वातावरणीय दाबमापक : वातावरणातील हवेचा दाब मोजण्यासाठी वापरण्यात येणारे उपकरण.

इतिहास : वातावरणात हवा सर्व बाजूंनी दाबत असली पाहिजे, ही कल्पना बीकमन व बॉलिऑनी यांना सतराव्या शतकाच्या सुरुवातीस प्रथम सुचली परंतु हवेचा दाब मोजण्यासाठी पाऱ्याच्या स्तंभाचा उपयोग करण्याची कल्पना इव्हांजेलिस्ता टोरिचेल्ली यांना १६४३ मध्ये सुचली. अशा रीतीने त्यांना पाऱ्याच्या दाबमापकाचे तत्त्व शोधण्याचे श्रेय मिळाले. पाऱ्याचे दाबमापक तयार करून त्यांनी त्यांच्या कल्पनेला मूर्त रूप दिले.

आ. १. दाबमापकाचे तत्त्वदाबमापकाचे तत्त्व : पृथ्वीपृष्ठावर क्षैतिज पातळीत एक एकक क्षेत्रफळावर पृथ्वीपासून वातावरणाच्या सीमेपर्यंत असलेल्या हवेच्या स्तंभाचा जो दाब असतो, त्यास पृथ्वीपृष्ठावरील वातावरणीय दाब असे म्हणतात. एखाद्या द्रव पदार्थाच्या स्तंभाचा दाब वातावरणीय स्तंभाच्या दाबाइतकाच असेल, तर द्रवीय स्तंभाची उंची वातावरणीय स्तंभाच्या उंचीच्या मानाने नगण्य राहील. कारण वातावरणातील हवेची घनता उंचीबरोबर कमी होत जाते व द्रवाची घनता हवेच्या घनतेच्या कमीत कमी हजारपट असते. हवेच्या स्तंभाच्या दाबाचे संतुलन द्रवाच्या स्तंभाच्या दाबाने करता आले, तर द्रवाच्या स्तंभाची उंची मोजून हवेच्या दाबाचे मापन करता येऊ शकते. द्रवाच्या स्तंभाची उंची बरीच कमी होण्यासाठी बऱ्याच जास्त घनतेचा पाऱ्यासारखा द्रव वापरणे आवश्यक आहे. एका काचेच्या भांड्यात पारा घेऊन एक तोंड बंद केलेल्या एका काचेच्या १ मी. लांबीच्या नळीत उघड्या तोंडातून पारा पूर्णपणे भरतात. त्यानंतर उघड्या तोंडावर बोट ठेवून नळी उलटी करतात. बोटासकट नळीचे तोंड भांड्यातील पाऱ्याच्या पातळीच्या खाली नेऊन बोट हळूहळू नळीच्या तोंडावरून काढून घेतात. असे करताना नळीचे तोंड नेहमी पाऱ्याच्या पातळीच्या खाली ठेवतात. कारण तसे केले नाही, तर हवा नळीत शिरण्याची शक्यता असते. नळीच्या तोंडावरून बोट काढल्यावर नळीतील पाऱ्याच्या स्तंभाची उंची कमी होऊन लवकरच ती स्थिर होते. तसे झाल्यावर नळी उदग्र (उभ्या) स्थितीत ठेवून एका पकडीत बसवतात (आ.१). नळीतील पाऱ्याच्या पृष्ठाच्या वरचा भाग निर्वात असतो, याला टोरिचेलियन निर्वात म्हणतात. वातावरणीय दाब भांड्यातील पाऱ्याच्या पृष्ठावर पडत असून त्याचे संतुलन नळीतील वाऱ्याच्या स्तंभाने होते. भांड्यातील पाऱ्याचे पृष्ठ आणि नळीतील पाऱ्याचे पृष्ठ यांतील उंचीचा फरक h सेंमी. आहे. त्यामुळे वातावरणीय दाब = पाऱ्याच्या h सेंमी. उंचीच्या स्तंभाचा दाब = h x १३.६ x g डाइन/सेंमी. येतो. (येथे १३.६ ग्रॅ./सेंमी. ही पाऱ्याची घनता g आणि पृथ्वीच्या गुरुत्वीय प्रवेगाचे मूल्य आहे). त्या ठिकाणी g चे मूल्य असेल ते वापरतात. समुद्रपृष्ठावर h चे मूल्य साधारपणपणे ७६ सेंमी. असते. पाऱ्याऐवजी पाणी वापरल्यास पाण्याच्या स्तंभाची उंची ७६ x १३.६ म्हणजे अंदाजे १०३३.६ सेंमी. अथवा १०.३३६ मी. येईल. कारण पाण्याची घनता १ ग्रॅ./सेंमी. आहे. पृथ्वीपृष्ठापासून जसजसे वर जावे तसतसे हवेच्या स्तंभाची उंची कमी होत जाते. त्यामुळे वाढत्या उंचीबरोबर हवेचा दाब कमी होत जातो.

दाबमापकात पाऱ्याचा उपयोग करण्याची मुख्य कारण याप्रमाणे आहेत : (१) पाऱ्याची उच्च घनता, (२) वातावरणात आढळणाऱ्या तापमानाला पाऱ्याच्या वाफेचा दाब फार कमी असतो, (३) पारा सहज स्वच्छ आणि शुद्ध करता येतो, (४) पारा नळीला चिकटत नाही आणि (५) नळीतील पाऱ्याचा पृष्ठभाग बहिर्वक्र असल्यामुळे पाऱ्याच्या स्तंभाच्या उंचीचे मापन अचूकतेने होऊ शकते.

दाबमापकाचे मुख्य प्रकार : दाबमापकाचे मुख्य प्रकार पुढील आहेत. पाऱ्याचा, दोन द्रव पदार्थ असलेला, निर्द्रव, हिस्पोमीटर व वायुदाबलेखक.


 आ. २. क्यू पद्धतीची दाबमापक : (अ) पूर्ण दाबमापक : (१) प्रकाशक दिवा, (२) स्विच (आ) दाबमापकाचे कुंड : (१) कुंड, (२) जोडकडे, (३) कुंडाचा वरचा भाग घट्ट करणारा भाग, (४) पकड, (५) काचेची नळी (इ) काचेची नळी : (१) सापळा, (२) रुंद भाग.पाऱ्याचे दाबमापक : यांमध्ये खाली दिल्याप्रमाणे प्रकार आहेत. (अ) कुंड असलेला दाबमापक : याचे तीन उपप्रकार आहेत : (१) कुंडातील पाऱ्याची पातळी वर-खाली करून् मोजपट्टीच्या शून्यावर आणण्याची सोय असलेला, (२) मोजपट्टी सरकवून कुंडातील पाऱ्याच्या पातळीवर मोजपट्टीचा शून्य आणण्याची सोय असलेला व (३) मोजपट्टी आणि कुंड दोनही स्थिर असणारा.

(आ) वक्रनलिका दाबमापक : यात पाऱ्याच्या दोनही पृष्ठांचे क्षेत्रफळ सारखेच असते.

(इ) वजन दाबमापक : यांचे दोन उपप्रकार आहेत : (१) नळीच्या वरच्या भागावर वातावरणाच्या पडणाऱ्या दाबाच्या वजनाने संतुलन करून दाबाचे मापन करणारा व (२) कुंडातील पाऱ्याचे वजन केले जाऊन वातावरणाचा दाब मोजणारा.

दोन द्रव पदार्थ असलेले दाबमापक : यात पाऱ्याशिवाय आणखी एक द्रव असतो. दुसऱ्या द्रवाची घनता पाऱ्याच्या घनतेपेक्षा कमी असते आणि तो पाऱ्याच्या वर असतो. त्यामुळे दाब थोडा जरी वाढला किंवा कमी झाला, तरी हलक्या द्रवाची उंची बरीच जास्त किंवा बरची कमी होते.

निर्द्रव दाबमापक : यात कोणताही द्रव नसतो. यात पन्हळ पाडलेल्या पातळ पत्र्याच्या चपट्या डबीचा उपयोग करतात. डबीतील जवळजवळ सर्व हवा काढून घेतलेली असते. डबीची खालची बाजू जोडून पक्की केलेली असते. डबीची वरची बाजू बदलत्या दाबामुळे वर-खाली होते.

हिप्सोमीटर : द्रवाचा उकळबिंदू द्रवाच्या पृष्ठावर असलेल्या वातावरणाच्या दाबावर अवलंबून असतो, या तत्त्वावर याचे कार्य चालते. यात उकळबिंदूचे मापन करून त्यावरून हवेचा दाब निश्चित केला जातो.

नोंद करणारा दाबमापक : यास वायुदाबलेखक असेही म्हणतात. यामध्ये दोन उपप्रकार असतात. पहिल्यात पाऱ्याच्या दाबमापकाचा तर दुसऱ्यात निर्द्रव दाबमापकाचा उपयोग केला जातो.

वर निर्देशिलेल्या प्रकारांपैकी क्यू व फोर्टिन हे कुंडाचे दाबमापक, निर्द्रव दाबमापक आणि नोंद करणारा वायुदाबलेखक सर्वसाधारणपणे वापरले जातात. त्यामुळे ह्या दाबमापकांची अधिक माहिती खाली दिली आहे.


क्यू पद्धतीचा दाबमापक : हल्ली बहुतेक वातावरणीय वेधशाळांमध्ये ह्या पद्धतीचे दाबमापक वापरले जातात. ह्याचा मुख्य फायदा म्हणजे कुंडातील पाऱ्याची पातळी वरखाली करून मोजपट्टीच्या शून्यावर आणावी लागत नाही किंवा मोजपट्टी वरखाली करून कुंडातील पाऱ्याच्या पातळीवर आणावी लागत नाही. त्यामुळे कुंड आणि मोजपट्टी दोनही स्थिर ठेवली जातात. आ. २ मध्ये क्यू पद्धतीचा दाबमापक दाखविला आहे. याचे कुंड अगंज (स्टेनलेस) पोलादाचे असते. कुंड आणि नळीचा वरचा भाग दोनही बरोबर दंडगोलाकार असतात. कुंड आणि नळी अनुक्रमे आ. २ (आ) व (इ) दाखविली आहेत. आ. २ (आ) मध्ये कुंड (१) दाखविले असून अर्ध्या उंचीवर जोडकडे (२) बसविलेले आहे. दाबमापक उचलून दुसरीकडे नेताना पाऱ्याचे हिंदकळणे जोडकड्यामुळे बरेच कमी होते. (३) ह्या भागात कुंडाचा वरचा भाग घट्ट बसविलेला असतो (३) च्या वरच्या भागात एक पितळेची नळी असते. ह्या नळीच्या वरच्या टोकाला दाबमापक लटकविण्याची व्यवस्था केलेली असते. दाबमापकाची काचेची नळी (५) पकडीत (४) बसविली असून पितळेच्या नळीच्या आत असते. अशा रीतीने नळी कुंडाला घट्ट लावलेली असते. लाकडाच्या छिद्रांतून बाहेरील वातावरणाच्या कुंडातील हवेशी संपर्क येतो. नळीचा वरचा भाग [आ. २ (इ) (२)] सोडल्यास बाकीचा भाग अरुंद (सु. २ मिमी. व्यासाचा) असतो. अरुंद भागात हवेकरिता एक सापळा [आ.२ (इ) (१)] असतो, त्यामुळे हवा नळीच्या वरच्या रुंद भागात जाऊ शकत नाही. कुंडाचे घनफळ स्थिर असते. त्यामुळे कुंडातील पाऱ्याच्या पातळीची वाढ झाली म्हणजे नळीतील पाऱ्याची पातळी कमी होते आणि कुंडातील पाऱ्याची पातळी कमी झाली म्हणजे नळीतील पाऱ्याच्या पातळीत वाढ होते. समजा, नळीतील पाऱ्याच्या पातळीवर क्षेत्रफळ न आहे, कुंडातील पाऱ्याच्या पातळीवरील क्षेत्रफळ उणे पाऱ्यात बुडलेल्या नळीच्या टोकाचे क्षेत्रफळ क आहे. समजा, नळीतील पाऱ्याची पातळी क्ष सेंमी.ने वाढली, त्यामुळे कुंडातील पाऱ्याची पातळी क्ष x न/ क. सेंमी.ने कमी होईल. तदनुरूप

हवेच्या दाबातील वाढ क्ष + 

क्षन 

=   क्ष 

(

क+ न 

)

 

 

होईल. हवेचा दाब जर १ सेंमी. ने वाढला तर नळीतील पाऱ्याची  पातळी

क्ष

सेंमी.ने. म्हणजे क/(क + न) सेमी.ने वाढेल.

[(क्ष(क+न)/क]

त्यामुळे दाबमापन पट्टीवर सेंमी.च्या खुणांऐवजी क/(क+न) या एककाच्या खुणा केलेले असतात. नळीतील सर्व पारा कुंडात आला, तर त्या वेळी कुंडातील पाऱ्याची जी पातळी राहील ती म्हणजे मोजपट्टीची शून्य पातळी असते. दाबमापकास एक व्हर्नियर (लघुभागमापक) आणि एक तापमापक जोडलेला असतो. व्हर्नियर वरील खुणांच्या साहाय्याने हवेचा दाब मिमी. किंवा मिलिबारमध्ये पहिल्या दशांश स्थळापर्यंत मोजता येते. क्यू दाबमापकाच्या पट्टीवरील खुणा इतर दाबमापकांशी तुलना करून ठरविल्या जातात, दाबाचे मापन केल्याबरोबर जोडलेल्या तापमापकाने दर्शविलेल्या तापमानाची नोंद केली जाते.

जहाजावर बहुधा क्यू दाबमापक वापरतात. जहाजाच्या हलण्यामुळे नळीतील पारा हलतो. त्यामुळे दाबाचे मापन करताना चूक होते. यासाठी दाबमापकाच्या मधल्या भागाचे वेज अगदी बारीक करतात. त्यामुळे जहाजाच्या हलण्यामुळे पारा फारसा वर-खाली होत नाही.


आ. ३. फोर्टिन दाबमापकाचे कुंड.फोर्टिन दाबमापक : क्यू दाबमापक आणि फोर्टिन दाबमापक यांत मुख्य फरक म्हणजे फोर्टिन दाबमापकात मोजपट्टी स्थिर असून तिची सुरुवात एका ठराविक पातळीपासून होते. ही पातळी हस्तिदंताच्या एका बारीक टोकाने निश्चित केलेली असते. कुंडातील पाऱ्याची पातळी वरखाली करून हस्तिदंताच्या बारीक टोकाच्या पातळीत आणतात. त्यानंतरच दाबाचे मापन मोजपट्टीवर करता येते. हस्तिदंताचे बारीक टोक व त्याचे पाऱ्याच्या पृष्ठावरील प्रतिबिंब ही दोन्ही एकास एक लागून असली म्हणजे कुंडातील पाऱ्याची पातळी मोजपट्टीच्या शून्यावर आहे, याची खात्री होते. मोजपट्टीवरील आकडे साधारणपणे मिमी. किंवा मिलिबार एककात दर्शविलेले असतात. फोर्टिन दाबमापकाचे कुंड आ. ३ मध्ये दाखविले आहे. आकृतीत दाखविलेल्या स्क्रूच्या (१) साहाय्याने कुंडातील पाऱ्याची पातळी वर-खाली करता येते. हस्तिदंताचे टोक (२) म्हणजे मोजपट्टीचे शून्य, चामड्याची पिशवी वा पाऱ्याचे कुंड (३) तसेच (४, ५ व ६) ह्या पेटीच्या लाकडाच्या तीन जुळवणी, काचेची चिती (७), पारा असलेली दाबमापकाची काचेची नळी (८) आणि बाहेरची पितळेची नळी (९) आहे. पितळी नळीमुळे दाबमापक सुरक्षित राहतो. तिच्यावर दाबमापकाची मोजपट्टी आखलेली असते, तसेच वर-खाली होणारा दर्शक आणि व्हर्नियर त्यावर बसविलेला असतो. तिलाच एक तापमापक जोडलेला असतो आणि तिच्या वरच्या बाजूस दाबमापक लटकविण्याची सोय असते. यात दाब व तापमान एका पाठोपाठ नोंदतात.

आ. ४. निर्द्रव दाबमापक : (१) तबकडी, (२) दर्शक काटा, (३) रीळ, (४) साखळी, (५) तरफ, (६) निर्द्रव डबी.निर्द्रव दाबमापक : या दाबमापकाचा शोध ल्यूसँव्हिदी यांनी सु. सव्वादोनशे वर्षांपूर्वी लावला. यात कोणताही द्रव नसतो (आ.४). पन्हळ पाडलेल्या धातूच्या लवचिक पत्र्याची एक चपटी डबी या दाबमापकात असते. डबीतील हवा पूर्णपणे अथवा काही प्रमाणात काढलेली असते. एका मजबूत स्प्रिंगमुळे डबी सपाट होऊ शकत नाही. हवेचा दाब वाढला म्हणजे डबी चपटी होते आणि हवेचा दाब कमी झाला म्हणजे डबी फुगते. डबीची खालची बाजू वेष्टनाच्या तळाशी जोडलेली असते. त्यामुळे ती बाजू स्थिर असते. डबीची वरची बाजू दाबाच्या प्रमाणांत आत-बाहेर वाकते. वरच्या बाजूला एक तरफ, साखळी व रीळ यांच्या साहाय्याने एक दर्शक काटा (सुई) जोडलेला असतो. दर्शक काटा एका वर्तुळाकार तबकडीवर फिरतो आणि हवेचा दाब दर्शवितो. हा दाबमापक वेळोवेळी पाऱ्याच्या दाबमापकाशी तुलना करून बरोबर करून घेतात. आकारमानाने लहान, किंमतीने कमी, सहज हलविता येण्याजोगा आणि दाबाचे मापन करण्यास सोपा असा असल्यामुळे या दाबमापकाचा बराच वापर केला जातो.

वायुदाबलेखक : वातावरणीय दाबात होणारे बदल कधीकधी फार महत्त्वाचे असतात. काही बदल ठराविक वातावरणीय आविष्कारांत अभ्यासासाठी हवामान खात्याला अविरतपणे वातावरणीय दाबाच्या चढउताराच्या नोंदीची गरज असते. अशी अखंड नोंद करणाऱ्या उपकरणाला वायुदाबलेखक किंवा दाबलेखक असे म्हणतात. 

यात साधारणपणे निर्द्रव दाबमापक वापरतात. डबीची आतबाहेर होणारी वरची बाजू तरफेच्या साहाय्याने एका लेखणीला जोडलेली असे. एका दंडगोलाच्याभोवती एक चार्ट (आलेखन पत्र वा कागद) गुंडाळून लेखणी त्यावर टेकेल अशी व्यवस्था केलेली असते. साधारणपणे एका दिवसाला एक किंवा आठवड्याला एक फेरी पूर्ण होईल इतक्या वेगाने हा दंडगोल घडाळ्याच्या यंत्राने गोल फिरविला जातो. आलेखावर बदललेल्या वातावरणीय दाबाचे लेखणीच्या साहाय्याने आलेखन होते. त्यावर दिवसाच्या तासांच्या खुणा असतात, तसेच निरनिराळ्या मूल्यांच्या समदाब रेषा असतात. दाबाच्या अखंड नोंदीत किती त्रुटी आहे हे माहीत करून घेण्यासाठी वेळोवेळी पाऱ्याच्या दाबमापकाने घेतलेल्या दाबाशी अखंड दाबाच्या आलेखनातील दाबाची तुलना केली जाते. ह्या त्रुटींची आलेखन पत्राच्या मागे नोंद केली जाते. 


निर्द्रव दाबमापकाऐवजी पाऱ्याच्या दाबमापकाचाही उपयोग अखंड नोंदीसाठी केला जातो. नळीतील पाऱ्याच्या पातळीचे फिरत्या ब्रोमाइड कागदावर लागोपाठ छायांकन केले जाते. अशा प्रकारचा दाबलेखक रोनाल्ड यांनी १८४७ मध्ये प्रथम तयार केला. विल्यम हेन्री डाइन्स यांनी १९१० मध्ये तयार केलेल्या दाबलेखकात वक्रनलिका पद्धतीचा पाऱ्याचा दाबमापक वापरलेला असतो. दाबात चढ-उतार होतो. त्याप्रमाणे वक्रनलिकेच्या उघड्या नळीतील पारा वर-खाली होतो. त्याचबरोबर त्याच्यावर तरंगणारा एक तरंड वर-खाली होतो. तरंडाची ही गती तरफांच्या साहाय्याने विवर्धित (मोठी) करून एका लेखणीला दिली जाते. लेखणीने फिरत्या दंडगोलाकार लावलेल्या आलेखावर दाबाची अखंड नोंद होते. 

वातावरणीय दाबाची एकके : बऱ्याच पूर्वी मोजपट्टीवर इंच किंवा मिमी. एककाच्या खुणा असत आणि हवेचा दाब इंच किंवा मिमी.मध्ये मापण्यात येत असे पण हल्ली मिलिबार ह्या एककाच्या खुणा मोजपट्टीवर असतात. प्रमाण तापमान आणि प्रमाण गुरुत्वीय प्रवेग मूल्य असताना वातावरणीय दाबाने तोलल्या गेलेल्या पाऱ्याच्या स्तंभाची उंची जर म मिमी. असेल, तर वातावरणाचा दाब प्रमाण स्थितीत पाऱ्याच्या स्तंभाच्या म मिमी. उंचीएवढा आहे, असे म्हटले जात असे. दाबाच्या एककात हा दाब म × घ × g डाइन/सेंमी. आहे (येथे घ पाऱ्याची प्रमाणित तापमानाला असलेली घनता आणि g प्रमाणित गुरुत्वीय प्रवेग मूल्य आहे). प्रमाण स्थितीत पाऱ्याच्या स्तंभाची उंची ७६० मिमी. = १०१३.२ मिलिबार पाऱ्याच्या स्तंभाचा १ मिमी. = १.३३३ मिलिबार १ मिलिबार=०.७५० मिमी. पाऱ्याचा स्तंभ. १ बार= १००० मिलिबार = १० डाइन/सेंमी.. ब्लेझ पास्काल या फ्रेंच शास्त्राज्ञांच्या सन्मानार्थ पास्काल हे एकक वापरण्यास सुरुवात झाली आहे. १ मिलिबार = १०० पास्काल = १ हेक्टोपास्काल १ पास्काल=१० मिलिबार= १० डाइन/सेंमी..

मापलेल्या दाबातील त्रुटी आणि आवश्यक असलेल्या शुद्धी : पाऱ्याचे दाबमापक सर्वांत जास्त अचूक असतात. त्यामुळे त्यांचा उपयोग प्रमाणित दाबमापक म्हणून केला जातो. प्रत्येक देशात काही प्रमाणित दाबमापक जतन करून ठेवलेले असतात. भारतीय हवामान खात्याची एकंदर पाच क्षेत्रे आहेत. प्रत्येक क्षेत्रीय केंद्रात प्रमाणित दाबमापक जतन केले जातात. राष्ट्रीय प्रमाणित दाबमापकांशी तुलना करून वेळोवेळी ह्यांची निर्देश त्रुटी निश्चित केली जाते. निर्देश त्रुटी म्हणजे दाबमापक तयार करताना काही कारणांमुळे त्यात राहिलेली त्रुटी होय. निरनिराळ्या वेधशाळांतील दाबमापकांची क्षेत्रीय प्रमाणित दाबमापकांशी वेळोवेळी तुलना करून त्यांच्या त्रुटी निश्चित केल्या जातात. दाबमापकावर मोजलेल्या दाबास सर्वांत प्रथम निर्देश त्रुटी लावली जाते. प्रत्येक दाबमापकाच्या त्रुटीदर्शक कार्डावर निर्देशित त्रुटी लिहिलेली असते. त्यानंतर तीन प्रकारच्या त्रुटींकरिता पुढे दिल्याप्रमाणे शुद्धी लावावी लागते : (१) एका ठराविक प्रमाण तापमानाकरिता (२८५के.) दाबमापकावरील मोजपट्टीच्या खुणा आणि पाऱ्याच्या स्तंभाची उंची अचूक असतात. तापमान त्यापासून निराळे असले म्हणजे पारा व मोजपट्टी यांच्या आकुंचन वा प्रसरणाने उद्‍‌भवणाऱ्या त्रुटींकरिता शुद्धी लावावी लागते. (२) अक्षांश ४५ च्या समुद्रसपाटीवर असलेले गुरुत्वीय प्रवेगाचे मूल्य (g) प्रमाणित धरले आहे. निरनिराळ्या ठिकाणांची समुद्रसपाटीपासूची उंची निरनिराळी असते तसेच अक्षांशही निरनिराळे असतात. ह्या दोनही कारणांमुळे बदलणाऱ्या g करिता शुद्धी लावणे आवश्यक असते. (३) निरनिराळ्या ठिकाणांच्या दाबांची तुलना करून नकाशावर समदाबरेषा काढण्यासाठी प्रत्येक ठिकाणी वातावरणीय दाब समुद्रसपाटीवर किती राहील हे काढण्यासाठी शुद्धी लावणे आवश्यक असते. प्रत्येक ठिकाणासाठी आणि प्रत्येक दाबमापकासाठी (१) व (२) या त्रुटींकरिता शुद्धी एकत्र करून त्याकरिता एक कोष्टक केलेले असते. तिसऱ्या त्रुटीची शुद्धी लावण्याकरिता एका हवेच्या स्तंभाची कल्पना केली जाते. हा स्तंभ म्हणजे त्या ठिकाणच्या जमिनीच्या पृष्ठापासून खाली समुद्रसपाटीपर्यंतचा हवेचा स्तंभ. जमिनीच्या पृष्ठावर जे तापमान आहे ते संपूर्ण स्तंभाचे सरासरी तापमान आहे असे समजून त्या स्तंभामुळे किती दाब पडेल याचे संगणन करतात. हा दाब (१) व (२) या त्रुटींकरिता शुद्धी लावल्यावर प्राप्त झालेल्या वातावरणीय दाबात मिळवितात म्हणजे समुद्रसपाटीवरील दाब मिळतो. तिसऱ्या त्रुटीकरिता शुद्धी लावण्यासाठी प्रत्येक ठिकाणी एक कोष्टक केलेले असते. हे कोष्टक वापरून ही शुद्धी लावण्यात येते. 


दाबमापकाचे उपयोग : अनेक शास्त्रीय प्रयोगांत वातावरणीय दाबाचे मूल्य आवश्यक असते त्यामुळे प्रत्येक प्रयोगशाळेत दाबमापक असतो. 

 

विमानतळावरील हवामान कार्यालयात प्रत्येक अर्ध्या तासाने निरीक्षणे घेऊन ती विमान वाहतूक नियंत्रण केंद्राकडे पाठवितात. ह्यांतील हवेच्या दाबाची निरीक्षणे घेण्यासाठी निर्द्रव दाबमापकाचा फार उपयोग होतो.

  

समुद्रसपाटीपासून वाढत्या उंचीबरोबर हवेचा दाब कमी होतो. हवेचा दाब मोजून समुद्रसपाटीपासून उंची मोजता येते. अशा रीतीने निर्द्रव दाबमापकाने उंची मोजता येते आणि दाबमापकाचा उच्चतामापक म्हणून उपयोग करता येतो. विमानात अशा प्रकारे उच्चतेचे (उंचीचे) मापन केले जाते. गिर्यारोहकही दाबमापक वापरून उंचीचे असे मापन करतात. कधीकधी हवेच्या दाबात होणारे बदल ठराविक आविष्कारांशी निगडित असतात. उदा., गडगडाटी वादळाच्या थोडे आधी हवेचा दाब कमी झालेला असतो आणि गडगडाटी वादळ सुरू झाल्यावर चंडवात होतो तेव्हा दाब झपाट्याने वाढतो. चक्री वादळ जर एखाद्या ठिकाणाजवळून जात असेल, तर ते सर्वांत जवळ येईपर्यंत हवेचा दाब झपाट्याने कमी होतो. त्यानंतर त्या ठिकाणापासून चक्री वादळ जसे दूर जाते त्याप्रमाणे हवेचा दाब झपाट्याने वाढतो. घूर्णवाती वादळातही हवेच्या दाबात ठराविक प्रकारचे बदल झपाट्याने होतात. साधारणपणे कमी दाबाच्या क्षेत्रावर हवा ढगाळ असते आणि उच्च दाबाच्या क्षेत्रावर हवा स्वच्छ असते. अशा रीतीने हे आविष्कार शोधण्यासाठी अथवा त्यांचे पूर्वानुमान करण्यासाठी या निरीक्षणांचा उपयोग होऊ शकतो. [⟶ हवामानाचा अंदाज व पूर्वकथन].

पहा : वातावरणविज्ञानीय उपकरणे.

संदर्भ : Middleton, W. E. K. Spilhans, A. F. Meteorological Instruments, Toronto, 1953.

 

भट, नलिनी मुळे, दि. आ.