पोर्टस्मथ – २ : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी व्हर्जिनिया राज्यातील बंदर आणि नाविक तळकेंद्र. लोकसंख्या १,१०,९६३ (१९७०). हे रिचमंडच्या आग्नेयीस सु.१३७ किमी. नॉरफॉकच्या विरुद्ध दिशेस, हॅम्प्टन रोड्स क्षेत्रात एलिझाबेथ नदीतीरावर वसले आहे. पोर्टस्मथचा इतिहास हा नेहमी नाविक घडामोडींनी भरलेला आढळतो.
प्रारंभी इंडियनांच्या असलेल्या या गावातील जमिनी ब्रिटिशांनी निरनिराळ्या व्यक्तींना जहाजबांधणी व मळाउद्योग यांसाठी १६२० पासून दिल्याचे आढळते. १७५२ मध्ये नॉरफॉक परगण्याचा न्यायाधीश कर्नल विल्यम क्रॉफर्ड याने शहराची स्थापना करून, त्याला इंग्लंडमधील पोर्टस्मथ बंदराचे नाव दिले. अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्ध काळात पोर्टस्मथचा ताबा आलटून-पालटून ब्रिटिश व अमेरिकन सैन्याकडे राहिला. १७६७ मध्ये अँड्रू स्प्राउल नावाच्या धनाढ्य स्कॉटीश व्यापाऱ्याने येथे एक जहाजकारखाना उभारला, त्याचेच पुढे १८०१ मध्ये अमेरिकन सरकारने ‘नॉरफॉक नेव्हल शिपयार्ड’ या नौदलाची जहाजे बांधण्याच्या कारखान्यात रूपांतर केले. १८३३ मध्ये देशातील पहिली निर्जल गोदी येथे बांधण्यात आली. या कारखान्यातून अमेरिकन नौदलाची ‘चेसपीक ’ नावाची पहिली युद्धनौका बाहेर पडली तसेच १८६२ मध्ये ‘मेरिमॅक’ या लाकडी जहाजाचे लोखंडी पत्र्याने वेष्टित अशा प्रसिद्ध ‘व्हर्जिनिया’ नामक पहिल्या जहाजामध्ये रूपांतर करण्यात आले. ‘टेक्सस’ ही देशातील पहिली युद्धनौका १८९२ मध्ये, त्याचप्रमाणे ‘लॅंगली’ हे देशातील पहिले विमानवाहू जहाज १९२२ मध्ये येथेच बांधण्यात आले. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांमध्ये स्वाभाविकच पोर्टस्मथला अतिशय महत्त्व होते. पोर्टस्मथमधील जहाजकारखान्याची जगातील सर्वांत मोठ्या जहाजकारखान्यांत गणना होते. अमेरिकेत येथे सर्वाधिक निर्जल गोद्या आहेत. अमेरिकेच्या पाचव्या किनारी संरक्षण व्यवस्थेचे मुख्य कार्यालय, मोठे नाविक रुग्णालय, नौदलाच्या दारूगोळ्याचे मोठे कोठार पोर्टस्मथ येथे आहे.
व्यापारी जलवाहतूक व रेल्वेवाहतूक यांचे पोर्टस्मथ हे एक महत्त्वाचे केंद्र असून तेथे जहाजबांधणी, प्लॅस्टिके, रसायने, अन्नप्रक्रिया, यंत्रे व अवजारे या उद्योगांचा विकास झाला आहे. नौदल जहाजविषयक वस्तुसंग्रहालय, ट्रिनिटी एपिस्कोपल कॅथीड्रल (१७६२), मॉन्युमेंटल युनायटेड मेथडिस्ट चर्च (१७७२), त्याचप्रमाणे किनारी भागातील निसर्गसुंदर पुळणी ही पोर्टस्मथमधील आकर्षणस्थळे होत.
डिसूझा, आ. रे.
“