दव : वातावरणाला उघडे असलेले भूपृष्ठ किंवा भूपृष्ठलगतची वनस्पतींची पाने, धातूचे पत्रे यांसारख्या पदार्थांचे पृष्ठभाग निरभ्र रात्री लगतच्या हवेपेक्षा बरेच थंड झाले की, या लगतच्या हवेतील जलबाष्पाचे संद्रवण (द्रवात रूपांतर) होऊन असंख्य जलबिंदू अशा पृष्ठभागांवर साचतात, त्यांना दव म्हणतात. अतिमंद वारा अथवा वाऱ्याचा अभाव, हवेत भरपूर आर्द्रता व दीर्घ रात्र अशी परिस्थिती दवनिर्मितीला अनुकूल असते. अशा वातावरणीय परिस्थितीत उघड्या पडलेल्या पृष्ठभागांपासून प्रारणाद्वारे (तरंगरूपी ऊर्जेद्वारे) उष्णता अवकाशात जाते व ते पृष्ठभाग त्वरेने थंड होऊ लागतात. पृष्ठभागाच्या खालील भागापासून संवहन क्रियेने उष्णतेचा पुरवठा होत नसल्यास पृष्ठभाग अल्पावधीतच थंड होतात. झाडांची पाने, धातूच्या वस्तू ह्या उष्णतेचे हवेपेक्षा चांगले प्रारण करू शकतात. यामुळे त्या निरभ्र रात्री लगतच्या हवेपेक्षा खूपच थंड होतात. हवा आर्द्र असल्यास तिच्यातील जलबाष्प ह्या शीत पृष्ठभागांवर दवाच्या रूपाने साचू लागते.

हवेतील एकूण आर्द्रतेवर तिचा संतृप्तबिंदू (ज्या तापमानाला हवेतील जलबाष्पाचे प्रमाण अधिकतम असते ते तापमान) अवलंबून असतो. हवेचा दाब व तिच्यातील जलांश स्थिर राहून हवा थंड झाल्यास तिची सापेक्ष आर्द्रता [⟶ आर्द्रता]वाढते. ज्या तापमानास ती जलबाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास दवांक, दवबिंदू किंवा दवबिंदुतापमान म्हणतात. यापेक्षा हवा अधिक थंड झाल्यास जलबाष्पाचे संद्रवण होऊन दव व धुके निर्माण होतात. हवेचे तापमान दवांकाच्या खाली गेल्यास थंड वस्तूंच्या पृष्ठभागांवर दव जमा होते. ह्या पृष्ठभागांचे तापमान हिमांकाच्या (पाण्याच्या गोठणबिंदूच्या) खाली गेल्यास जलबिंदू गोठतात व हिम–दव (किंवा हिमतुषार) पडू लागते. ज्या तापमानास हवा हिमतुषारांच्या दृष्टीने संतृप्त होते त्याला हिमतुषारांक म्हणतात.

दवांक व हिमतुषारांक साध्या प्रयोगाने मोजता येतात. याकरिता एक चकचकीत धातूचा सपाट पत्रा हवेत ठेवून तो क्रमाक्रमाने थंड करतात. ज्या तापमानास त्या पत्र्यावर दवामुळे पाणी किंवा हिमतुषारांमुळे हिमकण जमून तो अस्पष्ट किंवा ढगाळलेला दिसू लागतो त्या तापमानावरून दवांक किंवा हिमतुषारांक निश्चित करतात. वातावरण वैज्ञानिक वेधशाळांत शुष्क व ओल्या तापमापकांच्या साह्याने एकाच वेळी निरीक्षणे करून विशिष्ट कोष्टकांच्या मदतीने दवांक व हिमतुषारांक काढतात [⟶ आर्द्रता].

दीर्घकालपर्यंत दव पडत राहणे जलबाष्पाच्या विसरण क्रियेवर (एकमेकांत आपोआप मिसळले जाण्याच्या क्रियेवर) अवलंबून असते. वनस्पतींनी आच्छादिलेल्या जमिनीवरून ऊर्ध्व (वरच्या) दिशेने होणाऱ्या जलबिंदूंच्या विसरणाच्या बाबतीत दोन घटना संभवतात. (१) जमीन लगतच्या हवेपेक्षा थंड असल्यामुळे जलबाष्पाचे प्रमाण उंचीप्रमाणे कमी होत गेलेले असते. अशा वेळी विसरण क्रियेने जलबाष्प हवेतून जमिनीकडे येऊ लागते. (२) जमिनीच्या पृष्ठभागाचे तापमान वनस्पतींच्या पानांच्या तापमानापेक्षा अधिक असल्यास जलबाष्पाचे प्रमाण उंचीनुसार कमी होत गेलेले असते. अशा वेळी जलबाष्पाचा ओघ जमिनीपासून हवेत जाऊ लागतो. या दोन भिन्न प्रकारच्या घटनांनुसार दवाचेही दोन प्रकारांत वर्गीकरण केले जाते : (१) हवेतील विसरण क्रियेने वरून खाली येताना जमिनीवर पडणारे दव आणि (२) विसरण जमिनीच्या खालच्या थरांतून ऊर्ध्व दिशेने भूपृष्ठावर व नंतर वरील हवेत जाणारे जलबाष्प.

एकाच वेळी निरभ्र रात्र, आर्द्रतेने भारावलेली हवा, अतिमंद वारा व दीर्घकालीन प्रारणामुळे जमिनीतून होणारे उष्णतानिर्गमन, अशी दव पडण्यासाठी अनुकूल परिस्थिती साधारणतः दुर्मिळ असते. वाऱ्याने थोडा जोर केल्यास जमिनीजवळील हवेला गती मिळते, रात्रीच्या प्रारणाने उत्तरोत्तर थंड होत जाणाऱ्या जमिनीशी तिचा संपर्क तुटतो व ती सतत घुसळली जात असते. यामुळे ती दवनिर्मितीला योग्य असण्याइतकी कधीच थंड होऊ शकत नाही. आकाशात ढग आल्यास प्रारणत्वरा मंदावून जमिनीचा वा इतर वस्तूंचा पृष्ठभाग दव जमण्याइतका थंड होत नाही.

दवामुळे जमिनीला मिळणारा ओलावा फार कमी असतो. पर्जन्यमान चांगले असणाऱ्या प्रदेशातील वनस्पतींच्या दृष्टीने दवाचे फारसे महत्त्व नसते परंतु थंड, शुष्क हवेच्या प्रदेशात पहाटे पडणारे दव वनस्पतींच्या वाढीस उपयुक्त होत असावे. दहा तासांच्या एका रात्रीत अत्यल्प ते ०·५ मिमी. इतके व क्वचित प्रसंगी ०·८ मिमी. दव पडू शकते. शुष्क उष्ण किंवा शीत जलवायुमानाच्या (दीर्घकालीन सरासरी हवामानाच्या) प्रदेशातील एखाद्या ठिकाणी पडणाऱ्या दवाचे वार्षिक प्रमाण १३ मिमी., तर उष्णार्द्र जलवायुमानाच्या प्रदेशातील काही ठिकाणी ते ७५ मिमी. इतके असू शकते. दवामुळे वार्षिक पर्जन्यमानात विशेष भर पडत नसली, तरी अर्ध-शुष्क प्रदेशात पडणारे दव तेथील वार्षिक पर्जन्यमानाचा महत्त्वपूर्ण अंश असू शकतो. जीववैज्ञानिक दृष्ट्या दव उपयुक्त व उपकारक असेलच असे नाही. वनस्पतींना अपायकारक असलेली कवके (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पती) दव पडणाऱ्या ठिकाणीच प्रकर्षाने वाढतात. भूमध्य समुद्राच्या पूर्वेला असलेल्या काही ठिकाणी वार्षिक दवमान २०० मिमी. असल्याचे नोंदले गेले आहे. त्यामुळे काही उन्हाळी पिके केवळ दवावर वाढू शकतात, असा तेथील अनुभव आहे.

संदर्भ : 1. Geiger, R. The Climate Near the Ground, Oxford, 1951.

           2. Landsberg, H. Physical Climatology, Du Bois, Pa., 1958.

गोखले, मो. ना.