प्रणयाराधन :प्राण्यांपैकी नर किंवा मादी दुसऱ्याला लैंगिक क्रियेकरिता किंवा मैथुनाकरिता उद्दीपित करण्यासाठी ज्या विविध कृती करीत असतात त्यांना सर्वसाधारणपणे प्रणयाराधन म्हणतात. आपल्या शरीराच्या झगझगीत रंगांचे किंवा भूषणांचे प्रदर्शन करणे, विशिष्ट भागांनी एकमेकांना स्पर्श करणे, नृत्य किंवा इतर चेष्टा करणे, पाठलाग करणे, सुगंधित द्रव्याचे फवारे किंवा सुवास सोडणे, भक्ष्य अर्पण करणे वगैरे गोष्टींचा प्रणयाराधनाच्या क्रियेत समावेश होतो. सामान्यतः नरच या गोष्टीत पुढाकार घेत असल्याचे दिसून येते.
मनुष्यजातीमध्ये कायमचा सहचर किंवा सहचरी निवडण्याकरिता विवाहापूर्वी प्रणयाराधन चालू असते पण प्राण्यांमध्ये विवाहविधी अस्तित्वातच नसतो आणि पुष्कळ पक्ष्यांमध्ये तर जोडा जमल्यानंतरच विशिष्ट गुणांचे प्रदर्शन सुरू होते. जीवविज्ञानाच्या दृष्टीने प्रणयाराधनाची परिणती मैथुनात होते. ज्या वेळी विवाहविधीसारखा एखादा प्रकार अस्तित्वात असतो तेव्हा प्रणयाराधनाचा संबंध सहचरीच्या किंवा सहचराच्या निवडीशी असणे शक्य असते.
प्राण्यातील : ॲनेलिड व मॉलस्क :जिला प्रणयाराधन म्हणता येईल अशी अत्यंत आद्य प्रकारची क्रिया ⇨ नीरीज या समुद्री ॲनेलिड (वलयी) कृमीत दिसून येते. प्रजोत्पादनाच्या काळात नर व माद्या एके ठिकाणी गोळा होतात आणि नर विलक्षण अंगविक्षेप करून माद्यांच्या भोवती नाचतात. यामुळे माद्या उद्दीपित होऊन अंडी घालतात आणि नर त्यांवर आपले शुक्राणू (पुं-जनन पेशी) सोडतात.
मॉलस्कामध्ये (मृदुकाय प्राण्यांमध्ये) गोगलगाईसारख्या काही थोड्या प्रकारांत प्रणयाराधन आढळते. गोगलगाई उभयलिंगी (नर व मादीची इंद्रिये एकाच व्यक्तीत असलेल्या अशा) असतात. त्यांच्या शरीरात बाणासारखी एक संरचना असते. प्रत्यक्ष मैथुनापूर्वी एक गोगलगाय दुसरीच्या अंगावर बाण सोडते. ज्या गोगलगाईच्या शरीरात हा बाण घुसतो ती गोगलगाय उद्दीपित होऊन मैथुनाला प्रवृत्त होते.
क्रस्टेशियन:बहुतेक क्रस्टेशियन (कवचधारी) प्राण्यांमध्ये विशिष्ट ज्ञानेंद्रिये जरी चांगली विकसित झालेली असली आणि अंड्याचे निषेचन (फलन) शरीरात होत असले, तरी मैथुनापूर्वी मादीचा पाठलाग करून तिला जबरदस्तीने पकडण्याखेरीज दुसरी कोणतीही पूर्वतयारी दिसून येत नाही. तथापि अर्धभूचर फिडलर खेकड्याच्या नराला चकचकीत रंगाचा अतिशय मोठा एक नखर (आकडा) असतो आणि त्याचा उपयोग तो आद्य स्वरूपाच्या प्रणयाराधनाकरिता करतो. प्रजोत्पादनाच्या काळात एखादी मादी नराच्या जवळपास असली, तर तो पायांच्या टोकांवर उभा राहतो आणि आपली तयारी दर्शविण्याकरिता आपला मोठा नखर हवेत परजतो. नराची ही कृती कशाचा संकेत आहे हे मादी जाणते व नराच्या पाठोपाठ बिळात जाते.
ॲरॅक्निड:(अष्टपाद). आपल्या लैंगिक तयारीकडे मादीचे वरचेवर लक्ष वेधणे हा नर कोळ्याच्या प्रणयाराधनाचा मुख्य हेतू असतो. तीक्ष्ण दृष्टी असणारे शिकारी कोळी नाच किंवा अंगविक्षेप करून शरीराच्या आकर्षक रंग असलेल्या भागांचे मुख्यतः प्रदर्शन करतात. जाळे विणणाऱ्या कोळ्यांची दृष्टी अधू असते म्हणून या जातीचे काही कोळी प्रणयाराधनाकरिता जाळ्याचा एक पदर विशिष्ट लयबद्धतेने वरचेवर हालवून मादीला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतात. नर घुटमळत मादीकडे जातो कारण भक्ष्य समजून मादी आपल्याला खाऊन टाकील, अशी त्याला भीती वाटत असते पण प्रणयाराधनाची क्रिया जसजशी प्रगत होत जाते तसतशी मादी नराला वश होते.
कीटक:कीटकांमध्येही प्रणयाराधन आढळते. पुष्कळ माश्यांचे नर (उदा., ड्रॉसोफिला) आपले पंख विशिष्ट पद्धतीने हालवितात सॅटिरस या फुलपाखरात नर मादीच्या समोर बसून आपल्या शृंगिकांच्या (सांधेयुक्त स्पर्शेंद्रियांच्या) आणि पुढच्या पंखांच्या विशिष्ट हालचाली करून तिला मैथुनाला प्रवृत्त करतो. काही नर फुलपाखरांच्या पंखांवर गंधशल्क (सुगंधी द्रव्ययुक्त खवले) असतात. काही कीटकांच्या आवाजाचा उपयोग नर व मादीला एकमेकांच्या जवळ आणण्याकरिता होतो.
विंचवांच्या प्रणयाराधनाच्या वेळी नर आणि मादी आपले आकडे एकमेकांत गुंतवून नाचतात पण अंड्यांचे निषेचन झाल्यावर मादी सामान्यतः नराला खाऊन टाकते.
मासे:बहुसंख्य माशांमध्ये प्रणयाराधन नसते. ज्यांची प्रजोत्पादनाची रीत विशिष्ट प्रकारची असते किंवा ज्यांच्यात अंतःनिषेचन (अंड्याचे शरीरात होणारे फलन) असते, अशा थोड्या जातींच्या माशांत नर आपल्या ठळक शोभिवंत भागांचे प्रदर्शन करून प्रणयाराधन करतो.
नर ⇨ स्टिकलबॅक मासा आपल्याला पाहिजे असेल तेवढी जागा आधी निश्चित करून तेथे आपले घरटे तयार करतो. घरटे तयार झाल्यावर या हक्काच्या जागेवर दुसरा कोणताही मासा आला, तर तो त्याच्यावर आवेशाने हल्ला करतो. कित्येकदा स्टिकलबॅक मादी या हल्ल्याला बळी पडण्याचा संभव असतो पण तिच्या शरीराच्या विशिष्ट डौलावरून नर तिला ओळखतो. तो तिला घरट्यात घेऊन जातो. ती तेथे अंडी घालते व नराच्या रेतसिंचनाने त्यांचे निषेचन होते. ⇨ असिपुच्छमाशांमध्ये अंतःनिषेचन होते. नराचे रंग चकचकीत असून शेपूट लांब असते. प्रजोत्पादनाच्या काळात नर उत्तेजित स्थितीत मादीच्या भोवती घिरट्या घालतो व तिला उत्तेजित करण्याकरिता मधूनमधून तिला आपल्या शेपटीने धक्के देतो.
उभयचर: (जमिनीवर व पाण्यात राहणारे प्राणी). बेडूक आणि भेक (टोड) यांत प्रणयाराधनाची जरूरी नसते. तथापि नरांच्या मोठ्याने डरावडराव ओरडण्यामुळे नर व माद्या एके ठिकाणी येण्याला मदत होते. ⇨ न्यूट या सपुच्छ उभयचरामध्ये प्रणयाराधन आढळते. प्रजोत्पादनाच्या काळात नराचे रंग भडक होतात व तो मादीच्या भोवती विशिष्ट अंगविक्षेप करीत घिरट्या घालतो घिरट्या घालीत असताना तो आपल्या गंध ग्रंथींमधून सुगंधी द्रव्य मादीवर फवारतो यामुळे मादीचे लैंगिक उद्दीपन होते.
सरीसृप:सरीसृपांच्या (सरपटणाऱ्या प्राण्यांच्या) प्रणयाराधनाविषयी विशेष माहिती नाही. प्रजोत्पादनाच्या काळात नर सरड्याच्या डोक्याचा रंग बदलून भडक होतो व तो आपले डोके सारखे खाली वर हालवीत असतो. मादीचे लक्ष वेधून घेण्याकरिता तो हे करीत असावा. मगर (नर) मोठ्याने डुरकत मादीभोवती नाचतो आणि त्याच वेळी कस्तुरीसारखा वास बाहेर सोडतो.
पक्षी:पक्ष्यांमध्ये प्रणयाराधन सार्वत्रिक आणि सुस्पष्ट असून त्याच्या तपशिलाचा आणि हेतूचा पूर्णपणे छडा लावण्यात आला आहे. त्यांच्या प्रणयाराधनाची संपूर्ण माहिती येथे देणे शक्य नसल्यामुळे फक्त काही उदाहरणे दिली आहेत.
मोराचे प्रणयाराधन सुप्रसिद्ध आहे. प्रणयाराधनाच्या वेळी मोर आपला पिसारा वर उचलून त्यातील पिसे पंख्याप्रमाणे पसरून, पंख अर्धवट उघडून ठुमकत चालतो किंवा लांडोरीभोवती नाचतो. सारस पक्ष्यांची जोडपी आयुष्यभर टिकतात. प्रजोत्पादनाच्या काळात प्रणयाराधनामध्ये नर आणि मादी दोघेही भाग घेतात. पंख पसरून मान खाली घालून ती नाचतात मधूनच उड्या मारतात, एकमेकांभोवती फेऱ्या घालतात, मध्येच एकमेकांसमोर उभे राहून ते माना खालीवर करतात. हे सर्व चालू असताना दोघेही ओरडत असतात.
चास पक्ष्याच्या नर मादीच्या रूपात फरक नसतो. मादी बसलेली असताना नर तिच्या समोर उंच भराऱ्या मारून आपल्या पंखांच्या झळकणाऱ्या रंगांचे प्रदर्शन करतो कधीकधी हवेत कोलांट्याही घेतो. नराच्या या चेष्टांमुळे मादी त्याच्यावर मोहित होते आणि मैथुनाला प्रवृत्त होते.
चंडोलाची प्रणयराधनाची क्रिया जास्त आकर्षक असते. मादी स्वस्थ बसून पाहत असताना तिच्या समोर नर आपल्या गायनाच्या व उड्डाणाच्या कौशल्याचे प्रदर्शन करतो. [⟶ पक्ष्यांचा थाटमाट].
कर्वे, ज. नी.
सस्तनप्राणी:इतर पृष्ठवंशी प्राण्यांच्या मानाने सस्तन प्राण्यांच्या प्रजोत्पादनाची तऱ्हाअगदी वेगळी असल्याने त्यांच्या प्रणयाराधनाचीतऱ्हाही वेगळी असते. पुष्कळ सस्तन प्राण्यांच्या बाबतीत विणीचा विशिष्ट हंगाम असतो. मादी माजावर आलेली असतानाच तिच्याशी नराचा समागम होणे गर्भधारणेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असते. माजाचा व समागमाचा काळ जुळून येण्यासाठी पुढील दोन बाबी उपयुक्त ठरल्या आहेत. (१) नर बराच काळ मादीबरोबर राहिल्याने त्याच्या मदगंधाने व वर्तनाने मादी माजावर येण्याच्या क्रियेस चालना मिळते अथवा (२) माजावर आलेली मादीच नराचा शोध घेते. गाईम्हशी इ. जनावरे, उंदीर व मिंक यांच्या अभ्यासावरून असे दिसून आले आहे की, नरांच्या उपस्थितीत माद्या लवकर माजावर येतात. गवे व रेनडियर यांच्या माद्या पूर्णपणे माजावर येईपर्यंत नर त्यांच्या बरोबर राहतात. उलट मांजरी व नरवानरांच्या माजावर आलेल्या माद्या नराचा शोध घेतात.
माजाच्या वेळी अंडकोशातून स्रवणाऱ्या स्त्रीमदजनामुळे (उत्तेजक स्रावामुळे) नराला आकर्षित करणारे मदगंध निर्माण होतात. स्त्रीमदजनामुळे नरवानरांमध्ये जननांगक्षेत्रे मोठी व फुगीर होतात. स्त्रीमदजनामुळे एकूणच समागमाची इच्छा तीव्र होते. अशा वेळी पुष्कळ माद्या समागमोत्सुक अशा स्थितीत नरापुढे उभ्या राहतात (उदा., मांजरी, नरवानर) काही जमिनीवर लोळतात (उदा., मांजरी, सिंहीण) आणि काही नराच्या अंगाला आपले अंग घासतात, त्याला ढुश्या देतात किंवा त्याच्या अंगाखालून रांगत जातात (उदा., सिंहीण). मादीचे असे वर्तन व मदगंधाचा उपयोग ही सस्तन प्राण्यांच्या प्रणयाराधनाची वैशिष्ट्ये आहेत त्यातही मदगंधाचा उपयोगच मुख्यत्वे केला जात असल्याने सस्तन प्राण्यांचे प्रणयाराधन मासे व पक्षी यांच्या प्रणयाराधनाइतके देखणे नसते.
सस्तन प्राण्यांमध्ये समागमापूर्वीच्या नराच्या कृती कमीत कमी असतात कारण माजावर आलेल्या मादीला उद्दीपित करण्याची थोडीशीच गरज असते. मात्र नराचा मदगंध व वर्तन (उदा., आवाज करून साद घालणे) यांच्यामुळे नरमादीची भेट होण्यास मदत होते, तसेच, या गोष्टी इतर नरांना धोक्याच्या सूचनाही असतात (उदा., कुत्री, मांजरे). पुष्कळ सस्तन नरांना विणीच्या हंगामात विशिष्ट प्रकारचा वास म्हणजे मदगंध येतो काहींचा हा वास माणसालाही येऊ शकतो. काही नर हा वास आपल्या सर्वस्व क्षेत्रातील खांब, झुडपे, झाडे व इतर प्राणी यांनाही लावून ठेवतात व अशा तऱ्हेने आपल्या वर्चस्वाचे क्षेत्र निश्चित करतात (उदा., मांजर).
कळपाने राहणाऱ्या पुष्कळ प्राण्यांत बहुपत्नीत्व असते म्हणजे एक नर अनेक माद्यांचा तांडा बाळगून असतो (उदा., यूरोपियन तांबडे हरिण सील नराचा तांडा तर ४० ते ५० माद्यांचाही असतो). असा नर इतर नरांना तांड्यापासून दूर घालवून देण्याचा प्रयत्न करीत असतो कारण बहुपत्नीत्वामुळे नरांमधील स्पर्धा वाढलेली असते. मात्र ही स्पर्धा मादीला उद्दीपित करण्यासाठी नसते, तर मादीवरील आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी असते. यामुळे नरांमध्ये निकराच्या झुंजी होतात व विजयी नर मादीला घेऊन जातो (उदा., हरिण, एल्क, समुद्र सिंह). या झुंजीतूनच मृगशिंगे, सुळे, शिंगे, आयाळ किंवा स्कंधच्छद (केप) ही द्वितीयक लैंगिक वैशिष्ट्ये विकसित झाली असावीत मात्र या वैशिष्ट्यांमुळे माद्या सहजी उद्दीपित होतात, असे दिसत नाही. नरवानरांच्या कळपात मादीवरील वर्चस्वाचे संबंध अधिक स्थिर प्रकारचे असून नर क्वचित मादीसाठी भांडतात. त्याऐवजी माजावर आलेली मादी प्रबळ नराकडे जाते व त्याची विनवणी करते. मादीची प्रवृत्ती जरी प्रबळ नर पसंत करण्याकडे असली, तरी ती इतर नरांकडेही जाते. मिशा, दाढी, कल्ले, भडक रंगाचे केस तसेच,चेहऱ्यावरील व ढुंगणावरील चकचकीत चट्टे ही नरवानर नराची मादीला आकर्षित करणारी वैशिष्ट्ये आहेत. काही नरवानरांत नरमादींच्या जोड्या ठरतात व अशी जोडी कित्येक दिवस एकत्र राहते. तेव्हा ती एकमेकांच्या अंगाला अंग घासतात व एकमेकांची अंगे चाटून साफ करतात. यांमुळेही मादीला लवकर माज येणे शक्य आहे. इंडियन हॉग डियर या प्राण्यांच्या कळपात २० ते ३० प्राणी असतात व त्यांच्यातही नरमादीच्या जोड्या ठरतात. अशी जोडी कळपापासून विभक्त होऊन समागम होईपर्यंत एकत्र राहते. लांडग्यासारख्या प्राण्यांतही असे एकपत्नीत्व आढळते उलट कृंतकांसारख्या (भक्ष्य कुरतडून खाणाऱ्या प्राण्यांसारख्या) सस्तन प्राण्यांतील समागम नैमित्तिक व स्वैर असतो.
मांजरांचे प्रणयाराधन हे सस्तन प्राण्यांतील नमुनेदार प्रणयाराधन म्हणता येईल. माजावर आलेली मांजरी बोक्याला शोधते त्याच्यापुढे लोळते, डोके घासते आणि समागमोत्सुक अशा दबा धरून राहिल्यासारख्या स्थितीत त्याच्या पुढ्यात उभी राहते. उलट मादीचा मदगंध व वर्तन यांनी आकर्षित झालेला बोका विशिष्ट प्रकारे आवाज काढून तिला साद घालतो. समागमाच्या वेळी बोका मांजरीची मान पकडून ठेवतो व समागमाची पूर्तता होण्यापूर्वी तो काही धसमुसळ्या कृती करतो. या कृतींमुळे ⇨ पोषग्रंथीउत्तेजित होऊन अंडमोचनास सुरुवात होत असावी. कुत्राकुत्री पुढील पंजे ताणून दबा धरून बसल्यासारखी बसतात व डोकी एका बाजूस वळवितात, नंतर पुढील पाय एकमेकांच्या गळ्यांत घालतात व काहीसा कुस्ती खेळल्यासारखा आव आणतात. शेवटी एकमेकांपासून दूर पळत जातात व हुलकावण्या देत पाठलाग करतात.
पुष्कळ प्रगत समखुरी प्राण्यांच्या प्रणयाराधनातील नराचे नेहमीचे वर्तन म्हणजे मादीचे मूत्र हुंगणे व चाटणे आणि नंतर ओठ वर वळवून डोके किंचित वर उचलणे हे होय. यामुळे मादी माजावर आली की नाही ते समजत असावे. आफ्रिकी बारशिंगा (कुदू), बुशबक यांसारख्या हरिणांत नर मादीच्या मागोमाग जातो व अनेक वेळा तिच्या मानेवर नाक घासतो. टॉम्सन कुरंगांत वरील प्रकारचे वर्तन केल्यावर नर मादीच्या अगदी जवळ राहून तिच्यामागे पळतो व शेवटी पुढील पायांनी तिच्या मागील पायांवर हळूच थोपटतो. मादीला समागमाची इच्छा आहे की नाही हे पाहणे, स्पर्शाची सवय करणे किंवा तिला समागमासाठी उद्युक्त्त करणे हा या स्पर्शामागील हेतू असू शकेल.
विषमखुरी प्राण्यांचे प्रणयाराधन यामानाने साधे असते. उदा., गाढव गाढवीला चावतो, लाथा मारतो व तिच्यामागे धावतो. बर्चेल झीब्र्याची मादी माजावर आल्यानंतर नरापुढे वैशिष्ट्यपूर्ण रीतीने उभी राहते. तेव्हा ती पाय किंचित फाकवते, शेपटी वर उचलते व चेहऱ्यावर समागमोत्सुक असे भाव आणते. रानटी घोड्यातही काहीसे असेच वर्तन आढळते. सहचर अनोळखी असल्याने गेंडा व टॅपिर यांचे प्रणयाराधन अधिक श्रमसाध्य असते. त्यांच्यात नर मादी एकमेकांचा पाठलाग करतात नंतर त्यांच्यात हळुवार भांडण होते व शेवटी नर मादीच्या ढुंगणावर डोके ठेवतो.
देवमाशांत नरमादी विणीच्या हंगामात एकमेकांच्या शेजारी पोहत असतात. तेव्हा ती एकमेकांच्या अंगावर अंग घासतात, एकमेकांना बिलगतात किंवा नाकावर नाक घासतात घुमणारा आवाज निघेल अशा प्रकारे परांनी एकमेकांस मारतात आणि पाण्याबाहेर उडी घेऊन मोठ्या प्रमाणात पाण्याचे शिंतोडे उडतील अशा प्रकारे पाण्यात धप्पदिशी पडतात. वसा-तिमी (स्पर्म व्हेल) नर प्रणयाराधन करताना शेपटी फडफडवून नाच करतो नरमादी एकमेकांना कुरवाळतात, खोलवर सुरकांडी मारतात आणि पूर्ण शरीर पाण्याबाहेर येईल अशा प्रकारे उडी मारतात.
काही थोड्या कपींमध्ये व विशेषतः मानवात समागमाचा काळ ठराविक असा नसतो आणि मादी माजावर नसतानाही समागमोत्सुक असू शकते. स्त्री समागमोत्सुक असण्याचा ठराविक काळ नसल्याने तिला उद्दीपित करण्याची आवश्यकता असते आणि त्यामुळे पुरुषांकडून प्रणयाराधन केले जाण्याची प्रवृत्ती विकसित झाली असावी, असे सुचविण्यात येते. तथापि मानवातील प्रणयाराधन मुख्यत्वे केवळ समागमाऐवजी जोडी जमविण्यासाठी असते शिवाय मानवाच्या प्रणयाराधनात पुष्कळ सामाजिक वर्तनविषयक अडथळेही असतात. त्यामुळे ते अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे व म्हणून केवळ साध्या जीववैज्ञानिक स्पष्टीकरणाद्वारे त्याचा खुलासा करता येणे शक्य नाही.
ठाकूर, अ. ना.
मानवातील :मानवी समाजातील प्रणयाच्या आविष्कारामागील मूलभूत प्रेरणा इतर सजीव सृष्टीतील प्रेरणांसारख्याच लैंगिक परिपूर्तीशी निगडित असतात. मात्र त्यांवर समूहातील परंपरा, प्रथा, रूढी आणि एकूणच संस्कृतीचा प्रभाव फार मोठा असतो म्हणून मानवी प्रणयाराधन ही स्त्री-पुरुषांतील एक सामाजिक आंतरक्रियाच आहे, असे म्हणता येईल. स्त्री ही निसर्गतःच संथ प्रतिसाद देणारी असल्यामुळे प्रणयाची आराधना प्रामुख्याने पुरुषांकडूनच केली जाते. काही थोडे मानवी समूह असे आहेत, की जेथे प्रणयाराधनात स्त्रिया पुढाकार घेतात. जगातील काही आदिम जमातींत आणि भारतातील नायर जमातीसारख्या काही मानवी गटांत पूर्वी मातृसत्ताक पद्धती अस्तित्वात होती. संपत्तीचा वारसा मातृवंशाकडून येत असे. जन्माला आलेली मुले मातृगृहनिवासी असत. या स्वरूपाच्या समाजात स्त्रियांनी प्रणयाराधनात पुढाकार घेणे संभवते.
प्रणयाराधनाचा अंतिम हेतू लैंगिक समाधान मिळवणे हा असतो. वंशसातत्य टिकवण्याची प्रेरणाही त्याच्या मुळाशी असते, असे मानले जाते. वंशसातत्याची प्रेरणा मान्य केली, तर मानवी समाजात प्रणयाराधनाची परिणती विवाहात झाली पाहिजे. विवाहासाठी स्त्रीने कबूल व्हावे, या उद्देशाने पुरुषाने केलेला तिचा अनुनय म्हणजे प्रणयाराधन, असा अर्थ होतो. प्रणयाराधन हे विवाहोत्तर काळातदेखील संभवते परंतु त्याला वैवाहिक जीवनातील प्रेम अशी संज्ञा आपण देतो. शिवाय पुरुषप्रधान संस्कृतीत आणि जेथे स्त्री ही केवळ उपभोग्य वस्तू म्हणूनच मानली जाते तेथे ती पतीची मालमत्ताच समजली जाते. नंतर हक्काची वस्तू उपभोगण्यासाठी अनुनयाची आवश्यकताच उरत नाही. इतिहासात पुरुष हा नेहमीच स्त्रीवर अधिसत्ता गाजवताना दिसतो तथापि प्रणयाराधनाचाच काळ असा आहे, की जेव्हा तो तिचा अनुनय करून तिला वश करून घेण्याचा प्रयत्न करतो.
विशिष्ट प्रकारच्या समाजरचनेत वधूवरांचे विवाह आईवडिलांकडून ठरवले जातात. अशा ठिकाणी विवाहपूर्व प्रणयाराधनास वावच नसतो. तथापि विवाहानंतर समागमासाठी वधूची मानसिक तयारी होणे आवश्यक असल्यामुळे अशा समाजव्यवस्थेतदेखील प्रणयाराधनाच्या काही प्रथा निश्चित झालेल्या आढळतात. विवाहसमारंभात वा तो झाल्यानंतर फलशोभनाच्या दिवसापर्यंत पतिपत्नींनी एकत्र आंघोळी करणे, एकमेकांच्या अंगावर दुधाच्या, पाण्याच्या चुळा टाकणे, झाकल्या मुठीतील सुपारी सोडवणे, पतीने दाताने धरलेली लवंग पत्नीने दातानेच तोडणे इ. जे प्रकार हिंदू समाजात केले जात असत, त्यामागे नववधूच्या मनात पतीविषयी आत्मीयता निर्माण होऊन, समागमासाठी तिची मानसिक तयारी व्हावी, हाच हेतू असावा. ज्या समाजात तरुणतरुणी स्वतःच आपला जोडीदार निवडतात, तेथेदेखील प्रणयाराधनाचे काही संकेत अस्तित्वात असतात. शारीरिक सामर्थ्याचे प्रदर्शन करून वधू जिंकणे, हा प्रकार काही आदिम आणि काही प्राचीन जमातींतदेखील दिसून येतो. विवाहसंस्था अस्तित्वात येण्यापूर्वी जी अवस्था होती, तिचा तो अवशेष असावा. वधूला पळवून नेऊन लग्न करणे ही चाल काही आदिम जमातींत प्रतीकरूपात दिसून येते. प्राचीन भारतात क्षत्रिय जमातींत राक्षस विवाह म्हणजे पुरुषाने मुलगी पळवून आणून तिच्याशी विवाहबद्ध होणे, हा समाजमान्य प्रकार होता. उदा., कृष्णाने रुक्मिणीशी अशा प्रकारे विवाह केला होता. प्राचीन हिंदुधर्मशास्त्राने मान्य समजलेला गांधर्व विवाह हा प्रणयाराधनाचाच आविष्कार आहे. मत्स्यगंधेची प्रणयाराधना करून पराशर ऋषींनी तिच्याशी समागम केल्याचे उदाहरण आढळते. दुष्यंताने शकुंतलेची केलेली प्रणयाराधना, शंतनूने गंगेची केलेली मनधरणी अशा कितीतरी घटना सांगता येतील. पार्वतीने केलेली शंकराची प्रणयाराधना वैशिष्ट्यपूर्ण आहे. स्वर्गातील अप्सरा कृतक प्रणयाराधनाच्या हेतूने पृथ्वीवर पाठवल्या जात. विश्वामित्राचा तपोभंग करण्यासाठी मेनकेला पाठवण्यात आले होते.
युवागृहांचे (डॉर्मिटरी) अस्तित्व अनेक आदिवासी जमातींत दिसून येते. तेथे विवाहयोग्य तरुणतरुणी एकत्र राहतात परस्परांशी मैत्री वाढवतात त्यांचे लैंगिक संबंधही प्रस्थापित होतात मगच त्यांचा विवाह होतो. अशा जमातींत नृत्य, गायन, खेळ अशा अनेक मार्गांनी प्रणयाराधन केले जाते. आदिवासी समाजात प्रणयाराधनासाठी यातुविद्येचादेखील उपयोग केला जातो. प्रिय व्यक्तीला वश करून घेण्याच्या उद्देशाने पुढील काळात वशीकरणाचे जे अनेक प्रकार विकसित झाले, ते यातुविद्येतूनच. अथर्ववेदात वशीकरणाचे मंत्र सांगितलेले आहेत. पुरुषांचे मन आकर्षित करून घेण्यासाठी अलंकार घालणे, गोंदवून घेणे इ. प्रकार स्त्रियांमध्ये रूढ झाले. जी स्त्री गोंदवून घेत नाही, ती स्त्री विवाहास अयोग्य असा संकेत काही आदिम जमातींत दिसून येतो.
सुधारलेल्या नागर समाजातही प्रणयाराधनाचे विविध प्रकार दिसून येतात. स्त्रीचा प्रतिसाद संथ असल्यामुळे मानवी प्रणयाराधनाचा काळही प्रदीर्घ असू शकतो. नृत्य, गायन, काव्य यांच्या साहाय्याने जोडीदारास वश करण्याचे तंत्र नागर समाजातदेखील वापरले जाते. इतर जीवसृष्टीतील प्रणयाराधनात गंधसंवेदनेचे कार्य महत्त्वपूर्ण असते. मानवी प्रणयातदेखील सुगंधी द्रव्ये, अत्तरे, फुले, फुलांचे गजरे यांचा वापर पूर्वीपासून होत आलेला आहे. वात्स्यायनाने कामसूत्रात प्रणयाराधनाचे विविध मार्ग सांगितले आहेत. उदा., प्रिय व्यक्तीला आकर्षक भेटवस्तू अर्पण करणे, तिची सतत स्तुती करीत राहणे इत्यादी. मानवी प्रणयाराधनात शब्दांचे सामर्थ्य फारच मोठे आहे. स्त्रिया स्तुतिप्रिय असतात, असे समजले जाते म्हणून प्रिय स्त्रीचा गौरव करून तिला वश करून घेणे सहजच शक्य असते. स्त्रीच्या भावनांना प्रतिसाद देणे, तिच्या मनात आपल्याविषयी विश्वास निर्माण करणे, हे शब्दांच्या माध्यमानेच साध्य होते. प्रणयाराधनात विनोदाचेही स्थान महत्त्वपूर्ण आहे. विनोदामुळे वातावरणातील ताण कमी होतो व अधिक मोकळेपणा निर्माण होतो. सहली, प्रवास यांमधून प्रणयाराधनास अनुकुल वातावरण निर्माण होते. औद्योगिकीकरण व शहरीकरण झालेल्या समाजात चित्रपट, दूरदर्शन, रेडिओ, सभासंमेलने इ. आधुनिक साधनांचा उपयोग करून प्रिय व्यक्तीचा सहवास मिळविता येतो.
यूरोप आणि अमेरिकन समाजांत संकेतभेटीची (डेटिंग) प्रथा समाजमान्य झालेली आहे. विशेषतः अमेरिकन समाजात संकेतभेटीला अत्यंत महत्त्व आहे संकेतभेट हा प्रणयाराधनाचा एक मार्ग आहे. संकेतभेटीने प्रणयाराधनास प्रेरणा मिळू शकते. वयात येणाऱ्या भिन्न लिंगी व्यक्तींच्या सहवासाची योजना म्हणजे संकेतभेट. मनोरंजन, व्यक्तिमत्त्वाचा विकास, भावनेचा परिपोष, जोडीदाराची निवड इ. अनेक प्रकारच्या प्रेरणा संकेतभेटीच्या मागे असण्याची शक्यता असते. शाळा-महाविद्यालयांतून मुलेमुली एकत्र येतात व सहवास वाढत जातो. यातूनच विवाहासाठी जोडीदार निवडण्याची संधी प्राप्त होते.
मानवेतर जीवसृष्टीमध्ये समागमाचे एक कालचक्रच असते. विशिष्ट ऋतूमध्येच त्यांचा समागम होतो व प्रजोत्पादन होते. मानवी समाजात समागमाचा व प्रजोत्पादनाचा ठराविक असा काळ नसतो. तरीपण वसंत ऋतू हा मानवेतर जीवसृष्टीला समागमास प्रोत्साहन देतो, त्याचप्रमाणे मानवी प्रणयभावनादेखील या ऋतूत उमलू लागतात. प्राचीन ग्रीक काळातील तरुणतरुणींचे वसंतोत्सवासारखे समारंभ याचे निदर्शक होत. मदनोत्सवाचे अनेक समारंभ प्रणयाविष्काराला मुक्त वाव देतात, असे अनेक समाजांतून दिसून येते.
परळीकर, नरेश
संदर्भ : 1. Bastock, M. Courtship : A Zoological Study, New York, 1967.
2. Benda, Clemens E. The Image of Love, New York, 1961.
3. Fromm, Erich, The Art of Loving, London, 1965.
4. Manning, A. An Introduction to Animal Behaviour, Reading, Mass., 1967.
“