प्रतिक्रिया-काल : (रिॲक्शन टाइम). प्रायोगिक मानसशास्त्रातील एक संकल्पना. प्रतिक्रिया-काल म्हणजे उद्दीपकाची सुरुवात आणि त्या उद्दीपकास अनुसरून केलेल्या प्रतिक्रियेचा आरंभ यांमधील कालांतर. प्रयोगशाळेमध्ये प्रतिक्रिया-काल मोजण्यासाठी प्रतिक्रिया-काल-उपकरण आणि लघुकालदर्शक ही उपकरणे वापरतात. लघुकालदर्शकाच्या साहाय्याने एकसहस्त्रांश सेकंदापर्यंतचा काल मोजता येतो. विजेरीच्या साहाय्याने उपकरणे एकमेकांस जोडून असे मापन करतात. मानवाच्या सर्व वेदनक्षेत्रांतील अनुभवांना लागणारा प्रतिक्रिया-काल मोजता येतो.

प्रतिक्रिया-कालाचे साधा (सिंपल) आणि भेदबोधनात्मक (डिस्क्रिमिनेशन) असे दोन प्रकार आहेत. जेव्हा एकाच उद्दीपकाला ठराविक प्रतिक्रिया द्यावयाची असते, तेव्हा ते साध्या प्रतिक्रिया-कालाचे उदाहरण असते. जेव्हा एकाहून जास्त उद्दीपके असतात व त्यांपैकी एकाच उद्दीपकाला एकाहून अधिक प्रतिक्रियांपैकी ठराविक प्रतिक्रिया द्यावयाची असते, तेव्हा ते भेदबोधनात्मक प्रतिक्रिया-कालाचे उदाहरण असते.

प्रतिक्रिया-काल पुढील गोष्टींवर अवलंबून असतो : (१) उद्दीपनक्षेत्राचे स्वरूप, (२) उद्दीपकाची तीव्रता, (३) ज्या व्यक्तीच्या प्रतिक्रिया-काल मोजावयाचा असतो तिचा मनोन्यास (मेंटल सेट), मनोवृत्ती, प्रेरणा (मोटिव्हेशन) व पूर्वसूचना.प्रतिक्रिया-कालात व्यक्तिपरत्वे भेद असतात.

प्रतिक्रिया-काल बु़द्धिमत्तेवर अवलंबून नसतो. प्रतिक्रिया-कालाच्या साहाय्याने व्यक्ती वेगवेगळ्या  प्रकारची क्रियाकौशल्ये किती कार्यक्षमतेने हाताळू शकेल हे कळते. खेळाडू, वैमानिक इत्यादींच्या निवडीत व्यक्तीचा प्रतिक्रिया-काल माहीत असणे फार उपयुक्त ठरते.

इलेक्ट्रॉनिकीय तंत्रे व उपकरणे उपलब्ध झाल्यापासून प्रतिक्रिया-काल काटेकोरपणे मोजता येऊ लागलेला आहे.

संदर्भ : Postman, Leo Eagen, J. P. Experimental Psychology, New York,1964.

गोगटे, श्री. ब.