रवाह स्वाभाविकतःच जड शीत वातप्रवाहावर चढून वर जाऊ शकतो. ऊर्ध्व दिशेने जाणाऱ्‍या उष्णार्द्र हवेत ऊर्ध्व मेघनिर्मिती होते आणि अनुकूल परिस्थितीत पाऊस पडू शकतो. (४) वातावरणातील वेगवेगळ्या पातळ्यांवर उष्ण व शीत वातप्रवाहांत घडून येणाऱ्‍या परस्परक्रियांमुळे परिणामी उष्णार्द्र हवेला वर जाण्याची प्रेरणा मिळते. गतिमान उष्णार्द्र हवा शीत वातप्रवाहाच्या खाली आली किंवा गतिमान शीतशुष्क हवा उष्णार्द्र वातप्रवाहावरून वाहू लागली, तर विस्तीर्ण क्षेत्रावरील हवेत अस्थिरात येते. थरांची उलथापालथ होते, ऊर्ध्व दिशेने वाढणारे ढग तयार होतात व पर्जन्यवृष्टी होऊ लागते. (५) उष्णार्द्र हवा मार्गामध्ये आलेल्या पर्वतांची चढण चढत असताना जलबाष्पाचे संद्रवण होण्याच्या पातळीपलीकडे जाऊ लागल्यास तिच्यात ऊर्ध्व मेघ निर्माण होऊन पाऊस पडू शकतो. ह्या पर्जन्यवृष्टीला ‘पर्वतीय वृष्टी’ असे नाव दिले गेले आहे. (६) उष्णार्द्र हवेच्या प्रवाहात काही विकृती आल्यास त्यात न्यूनदाबाची क्षेत्रे निर्माण होतात. मोठ्या प्रमाणावर चोहोबाजूंकडून हवा केंद्रभागाकडे जाऊ लागते. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्यामुळे ह्या हवेला ऊर्ध्व दिशेने जाण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे संनयनी ढग निर्माण होतात व विस्तृत क्षेत्रावर पाऊस पडतो. काही तुरळक ठिकाणी गर्जन्मेघही निर्माण होतात.

वरील घटनांपैकी कोणत्याही एका घटनेमुळे किंवा अनेक घटनांच्या संयुक्त प्रभावामुळे विस्तृत प्रमाणावर आर्द्रतायुक्त हवा वर नेली जाऊन पर्जन्यवृष्टी होऊ शकते. तथापि शेवटच्या घटनेचे आगळेच महत्त्व आहे. ही न्यूनदाब क्षेत्रे समुद्रांवर निर्माण झाल्यास आर्द्रतेचा भरपूर पुरवठा होत असल्यामुळे चक्री वादळांचे किंवा उग्र अभिसारी चक्रवातांचे स्वरूप धारण करतात [⟶ चक्रवात]. ती चलनशील असतात. समुद्रावरून ती भूपृष्ठाकडे येतात व भूपृष्ठावरून आपला मार्ग आक्रमू लागतात. मार्गात आलेल्या सर्व प्रदेशांवर ती वृष्टी करतात. बहुतेक चक्री वादळे भूपृष्ठावरून आपला मार्ग आक्रमीत असताना आर्द्रतेचा पुरवठा तुटल्यामुळे शमतात. भारताला नैऋत्य मॉन्सूच्या काळात अशा अभिसारी चक्रवातांपासून बराच पाऊस मिळतो [⟶ मॉन्सून वारे].

पर्जन्याचे वितरण : चक्री वादळांत विस्तृत प्रमाणावर आर्द्र हवा वर नेली जाते. ही चक्री वादळे समुद्रांवरून किनाऱ्‍यावर येऊन थडकतात, तेव्हा अल्पावकाशात तेथे प्रचंड वृष्टी होऊन महापूर संभवतात. यानंतर भूपृष्ठावरून जातात उत्तरोत्तर ती क्षीण होतात. त्या प्रमाणात पावसाचे प्रमाणही कमी होते. यामुळे किनारपट्टीपासून दूर असलेल्या प्रदेशातपर्जन्यमान लक्षवेधी प्रमाणात कमी होत जाते. भारताच्या पूर्व किनाऱ्‍यावर अनेकदा चक्री वादळांमुळे पूर येतात. उत्तर भारतात २५ उ. अक्षवृत्ताच्या पलीकडे हिवाळ्यात अनेक उष्णोष्ण कटिबंधिय अभिसारी चक्रवात पश्चिमेकडून प्रवेश करून पूर्वेकडे किंवा ईशान्येकडे निघून जातात. त्यांत उष्ण व शीत सीमापृष्ठे निर्माण झालेली असतात. [⟶ सीमापृष्ठ]. उष्ण सीमापृष्ठावर खालील जड व शीत वायुराशीवरून उष्णार्द्र हवा वर जात असताना तीत विविध प्रकारचे स्तरमेघ निर्माण होतात व विस्तृत क्षेत्रावर मंद तुषारवृष्टी होते. शीत सीमापृष्ठावर जड शीत वायुप्रवाह हलक्या उष्णार्द्र वायुराशीच्या खाली घुसून आर्द्र हवेला वर उचलतो, त्यामुळे अल्पावकाशात गर्जन्मेघ निर्माण होऊन सीमित क्षेत्रांवर जोराचा पाऊस पडतो. उत्तर भारतातील हिवाळी पाऊस बव्हंशी या सीमापृष्ठीय अभिसारी चक्रवातांमुळेच पडतो. नैऋत्य मॉन्सूनच्या काळात अरबी समुद्रावरून येणाऱ्‍या आर्द्रतम हवेच्या मार्गात प्रलंब दिशेने सह्याद्रीच्या रांगा येत असल्यामुळे ह्या सागरी हवेला सह्याद्रीची चढण पार करून पलीकडे जाण्याशिवाय दुसरे गत्यंतर नसते. ह्यामुळे सह्याद्रीच्या वाताभिमुख बाजूला फार मोठ्या प्रमाणावर वृष्टी होते. वातविमुख बाजूला पर्जन्यछाया (अतिशय कमी वृष्टीचे क्षेत्र) निर्माण होते [⟶ पर्जन्यछाया प्रदेश]. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वर्षातून २०० ते ३५० सेंमी. पाऊस पडतो परंतु सह्याद्रीच्या पूर्वेकडील विस्तीर्ण उत्तर-दक्षिण क्षेत्रावर वार्षिक पर्जन्याचे प्रमाण अवघे ५० सेंमी. इतके अत्यल्प आहे. नैऋत्य मॉन्सून हंगामात बंगालच्या उपसागरावरून येणारे व उत्तरेकडे जाणारे आर्द्रतायुक्त वारे हिमालयाच्या पर्वतरांगांकडून अडविले जातात. त्या रांगांच्या वाताभिमुख बाजूवर अतिशय पाऊस पडतो. आसाममधील चेरापुंजी येथे वर्षातून सु. १,१४० सेंमी. पाऊस पडतो. ईशान्य भारताच्या डोंगराळ भागात पर्जन्याचे प्रमाण अधिकच असते. तेथील नद्यांना अनेकदा पूर येतात. हिवाळ्यातील उष्ण कटिबंधीय पश्चिमी चक्रवात, नैऋत्य मॉन्सूनच्या कालावधीत निर्माण होणारी न्यूनदाब क्षेत्रे, पर्वतीय दिकस्थिती यांसारख्या घटनांनी प्रचंड प्रमाणावर समुद्रवरून येणारी उष्णार्द्र हवा उचलली जाते व ईशान्य भारताच्या विस्तृत क्षेत्रावर मुबलक पाऊस पडतो. भारतात सर्वाधिक पाऊस केरळमध्ये (वार्षिक पर्जन्य सु. ३०० सेंमी.) पडतो. त्याच्या खालोखाल आसाम-मणिपूर-त्रिपुरा या विभागामध्ये (वार्षिक पर्जन्य सु. २५० सेंमी.) पाऊस पडतो. केरळमधील बहुतेक सर्व पर्जन्याला तेथील पर्वतरांगांची विशिष्ट दिकस्थिती कारणीभूत होते.


उत्तर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या दक्षिणेकडील विभागांवर न्यूनदाब क्षेत्रांच्या प्रभावामुळे निकटच्या महासागरांवरील उष्णार्द्र हवा फार मोठ्या प्रमाणात आत येते, तेथील पर्वतांची चढण चढून वर जाते व विस्तृत प्रमाणावर वृष्टी होऊन अल्पावकाशात गंभीर परस्थिती निर्माण करते.

जगातील बहुतेक खंडांत पश्चिमेच्या बाजूने उंच पर्वतरांगा निर्माण झालेल्या आहेत. महासागरांवरून भूखंडांकडे येणाऱ्‍या आर्द्रतायुक्त वाऱ्‍यांना ह्या पर्वतरांगा ओलांडून पलीकडे जावे लागते. अशा रीतीने पर्वताची चढण चढून वर जाण्याच्या आर्द्र हवेच्या क्रियेमुळे पयर्वतांच्या पश्चिम भागावर वर्षातून सु. २५० सेंमी. इतकी वृष्टी होते, तर पूर्वेकडील भागांना वर्षातून जेमतेम २५ सेंमी. इतका स्वल्प पाऊस मिळतो. साधारणपणे ज्या क्षेत्रावर अभिसारी चक्रवात अधिक संख्येने आक्रमण करतात तेथे आणि उष्ण कटिबंधातील सागरी प्रदेशांच्या जवळ जेथे पर्वतरांगा आहेत तेथील वाताभिमुख बाजूवर अत्याधिक प्रमाणात पाऊस पडतो. भूखंडीय प्रदेशांच्या मध्यवर्ती विभागांवर, उच्च शीत अक्षवृत्तीयप्रदेशांवर, पर्वतांच्या वाताभिमुख बाजूंवर पर्जन्याचे प्रमाण सर्वसाधारणपणे कमीच असते. अपसारी चक्रवात क्षेत्रात [⟶चक्रवात] वातावरणाच्या वरच्या थरांतील थंड व शुष्क हवा खाली येते व ती केंद्रापासून निघून बाहेरील क्षेत्रावर पसरते. अशा परिस्थितीत पर्जन्याचे प्रमाण अत्यल्प असते. 

जगात वर्षातून सर्वाधिक पर्जन्य (सु. १,१७० सेंमी.) हवाई बेटांतील माऊंट वाइआलेआले ह्या ठिकाणी पूर्वेकडील समुद्रावरून येणाऱ्‍या आर्द्रतायुक्त वाऱ्‍यांच्या प्रभावामुळे पडतो. आसाममधील चेरापुंजी या ठिकाणाचा दुसरा क्रमांक (सु. १,१४० सेंमी.) लागतो. साधारणपणे सर्वच खंडावर पडणाऱ्‍या वार्षिक पर्जन्याची चर मूल्ये २५ सेंमी. पेक्षा कमी व १५० सेंमी. पेक्षा अधिक अशी आहेत. उष्णोष्ण कटिबंधातील अपसारी चक्रवातांच्या मध्यवर्ती विभागांवर पाऊस अतिशय कमी असतो. जगातील मुख्य वाळवंटे व ओसाड प्रदेश याच कटिबंधात आढळतात. त्यांतील काही भागात नावालासुद्ध पाऊस पडत नाही.

यूरोप, द. अमेरिका, उ. अमेरिकेचा पूर्व भाग आणि मध्य आफ्रिका यांतील बहुतेक भागांत वर्षातून ५० सेंमी. पेक्षा अधिक पर्जन्य पडतो. आशिया खंडात भारत, तिबेट आणि चीन हे भाग वगळल्यास, इतरत्र वार्षिक पर्जन्यमान ५० सेंमी. हून बरेच कमी असते. अरेबियापासून ते ईशान्य मंगोलियापर्यंत पट्ट्यात वर्षातून २५ सेंमी. पेक्षाही कमी पाऊस पडतो. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाचा मध्यवर्ती भाग, आफ्रिका खंडाच्या उत्तरेकडचा बहुतेक सर्व भाग व नैऋत्य आफ्रिकेचा काही भाग, उ. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पर्वतीय प्रदेशांमधील काही भाग, द. अमेरिकेच्या पश्चिमेकडील मध्य किनारपट्टीचा व दक्षिणेकडील पूर्व किनारपट्टीचा काही भाग यांसारख्या क्षेत्रांत प्रतिवर्षी २५ सेंमी. पेक्षाही कमी पाऊस पडतो. विषुववृत्त व १० उ. या अक्षवृत्तांमधील आफ्रिकेच्या पश्चिमी किनारपट्टीचा काही भाग, भारताची पश्चिम किनारपट्टी, आसामधील काही भाग, ब्रम्हदेशाची किनारपट्टी, समशीतोष्ण कटिबंधातील उत्तर व दक्षिण अमेरिकेची पश्चिमेकडची वाताभिमुख डोंगरी किनारपट्टी, उष्ण कटिबंधातील काही तुरळक ठिकाणे यांसारख्या क्षेत्रांवर प्रतिवर्षी सरासरीने २५० सेंमी. पेक्षा अधिक पाऊस पडतो. अतिशय उंचीच्या प्रदेशांवर तापमान कमी व जलबाष्पधारणशक्ती खूपच कमी असल्यामुळे पाऊस अत्यल्प प्रमाणात पडतो. पर्जन्याची त्वरा (किंवा तीव्रता) वातावरणातून ऊर्ध्व दिशेने जाणाऱ्‍या आर्द्रतायुक्त हवेच्या वेगावर अवलंबून असते. जितका हा वेग जास्त तितकी पाऊस पडण्याची तीव्रता अधिक. काही किमी. च्या सीमित क्षेत्रावरील १ ते २ तासांच्या कालावधीच्या गडगडाटी वादळात किंवा पावसाच्या जोरदार सरीत हा ऊर्ध्व वेग १० मी./से. असतो, तर ३,००० किमी. चे विशाल ऊर्ध्व वेग प्रती सेकंदास ५ ते १० सेंमी., एका तासात १० सेंमी. किंवा एका दिवसात ५० सेंमी. यांसारखी पर्जन्यत्वरा आढळण्याची संभाव्यता कमी आहे. तथापि प्रत्यक्षात कधीकधी यांच्या दुप्पटीपे्क्षा अधिक त्वरेने पाऊस पडल्याची उदाहरणे आहेत.

कोष्टक क्र.१. भारतातील निरनिराळ्या राज्यांतील वार्षिकपर्जन्यमान (सेंमी.) 

राज्य

वार्षिक पर्जन्यमान

राज्य

वार्षिक पर्जन्यमान

राज्य

वार्षिक पर्जन्यमान

आसाम (त्रिपुरा- मणिपूरसहित)

२५२.००

पंजाब (दिल्लीसहित)

६२.५०

महाराष्ट्र

१३१.५०

पश्चिम बंगाल

१६४.५०

जम्मू आणि काश्मीर

९९.५०

आंध्र प्रदेश

८८.००

ओरिसा

१४८.००

मध्यप्रदेश

१२१.५०

कर्नाटक

१३५.५०

बिहार

१२७.००

राजस्थान

५८.५०

तामिळनाडू

१०१.००

उत्तर प्रदेश

९८.५०

गुजरात

८३.५०

केरळ

२९९.५०

पृथ्वीच्या. २९% भूपृष्ठावरीलवरील वार्षिक पर्जन्यमान सु.६७ सेंमी. आहे. उर्वरित ७१% जलाच्छादित भागावरील वार्षिक सरासरी १००.४ सेंमी. आहे.

जागतिक भूपृष्ठावरील ६७ सेंमी. या वार्षिक सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेने भारतातील ११० सेंमी.हे वार्षिक सरासरी पर्जन्यमान बरेच जास्त आहे. तथापि प्रादेशिक सरासरी पर्जन्यमान याहून फार वेगळ आहे. एकीकडे पश्चिम राजस्थानसारख्या सु. ३१ सेंमी. इतक्या कमी सरासरी वार्षिक पर्जन्यमान असणाऱ्‍या प्रदेशापासून तो आसाम (सरासरी वार्षिक पर्जन्यमान सु. २५० सेंमी.) व केरळ (सरासरी वार्षिक पर्जन्यमान सु. ३०० सेंमी.) सारखे अतिपर्जन्ययुक्त प्रदेश भारतात आहेत. कोष्टक क्र. १ मध्ये भारताच्या विविध राज्यांतील वार्षिक पर्जन्यमानाचे सरासरी आकडे दिले आहेत. त्यावरून भारतीवरील पर्जन्य वितरणास भूतलस्वरूप, पर्वतांचे दिकस्थापन, अभिसारी व अपसारी चक्रवात, सामापृष्ठे इ. घटक कसे कारणीभूत होतात हे कळू शकते.

पावसाचे प्रमाण दरवर्षी सारखेच असते असे नाही. एखाद्या वर्षी राजस्थानसारख्या कमी पावसाच्या प्रदेशावर ते सरासरीच्यादुपटीहून जास्त तर कधी त्याच्या एक तृतीयांशाहूनही कमी भरते. पुष्कळदा पाऊस अस्थानी व अवेळी पडतो. त्यामुळे अवर्षण किंवा महापूर यासारखी नैसर्गिक आपत्ती नेहमी कोठेतरी उदभवते. एक सर्वसाधारण नियम म्हणून असे सांगता येईल की, पावसाचे सरासरी मान जितके कमी तितके प्रत्यक्ष पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा फार कमी किंवा फार जास्त असण्याचे प्रसंग अधिक असतात.

शास्त्रज्ञांच्या अंदाजाप्रमाणे पृथ्वीवर पाणी प्रचंड प्रमाणात व विविध स्वरूपांत उपलब्ध आहे. केवळ जमिनीवर पडणाऱ्‍या पावसाच्या पाण्याचे जगातील सध्याच्या ३६० कोटी लोकांत वाटप केले, तर दररोज ७४,२५० लि. पाणी प्रत्येकाच्या वाट्याला येईल. पाण्याच्या उपलब्धतेच्या दृष्टीने पर्जन्य हा फार महत्त्वाचा वातावरणीय आविष्कार आहे पावसाचे सर्वच पाणी माणसांना पाहिजे तसे मिळविता येत नाही. अनेक प्रकारांनी ते वाया जाते अधूनमधून दुष्काळी परिस्थिती वा अवर्षण उदभवतेच. अशा समस्या सोडविण्यासाठी पावसाचे पाणी साठविणे, भूमिअंतर्गत पाण्याचा शोध घेणे, बाष्पीभवनाची त्वरा मंदावणे, समुद्राच्या खाऱ्‍या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणे, मेघबीजन करून कृत्रिम पर्जन्य पाडणे [⟶ हवामानाचे रूपांतरण] इ. उपायांचा अवलंब करावा लागतो [⟶जलविज्ञान जलसंधारण].

कोष्टक क्र. २ मध्ये जगातील दहा प्रमुख शहरी पडणाऱ्‍या मासिक व वार्षिक पर्जन्यमानाचे किंवा हिमवर्षावाचे सरासरी आकडे दिले आहेत. कोष्टकाच्या खाली पर्जन्यमानाच्या किंवा हिमवर्षावाच्या दिवसांची संख्याही दिली आहे.

अंतरकर, व. ना.


पर्जन्यवृष्टिस्फोट : अल्पावधीत एकाएकी पडणाऱ्‍या स्थानिक स्वरूपाच्या मुसळधार पावसाला पर्जन्यवृष्टिस्फोट म्हणतात. असा वृष्टिस्फोट सामान्यतः ⇨गडगडाटी वादळांशी निगडित असतो. गडगडाटी वादळांतील काही गर्जन्मेघांत उष्णार्द्र हलकी हवा अतिद्रुतगतीने वर जात असते. संद्रवणामुळे पर्जन्यबिंदूंची संख्या व त्यांचे आकारमान जरी वाढत जात असले, तरी १० मी./से. यासारख्या वेगाच्या प्रबल ऊर्ध्वगामी वातप्रवाहामुळे ते जलबिंदू भूपृष्ठावर पडू शकत नाहीत. त्यामुळे गर्जन्मेघाच्या उच्चतर भागात फार मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते व ते जोरदार ऊर्ध्व वातप्रवाहामुळे उच्च पातळीवरील वातावरणात तोलून धरले जाते. काही अनपेक्षित घटनांमुळे पाणी तोलून धरणारे हे ऊर्ध्व प्रवाह विशिष्ट परिस्थितीत एकदम क्षीण झाले, तर गर्जन्मेघाच्या उच्च भागात जमा झालेले सर्व पाणी अत्यल्प कालावधीत जमिनीवर कोसळते. मुख्यत्वेकरून पर्वतरांगांनी व्याप्त असलेल्या डोंगराळ भागात असे अल्पकालीन पर्जन्यवृष्टिस्फोट घडून येतात. उष्णार्द्र हवेचे प्रवाह मार्गात आलेल्या डोंगराच्या चढणीवरून वर जाताना तप्त डोंगरमाथ्यावर येतात. तेव्हा एकाएकी हवेला ऊर्ध्व दिशेने जाण्याची चालना मिळते. अत्युच्च पातळीपर्यंत गर्जन्मेघ वाढतो. तोही वातप्रवाहाबरोबर हळूहळू जाऊ लागतो. डोंगरमाथा पार करून तो गर्जन्मेघ दुसऱ्‍या बाजूला येतो तेव्हा ऊर्ध्व प्रवाह नसतात. उच्च पातळीवर पाणी तोलून धरणारे ऊर्ध्व प्रवाह नामशेष किंवा दुर्बल झाल्यामुळे एकाएकी मेघ कोसळू लागतो. अल्पावकाशात उंच पातळीवर जमा झालेले पाणी मुसळधार वृष्टीच्या स्वरूपाने खाली येते. हे सर्व पाणी मुसळधार वृष्टीच्या स्वरूपाने खाली येते. हे सर्व पाणी पर्वतांच्या उतरणीवरून घसरून खाली दऱ्‍याखोऱ्‍यांत जमा होते व अल्पावकाशात प्रलयकारी महापूर येतात. वृष्टिस्फोटात पाऊस पडण्याची त्वरा ताशी १० सेंमी. पेक्षा अधिक असते. एका ढगात ३,००,००० टनांपर्यंत पाणी असू शकते.

कोष्टक क्र. २. जगातील काही शहरांचे मासिक व वार्षीक सरासरी पर्जन्यमान किंवा हिमवर्षाव (सेंमी) 

 

लंडन 

पॅरिस 

बर्लिन 

रोम 

मॉस्को 

टोकिओ 

मुंबई 

न्युयॉर्क 

केपटाउन 

सिडनी 

जानेवारी 

४.८२६ 

३.८१ 

४.८२६ 

९.१४४ 

४.०६४ 

५.८४२ 

०.२५४ 

८.८९ 

१.७७८ 

९.९०६ 

फेब्रुवारी 

४.०६४ 

३.४७ 

३.३०२ 

६.८५८ 

३.५५६ 

७.६२ 

०.२५४ 

७.८७४ 

१.५२४ 

८.१२८ 

मार्च 

४.०६४ 

४.०६४ 

३.८१ 

७.८६४ 

३.५५६ 

१०.९२२ 

० 

९.१४४ 

२.०३२ 

११.१७६ 

एप्रिल 

४.०६४ 

४.३१८ 

४.०६४ 

७.८७४ 

३.५५६ 

१३.४६२ 

० 

८.१२८ 

४.८२६ 

१४.२२४ 

मे 

४.५७२ 

५.३३४ 

४.८२६ 

६.०९६ 

४.८२६ 

१४.९८६ 

१.५२४ 

८.८९ 

९.३९८ 

१२.७ 

जून 

५.०८ 

५.८४२ 

५.८४२ 

४.५७२ 

६.३५ 

१७.२७२ 

५०.२९२ 

९.३९८ 

११.१७६ 

९.३९८ 

जुलै 

५.५८८ 

५.५८८ 

८.१२८ 

२.०३२ 

७.८७४ 

१४.२२४ 

६०.७०६ 

१०.६६८ 

९.१४४ 

१२.४४६ 

ऑगस्ट 

५.५८८ 

५.५८८ 

५.५८८ 

२.५४ 

७.११२ 

१८.०३४ 

३५.८१४ 

१०.९२२

८.३८२

६.०९६

सप्टेंबर

४.८२६

५.०८

४.८२६

७.६२

६.०९६

२५.६५४

२६.९२४

९.३९८

५.८४२

७.११२

ऑक्टोबर

६.६०४

५.८४२

४.३१८

१३.४६२

६.३५

२०.०६६

५.३३४

७.६२

४.०६४

७.११२

नोव्हेंबर

५.८४२

४.५७२

४.३१८

११.४३

४.५७२

८.८९

१.२७

७.८७४

२.५४

६.३५

डिसेंबर

५.८४२

४.३१८

४.८२६

१०.४१४

४.०६४

५.५८८

०.२५४

७.८७४

२.०३२

९.१४४

वार्षिक पर्जन्यमान

६०.९६

५७.४०४

५८.६७४

८९.९१६

६१.९७६

१६२.५६

१८२.६२६

१०६.६८

६२.७३८

११३.७९२

पर्जन्यदिन

१६४

१७३

१७१

१०६

१८४

१४८

७५

१२६

९७

१४३

हिमवर्षाव दिन

१३

१२

३२

९१

१६

१६


पॉर्टोबेलो (पनामा) येथे २९ नोव्हेंबर १९११ रोजी स्वयंचलित पर्जन्यमापकाने ३ मिनिटांत ६.२७ सेंमी. यासारख्या वृष्टिस्फोटाची नोंद केली. ५ एप्रिल १९२६ रोजी कॅलिफोर्नियातील सन गाब्रीएल पर्वतरांगांतील ओपिडस् कँप येथे १ मिनिटात २.५९ सेंमी. इतक्या तीव्रतम पावसाची नोंद केली गेली. ४ जुलै १९५६ रोजी उ. अमेरिकेतील मिसूरी राज्यातील यून्यनव्हिल येथे १ मिनिटात ३.१२ सेंमी. तसेच जमेकामधील प्लंब पॉईंट येथे १२ मे १९१६ रोजी १५ मिनिटांत १९.८१ सेंमी. सारखी द्रुततम त्वरेची वृष्टी झाल्याची नोंद आहे. काही ठिकाणी भूपृष्ठावर पडलेल्या खळग्यांवरून आणि खुणांवरून याहीपेक्षा तीव्रतर वृष्टिस्फोट झाल्याची उदाहरणे आहेत.  

पर्जन्यमापक : पावसाचे पाणी मोजणाऱ्‍या या उपकरणाचे दोन प्रमुख भाग असतात : एक ठराविक व्यासाचे नसराळे व दुसरा भाग म्हणजे त्यातून पडणारे पाणी साठविण्याकरिता योग्य आकारमानाचे भांडे. या उपकरणाच्या साहाय्याने पाऊस मोजताना दोन गोष्टी गृहीत धराव्या लागतात : (१) नसराळ्याच्या मुखाच्या एकक क्षेत्रफळावर पावसाचे जितके पाणी पडते तितकेच पाणी आजूबाजूच्या भूपृष्ठाच्या एकक क्षेत्रफळावरही पडते (२) बाष्पीभवन, जमिनीत मुरणे किंवा वाहून जाणे यांसारख्या क्रियांनी पावसाचे पाणी कमी होऊ न देता सपाट भूपृष्ठावर साठविल्यास पाऊस पडलेल्या क्षेत्रफळावर पाण्याची जी उंची होईल तितका पर्जन्य त्या क्षेत्रावर झाला, असे मानावयाचे. ही उंची पूर्वी इंचांत मोजण्यात येत असे, आता ती सेंमी. मध्ये मोजतात.

आ. १. दैनंदिन पर्जन्यमापक : (१) नसराळे, (२) नरसाळ्याचे तोंड, (३) पावसाचे पाणी साठविण्याची बाटली, (४) आतील दंडगोलाकार भांडे, (५) जमीन, (६) चबुतरा.

दैनंदिन पर्जन्यमापक : सर्व ठिकाणच्या दैनंदिन पर्जन्यमापात एकसूत्रता आणून त्यांची तुलना करणे सोपे जावे म्हणून जो प्रमाणित पर्जन्यमापक बहुतेक सर्वत्र वापरतात, तो आ. १ मध्ये दाखविला आहे. पर्जन्यमापकातील नसराळ्याच्या मुखाचा व्यास १२७ मिमी. (५ इंच) असून त्याच्या काठाची उंची ११० मिमी. (४ १/२ इंच) असते. पाऊस पडताना वारा नसल्यास पावसाचे थेंब उदग्र (उभ्या) दिशेने नसराळ्यात पडतात पण पाऊस पडताना वारा असल्यास पावसाचे थेंब तिरप्या दिशेने येऊन नसराळ्यात पडतात. अशा परिस्थितीत पावसाचे पाणी नरसाळ्याबाहेर जाऊ नये म्हणून नसळ्याचा काठ आकृतीत दाखविल्याप्रमाणे धारदार आणि उंच केलेला असतो. नसराळ्याच्या मुखावर पडणारे पावसाचे पाणी अरुंद नळीवाटे खाली येऊन एका दंडगोलाकार भांड्यात किंवा काचेच्या बाटलीत जमा होते. बाष्पीभवनाने पावसाचे पाणी कमी होऊ नये म्हणून नसराळ्याच्या नळीचा व्यास खूपच लहान केलेला असतो. आकृतीत दाखविल्याप्रमाणे पर्जन्य मापकाचा काही भाग जमिनीत पुरलेला असतो. जमिनीच्यावर जो दंडगोलाचा भाग राहतो त्यावर नसराळे बसविलेले असते. पर्जन्य मापकाची वरची कडा जमिनीपासून बरोबर ३०.५ सेंमी. (१२ इंच) उंचीवर असते. बाह्य दंडगोलाच्या आत एक काढता येईल व परत ठेवता येईल असा दुसरा एक दंडगोल असून त्यात नरसाळ्याच्या नळीतून पडणारे पाणी साठविण्यासाठी एक काचेची बाटली ठेवलेली असते. क्वचित प्रसंगी अतिवृष्टी झाल्यामुळे बाटली भरून गेल्यास जास्त असलेले पाणी बाटलीच्या बाहेरील दुसऱ्‍या दंडगोलाकृती भांड्यात जमा होते व त्याचेही मापन करता येते. पर्जन्यमापकातील पाणी मोजण्यासाठी उष्णतेने कमीतकमी प्रसरण पावणाऱ्‍या काचेचे एक चंचुमुखी मोजपात्र वापरतात. त्यावर सेंमी. व मिमी.च्या खुणा असून नसराळ्याचा व्यासही लिहिलेला असतो. नसराळ्याच्या मुखाचा व्यास व चंचुमुखी मोजपात्राचा व्यास यांचे गुणोत्तर साधे असणे आवश्यक असते. साधारणपणे मोजपात्राच्या मुखाचा व्यास नसराळ्याच्या मुखाच्या व्यासाच्या १/३ असतो. मोजपात्र दंडगोलाकृती असते. तळ सपाट असतो. कधीकधी मोजपात्राच्या तळाकडील बाजू निमुळती म्हणजे व्यास कमी होत जाणारी अशी केलेली असते. अशा रचनेमुळे पाऊस थोडा पडल्यास पर्जन्यमापकात जमलेले पाणी अधिक अचूकतेने मोजता येते. पाणी मोजताना त्याच्या पातळीची खालची कडा पाहून उंचीची नोंद करावयाची असते. चंचुपात्राऐवजी पाणी न शोषणाऱ्‍या लाकडाची अंशांकित पट्टीही बाटलीतील पाण्यात बुडवून उंची मोजता येते.

दैनिक पर्जन्यमापकातील पाणी दररोज एकदा ठराविक वेळी (भारतीय प्रमाणित वेळेप्रमाणे सकाळी ८.३० वाजता) मोजतात. काही ठिकाणी अशी निरीक्षणे दिवसातून अनेकदा करतात. याचप्रमाणे साप्ताहिक व मासिक पर्जन्यमापके केलेली असून त्यातील पाणी जमा करावयाची दंडगोलाकृती भांडी अधिक मोठ्या आकारमानाची असतात. दुर्गम प्रदेशात अशी मापके वापरतात. पावसाच्या पाण्याचे अधिक अचूकपणे मापन करावयाचे झाल्यास दंडगोलीय भांड्यासह पाण्याचे वजन करतात व त्यावरून पर्जन्य किती झाला ते निश्चित करतात. या पद्धतीत पाणी एका भांड्यातून मोजपात्रात ओतताना सांडपाण्याचा व भांड्यांना चिकटून राहिलेले पाणी मोजले न जाण्याचा संभव राहत नाही. 

ह्या प्रकारची पर्जन्यमापक उपकरणे हिमवर्षाव किंवा गारांचा वर्षाव होत असतानाही वापरण्यात येतात. नसराळ्याच्या वरच्या काठाची उंची ११० मिमी. असल्यामुळे त्यात बऱ्‍याचशा गारा किंवा बरेचसे हिम जमा होऊ शकते. वितळल्यानंतर त्यांचे पाण्यात रूपांतर होते. ते वर्षण म्हणून या उपकरणांच्या साहाय्याने मोजले जाऊ शकते. ३०.५ सेंमी. (१ फूट) जाडीचा हिमस्तर साधारणपणे २.५४ सेंमी. (१ इंच) द्रवरूप पाण्याच्या वर्षाइतका असतो, असे मानण्यात येते. कोणत्याही पर्जन्यमापनात ०.१ मिमी. ची अचूकता आवश्यक असते. हिमवर्षावाच्या बाबतीत ती १ मिमी. पर्यंत असली पाहिजे. पावसाळासंपला असला, तरी पर्जन्यमापकाची निरीक्षणे दररोज ठराविक वेळी केलीच पाहिजेत. पुष्कळ ठिकाणी वर्षातून अनेकदा दव पडते. कधी-कधी अल्पतम पर्जन्याइतकेच ते दव मोजण्याइतपत असते.

जगात सर्व ठिकाणच्या पर्जन्यमापनात एकसूत्रता असणे आवश्यक असते. त्या दृष्टीने पर्जन्यमापक ज्या ठिकाणी बसवायचा त्या ठिकणच्या योग्य प्रातिनिधिक पर्जन्याचे प्रमाण कळावे म्हणून व वर्षाणाशिवाय अन्य कारणांनी पर्जन्यमापकात जमा होणाऱ्‍या पाण्यात भर किंवा घट होऊ नये म्हणून विशेष दक्षता घ्यावी लागते. पर्जन्यमापकाच्या आजूबाजूची जमीन सपाट असावी. पावसाचे थेंब जमिनीवर पडल्यानंतर ते परावर्तित होऊन किंवा फुटून त्यांचे तुषार पर्जन्यमापकात जातील इतकी ती जमीन कठीणही नसावी. पर्जन्यमापकाच्या नसराळ्याचे तोंड ठिक क्षैतिज (आडव्या) पातळीत असावे. वारा व उसळलेले पाणी यांचा परिणाम होऊ नये म्हणून पर्जन्यमापकाच्या मुखाची वरची कडा सपाट जमिनीपासून ३०.५ सेंमी. उंचीवर असावी. असमंतातील घरे व झाडे यांच्या उंचीच्या चौपट अंतराच्या आत पर्जन्यमापक बसवू नये. प्रत्येक ठिकाणी वाहणाऱ्‍या जोराच्या वाऱ्‍यापासून तो संरक्षित असावा. पर्जन्यामापक बसवू नये. प्रत्येक ठिकाणी वाहणाऱ्‍या जोराच्या वाऱ्‍यापासून तो संरक्षित असावा. पर्जन्यामापक कधीही उतार असलेल्या जमिनीवर, इमारतींच्या गच्चीवर, भिंतीवर किंवा छपरावर बसवू नये. पर्वतीय प्रदेश, किनारपट्टीवरील ठिकाणे, पाणथळ रान किंवा ओसाड प्रदेश यांसारख्या ठिकाणी पर्जन्यामापक ठेवणे अटळ असल्यास प्रचलित वाऱ्‍यांच्या वेगवान प्रवाहापासून त्याचे संरक्षण करणे आवश्यक असते. अशा वेळी ३ मी. व्यास व ३०.५ सेंमी. खोली असलेल्या वर्तुळाकार, खोलगट व सपाट गवताळ जमिनीचे क्षेत्र तयार करतात आणि त्याच्या ठीक मध्यभागी पर्जन्यामापकाच्या नसराळ्याचे वरचे तोंड गवताळ जमिनीपासून ३०.५ सेंमी. उंचीवर राहील अशा राहील अशा रीतीने पर्जन्यामापक बसवितात (आ. २). या खोलगट गवताळ जागेच्या भिंतीचा आतील भाग संपूर्णतया उदग्र राहावा म्हणून भिंतीच्या आतील भागास लाकडी फळ्या ठोकलेल्या असतात. भिंतीच्या आतील भागास लाकडी फळ्या ठोकलेल्या असतात. भितीची जाडी १५ सेंमी. (६ इंच) असते आणि तिच्या बाह्य बाजूच्या जमिनीला १: ४ असा उतार दिलेला असतो. ह्या खोलगट जागेत पावसाचे पाणी अधिक प्रमाणात साचले असल्यास ते काढून टाकण्यासाठी निष्कांची (पाण्याचा निचरा करणाऱ्‍या नलिकांची) सोय केलेली असते. अशा रीतीने पर्जन्यामापकाची स्थापना केल्यास द्रुतगती वाऱ्‍यांमुळे पर्जन्यामापकाच्या सान्निध्यातील पावसाचे थेंब इतस्ततः उधळले न जाता पडलेल्या पावसाचे यथायोग्य मापन होते.


आ. २. वेगवान वाऱ्‍यांच्या क्षेत्रात पर्जन्यामापकाच्या स्थापनेसाठी तयार केलेली खोलगट वर्तुळाकार गवताळ जागा : (१) पर्जन्यामापक, (२) क्षैतिज प्रतल, (अ–आ) संरक्षक फळांची उभी वर्तुळाकार भिंत, (आ–इ) १५ सेंमी. जोडीच्या भिंतीचा क्षैतिज भाग, (इ–ई) भिंतीचा उतस्ता भाग (उतार १:४).

पर्जन्यामापकाच्य़ा नसराळ्याचा वरच्या कडेचा व्यास सर्व देशांतील वेधशाळांत १२७ मिमी. (५ इंच) असतो असे नाही. उ. अमेरिकेच्या संयुत्त्क संस्थानांतील वातावरणवैज्ञानिक वेधशाळांतील पर्जन्यामापकांत तो २०३.२ मिमी. (८ इंच), कॅनडात ९०.२ मिमी. (३,५७ इंच), ब्रिटन, भारत इ. देशांत १२७ मिमी. असतो.

आ. ३. स्वयंलेखी पर्जन्यामापक : (१) नसाराळे, (२) पाणी आत येण्याची नलिका, (३) लेखणीधारक, (४) घड्याळाच्या यंत्रणेप्रमाणे फिरणारा दंडगोल व त्यावरील आलेखपत्र, (५) तरंगणारा बंद डबा व लेखणीधारकाला जोडलेला त्यावरील दंड, (६) वक्रनलिका कक्ष, (७) काचेचे झाकण, (८) निष्कास नलिका.

स्वयंलेखी पर्जन्यामापक : जेव्हा वर्षणाचे अखंडित अभिलेखन करणे आवश्यक असते तेव्हा स्वयंलेखी पर्जन्यामापक वापरतात. अशा उपकरणांच्या साहाय्यने गेल्या २४ तासांतील कोणत्याही क्षणापर्यंत किती पाऊस पडला हे तर कळतेच पण कोणत्याही क्षणी पर्जन्यत्वरा किती होती हेही कळते. याशिवाय पाऊस केव्हा सुरू झाला आणि केव्हा संपला हेही या उपकरणाच्या साहाय्याने मिळविलेल्या आलेखाच्या अभ्यासावरून कळून येते. 

स्वयंलेखी पर्जन्यामापकात (आ. ३) २०.३२ सेंमी. (८ इंच) व्यासाच्या नसराळ्यातून पडणारे पावसाचे पाणी ज्या भांड्यात जाते त्यात धातूचा एक असतो. जसजसे पाणी जमेल तसतसा तो डबा पाण्याच्या पाचळीबरोबर वर उचलला जातो. एका ठराविक उंचीवर पाण्याची पातळी पोहचताच एका वक्रनलिकेमुळे पाणी बाहेर वाहून जाते, भांडे रिकामे होते आणि तो तरंगणारा बंद डबा पुन्हा पूर्वस्थितीत खाली येतो. या तरंगणाऱ्‍या डब्यास एक लेखणी जोडून ती घडाळ्याच्या यंत्रणेप्रमाणे फिरणाऱ्‍या दंडगोलावर गुंडाळलेल्या आलेखपत्रावर टेकलेली असते. पावसाचे पाणी जमून जसजशी भांड्यातील पाण्याची उंची वाढते तसतसा तरंगणारा बंद डबाही वर जातो. त्याप्रमाणे तरंगणाऱ्‍या डब्याच्या उंचीची आलेखपत्रावर अविरतपणे नोंद होत असते. साधारणपणे १ सेंमी. पावसाचे पाणी भांड्यात जमल्यानंतर वक्रनलिकेतून सर्व पाणी निघून जाते व तरंगणारा डबा पुन्हा भांड्याच्या तळाशी येतो. दीर्घकालपर्यंत जोराची वृष्टी होत असल्यास प्रत्येक वेळी १ सेंमी. पाऊस झाला की, भांडे रिकामे होते व तरंगणारा डबा खाली येतो. असा प्रकार अनेकदा होऊ शकतो. तरंगणाऱ्‍या डब्याच्या सर्व हालचाली आलेखपत्रावर नोंदल्या जातात. त्यामुळे पाऊस कितीही पडला, तरी त्याची अचूकपणे नोंद होते. त्याचप्रमाणे छोट्या कालखंडात किती पाऊस पडला हे आलेखावरून चटकन कळून येत असल्यामुळे कोणत्याही वेळेची पर्जन्यतीव्रता त्यावरून समजू शकते.

स्वयंलेखी पर्जन्यमापकांचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. काही उपकरणांत पावसाचे पाणी ज्या भांड्यात जमा होते ते भांडे एका तराजूवर ठेवलेले असते. तराजूच्या काट्याला एक लेखणी जोडलेली असते. पाऊस जसजसा पडू लागतो तसतसे भांड्यातील पाण्याचे वजन वाढू लागते व ते अविरतपणे आलेखपत्रावर नोंदले जाते. कोणत्याही वेळेची पर्जन्यवृष्टीची तीव्रता प्रत्यक्ष दाखविणारी उपकरणेही सध्या अनेक ठिकाणी वापरात आहेत. काही विद्युत् दूरवर्तीमापक उपकरणांच्या साहाय्याने दूर अंतरावर पडलेल्या पावसाच्या नोंदी वेधशाळांच्या कार्यालयात दिसू शकतात.  

पर्जन्यमापके एकूण पावसाचा अत्यल्प भाग मोजतात. विस्तृत क्षेत्रावर पडणाऱ्‍या पावसाचे पाणी तुरळक ठिकाणी ठेवलेल्या केवळ १२७ मिमी. किंवा २०३.२ मिमी. व्यास असलेल्या नसराळ्याच्या पर्जन्यमापकांकरवी मोजल्यामुळे त्या क्षेत्रावरील नक्त पर्जन्यवृष्टीची अनुक्रमे कितपत प्रातिनिधिक असतील, याबद्दल वातावरणविज्ञ साशंक आहेत. पाऊस सर्वत्र सारख्या प्रमाणात पडत नाही. गडगडाटी वादळांचा पाऊस अत्यंत सीमित क्षेत्रावर पडतो. ३० किमी. च्या अंतरावर असलेल्या दोन पर्जन्यमापकांच्या मधल्या भागात जर गडगडाटी पाऊस पडला, तर दोन्ही पर्जन्यमापकांत त्या पावसाची नोंद असू शकणारा नाही. अशा परिस्थितीत दैनंदिन, मासिक व वार्षिक पर्जन्यमूल्यांवर कितपत अवलंबून रहावे, याबद्दल अनिश्चितता उदभवते. तथापि पर्जन्यमापकांची संख्या वाढवून त्यांचे जाळे तयार केले, तर कोणत्याही क्षेत्रावरील पर्जन्याचे प्रातिनिधिक मूल्य मिळू शकेल, यात शंका नाही. अधिक अचूकतेसाठी ३ ते १० सेंमी. तरंगलांबीचे तरंग प्रेषित करणारे रडार वापरतात [⟶ रडार]. ही उपकरणे ३५० किमी. अंतरापर्यंत पर्जन्यबिंदूचे आकारमान व ढगांच्या एकक आकारमानातील पर्जन्यबिंदूंचे आकारमान व ढगांच्या एकक आकारमानातील पर्जन्यबिंदूंची संख्या अत्यंत अचूकपणे मोजू शकतात. त्यामुळे अशा उपकरणांच्या साहाय्याने विस्तृत प्रदेशावर पडणाऱ्‍या पावसाची विश्वसनीय अनुमाने करता येतात.

पहा : मेघ हवामानाचे रूपांतरण.

नेने, य. रा. चोरघडे, शं. ल.

संदर्भ :1. Her Majesty’s Stationery Office, Handbook of Meteorological Instruments, part I, London, 1956.

    2. Kendrew, W. G. Climates of the Continents, Ocford, 1961.

    3. U.S. Department of Agriculture, Climate and Man, Washington, 1941.