प्रत्युत्परिवर्तन : (रिव्हर्शन ॲटाविझम). प्रत्येक प्राण्याचे व वनस्पतीचे गुणधर्म त्याच्या वंशप्रकृतीवर अवलंबून असतात. वंशप्रकृतीवर परिस्थितीची प्रतिक्रिया घडल्यानंतर त्या प्राण्याचे अगर वनस्पतीचे दृश्य रूप तयार होते. या दृश्य रूपात वंशप्रकृतीची घडण ही महत्त्वाची होय. मुळातच वंशप्रकृती चांगली नसेल, तर कितीही उत्तम परिस्थिती अनुकूल असली, तरी दृश्य रूप चांगले होणार नाही.

वंशप्रकृती घडविणारी जनुके केंद्रकातील गुणसूत्रांत असतात [⟶ जीन गुणसूत्र]. जनुके ही डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्लाची [⟶न्यूक्लिइक अम्ले] बनलेली असतात. काही खालच्या वर्गाच्या जीवांत उदा., काही व्हायरसांमध्ये ते रिबोन्यूक्लिइक अम्लाचे बनलेले असतात. या जनुकांच्या परस्परक्रियेमुळे प्राण्यांचे अगर वनस्पतींचे काही गुणधर्म बनतात व ते त्यांच्या दृश्य रूपात आपल्याला दिसतात. युग्मके (पक्व प्रजोत्पादक कोशिका म्हणजे पेशी गंतुके) तयार होण्यापूर्वी गुणसूत्रांचे विभाजन होते आणि त्याच गुणसूत्रांचे नवीन समूह तयार होतात [⟶ कोशिका]. यामुळे या युग्मकांच्या संयोगामुळे नवीन तयार होणाऱ्या प्राण्यात अगर वनस्पतीत गुणसूत्रांत काहीही बदल न घडून येता जनुकांच्या परस्परक्रियेमुळे नवीन गुणधर्म दिसू लागतात. हे गुणधर्म काही वेळा त्या प्राण्याच्या वंशातील काही पिढ्यांच्या पूर्वीच्या पूर्वजांच्या गुणधर्मांशी जुळतात. अशा प्रकारास प्रत्युत्परिवर्तन म्हणतात. कबूतरांच्या काही जातींत असे प्रत्युत्परिवर्तन आढळून आले आहे. मूळ कबूतर कोलंबा लिव्हिया या जातीचे आहे व त्यापासून माणसाने बऱ्याच नवीन प्रकारांची कबूतरे निर्माण केली आहेत. ही नवीन कबूतरे पिढ्यानपिढ्या त्यांच्यासारखेच दृश्य रूप असलेली प्रजा निर्माण करतात पण जर मध्येच दोन प्रकारच्या कबूतरांचा संकर झाला, तर कधीकधी पूर्वजासारखे कोलंबा लिव्हिया या जातीचे कबूतर तयार होते. ‘सिल्व्हर फॅनटेल’ व ‘ब्ल्यू एट’ ह्या कबूतरांच्या दोन जाती त्याच दृश्य रूपाची प्रजा निर्माण करतात पण जर या दोन जातींचा संकर झाला, तर मूळ कोलंबा लिव्हिया या जातीचे कबूतर मिळते. पणजोबाचे काही गुण आजोबात अगर बापात न उतरता पणतूत उतरणे यातलाच हा प्रकार आहे.

वाटाण्यांच्या काही जाती पांढरी फुले देणाऱ्या आहेत व पिढ्यान्‌पिढ्या ती पांढरी फुले देतात पण काही वेळा यांच्या पिढीत तांबडीफुले आढळली आहेत. या परिस्थितीचे विश्लेषण केल्यावर असे आढळून आले की, मूळ साठ्यामध्ये पांढरी फुले देणाऱ्या दोन जाती आहेत व त्या जातींत हा पांढरा रंग निरनिराळ्या जनुकांमुळे निर्माण होतो. हे जनुक समरंदुक [⟶ आनुवंशिकी] स्थितीत असतात. जेव्हा या दोन पांढऱ्या जातींचा संकर होतो तेव्हा विषमरंदुक स्थिती निर्माण होते व जनुकांच्या परस्परक्रियेमुळे लाल रंगाची फुले येतात. सकृद्दर्शनी पूर्वीच्या पिढीचा गुण या पिढीस आला असे वाटते पण वरील विवेचनावरून असे काही घडत नाही, हे सिद्ध होते.

यावरील दोनही उदाहरणांत जनुकांच्या रचनेत काहीच फरक पडलेला नाही, फक्त त्यांच्या समूहाची पुनर्रचना झाली, हे स्पष्ट दिसते. याउलट जनुकात उत्परिवर्तन (आनुवंशिक लक्षणात होणारा आकस्मिक बदल) झाल्यामुळेही मागील पिढीचे काही गुण काही पिढ्यांनंतर दिसून येतात, असे आढळले आहे.

उत्स्फूर्त उत्परिवर्तन निसर्गात सारखे होत असते. क्ष-किरण, जंबुपार किरण (वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य किरण), विश्वकिरण (बाह्य अवकाशातून पृथ्वीवर येणारे अतिशय भेदक किरण व काही रासायनिक द्रव्ये यांच्या साह्याने उत्परिवर्तन होते. या उत्परिवर्तनाच्या प्रमाणाचा अंदाजही करणे शक्य आहे. एकदा एका जनुकात उत्परिवर्तन झाले म्हणजे त्याच जनुकात पुन्हा उत्परिवर्तन व्हावयास काही कालावधी जावा लागतो. या उत्परिवर्तित जनुकाचे पुन्हा मूळच्या जनुकात उत्परिवर्तन फार क्वचितच होते पण हे झालेच, तर पुढील पिढीत पुन्हा अगोदरच्या पिढीतील गुणधर्म दिसू लागतात. हा प्रकार जरी निराळ्या प्रक्रियेने होत असला, तरी तात्त्विक दृष्ट्या यात व वर वर्णिलेल्या कबूतराच्या प्रत्युत्परिवर्तनात विशेष फरक नाही.

ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर या फळमाश्यांच्या डोळ्यांचा रांग लाल असतो. या लाल रंगाचे गुणधर्म असणाऱ्या जनुकामध्ये जर उत्परिवर्तन झाले, तर डोळ्यांचा रंग फिकट लाल अगर पांढरा बनतो. पुढील पिढ्यांमध्ये काही काळानंतर जर या उत्परिवर्तनाचे प्रत्युत्परिवर्तन झाले, तर डोळ्यांना मूळचा रंग प्राप्त होणे शक्य आहे. मक्याच्या दाण्यांचा रंग आनुवंशिक असतो. या दाण्यांतील जांभळा रंग तीन जनुके एकत्र आल्याने बनतो. जर यांपैकी एखादे जनुक नसेल, तर दाणे रंगहीन होतात. हे जनुक जर परत या समूहात आले अगर उत्परिवर्तनाने तयार झाले, तर पुन्हा पुढील पिढीत रंगीत दाणे तयार होतील. वनस्पतींचे अगर प्राण्यांचे संकर पद्धतीने प्रजोत्पादन केले, तर निर्माण होणाऱ्या संततीमध्ये मातापित्यांची अंगभूत लक्षणे न आढळता पुष्कळदा पूर्व पिढीत आढळणारी लक्षणे दिसून येतात. काही जनुकात घडलेल्या बदलामुळे असे होते.

न्यूरोस्पोरा जातीच्या कवकावर (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीवर) बरेच प्रयोग झाले आहेत. ही कवके वेगवेगळ्या माध्यमांवर वाढतात. जंबुपार किरणांच्या साह्याने या कवकात उत्परिवर्तन करता येते. माध्यमात बदल करून ही उत्परिवर्तित कवके वाढविता येतात. अनेक पिढ्यांनंतर या उत्परिवर्तित कवकांत प्रत्युत्परिवर्तन घडून ती पुन्हा पहिल्यासारखी त्यांच्या मूळच्या माध्यमावर वाढू शकतात.

अनेक प्रयोगान्ती असे आढळून आले की, उत्परिवर्तनानंतर त्याच जनुकाचे पुन्हा प्रत्युत्परिवर्तन झाले, तर पूर्वीचे आनुवंशिक गुण प्राप्त होतात.

पहा : आनुवंशिकी उत्परिवर्तन.

संदर्भ :1. Altenburg, E. Genetics, New York, 1965.

           2. Gardner, J. Principles of Genetics, New York, 1964.

  

रानडे, द. र. इनामदार, ना. भा.