औद्योगिक वातावरणविज्ञान : वातावरणविज्ञानाची एक शाखा. विविध प्रकारचे उद्योगधंदे, वाहतूक व दळणवळणाची साधने, शेती इत्यादींची कार्यक्षमता वाढविण्याकरिता, वातावरणाशी निगडित असलेल्या प्रश्र्नांवर निर्णय घेताना, वातावरणासंबंधी उपलब्ध असलेल्या ज्ञानाचा उपयोग करणे हे या शाखेचे उद्दिष्ट आहे.

वातावरणातील घडामोडींचे वैशिष्ट्य, गतकालीन व चालू हवामानासंबंधीची माहिती, आगामी हवामान परिस्थितीचे अंदाज या सर्वांचा विचार करून हवामानाच्या काही विशिष्ट घटकांचे उद्योगधंद्यांवर होणारे परिणाम जाणून घेऊन योग्य ते मार्ग अवलंबणे व त्यानुसार योजना आखणे अंतिम दृष्ट्या फायद्याचे असते.

औद्योगिक वातावरणविज्ञानात खालील विषयांचा समावेश होतो.

(१) सूक्ष्म वातावरणविज्ञान : पुढील उद्योगांत किंवा योजनांत याचा उपयोग केला जातो: (अ) कारखाने व इमारतींच्या परिसरातील सरासरी तपमान, त्यांच्या कमाल व किमान मर्यादा आणि आर्द्रता यांच्या माहितीवरून उष्णता, आर्द्रता व वातानुकूलित (अनुकूल वातावरण परिस्थिती निर्माण करण्याची) व्यवस्था यांचे नियंत्रण करणे. (आ) गतकालीन पर्जन्यमानाचा विचार करून शहरांतील मलविसर्जन योजनांची आखणी करणे. (इ) प्रचलित वाऱ्‍यांच्या वेगाचा व दिशेचा अभ्यास करून कारखाने, इमारती व उद्याने यांची आखणी करणे व त्यांची स्थळे निश्चित करणे. (ई) तलाव, सरोवरे किंवा धरणे यांतील पाण्याचे बाष्पीभवन मोजून पाणीपुरवठ्याचे नियंत्रण करणे. (उ) जमिनीच्या तपमानाचा आणि प्रचलित वाऱ्‍यांच्या दिशांचा अभ्यास करून मानवाला व शेतीला उपद्रवकारक असणार्‍या आणि जमिनीत राहणाऱ्‍या प्राण्यांच्या संहारासाठी जमिनीत विषारी धूर सोडण्याच्या योजना आखणे. (ऊ) गतकालीन तपमान अभ्यासून व आगामी तपमानाच्या अंदाजावरून हिवाळ्यातील गरम कपडे, उष्णतेसाठी लागणारा कोळसा, वीज, प्रतिशीतक (उष्णता निर्माण करणारी) उपकरणे त्याचप्रमाणे उन्हाळ्यात थंड पेये, आइस्क्रीम, प्रशीतक (रेफ्रिजरेटर) इ. संबंधीच्या व्यापारी योजना आखणे. (ए) हवामानाचा शेतीवर, जनावरांवर व त्यांच्यापासून मिळणाऱ्‍या उत्पन्नांवर होणाऱ्‍या परिणामांचा अभ्यास करून त्यांसंबंधीच्या व्यापारी व संरक्षक योजना आखणे [→कृषि वातावरणविज्ञान]. (ऐ) खनिज तेलाच्या उद्योगांना तपमानाचे मध्यमावधीचेअंदाज देऊन पेट्रोलची वाहतूक सुलभ करणे इत्यादी.

(२) वातावरणीय प्रदूषण : सध्या अनेक प्रकारचे औद्योगिक कारखाने अस्तित्वात आले असून त्यांत दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे कारखान्यांतून बाहेर पडलेल्या धुराबरोबर अपायकारक वायू व इतर द्रव्ये ह्यांच्या वातावरणात प्रसार होत आहे व वातावरणाचे प्रदूषण वाढत आहे ही एक नव्याने काळजी करण्याजोगी मोठी समस्या निर्माण झाली आहे. धुराड्यातून बाहेर पडल्यावर ही द्रव्ये खाली जमिनीवर व निकटवर्ती वातावरणीय थरांत पसरतात. त्यांपासून प्राण्यांना व वनस्पतींना बराच अपाय होतो, असे आढळले आहे (उदा., रासायनिक पदार्थांचे कारखाने). हे अपाय थांबविणे ही एक वातावरणविषयक बाब झाली आहे. ह्यासाठी वातावरणविज्ञांच्या मदतीने औद्योगिक परिसरातील जलवायुस्थितीची (दीर्घ कालीन हवामानाच्या परिस्थितीची) संपूर्ण माहिती करून घेऊन कारखान्यासाठी योग्य स्थळ निवडणे, कारखान्यांच्या इमारतींची आणि मजूरांच्या निवासस्थानांची निश्चिती करणे, तसेच प्रचलित वारे, तपमान इत्यादींबद्दलच्या माहितीनुसार धुराड्यांची उंची, कामाच्या वेळा वगैरे निश्चित करणे हितावह होते [→प्रदूषण].

(३) उपयोजित वातावरणविज्ञान व जलवायुविज्ञान : वातावरणविज्ञानाचा औद्योगिक कार्यांसाठी उपयोग करताना निव्वळ सरासरी हवामानीय मूल्यांचाच विचार करून भागत नाही. त्याला सांख्यिकीचीही (संख्याशास्त्राचीही) जोड द्यावी लागते. हवामानाच्या अनेक आविष्कारांची वारंवारता, त्यांचा स्थितिकाल, तीव्रता, वेळ, त्यांची संभाव्यता, कमाल व किमान मूल्यांतील फरक वगैरेंसंबंधीचे ज्ञान अनेक मार्गांनी मिळवावे लागते. या माहितीवरून साधनसामग्रीची निवड व रचना करण्यास मदत होते. त्याचप्रमाणे अनेक राष्ट्रीय संरक्षक आणि तांत्रिक योजना आखण्यात वरील माहिती अत्यंत उपयुक्त ठरते. उदा., (अ) पर्जन्यमानावरून शहरांत घालावयाच्या मलविसर्जक नलिकांचे आकारमान ठरविणे, धरणांतील जादा पाणी वाहून जाण्यासाठी साय करणे, पूररेषा आखणे वगैरे. (आ) हिमतुषार निर्माण होतील अशा अतिशीत तपमानाच्या अंदाजावरून पिकांसाठी संरक्षक योजना आखणे व त्यांनुसार प्रतिशीतक उपकरणे पुरविणे. (इ) रेयॉन किंवा सुती कापडाच्या गिरण्यांमधून धागा तयार करण्यासाठी तपमान व आर्द्रता एका विशिष्ट मर्यादेत असावी लागते. त्यासाठी बाहेरील तपमान व आर्द्रतेनुसार वातानुकूलकांच्या साहाय्याने गिरण्यांतील तपमान व आर्द्रता यांचे नियंत्रण करणे. (ई) थंड प्रदेशांतील मोठमोठ्या शहरांतील इमारतींमध्ये उष्णता पुरविण्याची योजना असते. तेथे हिवाळ्यातील तपमानाच्या अंदाजावरून उष्णतेसाठी लागणारा वीज अगर कोळसा पुरवठा यांची व्यवस्था करणे. (उ) मालवाहू बोटींना लांबचा प्रवास करताना भिन्नभिन्न हवामान परिस्थितींतून जावे लागते. बोटीत असलेल्या मालावर मार्गातील सतत बदलणाऱ्‍या हवामानांचा परिणाम होऊ नये म्हणून मालाच्या कोठारातील हवेवर आधुनिक उपकरणांच्या साहाय्याने नियंत्रण ठेवणे.

अमेरिकेत हवामानाच्या उग्र आणि विध्वंसक आविष्कारांमुळे तेथील उद्योगधंद्यावर किती विघातक परिणाम झाले ह्याची काही माहिती आता उपलब्ध झाली आहे. १९४९ — ५७ ह्या नऊ वर्षांत झालेल्या चक्रीवादळे, गारावादळे, घूर्णवातीवादळे अशा निरनिराळ्या ७२ उग्र वादळांमुळे जी हानी घडून आली, तिच्यामुळे तेथील राष्ट्रीय अग्‍निविमामंडळाला जवळजवळ ८७ कोटी डॉलर नुकसानभरपाई द्यावी लागली. ज्यांनी मोठ्या रकमेचे विमे भरले होते त्यांनाच मिळालेल्या नुकसानभरपाईचा ह्या आकड्यात समावेश केला आहे. त्यामुळे खऱ्‍या वित्तहानीची कल्पना येणार नाही. किरकोळ विमे लक्षात  घेतल्यास ही रक्कम आणखी बरीच वाढेल.

उद्योगधंद्यांवर होणाऱ्‍या हवामानाच्या परिणामांबाबतीत योग्य उपाय योजिल्यास सालीना सु. १०० कोटी डॉलरची बचत होते असा अंदाज अमेरिकन हवामान खात्याने व्यक्त केला आहे. भारतात असे उपाय योजल्यास १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक बचत होईल असा अधिकृत अंदाज करण्यात आलेला आहे.

औद्योगिक क्षेत्रातील हवामान खात्याची कामे : (१) व्यापारी विमान वाहतूक मंडळे : अनेक उच्चस्तरांतील वाऱ्‍यांची दिशा व वेग. ढगांची उंची, धुके, प्रभावी राशिमेघ व अतिवृष्टी यांची संभाव्यता व अपेक्षित हवामान यांसंबंधी माहिती पुरविणे [→  वैमानिकीय वातावरणविज्ञान].

(२) इंधन वायू आणि विद्युत् मंडळे: निरनिराळ्या ऋतूंतील तपमानासंबंधी व झंझावाती वाऱ्‍यांसंबंधी माहिती पुरविणे.

(३) राष्ट्रीय हमरस्ते व मोठे रस्ते तयार करणारे शासकीय विभाग : अतिवृष्टी, तपमान, झंझावाती वारे व वादळे यांची माहिती देऊन रस्ते व महामार्ग सुस्थितीत ठेवण्यास मदत करणे. दूरध्वनी व तारायंत्र यांमुळे होणारे दळणवळण अखंडपणे चालू ठेवण्यासही हवामानाच्या अंदाजांचा फायदा होतो


(४) इमारती व बांधकाम : पर्जन्य, आर्द्रता, तपमान, वारे तसेच ह्या घटकांच्या कमाल व किमान मर्यादा वगैरेंची माहिती देणे व दिक्‌संयोजन (स्थल निश्चिती) करणे.

(५) नाविक वाहतूक व दळणवळण : उग्र चक्रीवादळांची केंद्रे, त्यांची चलनदिशा आणि तीव्रता, समुद्रावरील हवामानाची सद्यःस्थिती, वाऱ्‍यांचा वेग आणि त्याची दिशा यांबद्दलचे अंदाज असलेली माहिती पुरविणे [→नाविक वातावरणविज्ञान].

(६) व्यापार व जाहिरात-व्यवसाय: निरनिराळ्या ऋतूंत खपणाऱ्‍या मालाच्या उत्पादनासाठी व जाहिरातीसाठी हवामानविषयक माहिती पुरविणे.

(७) पूरप्रतिबंधकप्रकल्प: नद्यांच्या काठी आणि आसपासच्या क्षेत्रातील अनेक ठिकाणच्या, तसेच जलागमन (पाणलोट) आणि जलविभाजन क्षेत्रांतील काही ठिकाणच्या दैनंदिन पर्जन्याची माहिती पुरविणे व पूर-नियंत्रणासमदतकरणे.

(८) मत्स्य व्यवसाय: मासे वाळविणे, त्यांचा साठा करणे आणि त्यांची ने-आण करणे ह्यांसाठी हवामानविषयक माहिती पुरविणे. प्रत्यक्ष मासे धरण्याच्या वेळी समुद्रावरील हवामानाच्या सद्यःस्थितीची माहिती पुरविणे.

गद्रे, कृ. म.