चुंबकांबर : पृथ्वीच्या भोवताली असणाऱ्या अवकाशाच्या ज्या भागातील भौतिक प्रक्रियांवर पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा प्रभाव पडतो, त्या भागाला ‘चुंबकांबर’ म्हणतात. म्हणजे या भागातील विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगट म्हणजेच आयन तसेच मूलकण (जसे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन वगैरे) यांची वर्तणूक पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर अवलंबून असते. थोडक्यात, या भागातील चुंबकीय आणि विद्युत् परिणामांवर आणि प्रक्रियांवर पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचे परिणाम होत असतात. सामान्यपणे भूपृष्ठापासून सु. १०० किमी. उंचीवर म्हणजे ⇨ आयनांबरातील E थरापासून चुंबकांबर सुरू होते. याची वरची सीमा मात्र सूर्यप्रकाशानुसार बदलते. सूर्याने प्रकाशित होणाऱ्या पृथ्वीच्या बाजूला ती सीमा सरासरीने पृथ्वीच्या त्रिज्येच्या दहापट (सु. ६४,००० किमी.) इतक्या उंचीवर, तर अप्रकाशित बाजूस सर्वसाधारणपणे पृथ्वीच्या त्रिज्येच्या चाळीसपट (सु. २,५६,००० किमी.) इतक्या अंतरावर असते. अप्रकाशित बाजूकडील चुंबकांबराचा विस्तार कधीकधी याहीपेक्षा दूर म्हणजे चंद्रापलीकडेही गेलेला असतो. चुंबकांबराचा आकार पुच्छ असलेल्या धूमकेतूसारखा असतो. अप्रकाशित बाजूकडे ते लांब शेपटाप्रमाणे निमुळते होत गेलेले असते, तर सूर्यप्रकाशित बाजूकडील त्याचा आकार अधिक जाड व बोथट टोकासारखा असतो. पृथ्वीच्या त्रिज्येच्या साठपट म्हणजे चंद्राइतक्या अंतरावर (सु. ४ लक्ष किमी. वर) चुंबकांबराची त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या वीसपट (सु. १,२८,००० किमी.) इतकी असते. पायोनियर – ६ या कृत्रिम उपग्रहाने केलेल्या निरीक्षणांवरून चुंबकांबराचा प्रभाव ५१ लक्ष किमी. अंतरावरही असल्याचे आढळले आहे. चुंबकांबराची पृथ्वीच्या अप्रकाशीत बाजूकडील कमाल सीमा पृथ्वीच्या त्रिज्येच्या ३,००० पटींहून (२ कोटी किमी. हून) जास्त नसावी, असे अनेक निरीक्षणांवरून सिद्ध झाले आहे. सूर्योदयाच्या व सूर्यास्ताच्या वेळी, तसेच उत्तर व दक्षिण ध्रृवांवर चुंबकांबराचा विस्तार सामान्यपणे पृथ्वीच्या त्रिज्येच्या १५ पट (सु. ९६,००० किमी.) अंतरापर्यंतच असतो. अप्रकाशित बाजूकडील चुंबकांबराच्या शेपटाचा प्रसार पृथ्वीच्या त्रिज्येच्या शेकडो ते हजारो पटींनी बदलत असतो, असे कृत्रिम उपग्रहांद्वारे केलेल्या संशोधनाने दिसून आले आहे.

सूर्य व पृथ्वी यांना जोडणारी रेषा आणि भूचुंबकीय अक्ष यांच्या प्रतलातील चुंबकांबराचे स्वरूप दाखविणारी रेखाकृती : (१) भूचुंबकीय प्रभावसीमा, (२ - २’) चुंबकांबराचे बोथट टोक, (३) सौरवात, (४) ध्रुवीय प्रकाशाचे क्षेत्र, (५) आयनीभूत कण धरून ठेवले जाणाऱ्या क्षेत्राची सीमा. पृ–पृथ्वी, उ–उत्तर ध्रुव, द–दक्षिण ध्रुव. चुंबकांबर जेथे संपते त्या सीमेला भूचुंबकीय प्रभावसीमा म्हणतात. या सीमेजवळ चुंबकीय क्षेत्राची दिशा एकदम बदलते व त्याची तीव्रता  घटते. ही सीमा आंतरग्रहीय अवकाशात संक्रमित होते, असे पूर्वी मानीत परंतु आता ती स्पष्टपणे निश्चित झाली आहे. तिचा संक्रमणी पट्टा सु. ७० किमी. रूंद आहे. त्यापलीकडे आंतरग्रहीय अवकाश सुरू होते असे मानतात. सौरवातामुळे (सूर्यावरील वादळामुळे त्याच्यापासून निघणाऱ्या प्रोटॉनांच्या झोतामुळे) भूचुंबकीय प्रभावसीमेवर निर्माण होणाऱ्या प्रतिबलांनी (एकक क्षेत्रफळावरील प्रेरणांनी) चुंबकांबराचा आकार निश्चित होत असतो. चुंबकांबरात पकडले न गेलेले विद्युत् भारित कण उच्चतर वातावरणातील हवेच्या रेणूंवर आदळतात व त्यांमुळे ⇨ ध्रुवीय प्रकाशाचे वर्णविलास (विविध रंगांचे आविष्कार) निर्माण होतात. भूचुंबकीय वादळांच्या वेळी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता घटते. ही घट चुंबकांबरात पकडल्या जाणाऱ्या कणांच्या एकूण ऊर्जेशी निगडित असल्याचे दिसून आले आहे.

पृथ्वीपासून सु. ३,००० ते ३०,००० किमी. उंचीवरील भागात इलेक्ट्रॉन, प्रोटॉन तसेच उच्च ऊर्जावान असे आयनीभूत कण चुंबकीय क्षेत्ररेषांच्या भोवती मळसूत्राकार मार्गाने उत्तरेकडून दक्षिणेकडे व परत दक्षिणेकडून उत्तरेकडे जात-येत असतात. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे ते बंदिस्त होऊन चुंबकीय क्षेत्ररेषांच्या दिशेत काही विशिष्ट तऱ्हांनी त्यांची मांडणी झालेली असते. एक्स्प्लोअरर – १, ४ व ६ आणि पायोनियर – १ व ३ या उपग्रहांद्वारे मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करीत असताना विद्युत् भारित कणांचे हे पट्ट आढळले. जेम्स ए. व्हॅन ॲलन यांनी १९५८ साली ते प्रथम ओळखून काढल्याने या भागांना ‘व्हॅन ॲलन प्रारण पट्ट’ असे नाव देण्यात आले. एक्स्प्लोअरर–१२ या उपग्रहाद्वारे हे पट्ट चुंबकांबरातच सामाविलेले असल्याचे दिसून आले आहे, तर पुढील काही उपग्रहांद्वारे त्यांचे स्वरूप अत्यंत जटिल असल्याचे आढळून आले [→ प्रारण पट्ट].

इतर ग्रह व सूर्य यांच्या भोवतीही पृथ्वीप्रमाणे चुंबकांबर असण्याची शक्यता असून त्याचे स्वरूप व व्याप्ती मात्र वेगवेगळी असण्याची शक्यता आहे.

ठाकूर, अ. ना.