समनति रेषा : पृथ्वी हा एक प्रचंड चुंबक आहे. सध्या त्याचा उत्तर धुव कॅनडाच्या उत्तरेस ( व्हिक्टोरिया आणि बॅफिन बेटे यांच्या मधे) आणि दक्षिण धुव अंटार्क्टिका खंडाची दक्षिण व्हिक्टोरिया भूमी या प्रदेशावर आहे. दोन्हीही चुंबकीय धुव अती मंद आणि गूढ गतीने सरकत असतात. ह्या दोन्ही धुवांस जोडणारी रेषा ( म्हणजे चुंबकीय अक्ष ) पृथ्वीच्या मध्यापासून सु. १,२०० किमी. अंतरावर आहे. चुंबकीय अक्ष आणि पृथ्वीचा धुवीय अक्ष ह्या दोहोंमध्ये १० ते १२ अंशांचा कोन असतो. एखादी चुंबकीय सूची तिच्या वस्तुमध्यापासून आडव्या अक्षावर टांगून ठेवली, तर चुंबकीय धुवावर ती उदग ( उभ्या दिशेत ) राहील, चुंबकीय विषुववृत्तावर ती आडव्या पातळीत राहील आणि इतर ठिकाणी ती चुंबकीय रेषांची स्थानिक दिशा दाखवील. पृथ्वीच्या चुंबकाची चुंबकीय रेषा आडव्या पातळीशी जो कोन करते, त्यास त्या स्थानाची नती असे म्हणतात. चुंबकीय धुवावर नती ९०º असते आणि चुंबकीय विषुववृत्तावर ती शून्य अंश असते. इतर ठिकाणी नती ह्या दोहोंच्या मधे असते. नतीचे एकच मूल्य असलेल्या ठिकाणांस जोडणाऱ्या रेषेस समनती रेषा असे म्हणतात. चुंबकीय विषुववृत्ताच्या उत्तरेस टांगलेल्या चुंबकीय सूचीचे उत्तराग खाली असते, तर दक्षिणेस टांगलेल्या चुंबकीय सूचीचे दक्षिणाग खाली असते.

गोखले, मो. ना.