प्रशांत मंडल : ज्या क्षेत्रात हवेची हालचाल जवळजवळ किंवा संपूर्णपणे थांबून वारा वाहण्याचे बंद झाले असेल असे शांत क्षेत्र. अशी क्षेत्रे भूपृष्ठावर, तसेच मुक्त सागरी प्रदेशावरही निर्माण होतात. त्यांत वारा वाहत असलाच, तर त्याचा वेग ताशी १·६ किमी. पेक्षा अधिक नसतो.

एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी ब्रिटिश नाविक अधिकारी फ्रान्सिस बोफर्ट यांनी वाऱ्यामुळे भूपृष्ठावर किंवा सागरपृष्ठावर होणाऱ्या विविध परिणामांच्या निरीक्षणांवरून वायुवेगांची कल्पना करता यावी या दृष्टीने ० पासून १२ पर्यंत अशा तेरा क्रमांकांचा ‘बोफर्ट मापक्रम’ प्रचारात आणला. यानुसार प्रशांत मंडलात वाऱ्यांचा वेग दाखविण्यासाठी शून्य हा अंक योजिला जातो. अशा परिस्थितीत धुरांड्यातून निघालेला धूर सरळ ऊर्ध्व दिशेने जातो. सागरपृष्ठ आरशासारखे वा काचेसारखे दिसते.

प्रशांत मंडले विषुववृत्तीय निर्वात पट्ट्यात आढळतात. त्यातील उष्ण-आर्द्र हवा सूर्याच्या उष्णतेमुळे अधिक उष्ण होऊन मुख्यत्वेकरून ऊर्ध्व दिशेनेच जात असते. त्यामुळे अनेकदा गडगडाटी वादळे निर्माण होतात. प्रशांत मंडलातील पवनविरहित उष्ण व कुंद वातावरणामुळे असह्य त्रास होतो.

उपोष्ण कटिबंधातही प्रशांत मंडले आढळतात. ३०° उ. व ३०° द. या अक्षवृत्तांच्या जवळपास उच्च दाबाचे पट्टे निर्माण झालेले असतात. त्यांतील हवा उच्चतर वातावरणातून खाली आल्यामुळे शुष्क व उष्ण असते. आकाश निरभ्र असते. हवेला क्षैतिज गती बहुतेक नसतेच. अशी परिस्थिती असलेल्या उपोष्ण कटिबंधातील उच्च दाबाच्या पट्ट्यांना ⇨ अश्व अक्षांश असे म्हणतात. त्यांना ‘उपोष्ण कटिबंधीय प्रशांत मंडले’ अशीही संज्ञा देण्यात आलेली आहे.

संदर्भ : Donn, W. L. Meteorology with Marine Applications, New York, 1951.

नेने, य. रा. चोरघडे, शं. ल.