जीवावरण :विविध प्रकारचे जीवित ज्यात आढळते असे पृथ्वीभोवतालचे आवरण. पृथ्वीच्या पृष्ठभागालगतच्या वातावरणाचा सु. १०,००० मी. जाडीचा थर, शिलावरणाचा सु. २,००० मी. जाडीचा भाग (भूपृष्ठ, खडक इ.) व जलावरणाचा १०,८६३ मी. च्या महत्तम खोलीपर्यंतचा बहुतेक सर्व भाग, अशा तीन वेगवेगळ्या विभागांचा जीवावरणात समावेश केला जातो.

अनेक प्रकारच्या वनस्पती, विविध पशू आणि पक्षी, जलचर प्राणी, मनुष्य प्राणी, कीटक व असंख्य प्रकारचे सूक्ष्मजीव जीवावरणात वास्तव्य करतात. खाणीतून नुकत्याच खणून काढलेल्या खडकातून झिरपणाऱ्या पाण्यात सूक्ष्मजीव आढळले आहेत. खनिज तेलाचे निक्षेप (साठे) साधारणपणे भूपृष्ठापासून ते ६,५५० मी.च्या खोलीपर्यंत सापडले आहेत. त्यातील पृष्ठभागापासून २,००० मी.पर्यंतच्या काही थरांत खनिज तेलाच्या निक्षेपांबरोबर काही  सूक्ष्मजंतूंचे अस्तित्व आढळून आले आहे. मुक्त वातावरणात १० किमी. उंचीपर्यंत सूक्ष्मजंतू आणि कवक-बीजुके (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींचे प्रजोत्पादक भाग) गोळा केली गेली आहेत. मौंट एव्हरेस्टसारख्या उत्तुंग पर्वतशिखरांच्या परिसरात ८,२३० मी. उंचीवर पक्षी उडत असलेले आढळले आहेत. काही  भूचर प्राणी मौंट एव्हरेस्टच्या ६,७०० मी. उंचीपर्यंत चढून जाऊ शकतात. त्याच उंचीवर उड्या मारीत जाणाऱ्या अविकसित कोळ्यांचे प्रकारही दिसून आले आहेत.

वातावरणातील सूक्ष्मजीव, कीटक, सूक्ष्मजंतू आणि काही प्राणी यांच्या मानाने हरित वनस्पती कमी  उंचीवर आढळतात. हिमनदीय लार्कस्परसारखी  हरित वनस्पती हिमालयात मौंट एव्हरेस्टच्या परिसरात ६,२०० मी. उंचीवर दिसते. पक्षी त्यापेक्षा दोन किमी. अधिक उंचीवरून उडू शकतात. समुद्रातील वनस्पतिजीवनास आवश्यक असणारा सूर्यप्रकाश फार खोलवर पोहोचत नसल्यामुळे जलावरणातही जलीय वनस्पती जलपृष्ठापासून जास्त खोलीवर अस्तित्वात असलेल्या दिसत नाहीत. शैवले ३५० मी. खोलीच्या पलीकडे बहुधा आढळतच नाहीत. सूक्ष्मजीव त्यापेक्षा कित्येक हजार मीटरांच्या खोलीवर आढळतात. अशा रीतीने जीवावरणाच्या मूलभूत रचनेत एक वैचित्र्यपूर्ण परिस्थिती  आढळते. वातावरणाची १० किमी. जाडी व जलावरणाची १०·८ किमी. जाडी लक्षात घेता संपूर्ण जीवावरणाची महत्तम जाडी २१ किमी. इतकी  आहे. परंतु जीवावरणातील असंख्य जीवांना ज्यांच्यापासून खाद्य मिळते त्या वनस्पती पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वातावरणात ६·२ किमी. उंच आणी  भूपृष्ठाच्या खाली ३५० मी. खोल अशा जीवावरणाच्या फक्त ६·५५ किमी. जाडीच्या थरातच वाढतात. वास्तविक पोषक वनस्पतींच्या उत्पादनाचे क्षेत्र व त्यांच्यावर जगणाऱ्या प्राण्यांचे संचारणक्षेत्र ही दोन्ही  क्षेत्रे सारख्याच जाडीची असावयास पाहिजेत पण जीवावरणात तशी परिस्थिती  आढळत नाही. जीवावरणामधील पोषक वनस्पतींचे उत्पादनक्षेत्र फक्त ६·५ किमी. जाडीचे असताना संपूर्ण जीवावरण त्याच्या तिप्पट जाडीच्या क्षेत्रात सामाविलेले असावे, ही घटना जरा विलक्षणच वाटते व पोषक वनस्पतींचा पट्टा सोडून जीव किंवा सूक्ष्मजंतू आपल्या खाद्यापासून इतके दूर कसे राहू शकतात, असा प्रश्न उत्पन्न होतो.

उत्तरादाखल असे म्हणता येईल की, जलीय वनस्पतींपासून उत्पन्न होणाऱ्या कार्बनी द्रव्यांच्या कणांचे अवसादन (साका तयार होणे) किंवा अवपातन होऊन गुरुत्वाकर्षणामुळे ते समुद्रतळाकडे जात असावेत. समुद्रात त्यांचे वितरण होऊन सर्व थरांत विपुल प्रमाणात अन्नकण उपलब्ध होत असावेत. त्यामुळे हे अन्न खाऊन जगणारे सूक्ष्मजीव समुद्राच्या अगदी तळापर्यंतच्या सर्व थरांत आढळणे शक्य होत असावे. त्याचप्रमाणे वातावरणात ६·२ किमी. उंचीपर्यंत वाढणाऱ्या वनस्पतिजन्य परागकणांसारखे अन्नाचे कण वाऱ्यांमुळे किंवा वातावरणातील ऊर्ध्व प्रवाहांमुळे १० किमी. उंचीपर्यंत वाहून गेल्यामुळे त्यांवर उपजीविका करणारे सूक्ष्मजंतू किंवा कीटक वातावरणात त्या  उंचीपर्यंत सर्वत्र आढळणे शक्य आहे.

पृथ्वीची पुष्कळशी जीवसृष्टी शिलावरणातच आढळते. लहान प्राण्यांना भक्ष्य बनवून मोठ्या प्राण्यांनी आपली उपजीविका करून घ्यावी, हा जीवावरणाच्या अविरततेचा नियम आहे. परागकण खाऊन कोलेंबोला (स्प्रिंगटेल्स) नावाचे जंतू आपली  उपजीविका करतात. कोलेंबोला खाऊन एव्हरेस्टवरील कोळी आपला जीव जगवितात. लहान मासे खाऊन मोठे मासे जगतात. लहान प्राणी  खाऊन हिंस्त्र वन्य पशू आपले जीवनसंवर्धन करतात. जीवावरणात अतिसूक्ष्म जीवांपासून विशाल जलचर प्राण्यांपर्यंत अनंत प्रकारचे प्राणिजीवन आढळते. अतिविरल वातावरणात राहणारे सूक्ष्मजीव, वातावरणाच्या तळाशी राहणारे मानव, पक्षी व इतर पृष्ठभागीय प्राणी आणि समुद्राच्या तळाशी राहून पाण्याचा व वरील वातावरणाचा प्रचंड भार सहन करू शकणारे जलचर प्राणी यांशिवाय अगणित प्रकारचे जीव जीवावरणात वास्तव्य करतात.

जीवावरणाची चार वैशिष्ट्ये आहेत : (१) या क्षेत्रात पाणी मुबलक प्रमाणात आढळते. बहुतेक सर्वच जीवांची घडण बव्हंशी पाण्यासारख्या महत्वाच्या घटकामुळे झालेली असते. (२) याच आवरणात द्रव-घन, घन-वायू आणि वायू-द्रव वस्तू विभागणारी अनेक आंतर पृष्ठे अस्तित्वात आलेली असतात. सूक्ष्मजीवांच्या विशाल वसाहती घनपृष्ठावर न आढळता अधिकांशाने त्या विशुद्ध असलेल्या पाण्यातच आढळतात. (३) अतिघनपृष्ठावर सूक्ष्मजीवजंतूंच्या वसाहती किंवा वनस्पतिजीवन क्वचितच आढळते. मृदावरणात अनंत अतिसूक्ष्म मृत्तिकाकणांचा पृष्ठभाग मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतो. ह्याच मृदू भूस्तरात वनस्पती व जीवजंतू वाढतात. (४) जीवावरणाला अतिशय लघू तरंगलांबीच्या सौरप्रारणाशिवाय (तरंगरूपी उर्जेशिवाय) इतर दीर्घ तरंगलांबीचे प्रारणही  मिळते. हे दीर्घ तरंगलांबीचे प्रारण जेव्हा अपारदर्शक हरित वनस्पतींवर आदळते तेव्हा त्यांतील हरितद्रव्यामुळे ⇨प्रकाशसंश्लेषण  होऊन वनस्पतींना संवर्धक द्रव्ये मिळतात, मानवांच्या व इतर प्राण्यांच्या श्वसनासाठी  विपुल प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होतो. अनेक कार्बनी संयुगे निर्माण होतात आणि रासायनिक ऊर्जा साठविली जाते. पृथ्वीवरील जीवित अव्याहतपणे चालू ठेवायला ही मूलभूत यंत्रणा अत्यावश्यक असते.

मानवाच्या अनेकविध वैज्ञानिक व्यवहारांमुळे व उद्योगांमुळे जीवावरणाचा ‘मानवी उद्योगावरण’ (अँथ्रपॉस्फिअर) किंवा ‘चिदावरण’ (नूस्फिअर) अशा अर्थाच्या आधुनिक नावांनी कधीकधी उल्लेख केला जातो.

गद्रे, कृ. म. चोरघडे, शं. ल.