पोषण : एककोशिकीय (एकाच पेशीच्या बनलेल्या) जीवांपासून ते जटिल अशा स्तनी प्राण्यांपर्यंतच्या सर्व प्राण्यांना व वनस्पतींना त्यांच्या क्रियाशील जीवनासाठी आणि यशस्वी प्रजोत्पादनासाठी वा पुनरुत्पादनासाठी काही खाद्य पदार्थ किमान स्वरूपात व प्रमाणात लागतात. हे पदार्थ काय आहेत? त्यांचे कार्य असे होते? या पदार्थांचे प्रमाण कमी वा जास्त झाल्यास काय परिणाम होतात? पोटात गेल्यावर त्यांचे काय होते? इत्यादी तत्संबंधी प्रश्नांशी पोषण निगडित आहे. ‘अत्राचे शास्त्र व त्यातील पोषक घटक आणि त्यांचा आरोग्याशी असणारा संबंध’ अशी पोषणाची व्याख्या करता येईल. ⇨जीवरसायनशास्त्र, शरीरक्रियाविज्ञान आणि एंझाइमविज्ञान (सजीव कोशिकांमध्ये तयार होणाऱ्या व रासायनिक विक्रिया घडविण्यास मदत करणाऱ्या प्रथिन संयुगांचे विज्ञान) ह्या शास्त्रांशी पोषणाचा संबंध येतो. पोषण आणि ही शास्त्रे एकमेकांत इतकी गुंफलेली आहेत की, काही वेळा त्यांच्यातील फरक दाखविणे शक्य होत नाही. विविध प्रकारच्या प्रत्येक सजीवाच्या पुढील दोन पोषणविषयक गरजा असतात : (१) ज्यांच्यापासून ऊर्जा उत्पत्र होते असे पदार्थ अन्न म्हणून खाणे व (२) ज्या पदार्थांचे सजीवांच्या क्रियात्मक वा संरचनात्मक गरजा भागविणे हे प्राथमिक कार्य आहे असे पदार्थ. काही पदार्थ दोन्ही प्रकारच्या गरजा भागवू शकतात. एका जातीतील जीवांना लागणाऱ्या पोषणविषयक पदार्थांचे प्रमाण दुसऱ्या जातीतील जीवांच्या बाबतीत जास्त असेल, कमी असेल वा निराळे असेल. काही जीव काही वेळा हे पदार्थ इतर पदार्थांपासून तयार करू शकतात. त्यामुळे एका जातीबद्दलच्या पोषणविषयक ज्ञानावरून दुसऱ्या जातीच्या जीवासंबंधीचे पोषणविषयक अंदाज बांधणे कठीण जाते.
स्वतंत्र रीत्या जगणाऱ्या वा जटिल ऊतकाचा (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहाचा) भाग असणाऱ्या जिवंत कोशिकांना एक वा अनेक अकार्बनी पदार्थ, विविध स्वरूपांतील कार्बन व नाइट्रोजन यांची गरज असते. प्रत्येक जीवाच्या बाबतीत जटिल कार्बनी पदार्थांची गरज वेगवेगळी असते. प्रथिने व जीवनसत्त्वे ही काही प्राणिजातींना अत्यावश्यक असतात, तर त्यांची वनस्पतींना गरज नसते कारण त्यांची निर्मिती कार्बन डाय-ऑक्साइड, पाणी व अमोनिया यांपासून वनस्पती स्वतःच करतात. उलट प्राणी हे पदार्थ स्वतः तयार करू शकत नसल्यामुळे असे पदार्थ त्यांना इतरांकडून मिळवावे लागतात. हा जीवाजीवांमधील फरक पोषणाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. काही जातींकडून कार्बन आणि नायट्रोजन यांच्या साध्या रेणवीय संरचनेच्या संयुगांचे जटिल रेणूंत रूपांतर होते आणि या जटिल रेणूंचा वापर उच्च जातींतील जीवांकडून केला जातो व ते परत त्यांपासून लहान लहान रेणूंची संयुगे तयार करतात. हे चक्र दीर्घकाल चालू राहते व त्यात फक्त ऊर्जाच खर्ची पडते. काही कारणांनी हे चक्र दीर्घकाळ खंडित झाले, तर पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट होण्याची शक्याची आहे.
वनस्पती : कार्बन, नायट्रोजन व खनिजे यांचा वनस्पतींना असलेल्या गरजेविषयी बरेच ज्ञान झालेले आहे. वनस्पतींच्या वाढीला व पुनरुत्पादनाला काही मूलद्रव्ये वा खनिजे अत्यंत अत्यल्प प्रमाणात आवश्यक असतात. बोरॉन व सिलिकॉन ही मूलद्रव्ये वनस्पतींना अत्यल्प प्रमाणात लागतात पण ती प्राण्यांना लागत नाहीत. वनस्पतींचे चांगले पोषण होणे हे प्राण्यांच्या पोषणाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असते. कारण अशा वनस्पती प्राणी खातात व पर्यायाने प्राण्यांना वनस्पतींकडून अत्यल्प प्रमाणातील मूलद्रव्ये वा खनिजे उपलब्ध होऊ शकतात. [→खते चयापचय प्रकाशसंश्लेषण वनस्पतींचे खनिज पोषण] .
सूक्ष्मजीव : सूक्ष्मजंतू, बुरशी व यीस्ट ह्यांच्या पोषणास कोणती द्रव्ये आवश्यक असतात यासंबंधीचे संशोधन झालेले आहे. सूक्ष्मजीवांच्या जातीजातींत पोषणविषयक गरजा वेगवेगळ्या असतात, तसेच एकाच जातीमधील अनेक वाणांच्याही गरजा निरनिराळ्या असतात, असे आढळून आलेले आहे. वनस्पतींप्रमाणे सूक्ष्मजीवांना जटिल कार्बनी पदार्थांची गरज नसते. अमोनियाच्या लवणांच्या स्वरूपातील नायट्रोजन, कार्बोनेटासारख्या साध्या स्वरूपातील कार्बन व खनिजे यांच्यामुळे काही सूक्ष्मजीवांची वाढ व जनन होऊ शकते, तर काही सूक्ष्मजीवांना मानवाला लागतात तसे जटिल पदार्थ त्यांसाठी आवश्यक असतात. अशा जीवांना ⇨ ॲमिनो अम्ले, ⇨जीवनसत्त्वे, ⇨ कार्बोहायड्रेटे आणि खनिजे ही रसायनाच्या स्वरूपात दिल्यास त्यांचे योग्य पोषण होते पण यांतील एखादा पदार्थ न दिल्यास वा कमी पडल्यास त्यांची वाढ खुंटते.
सूक्ष्मजीवांमुळे उच्च जातींतील प्राण्यांच्या पोषणाच्या व जीवरसायनशास्त्राच्या अभ्यासास मदत होते. सूक्ष्मजीवांमुळे खाद्य पदार्थांचे शरीरात संश्लेषण (घटक पदार्थांपासून नवीन पदार्थ तयार होणे) व अपघटन (घटक पदार्थांत विभाजन होणे) कसे होते, हे अभ्यासता येते. सर्वसाधारणतः महत्त्वाच्या पोषक व जैव पदार्थांच्या बाबतीत असा अभ्यास करण्यात येतो. क्ष-किरणांनी काही सूक्ष्मजीव खराब होतात व त्यामुळे संश्लेषण व अपघटन या क्रियांत बिघाड होतो. हे होऊ नये म्हणून त्यांना मुद्दाम काही नवीन पदार्थ द्यावे लागतात. तसेच आतड्यातील सूक्ष्मजीवांमुळे बऱ्याच पदार्थांचे अपघटन वा संश्लेषण होते. हे सूक्ष्मजीव त्यांना लागणारे पोषक घटक इतर पदार्थांपासून तयार करतात. तथापि सूक्ष्मजीवांचे प्राण्यांच्या पोषणातील महत्त्व काय आहे, हे निश्चित सांगणे कठीण आहे. प्रतिजैव पदार्थ (अँटिबायॉटिक्स) व सल्फा औषधे यांसारख्या पदार्थांमुळे या सूक्ष्मजीवांचा नाश होतो. त्यामुळे त्यांच्याद्वारे तयार होणाऱ्या जीवनसत्त्वांचा पुरवठा बाहेरून करावा लागतो. [→ सूक्ष्मजीवविज्ञान] .
प्राणी : वनस्पती व सूक्ष्मजीव यांच्यापेक्षा उच्च वर्गातील प्राण्यांचे जीवन गुंतागुंतीचे असते, तसेच प्राण्यांचे पोषण काही बाबतींत वनस्पती व सूक्ष्मजीव यांच्यापेक्षा भिन्न असते. अशा प्राण्यांना त्यांच्या जीवनास, सर्वसाधारण विकासास व जननास आधी तयार झालेले जटिल कार्बनी पदार्थ आवश्यक असतात व ते त्यांच्या अन्नातच असणे आवश्यक असते. प्राण्यामध्ये पोषण हे कोशिकांमधील फरकाबरोबरच जटिल ऊतकांमधील फरकांवरही अवलंबून असते. प्राणी हे अन्नासाठी वनस्पती व सूक्ष्मजीव यांवर सर्वथा अवलंबून असतात. प्राण्यांमधील स्नायूंच्या हालचालींमुळे त्यांना जादा ऊर्जेची गरज असते. त्यांच्या सवयी, गरजा व स्वभाव वैचित्र्य यांचा त्यांच्या आहारावर परिणाम होतो.
मनुष्य व इतर प्राण्यांप्रमाणेच पोषणासाठी व क्रियाशील जीवनासाठी पशूंना खाद्याची जरूरी आहे. खाद्यातील पोषण घटकांच्या पचनामुळे पशूंना उर्जा मिळून त्यांच्यापासून अपेक्षित असलेले काम व उत्पादन करण्याची क्षमता प्राप्त होते. गाय, म्हैस, शेळी यांसारख्या रवंथ करणाऱ्या पशूंचे पोट चार कप्प्यांचे असते व घोडा, कुत्रा, ससा यांसारख्या प्राण्यांचे पोट एकाच कप्प्याचे असते. या फरकामुळे त्यांच्या पचन तंत्रामध्ये (संस्थेमध्ये) फरक असणे साहजिकच आहे. असे असले तरी त्यांना लागणाऱ्या खाद्यातील प्रथिने, कार्बोहायड्रेटे, वसा (स्निग्ध पदार्थ), पाणी, खनिज पदार्थ व जीवनसत्त्वे या पोषण घटकांमध्ये फरक पडत नाही. रवंथ करणारे पशू वरील पोषण घटकांची जटिल संयुगे पचवू शकतात, तचेस त्यांना काही प्रमाणात तंतुमय चाऱ्याची आवश्यकता असते. तसेच निरनिराळ्या पशूंतील शरीरक्रियावैज्ञानिक फरकांमुळे वरील पोषण घटक कमीजास्त प्रमाणात लागतात इतकेच. पशूंचे पोषण व पदार्थ यांसंबंधीची अधिक माहिती ‘पशुखाद्य’या नोंदीमध्ये दिलेली आहे.
मानवी पोषणाचा अभ्यास आहार व त्यातील आवश्यक घटक, त्यांचे शरीरातील कार्य, त्यांच्या अभावामुळे वा अतिसेवनामुळे निर्माण होणारे दुष्परिणाम इ. विविध दृष्टींनी झालेला आहे. प्रस्तुत नोंदीच्या उर्वरित भागात मुख्यत्वे मानवी पोषणासंबंधी अधिक तपशीलवार माहिती दिली आहे.
ऊर्जा-गरज : ऊर्जा ही कोशिकांची व पर्यायाने प्राणिशरीराची मूलभूत गरज असते. जर ऊर्जा दिली नाही, तर कोशिकांची कार्य करण्याची क्षमता कमी कमी होऊन शेवटी त्यांच्यातील जीवनक्रिया थांबते. सामान्यतः ही गरज योग्य ऊर्जेचे अन्न खाऊन भागविली जाते. उपासमारीतही ऊर्जेची गरज असते पण या वेळी ती शरीरातील वसा, कार्बोहायड्रेटे व काही प्रमाणात प्रथिने यांच्या राखीव साठ्यातून भागविली जाते. हा साठा जेव्हा संपतो तेव्हा मृत्यू ओढवतो. मृत्यूच्या आधीच्या काळात प्राण्याची क्रियाशीलता कमी कमी होत जाते व तो ऊर्जेची बचत करीत असतो.
शरीराच्या विविध गरजांच्या पूर्ततेसाठी ऊर्जा द्यावी लागतो. प्रौढांमध्ये ऐच्छिक स्नायूंचे कार्य व इतर ऊर्जा-व्यय कार्ये वगळता शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी ऊर्जा लागते. सामान्यतः शरीराचे तापमान राखणे, श्वसन, हृदयाचे स्पंदन इ. मूलभूत गरजांव्यतिरिक्त ऐच्छिक स्नायूंचे कार्य हीही एक मूलभूत नसलेली गरज असते. व्यक्तीच्या कार्यानुसार त्याची ऊर्जा-गरज अवलंबून असते. ही ऊर्जा-गरज भागाविण्यासाठी जे अन्न घेतले जाते त्याचा वापर बहुतांशी एखाद्या इंधनासारखाच होत असल्यामुळे त्याचे ऊर्जामूल्य (वा उष्णतामूल्य) काढण्यासाठी हे ऊर्जामूल्य प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे मोजण्यासाठी कॅलरी हे एकक वापरले जाते. बाँब उष्णतामापक [→ उष्णतामापन], श्वसन उष्णतामापक [श्वसन निर्देशांक मोजण्यासाठी वापरण्यात येणारा →चयापचय] इ. साधनांचा वापर करतात. श्वसन निर्देशांकामुळे न्यूनतम चयापचय मूल्य (मान) मिळते. लहान मुलांत हे मूल्य जास्त असते. तारुण्यावस्थेपर्यंत ते वाढते व नंतर ते स्थिर राहते. मग ५० वर्षांपर्यंत ते तसेच राहते व नंतर कमी कमी होते. हे मूल्य लिंग फरक, अन्नाचा प्रकार व परिस्थिती (हवामान, तापमान इ.) यांवरही अवलंबून असते.
मानवाच्या बाबतीत ऊर्जा-गरज मोजणे हे शरीराचे वजन, उंची व लिंग यांतील फरकांमुळे (म्हणजेच निरनिराळ्या मानवी शरीरांच्या आकारात व आकारमानात फार फरक आढळून येत असल्यामुळे) कठीण जाते. ही ऊर्जा-गरज मोजण्यासाठी शरीराच्या पृष्टभागाचे क्षेत्रफळ काढावे लागते आणि त्याकरिता १९१५ मध्ये ई. एफ्. द्यूब्वा व डी. द्यूब्वा यांनी अनेक प्रयोग करून वजन व उंची यांवर आधारलेले खालील सूत्र मांडले.
A = W0·425 X H0·735 X 71·84
या सूत्रात A हे शरीराच्या पृष्टभागाचे क्षेत्रफळ (चौ. सेंमी.मध्ये), W हे वजन (किग्रॅ.मध्ये) व H ही उंची (सेंमी.मध्ये) आहेत. या सूत्राचा उपयोग करून १९१७ साली जे. सी. ऑब व ई. एफ्. द्यूब्वा यांनी न्यूनतम चयापचयाचे मूल्यशरीराच्या प्रति चौ. मी. पृष्टभागातून प्रति तास बाहेर टाकण्यात येणाऱ्या (कॅलरीत मोजण्यात येणाऱ्या) उष्णतेच्या रूपात काढण्यासाठी एक कोष्टक तयार केले.
पोषणाचे घटक : मानवी अन्नाचा मोठा भाग कार्बोहायड्रेटे, वसा, प्रथिने व पाणी हे चार पोषण घटक व्यापतात. एंझाइमे, जीवनसत्त्वे व खनिज अत्यल्प प्रमाणात लागतात. पोषणाच्या दृष्टीने सर्व घटक महत्त्वाचे आहेत, तर काही घटक महत्त्वाची कार्ये करतात.
कार्बोहायड्रेटे : बहुतकरून कार्बोहायड्रेटे ही स्टार्च व डायसॅकॅराइडे या रूपांत अन्नात असतात. शरीरात त्यांचे ग्लुकोज, फ्रुक्टोज ह्यांसारख्या एकशर्करांत रूपांतर होऊन रक्तावाटे त्यांचा कोशिकांना पुरवठा होतो. ही सर्व क्रिया एंझाइमांमुळे होते. आरोग्याच्या दृष्टीने कार्बोहायड्रेटांच्या वापरावर नियंत्रण असणे आवश्यक असते, नाहीतर अनेक विकार उद्भवतात. उदा., इन्शुलिनामुळे ग्लुकोजचा वापर होतो. यात बिघाड झाल्यास मधुमेह होतो. [→ कार्बोहायड्रेटे चयापचय पचन तंत्र].
वसा : पोषणाच्या दृष्टीने दुसरा महत्त्वाचा घटक. अन्नातून तेले व वसाम्ले या स्वरूपांत ते शरीरात येते. वसेचे पचन प्रथम आतड्यात होते व तिचे लायपेज या एंझाइमामुळे जलीय विच्छेदन होऊन (पाण्याच्या विक्रियेने घटक सुटे होऊन) वसाम्लांत रूपांतर होते. ही वसाम्ले रक्तावाटे कोशिकांमध्ये जातात व तेथे त्यांचे पुढील पचन होते. तसेच त्वचेनजीक वसा व वसाम्ले साठतात. [→चयापचय तेले व वसा पचन तंत्र लिपिडे वसाम्ले].
प्रथिने : प्रथिनांमुळे शरीराला ऊर्जा मिळते. त्याचबरोबर शरीरातील प्रथिननिर्मितीस आवश्यक असणाऱ्या ॲमिनो अम्लांचा पुरवठा होतो. प्रथम पेप्सिनामुळे व नंतर ट्रिप्सिनामुळे प्रथिनांचे अपघटन होऊन ॲमिनो अम्ले तयार होतात व ती रक्तावाटे कोशिकांत जातात व तेथे त्यांचे शरीर-प्रथिनांत रूपांतर होते. प्रथिनांमुळे शरीरातील नायट्रोजनाचा समतोल राखला जातो. सर्व प्रथिनांचा उपयोग पोषणासाठी आवश्यक नसतो. काही प्रथिनेच त्यासाठी उपयुक्त असतात. [→ चयापचय पचन तंत्र प्रथिने].
एंझाइमे : शरीरातील अन्नाचे पचन करण्यासाठी आवश्यक असणारे पदार्थ. हे शरीरात तयार होतात पण ज्यापासून ते जलद तयार होऊ शकतील असे पूर्वगामी पदार्थ अन्नातून शरीरात जातात. तसेच काही फळांतूनही ते उपलब्ध होऊ शकतात. हे पदार्थ प्रथिने असतात. बरीच एंझाइमे वेगळी करण्यात आलेली असून त्यांच्या कार्याचा अभ्यास करण्यात आला आहे. काही औषधांमुळे शरीरातील एंझाइम-क्रिया बिघडते. त्या वेळी ती बाहेरून द्यावी लागतात. [→ एंझाइमे चयापचय पचन तंत्र].
पाणी : मानवी शरीराच्या वजनाच्या ६०% इतके पाणी शरीरात असते व ते चयापचय क्रियेत महत्त्वाचे कार्य करते. जिवंत प्राणी व वनस्पती यांच्या जीवनाशी संबंधित असणाऱ्या रासायनिक विक्रिया ह्या विद्रावात होणाऱ्या बदलांशीच शेवटी निगडित असतात आणि त्यासाठी पाणी हे महत्त्वाचे द्रव माध्यम आहे. प्राणी जितका वयाने लहान तितके त्याच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण जास्त असते व लट्ठ प्राण्यात पाण्याचे प्रमाण कमी असते, असे आढळून आले आहे. तोंडावाटे घेतलेले पाणी व चयापचयामुळे तयार झालेले पाणी यांची कोशिकांमध्ये अदलाबदल होते, असे जड व किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकण्याचा गुणधर्म असणाऱ्या) पाण्याच्या [→ ड्यूटेरियम, ट्रिटियम व जड पाणी] साहाय्याने केलेल्या अभ्यासावरून दिसून आले आहे. प्रथिने व इतर घटक यांमुळे कोशिकांतील काही पाणी बंधित करून ठेवलेले असते. काही सजीवांना पाणी अतिशय कमी प्रमाणात लागते पण पाण्याशिवाय कोणताही जीव जगू शकणार नाही.
जीवनसत्त्वे : प्राणिमात्रांच्या विशेषतः मानवाच्या, पोषणाच्या दृष्टीने हे पदार्थ महत्त्वाचे आहेत. प्राण्यांच्या शरीरात ती तयार होत नाहीत. त्यांसाठी त्यांना इतरांवर अवलंबून राहावे लागते. वनस्पतींमध्ये मात्र असे पदार्थ तयार होतात. त्यामुळे त्यांना ते बाहेरून घ्यावे लागत नाहीत. [→ चयापचय जीवनसत्त्वे पचन तंत्र].
खनिजे : अन्नातील महत्त्वाच्या पोषक घटकांच्या पोषणासाठी ज्या रासायनिक विक्रिया घडतात त्यांसाठी विविध खनिजांची आवश्यकता असते. ही खनिजे आपणाला अन्नातून अल्प प्रमाणात मिळतात व शरीरास अल्प प्रमाणातच त्यांची आवश्यकता असते. या खनिजांशिवाय शरीरातील कोणत्याही एंझाइमांचे कार्य सुलभपणे चालू शकणार नाही. काही खनिजांचे परिणाम चांगले, काहींचे वाईट तर काहींचे दोन्ही असू शकतात. सजीवांना कोणती खनिजे लागतात व ती किती प्रमाणात आवश्यक असतात याबद्दल शास्त्रज्ञांत एकमत नाही. जीवनास आवश्यक अशी कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन व गंधक ही पाच मूलद्रव्ये रेणवीय स्वरूपात कार्बोहायड्रेटे, वसा, प्रथिने यांच्या रूपाने अन्नात असतात. त्यांशिवाय इतर मूलद्रव्येही अत्यल्प प्रमाणात आयनी (विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगट) अवस्थेत अन्नातून घेतली जातात पण त्यांना रूढार्थाने ‘खनिजे’ या नावानेच संबोधित जाते. जवळजवळ ४५—५० मूलद्रव्ये संपूर्ण व निरोगी जीवनास आवश्यक असतात, असे आढळून आले आहे. १९२८ पर्यंत आयोडीन व लोह ही खनिजे आवश्यक समजली जात होती. १९२८—३५ या काळात तांबे, जस्त, मँगॅनीज व कोबाल्ट ही चार धातुरूप खनिजेही जीवनास आवश्यक समजली गेली. पुढील ३० वर्षांच्या काळात क्रोमियम, सिलिनियम व मॉलिब्डेनम खनिजे आवश्यक आहेत असे आढळले. १९७० नंतर या यादीत फ्ल्युओरीन, सिलिकॉन, कथिन व व्हॅनेडियम यांची त्यांत भर पडली.
मानवी आहारातील खनिजांची विभागणी दोन प्रकारांत करतात : (१) बृहत् मात्रिक आणि (२) सूक्ष्ममात्रिक. जी खनिजे जादा प्रमाणात आढळतात (उदा., कॅल्शियम शरीरात १·२ किग्रॅ. भरेल इतके असते) त्यांनाच बृहत् मात्रिक मूलद्रव्ये म्हणतात. जी खनिजे शरीरात अत्यल्प प्रमाणात (२०,००० भागांत १ भाग) असतात त्यांना सूक्ष्ममात्रिक मूलद्रव्ये म्हणतात (उदा., आयोडीन फक्त ०·०११ ग्रॅमच असते).
प्रौढ माणसाच्या शरीरात त्याच्या एकूण वजनाच्या एकूण ४-५% इतकी खनिजे असतात. प्रमाणांनुसार कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, गंधक, क्लोरीन, सोडियम, मॅग्नेशियम, आयोडीन, फ्ल्युओरीन, लोह, ब्रोमीन असा त्यांचा क्रम लागतो. यांपैकी पहिली सात खनिजे एकूण वजनाच्या सू. ७०% असतात. त्यांशिवाय तांबे, जस्त व मँगॅनीज ही अत्यल्प प्रमाणात असतात. शरीराच्या एकूण वजनाच्या ६०% पाणी असते. त्यात सोडियम व क्लोरीन ही सोडियम क्लोराइडाच्या (मिठाच्या) रूपात विरघळलेल्या स्थितीत असतात. कोशिकाबाह्य द्रवात सोडियम क्लोराइड असते, तर कोशिका द्रवात पोटॅशियम हे क्लोराइड व फॉस्फेट या संयुगांच्या स्वरूपात असते. शरीरातील एकूण खनिजांपैकी ५/६ खनिजे हाडांत सापडतात. हाडे बळकट व कठीण असली, तरी ती खनिजांची कोठारे आहेत. गरज भासल्यास शरीर हाडांतूनही खनिजे घेते. काही परिस्थितींत शरीर हाडांतून इतकी खनिजे घेते की, त्यामुळे हाडे मऊ होऊन ती सांगाड्याचे कार्य करण्यात असमर्थ होतात. उरलेली १/६ खनिजे शरीराच्या इतर भागांत सम प्रमाणात विखुरलेली आढळून येत नाहीत. ए. बी. मॅकॅलम यांनी पुरारसायनशास्त्राविषयीच्या आपल्या अभ्यासावरून असा विचार मांडला आहे की, रक्तप्लाविकेमधील (रक्तामध्ये असणाऱ्या द्रव पदार्थामधील) अकार्बनी घटकांचे सध्याचे प्रमाण पाहता ते कँब्रियन (सू. ६० ते ५१ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळाच्या थोड्या अगोदरच्या काळातील सागरी पाण्यातील प्रमाणाशी कदाचित जुळते असावे आणि कोशिकेतील जीवद्रव्यातील (प्रथिनयुक्त जिवंत द्रव्यातील) लवणांचे प्रमाण, ज्या आद्य सागरी पाण्यात जीवसृष्टी प्रथम अवतरली त्या पाण्यातील लवणांच्या प्रमाणाचे निदर्शक असावे.
विविध मार्गांनी शरीराबाहेर टाकण्यात येणाऱ्या खनिजांचे प्रमाण भरून काढण्यासाठी ती बाहेरून घ्यावी लागतात. बहुतेक प्राणिजातींना कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, आयोडीन, फॉस्फरस, सोडियम, पोटॅशियम व क्लोरीन ही आवश्यक असतात, तर काही प्राण्यांना मानवाच्या तुलनेने जस्त, तांबे, कोबाल्ट व मँगॅनीज फार अल्प प्रमाणात लागतात. सर्वसाधारणतः मानवात चयापचयाच्या विविध प्रक्रियांमुळे प्रामुख्याने गंधक व फॉस्फरस यांच्यामुळे कोशिकांमध्ये अम्ले तयार होतात. या अम्लांचे सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम व फॉस्फरस यांच्यामुळे ⇨उदासिनीकरण होते. अकार्बनी घटकांचा निचरा वृक्कामुळे (मूत्रपिंडामुळे) होतो. तथापि या घटकांचा पूर्णपणे निचरा होऊ शकणार नाही अशी यंत्रणा शरीरात असते. प्रमाणापेक्षा जास्त निचरा झाला, तर गंभीर स्वरूपाचे विकार उत्पत्र होतात. उच्च तापमानात व जास्त घाम येणाऱ्या परिस्थितीत जर माणसाने काम केले, तर त्याला पेटके येतात असे आढळून आले आहे. या वेळी त्याने तहान शमविण्यासाठी पाणी प्यायले, तर पेटके काही प्रमाणात कमी होतात. पेटके येण्याचे प्रमुख कारण म्हणजे घामातून सोडियम क्लोराइड जास्त प्रमाणात उत्सर्जित होते. मीठयुक्त पाणी दिल्यास तो पूर्वस्थितीत येतो. सामान्यतः वरील सर्व खनिजे शरीरात स्वतंत्रपणे कार्य करीत असतात, तरीही ती एकमेकांना पूरक अशी असतात व त्यामुळे ह्या खनिजांमध्ये समतोल राखला जातो. खाल्लेल्या अन्नाचे पचन होण्यासाठी लागणाऱ्या पाचक रसांना क्रिया करण्यासारखी परिस्थिती निर्माण करण्याचे कार्य खनिजांकडून आयन स्वरूपात करण्यात येते. काही महत्त्वाच्या खनिजांबद्दलची माहिती खाली दिलेली आहे.
सोडियम व क्लोरीन : मिठाच्या रूपाने यांचे आयन मिळवावे लागतात. दूध, भाज्या व धान्ये यांतून त्यांचा पुरवठा होत नाही. भाज्या इत्यादींमध्ये मीठ मिसळून घ्यावे लागते. शरीराला दररोज सु. १० ग्रॅ. मीठ लागते. शरीरात ते साठविण्याची व्यवस्था नसते. घाम व मूत्र ह्यांवाटे त्याचे उत्सर्जन होते म्हणून रोजच्या रोज त्याचा पुरवठा होणे आवश्यक असते. मीठ पोटात गेल्यावर ताबडतोब शोषले जाते. मिठाचे प्रमुख कार्य म्हणजे रक्ताची अम्लता योग्य राखणे, विविध शरीर-द्रवांचा समतोल राखणे, तसेज त्यांची तर्षणक्रिया [→ तर्षण] योग्य राखणे, स्नायूंचे अनावश्यक उद्दीपन रोखणे इ. होत. मिठातील क्लोरिनामुळे जठरात हायड्रोक्लोरिक अम्ल तयार होते. त्यामुळे अन्नाचे अम्लीय विघटन होते. मिठाव्यतिरिक्त खाण्याचा सोडा, सल्फेट,फॉस्फेट, ग्लायकोलेट, टॉरोकोलेट, यूरेट, पायरुव्हेट व लॅक्टेट या संयुगांच्या स्वरूपात थोड्या फार प्रमाणात शरीराला मिळते.
पोटॅशियम : हे खनिज रक्तातील तांबड्या कोशिकांत असते. तसेच क्लोराइड, बायकार्बोनेट, फॉस्फेट व सल्फेट ह्या रूपांतही ते अल्प प्रमाणात असते. दररोज सु. ४ ग्रॅ. इतक्या पोटॅशियमाची गरज असते. भाजीपाला, दूध व मांसाहार यांतून ते मिळते. त्याचा शरीरात समतोल राखण्यासाठी ते मूत्रावाटे रोज सु. ३-४ ग्रॅ. इतके उत्सर्जित होते. सोडियमाला पूरक असे त्याचे कार्य असते. स्नायुंची व हृदयाची क्रियाशीलता पोटॅशियमावर अवलंबून असते. शर्करा व नायट्रोजन यांच्या साठवणीचा रक्तातील पोटॅशियमाशी संबंध असतो व त्यांच्या साठवणीत वाढ झाल्यास रक्तद्रवातील पोटॅशियम तांबड्या कोशिकांत जाते.
कॅल्शियम :हे खनिज हाडे व दात यांमध्ये कॅल्शियम फॉस्फेटाच्या स्वरूपात असते. प्रौढ मानवास दररोज सु. १ ग्रॅ. इतकी याची गरज असते. बालवयात व पूर्ण वाढ होईपर्यंत त्याशिवाय आणखी १ ग्रॅ. प्रतिदिन आवश्यक असते. स्त्रियांना बाळंतपणापूर्वी व नंतर एक-दोन वर्षे अधिक कॅल्शियमाची गरज असते. ही गरज जास्त करून दुधातून भागविली जाते. तसेच अंडी, कडधान्ये, पालेभाज्या इत्यादींतूनही ती काही प्रमाणात भागविली जाते. शरीरातील एकूण कॅल्शियमापैकी ९०% हाडांत असते व उरलेल्यापैकी निभ्म्यापेक्षा जास्त भाग आयन स्वरूपात असतो. रक्ताची गुठळी होण्यात कॅल्शियमाचा महत्त्वाचा भाग असतो. स्नायूंची कार्यक्षमता व संवेदनावहनाची कार्यक्षमता यांमध्येही ते महत्त्वाचे कार्य करते. कॅल्शियमाचा उरलेला भाग हा शरीरातील अल्ब्युमीन या प्रथिनाशी जोडलेला असतो.
कॅल्शियमाची संयुगे पांण्यात सहज विरघळत नसल्याने त्यांच्या शोषणाचा प्रश्न अवघड असतो. विशेषतः हा प्रश्न शिशू व बाल्यावस्थेत महत्त्वाचा असतो. या काळात त्यांचा कमी प्रमाणात पुरवठा झाल्यास ⇨मुडदूस इ. रोग होतात. कॅल्शियमाची संयुगे क्षारधर्मी (अल्कलाइन) विद्रावांत जास्त विरघळतात. काही अम्लांमुळे ती विरघळतात. प्रथिनयुक्त आहार व ड जीवनसत्त्व यांमुळे कॅल्शियमाचे अभिशोषण होते. शरीरात कॅल्शियम व फॉस्फरस जोडीने कार्य करतात त्यामुळे त्यांच्यात समतोल राखणे जरूर असते. या समतोलात फरक झाल्यास त्यांच्या कार्यात बिघाड निर्माण होतात. यांपैकी एक जरी कमी प्रमाणात मिळाले, तरी त्यांचा समतोल बिघडतो. शरीरातील त्यांचा समतोल राखण्याचे कार्य मूत्रपिंड व ⇨परावटू ग्रंथी करतात.
मॅग्नेशियम : फॉस्फेटाच्या स्वरूपात हे खनिज हाडांत जास्त असते व उरलेले स्नायूंत असते. हाडांत ते कॅल्शियमाशी सहकार्य करते व कॅल्शियम-मॅग्नेशियम फॉस्फेट अशा मिश्र स्वरूपात असते. रक्तात व स्नायूंत ते पोटॅशियमाबरोबर सहकार्य करते. दररोज सु. अर्धा ग्रॅ. इतकी मॅग्नेशियमाची आवश्यकता असते. मलमूत्रातून याचा टाकाऊ भाग उत्सर्जित होतो. मॅग्नेशियमामुळे एंझाइमांना प्रेरणा मिळणे, हाडांना मजबुती येणे, स्नायू पुष्ट होणे व त्यांना शक्ती उपलब्ध करून देणे इ. कार्ये होतात. ते शरीराला कमी प्रमाणात मिळाल्यास रोहिण्यांवर परिणाम होणे, रक्तात ⇨कोलेस्टेरॉलाचे प्रमाण वाढणे, रक्तवाहिन्यांच्या भित्तीवर कॅल्शियमाचे पुटमय आवरण बसणे इ. दुष्परिणाम होतात.
फॉस्फरस : याचे शरीरातील कार्य कॅल्शियमाशी निगडित असते. ते सु. ७५% कॅल्शियमाबरोबर कंकालात (हाडांच्या सांगाड्यात) व बाकीचे स्निग्ध व शर्करायुक्त पदार्थांशी संयुक्तावस्थेत प्रथिनांशी जोडलेल्या स्वरूपात असते. तसेच ते ग्लिसरोफॉस्फेट, हेक्झॅफॉस्फेट, न्यूक्लिओटाइड फॉस्फेट या कार्बनी संयुगांतही असते. रक्तातील तांबड्या कोशिकांत ते जास्त प्रमाणात असते. दररोज सु. १—१·५ ग्रॅ. इतकी त्याची गरज असते. केळी व भाजीपाल्यातून हे खनिज मिळते. शरीरातील विविध रासायनिक विक्रियांना शक्ती पुरविण्यासाठी आणि शरीरसंवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा ⇨ न्यूक्लिइक अम्लांत फॉस्फेट गटाला फार महत्त्व आहे.
आयोडीन : दररोज सु. ०·००००५ ग्रॅ. इतकी आयोडिनाची गरज असते. नेहमीच्या अन्नातून त्याचा पुरवठा होतो. चयापचयाच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहे. ⇨अवटू ग्रंथीतील हॉर्मोनांचा (रक्तात सरळ मिसळणाऱ्या उत्तेजक स्रावांचा) हे भाग असून सर्व आयोडीन अवटू ग्रंथीत साठविलेले असते. रक्तातील आयोडिनापैकी निम्म्याहून अधिक आयोडीन प्रथिनांशी बंधित असते. आयोडिनाच्या अभावी ⇨गलगंड हा विकार होतो. वाढ होत असलेली मुले, गरोदर व दुग्धस्रवण होत असलेल्या स्त्रिया यांना आयोडीन जास्त लागते.
गंधक : गंधकाचा पुरवठा मिथिओनीन व सिस्टाइन ह्या ⇨ॲमिनो अम्लांमार्फत होतो. शरीरात ते वरील अम्लांच्या स्वरूपात, हेपारीन, इन्शुलीन, को-एंझाइम-ए, ग्लुटाथायोन, ब गटातील जीवनसत्वे इत्यादींमध्ये आढळते. शिवाय ते सोडियम व पोटॅशियम यांच्या सल्फेटांच्या स्वरूपातही आढळते. गरजेपेक्षा जास्त असलेले गंधक मूत्रावाटे शरीराबाहेर टाकले जाते. गंधकामुळे आतड्यातील ⇨ किण्वन रोखणे, मारक सूक्ष्माजंतूंचा नाश करणे, फॉस्फेटासारखे ऊर्जाबंध पुरविणे, कोशिकांच्या श्वसनास मदत करणे, शरीरात भिनलेल्या विषाचा विषारीपणा नष्ट करून ते विष सल्फेटाच्या रूपाने मूत्रावाटे बाहेर काढणे इ. कार्ये होतात.
मॅंगॅनीज : हे दररोज सु. ३ मिग्रॅ. इतके आवश्यक असते व ते पालेभाज्यांतून मिळते. त्याचा साठा यकृत व वृक्क यांमध्ये होतो. पित्तातून ते आतड्यात येते. विविध एंझाइमांना प्रेरणा देण्याचे कार्य हे खनिज करते. कोशिकांना ऑक्सिजन पुरविण्यातही हे महत्त्वाचा भाग घेते. याच्या कमतरतेमुळे स्त्रियांची गर्भधारणशक्ती कमी होते व पुरुषांची वीर्योत्पादनशक्ती कमी होते.
जस्त : दररोज सु. १५ मिग्रॅ. इतकी शरीराला जस्ताची गरज असते. भाजीपाला, दूध, हेरिंग मासे, ऑयस्टर व गव्हाचा कोंडा यांतून त्याचा पुरवठा होतो. याच्यामुळे जखमा व शस्त्रक्रियेनंतरच्या काळातील वेदना कमी होतात, तसेच प्राण्यांच्या जननक्षमतेवर परिणाम होतो. स्त्रियांच्या दुग्धनिर्मिती करणाऱ्या ग्रंथींना त्याची गरज असते. इन्शुलिनाच्या कार्यात त्याला महत्त्व आहे. काही एंझाइमांबरोबर ते आढळते. ते यकृत, प्लीहा, हाडे, नखे व केस यांत साठते. रक्तार्बुदात (ल्युकेमिआत) पांढऱ्या कोशिकांतील त्याचे प्रमाण कमी होते. याच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे रोहिण्या कठीण होतात. १९६१ मध्ये याच्या कमतरतेमुळे होणारे रोग इराणी सैन्यात आढळून आले होते.
लोह : दररोज सु. १०—१५ मिग्रॅ. इतक्या लोहाची शरीराला गरज असते. यकृत, मांस, मासे, अंडी, हिरव्या पालेभाज्या, गहू, कडधान्ये, नारळ इत्यादींमधून त्याचा पुरवठा होतो. स्त्रियांना बाळंतपणापूर्वी व नंतर आणि लहान मुलांना जास्त लोहाची गरज असते. शरीरात ऑक्सिजनाचा पुरवठा करण्यासाठी जास्त लोहाची गरज असते. शरीरात ऑक्सिजनाचा पुरवठा करण्यासाठी हे फार उपयोगी पडते. कोशिकांच्या श्वसनास मदत करणाऱ्या एंझाइमांचा लोह एक प्रमुख घटक आहे. शरीरातील एकूण लोहापैकी ७०% लोह हीमोग्लोबिनात (रक्तातील तांबड्या कोशिकांतील ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या तांबड्या रंगद्रव्यात) व बाकीचे रक्तद्रवात असते. शरीरास आवश्यक तेवढे लोह शोषले जाते व अनावश्यक भाग मलावाटे बाहेर टाकला जातो. मानवी शरीरातून दररोज १ मिग्रॅ. लोह बाहेर पडते. मासिक पाळीत स्त्रियांच्या शरीरातून १·५० मिग्रॅ. लोह बाहेर जाते. अन्नातून शोषले गेलेले लोह रक्तात मिसळले जाणे ही कॅल्शियमासारखी कठीण गोष्ट आहे. कारण हे लोह फेरिक स्वरूपात असते व फेरस स्वरूपातच ते रक्तात मिसळले जाते. जठरातील हायड्रोक्लोरिक अम्ल, क जीवनसत्त्व व सिस्टाइन यांपासून मिळणारा सल्फाहायड्रिल गट फेरिकचे फेरसमध्ये रूपांतर करण्यास मदत करतो. फॉस्फेट गट व काही अम्ले लोहाच्या शोषणास विरोध करतात. आतड्यात लोहाचे शोषण होऊन यकृत, प्लीहा, हाडातील मज्जा (हाडाच्या पोकळीतील संयोजी ऊतक) यांत फेरिक स्वरूपात साठविले जाते. लोहाच्या पूर्ण अभावामुळे ⇨ पांडुरोग होतो पण अल्प कमतरता असल्यास ती जाणवत वा आढळून येत नाही.
तांबे :दररोज सु. २ मिग्रॅ. इतक्या तांब्याची गरज असते. खेकड्यामध्ये ऑक्सिजनवाहक म्हणून कार्य करणाऱ्या हीमोसायनिनामध्ये लोहाऐवजी तांबे असते. मानवात तांब्यामुळे लोहाचे अभिशोषण सहज होते. तसेच ऑक्सिजनाची देवाणघेवाण करणाऱ्या व इतर काही एंझाइमांना तांब्याची मदत होते. रक्तात शोषल्यानंतर ते अल्ब्युमिनाशी बंधित होते व सु. एक दिवसानंतर ग्लोब्युलिनाला (एक प्रकारच्या प्रथिनाला) जोडले जाते. मेंदू, यकृत, हृदय व वृक्क यांत ते जास्त प्रमाणात आढळते. गरोदरावस्थेत यकृतातील तांब्याचे प्रमाण प्रौढ स्थितीत यकृतात असणाऱ्या तांब्याच्या ५—१० पट असते. प्रसूतीच्या वेळी ते जास्त असते. प्रसूतीनंतरच्या पहिल्या वर्षी ते झपाट्याने कमी होत जाते. फक्त मेंदूतच वयाच्या वाढीनुसार तांब्याचे प्रमाण वाढत जाते व प्रौढत्वाच्या वेळी ते जन्माच्या दुप्पट होते. दररोजच्या दहापट तांबे पोटात गेल्यास विषबाधा होते. भाजीपाला, कडधान्ये, कवचधारी प्राणी यांत ते जास्त असते. याच्या अभावाने हाडांत दोष उत्पन्न होतात.
सिलिनियम : हे खनिज प्राण्यांच्या वाढीस आवश्यक असते. हे खनिज जितके आवश्यक आहे तितकेच ते पारा-आर्सेनिकापेक्षाही घातक आहे. त्याचे प्रमाण जास्त झाल्यास नखर (नख्या) मोडतात वे केस गळतात. कमी झाल्यास वासरांना व कोकरांना ‘पांढऱ्या स्नायूचा रोग’ होतो. पिण्याच्या पाण्यातून याचा पुरवठा होतो. दहा लाख भागांत ०·००१ भाग इतके सिलिनियम पाण्यात असल्यास पुरते.
कोबाल्ट : हे अत्यल्प प्रमाणात लागते. मारक पांडुरोगाच्या निवारणासाठी प्राण्यांच्या (विशेषतः मानवाच्या) सामान्य चयापचयासाठी व भूकेच्या वाढीसाठी कोबाल्ट आवश्यक असते. याचे प्रमाण कमी पडल्यास वा कमतरतेमुळे प्राणी अशक्त होऊन खात नाही व शेवटी मृत्यू पावतो. त्याच्या सल्फेटाच्या अस्तित्वामुळे बिअर पिणाऱ्याचे हृदय मोठे होऊन त्याला मारक अशी विकृती होते. बिअर टिकण्यासाठी तिच्यात कोबाल्ट सल्फेट मिसळतात.
फ्ल्युओरीन : याच्यामुळे दात किडण्यास तसेच प्रौढावस्थेत हाडे बारीक होण्यास रोध होतो. ते शरीरात दात व हाडे यांत आढळून येते. चहा व पाणी यांतून ते शरीराला मिळते. सागरी खाद्यपदार्थांतूनही त्याचा पुरवठा होतो.
निकेल : हे खनिज कोंबडीच्या पिलाच्या वाढीस आवश्यक आहे. आहारातून ते अल्प प्रमाणात शोषले जाते. मासे, अंडी, दूध व प्राण्यांचे स्नायू यांत ते नसते. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर याचे प्रमाण वाढते.
क्रोमियम : आयुष्याच्या साधारण मध्याला तसेच वयस्कर, मधुमेहपीडित व्यक्ती व अपपोषण होणारी मुले यांमध्ये ग्लुकोजाचा वापर कमी कमी होत जातो. अशा वेळी आहारातून क्रोमियम दिल्यास ग्लुकोजाचा वापर योग्य तितका राखला जातो.
व्हॅनेडियम : शरीरक्रियादृष्ट्या हे खनिज महत्त्वाचे आहे पण मानवाच्या बाबतीत त्याच्या कार्याचे महत्त्व अद्याप अज्ञात आहे.मानवी रक्तातील कोलेस्टेरॉलाशी त्याचे कार्य निगडित आहे, असे आढळून आले आहे. हे खनिज दिल्यास कोलेस्टेरॉलाच्या चयापचयास मदत होते. कोंबडीच्या पिलांना हे दिल्यास त्यांची वाढ होते.
लिथियम : हे खनिज दिल्यास काही मानसिक रोग बरे होतात, असे आढळून आले आहे. तसेच त्याच्या अस्तित्वामुळे रोहिण्यांचे कठिनीकरण होत नाही. याचे प्रमाण कमी असल्यास हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब इ. विकार होतात.
मॉलिब्डेनम : सूक्ष्ममात्रिक मूलद्रव्यांपैकी हे एक मूलद्रव्य असून ते प्रौढ शरीरात ०·००९ ग्रॅ. एवढे असते. त्याची दैनंदिन गरज अजून अनिश्चित असून दररोजच्या आहारात सु. ०·४ मिग्रॅ. असते. घेवडा, वाटाणा यांसारख्या शेंगा, तृणधान्ये, अंतस्त्यांचे (अंतर्गत इंद्रियांचे) मांस यांतून त्याचा पुरवठा होतो. शरीरातील काही एंझाइमांचा ते एक घटक असते. मानवात याची त्रुटिजन्य विकृती आढळलेली नाही.
महत्त्वाची खनिजे व त्यांच्या अतिसेवनामुळे वा इतर कारणांमुळे होणारे दुष्परिणाम
खनिज |
प्रौढ शरीरातील प्रमाण (ग्रॅम) |
दैनंदिन गरज (मिग्रॅ.) |
पुरवठा करणारे पदार्थ |
अतिसेवन किंवा इतर कारणांमुळे होणारे दुष्परिणाम |
कॅल्शियम |
१,५०० |
८०० |
दूध, चीज, हिरव्यागार भाज्या, कडधान्ये |
मानवात आढळलेले नाहीत |
फॉस्फरस |
८६० |
८०० |
दूध, चीज, मांस, कोंबडी व धान्ये |
चिरकारी विषबाधा फॉस्फरसाच्या वाफाऱ्यामुळे उद्भवते. दात दुखणे व खालच्या जबड्याच्या हाडाचा ऊतकमृत्यू (फॉसीजॉ) ही लक्षणे उद्भवतात. |
गंधक |
३०० |
गंधकयुक्त ॲमिनो अम्लांतून पुरेसे मिळते. |
प्रथिनातून, विशेषेकरून मांसातील उपास्थी व कंडरा. |
गंधकयुक्त ॲमिनो अम्लांच्या अतिसेवनाने शरीराची वाढ खुरटते. |
पोटॅशियम |
१८० |
२,५०० |
मांस, दूध व फळे |
स्नायुदौर्बल्य-मृत्यू |
क्लोरीन |
७४ |
२,००० |
मीठ |
उलट्या |
सोडियम |
६४ |
२,५०० |
मीठ |
अतिरक्तदाब |
मॅग्नेशियम |
२५ |
३५० |
टरफलासहित धान्य, हिरव्या पालेभाज्या |
अतिसार |
लोह |
४·५ |
१० |
अंडी, मांस, कडधान्ये, टरफलयुक्त धान्ये, हिरव्या पालेभाज्या. |
लोहमयता, यकृत-सूत्रण. |
ल्युओरीन |
२·६ |
२ |
पाणी, चहा, सागरी अन्न |
दातावर डाग पडणे, अस्थिघनताधिक्य, तंत्रिका विकृतिजन्य रोग (ल्युओरिनाधिक्य). |
जस्त |
२ |
१५ |
सर्व प्रकारच्या अन्नात असते |
ज्वर, मळमळणे, उलट्या व अतिसार |
तांबे |
०·१ |
२ |
मांस, पिण्याचे पाणी |
विल्सन रोग (कचित आढळणारा चयापचयात्मक रोग). |
सिलिकॉन |
०·०२४ |
अनिश्चित |
सर्व अन्नपदार्थांत विखुरलेले |
औद्योगिक प्रभावाधीनता-सिकतामयता |
व्हॅनेडियम |
०·०१८ |
अनिश्चित |
सर्व अन्नपदार्थांत विखुरलेले |
औद्योगिक प्रभावाधीनता-फुप्फुसक्षोभ |
कथिल |
०·०१७ |
अनिश्चित |
सर्व अन्नपदार्थांत विखुरलेले |
औद्योगिक प्रभावाधीनता-उलट्या |
सिलिनियम |
०·०१३ |
अनिश्चित |
कडधान्ये, तृणधान्ये, अंतस्त्य-मांस |
आंत्रमार्ग विकृती, फुप्फुसक्षोभ |
मॅंगॅनीज |
०·०१२ |
अनिश्चित |
सर्व अन्नपदार्थांत विखुरलेले |
खाण कामगारांना तंत्रिका तंत्राची विकृती |
आयोडीन |
०·०११ |
०·१४ |
मसे, भाज्या, दूध व दुधाचे पदार्थ |
अवटू ग्रंथीची क्रियाशीलता कमी होते |
निकेल |
०·०१० |
अनिश्चित |
सर्व अन्नपदार्थांत विखुरलेले |
औद्योगिक प्रभावाधीनता-तीव्र फुप्फुसशोध |
मॉलिब्डेनम |
०·००९ |
अनिश्चित |
कडधान्ये, तृणधान्ये, अंतस्त्य-मांस |
एंझाइम उत्पादनास प्रतिबंध |
क्रोमियम |
०·००६ |
अनिश्चित |
वसा, वनस्पती तेले, मांस |
व्यावसायिक प्रभावाधीनता-त्वचा रोग, वृक्कविकृती. |
कोबाल्ट |
०·००१५ |
जीवनसत्त्व ब१२ या स्वरूपात. |
दूध व मांस |
औद्योगिक प्रभावाधीनता-त्वचाशोध, रक्तातील तांबड्या कोशिकांचे अधिक्य. |
पाणी |
४०,००० एकूण वजनाच्या ६०% |
१·५ लिटर |
अन्नपदार्थ, पेये व पिण्याचे पाणी |
डोकेदुखी, मळमळणे, शोफ, अतिरक्तदाब |
वर उल्लेख केलेल्या खनिजांशिवाय इतर बरीच खनिजे आहारातून, औषधांतून शरीरात जातात, तशीच ती शरीरात आढळतात पण शरीराला ती आवश्यक आहेत काय किंवा त्यांचे शरीरातील कार्य काय याविषयीचे ज्ञान अद्याप झालेले नाही.
चोथा : (फायबर). अन्नातील वरील घटकांशिवाय आणखी एका पदार्थाचा समावेश आवश्यक घटकांत अलीकडे करण्यात येत आहे. या घटकाला ‘चोथा’असे म्हणतात. या संज्ञेची व्याख्या करण्याविषयी शास्त्रज्ञांचे अजून एकमत झालेले नाही. आहारातील टरफलासहित धान्ये, भाज्या, फळे व कवचयुक्त फळे यांच्यामधील ज्या भागावर पाचक रसांचा परिणाम होत नाही, त्यांचा समावेश ‘आहारातील चोथा’ या संज्ञेत करतात. हा चोथा सेल्युलोज, हेमिसेल्युलोज यांसारखी कार्बोहायड्रेटे, पेक्टिने (पक्व फळातील अपचनीय व पाणी शोषून घेण्याचा गुणधर्म असलेली कार्बोहायड्रेटे), लिग्निन (वनस्पति-कोशिकांच्या भित्तीतील पदार्थ) इ. पदार्थ मिळून बनलेला असतो. शुद्धीकृत अन्नात चोथ्याचे प्रमाण अत्यल्प असते कारण दळणे, कोंडा अलग करणे, तसेच भाज्या व फळे यांच्या साली काढून टाकणे यांमुळे अन्न चोथारहित बनते. शाकाहारी माणसांच्या आहारातील चोथ्याचे प्रमाण मांसाहारी माणसांपेक्षा चौपटीने अधिक असते.
चोथ्यामुळे आंत्रमार्गाच्या (आतड्याच्या मार्गाच्या) पचन, अभिशोषण आणि उत्सर्जन या क्रिया व्यवस्थित होतात. चोथा हा आहाराचा मोठा घटक असल्यामुळे, तसेच अधिक पाणी शोषण करण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे आंत्रमार्गातील अन्नाचा गोळा मऊ बनतो. गोळ्याचे आकारमान वाढून आतड्याच्या हालचालीस मदत होते, तसेच पचनक्रियेनंतर उरलेले अपशिष्ट भाग इकडे तिकडे विखरून पडू न देता चोथ्यामुळे पुढे ढकलले जातात. अलीकडील संशोधनानुसार चोथा आंत्रमार्गाच्या नेहमीच्या कार्यशीलतेकरिता आवश्यक असून तो नियमतता, मलाचा मऊपण आणि बृहदांत्रातील (मोठ्या आतड्यातील) जलद परिवहन यांना मदत करतो. काही शास्त्रज्ञांच्या मते चोथा आंत्रमार्गाला संसर्गाविरुद्ध संरक्षण देतो. अलीकडेच चोथ्याच्या निर्विषीकरण क्रियाशीलतेने संशोधकांचे लक्ष वेधून घेतले आहे. बृहदांत्राचा कर्करोग आणि चोथा यांचय संबंध हा संशोधनाचा विषय बनला आहे. रोहिणी विलेपी विकारजन्य (रोहिण्यांच्या आतील भित्तींवर लिपीड साचणे व तंतुमय संयोजी ऊतकाच्या कोशिकांचा प्रादुर्भाव होणे यांमुळे होणाऱ्या विकारामुळे उद्भवणारा) हृद्रोग आणि चोथा अधिक प्रमाणात असलेला आहार यांच्या संबंधाविषयी संशोधन चालू आहे.
मानवी पोषणातील चोथ्याच्या कार्याविषयी अधिक माहिती अजून उपलब्ध व्हावयाची आहे परंतु ज्ञात पुराव्यावरून चोथा हा मानवी आहाराचा एक आवश्यक घटक असल्याचे जवळजवळ सिद्ध झाले आहे. जी. आर्. कौगिल या आहारतज्ञांच्या मताप्रमाणे आहारात प्रत्येक किग्रॅ. शारीरिक वजनामागे १०० मिग्रॅ. (प्रौढात दररोज ५ ते ६ ग्रॅ.) चोथा असावयास हवा.
त्रुटिजन्य व अतिसेवनामुळे उद्भवणारे परिणाम : मानवी आहारातील घटकांच्या त्रुटीमुळे उद्भवणाऱ्या रोगांची माहिती ‘त्रुटिजन्य रोग’ या स्वतंत्र नोंदीत दिली आहे. पृष्ठ क्रमांक १३७ वरील कोष्टकात खनिजांचे शरीरातील प्रमाण, दैनंदिन गरज, पुरवठा करणारे पदार्थ आणि अतिसेवनामुळे किंवा इतर कारणामुळे उद्भवणारे दुष्परिणाम यांसंबंधी माहिती दिली आहे.
पहा : अन्न अपपोषण आहार व आहारशास्त्र चयापचय त्रुटिजन्य रोग पचन तंत्र.
संदर्भ : 1. Beaton, G. H. McHenry, E. W., Ed., Nutrition : A Comprehensive Treatise, 2 Vols., New York, 1964.
2. Davidson, S. Passmore, R. Brock, J. R. Human Nutrition and Dietetics, Edinburgh, 1973.
3. Mitchell, H. M. Comparative Nutrition of Man and Domestic Animals, 2 Vols., New York, 1964.
4. Smith, A. The Body, London, 1968.
5. Underwood, E. J. Trace Elements in Human and Animal Nutrition, New York, 1962.
भाट, य. ना. पानसे, के. वि. जोगळेकर,
व. दा. भालेराव, य. त्र्यं. दीक्षित, श्री. गं.
“