टायफून : उत्तर पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागावरील उष्ण कटिबंधातील उग्र ⇨चक्रवात किंवा चक्री वादळ. या शब्दाचा उगम चिनी भाषेतील ‘ताईफुंग’ म्हणजे ‘जोराचा वारा’ ह्या शब्दापासून झालेला आहे. अरेबिक भाषेत तीव्र वादळाला ‘तुफान’ हा शब्द रुढ आहे. हा अविष्कार वातावरणात निर्माण होणाऱ्‍या अभिसारी चक्रवातासारखा असून त्याची संरचना व स्वरूप उत्तर अटलांटिक महासागरावरील ⇨हरिकेन  किंवा बंगालच्या उपसागरावरील तीव्र चक्री वादळे यांच्यासारखी असते. समशीतोष्ण कटिबंधांत निर्माण होणाऱ्‍या अभिसारी चक्रवातांपासून मात्र हे भिन्न असतात. ह्या चक्री वादळात सीमापृष्ठे [उत्तरेकडील शीत शुष्क हवा आणि दक्षिणेकडची उष्णार्द्र हवा ह्यांना विभागणारी पृष्ठे,⟶ सीमापृष्ठ] आढळत नाहीत. काही भागांत पवनवेग ताशी १६० किमी.पेक्षाही अधिक असतो. टायफूनाचा व्यास समशीतोष्ण कटिबंधांतील अभिसारी चक्रवातांच्या व्यासाच्या सु. तृतीयांश असतो. केंद्रस्थानावरील वातावरणीय दाब सरासरीने ९२० मिलिबार असतो. फिलिपीन्स बेटांच्या पूर्वेला निर्माण झालेल्या अशाच एका टायनाफूमध्ये ८८६·८ मिलिबार सारखा न्यूनतम वातावरणीय दाब नोंदला गेला होता.

समुद्रपृष्ठावर असेपर्यंतच टायफून प्रतापी आणि अतितीव्र स्वरूपाचे असते. किनारा ओलांडून जमिनीवर आल्यानंतर ते क्षीण व निष्प्रभ होते. टायफूनाच्या केंद्रीय भागात वारे अतिशय मंद असून तेथे दंडगोलाकृती प्रशांत मंडळच निर्माण होते. या क्षेत्राचा व्यास २० किमी.पर्यंत असून त्यास टायफूनाचा ‘डोळा’ किंवा ‘नेत्र’ असे म्हणतात. या क्षेत्रावर ढग जवळजवळ नसतातच. यानंतरच ढगांची एक वर्तुळाकृती प्रचंड भिंतच उभी असलेली आढळते व तेथून १०० ते ३०० किमी.पर्यंत चक्री वादळांशी निगडित असलेले झंझावात, अखंड मुसळधार पाऊस, उत्तुंग लाटा यांसारखे बहुतेक सर्व विघातक आविष्कार प्रतीत होतात. यांनंतरच्या ३०० किमी. जाडीच्या क्षेत्रात आविष्कारांची तीव्रता व विध्वंसकता कमी होते.

एका वर्षात साधारणपणे २२ टायफून उत्तर पॅसिफिक महासागराच्या पश्चिम विभागात निर्माण होतात. हिवाळ्यात टायफूनांची संख्या कमी असते. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांत ती अधिक संख्येने निर्माण होतात. या कालावधीतील टायफून साधारणपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे जातात, किनाऱ्‍यापासून काही अंतरावर आल्यानंतर ती उत्तरेकडे वळतात आणि शेवटी ती ईशान्येकडे जातात. उष्ण कटिबंधीय सीमा ओलांडल्यानंतर त्यांचे स्वरूप बदलते. त्यांच्यात सीमापृष्ठे निर्माण होतात व त्यांची तीव्रताही कमी होते. जपान व चीन आणि कधीकधी कोरिया व आग्नेय सायबीरियाला अशा टायफूनांचा तडाखा बसतो. इतर महिन्यांत निर्माण होणारी टायफून पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करतात व फिलिपीन्स बेटे, द. चीन व इंडोचायनावर आपला प्रभाव पाडतात. फिलिपीन्सच्या पूर्वेकडील चीनच्या समुद्राचा भाग जगात सर्वाधिक चक्री वादळग्रस्त विभाग म्हणून समजण्यात येतो. टायफूनांची मासिक वारंवारता मागील कोष्टकात दिली आहे.

टायफूनांची मासिक वारंवारता 

वार्षिक सरासरी संख्या

प्रतिशत मासिक वारंवारता

जाने.

फेब्रु.

मार्च

एप्रिल

मे

जून

जुलै

ऑगस्ट

सप्टें.

ऑक्टो.

नोव्हें.

डिसें. 

२२

१५

१६

१९

१५

वरील टायफूनांपैकी प्रतिशत १२ टायफून बंगालच्या उपसागरात प्रवेश करतात.

जगाच्या अनेक विभागांत उष्ण कटिबंधीय चक्री वादळे निर्माण होतात. चीनच्या समुद्रात निर्माण होणाऱ्‍या चक्री वादळांची संख्या सर्वांत अधिक असते. वर्षाच्या बहुतेक सर्वच महिन्यांत ती उद्‌भवतात. त्यामुळे पश्चिम पॅसिफिक महासागराच्या किनारपट्टीवर वसलेल्या सर्वच देशांना ह्या चक्री वादळांमुळे फार नुकसान पोहोचते. तथापि ह्या चक्री वादळांमुळेच त्यांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होतो व प्रदीर्घ अवर्षणाचा धोका टळतो. जपानच्या काही विभागांना लागणाऱ्‍या पाण्याचा बराचसा भाग चक्री वादळांमुळे होणाऱ्‍या वर्षणाद्वारे मिळतो.

नेने, य. रा.