मज्जा विकृति : ‘न्यूरोसिस’ ह्या संज्ञेचा वापर विल्यम कलन (१७१० – ९०) ह्या ब्रिटिश तंत्रिकाविकारतज्ञाने न समजून येणारे तंत्रिकाविकार किंवा मनोविकार यांचे वर्णन करताना केला (१७६९). मनोमज्जाeविकृती (सायकोन्यूरोसिस) ही संज्ञा फ्रॉइड ह्या सुप्रसिद्ध मानसचिकित्सकाने प्रचलित केली (१९२६).

ह्या विकारसमूहातील ⇨ उन्माद ह्या विकाराचा पहिला अभ्यास ⇨ झां मार्‍तँ शार्को (१८२५ – ९३) या फ्रेंच तंत्रिकाविकारतज्ञाने केला (१८७०). त्याने प्रेरित होऊन ⇨ प्येअर झाने (१८५९ – १९४७), ⇨ सिग्मंड फ्रॉइड (१८५६ – १९३९) व ⇨ योझेफ ब्रॉइअर (१८४२ – १९२५) या मानसचिकित्सकांनी उन्माद तसेच काही इतर मज्जाविकृतींचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास केला.

संकल्पना : मज्जाविकृती हा विकारसमूह पूर्णपणे मानसिक असून त्याचा मज्जासंस्थेशी काही एक संबंध नसतो. ह्या समूहात पुढे नमूद केलेल्या मनोविकारांची गणना जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यू.एच्. ओ.) केलेल्या नवव्या आंतरराष्ट्रीय मनोविकारांच्या वर्गीकरणात (आय्. सी. डी. – ९) केलेली आहे (१९७८). ती अशी : (१) चिंताविक्रिया, (२) उन्माद, (३) भयगंड, (४) भावातिरेकी – सक्तियुक्त – मज्जा्विकृती, (५) मज्जाचविकृतीय अवसाद, (६) मज्जादअशक्तियुक्त मज्जायविकृती, (७) व्यक्तिमहत्त्वहरण (डीपर्सनलायझेशन), (८) शरीर चिंता अथवा आरोग्य चिंता (हायपोकाँड्रिॲतसिस), (९) इतर मज्जा विकृती आणि (१०) अनिर्दिष्ट मज्जाविकृती.

मज्जाविकृतिसमूहाचे नेहमी आढळणारे खास घटक असे आहेत : 

(१) व्यक्तिमत्त्व थोडे कच्चे, अपर्याप्त व निर्बंधित अहंसामर्थ्य कमी आत्मप्रतिमा निकृष्ट. शिवाय मज्जाचविकृतीय गुणधर्मांची (न्यूरोटिक ट्रेज) उपस्थिती. उदा., लहानपणी अंगठा चोखणे, बिछाना भिजविणे, डुलणे, चाचरत बोलणे, झोपेत बरळणे आणि मोठेपणी नखे खाणे, संवेदनशीलता, हळवेपणा, भित्रटपणा, अतिविचारी वृत्ती, काळजीखोर स्वाभाव वगैरे. मज्जाविकृतिजन्यता हा आनुवंशिक गुणक असून त्यात स्वायत्त तंत्रिकातंत्राची संवेदनशीलता समाविष्ट आहे. (आयसेंक).

(२) दैनंदिन जीवनातील तणाव व क्षुल्लक दुर्घटना अतिरंजित करून त्या स्वहिताला घातक आहेत, असे ठरविण्याची वृत्ती.

(३) त्यातून सतत उद्‍भवणारी विकृत चिंता किंवा कष्टभाव (डिस्फोरिया).

(४) चिंतानिवारणासाठी अविरत सक्तियुक्त आणि पुनरावृत्त अशा संरक्षक हालचाली परंतु सामाजिक वातावरणाशी समायोजन करण्यात अपयश.

(५) वागणुकीत सतत अकार्यक्षमता व बऱ्याच वेळा वेंधळेपणा. 

(६) या सर्वांची वैफल्यपूर्ण जाणीव, त्याचे दडपण आणि काही वेळा त्यातून येणारी त्रस्तता तसेच संशयी व भांडकुदळ वृत्ती.

(७) चिंतेचे शारीरिक आविष्कार म्हणून दिसणारी शारीरिक लक्षणे, उदा., छातीत धडधड, डोकेदुखी, पोटाच्या अपचनवजा तक्रारी. 

(८) आत्मकेंद्रितता आणि त्यामुळे सामाजिक संबंधांना येणारी बाधा. 

(९) मर्मदृष्टी मर्यादित असल्यामुळे वास्तवतेशी असलेल्या संपर्कात परिमाणात्मक बिघाड. 

(१०) सामाजिक कर्तव्यांपासून अर्भकीय परावलंबनाकडे माघार. त्यामुळे स्वकीयांपासून फाजील अपेक्षा.

(११) लक्षणांची सुरुवात बहुधा नाट्यमय व धक्कादायक प्रसंगातून होते. उदा., अपघाती मृत्यू पाहून.

 ह्यांतील बरेच घटक फ्रॉइडवादी सिद्धांताचा आधार घेत असल्यामुळे सर्वसामान्य नाहीत तसेच सर्व घटक उन्माद ह्या मज्जा विकृतीलाही पूर्णपणे लागू पडत नाहीत. मज्जाविकृतीची⇨ चित्तविकृतीशी तुलना केल्यास, ह्या संकल्पनेचे आकलन सुलभ होण्यास मदत होईल :

अनुक्रम 

लक्षणे व चिन्हे 

मज्‍जाविकृती 

चित्तविकृती 

१ 

रूप 

आत्मनिष्ठ 

वस्तुनिष्ठ 

२ 

वास्तवतेशी संपर्क 

परिमाणात्मक व अंशतः बिघाड 

गुणात्मक व संपूर्ण बिघाड 

३ 

भावनिक लक्षणे 

साधारण 

तीव्र स्वरूपात 

४ 

वर्तनीय लक्षणे 

अल्प प्रमाणात 

अतिरिक्त प्रमाणात 

५ 

विचारात बिघाड 

अत्यल्प प्रमाणात 

अत्यंत तीव्र 

६ 

मर्मदृष्टी 

मर्यादित 

अत्यल्प 

७ 

चिंता व शारीरिक लक्षणे 

प्रामुख्याने 

क्वचितच 

८ 

निराधार भ्रम व संभ्रम 

पूर्ण अभाव 

सर्रास (प्रिव्हेलंट) 

९ 

सामाजिक जीवन 

अंशतः बिघडलेले 

सामान्यतः उद्ध्वस्त झालेले 

१० 

फलानुमान 

बहुधा उत्तेजक 

काही वेळा निराशाजनक 


प्रादुर्भाव : पाश्चात्त्य देशांत आढळून आलेले मज्जासविकृतींचे प्रमाण ६% (१६ जणात १) असे आहे. भारतात हे प्रमाण कमी असावे (नक्की आकडेवारी उपलब्ध नाही). ह्या विकृतीचे प्रमाण शहरवासियांत, मध्यमवर्गीयांत आणि सुशिक्षितांत जास्त आहे. वयाची मर्यादा विशेष नसली, तरी सुरुवातीची लक्षणे तरूण वयात जास्त दिसून येतात तसेच बदलत्या सांस्कृतिक तणावामुळे स्त्रियांत ह्या विकृतीचे प्रमाण वाढते आहे.

सिद्धांत : (१) फ्रॉइड : फ्रॉइड यांच्या अर्भकीय लैंगिकतेच्या सिद्धांतानुसार लैंगिकतेचे शमन आपल्या वर्तमान संस्कृतीप्रमाणे झाले पाहिजे. ह्या सांस्कृतिक कर्तव्यपूर्तीची वाटचाल करताना लैंगिकता तीन अवस्थांतून जाते : (१) मुक्ताभिव्यक्ती – जिच्यात लैंगिकता अनिर्बंध रहाते, (२) मर्यादित अभिव्यक्ती – जिच्यात लैंगिकतेला वाव फक्त प्रजोत्पादन कर्तव्यापुरताच असतो आणि (३) अतिमर्यादित लैंगिकता जिच्यात लैंगिकतेला प्रजोत्पत्तीसाठीसुद्धा मोकळीक दिली जात नाही.   

काही व्यक्तींच्या बाबतीत लैंगिकतेची अशी सांस्कृतिक परिपक्वता होत नाही आणि वाढ पहिल्या अवस्थेतच खुंटल्यामुळे तिचे रुपांतर विकृतावस्थेत होते. ह्या विकृत लैंगिकतेला (समलैंगिकता किंवा अर्भकीय अवस्थेवर दृढीकरण. उदा., हस्तमैथुन) संस्कृतीविरूद्ध तोंड द्यावे लागते आणि त्यात तिने टिकाव न धरल्यास तिचे ⇨ निरोधन होते. ते पूर्णपणे न झाल्यास मज्जा विकृतीच्या लक्षणात तिचे रूपांतर होते. थोडक्यात मज्जाविकृती ही विकृत लैंगिकतेच्या उलट असते. हे रूपांतर शारीरिक लक्षणात झाल्यास उन्माद हा विकार जडतो पण तसे न घडता अहम्शी संघर्ष झाल्यास जाणीवयुक्त भीती निर्माण होते आणि त्यातून चिंतोन्माद (अँग्झायटी – हिस्टेरिया) म्हणजेच भयगंड जडतो. परंतु संघर्ष जाणीवयुक्त राहून त्यातील भावनेचा वस्तुभावबंध (कॅथेक्सिस) केल्यास भावातिरेकी – सक्तियुक्त – मज्जारविकृती निर्माण होते.

फ्राईड यांनी काही वर्षानंतर मज्जाविकृतीच्या उगमाबद्दल नवे सिद्धांत सादर केले. त्यानुसार मज्जारविकृतीच्या रुग्णांत अहम् व इदम्मतध्ये संघर्ष असतो. बाहेरचे जग हे मोह व शिक्षेचे प्रतीक असल्याने, हा संघर्ष अहम् व बाहेरच्या जगाशी आहे असे भासते. अहम् हा प्रेरणेच्या आवेगापासून संरक्षण करीत असतो. ते यशस्वी न झाल्यास परतवणाऱ्या प्रतिबंधक शक्तींना (वॉर्डिंग फोर्सेस) अहम् पुष्टी देतो (प्रतिवस्तुभावबंध – ‘काउंटर – कॅथेक्सिस’). यांना डावलून इदम्‍चे आवेग पर्यायी मार्ग (डेरिव्हेटिव्ह) शोधतात. मूळ आवेग बंधयुक्त झाला, तर मज्जारविकृतीची लक्षणे उद्भयवतात. प्रतिबंधक शक्तींची बेसुमार वाढ हे पण एक लक्षण होऊ शकते. उदा., अपराधी भावना व चिंता.

(२) ॲड्लर : ॲड्लर यांच्या मूळ व्यक्तिमत्त्व सिद्धांताप्रमाणे व्यक्ती आपल्या अर्भकावस्थेत पालकांच्या ताकदीशी स्वतःची तुलना करते आणि स्वतःला अत्यंत असहाय समजते (अर्भकीय न्यूनता). पुढे या असहायतेवर मात करण्यासाठी ती पालकांच्या दडपणाला विरोध करू लागते आणि त्यातून आपले अस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी तसेच वर्चस्व (सुपिरियॉरिटी) मिळविण्यासाठी विशेष धडपड करते (पुरूषी निषेध – ’मॅस्कूलिन प्रोटेस्ट’). ह्या पार्श्वभूमीवर मज्जाविकृतिप्रवण व्यक्ती चुकीच्या अतिरंजनात्मक दृष्टिकोनामुळे सामाजिक वातावरणाचा बागुलबोवा करतात आणि नंतर समाजाशी समायोजन करण्यासाठी ’चुकीची जीवनशैली’ स्वीकारतात. नवीन अनुभवाने शहाणे होणे त्यांना जमत नाही. अपयश येऊ नये म्हणून न्यूनतेवर मात करण्यासाठी त्या अतिरेकी धडपड करतात. ह्या संरक्षणात्मक उपायांपोटीच मज्जायविकृतीची लक्षणे उद्भ वतात. अर्भकीय न्यूनता जेव्हा शरीरावर केंद्रित केली जाते, त्यावेळी शरीर चिंतात्मक वृत्ती (हायपोकाँड्रीयाक ॲयटिट्यूड) निर्माण होते.

(३) अभिसंधान सिद्धांत : पाव्हलॉव्ह (१९२७) यांच्या कुत्र्यांवरील मानसशास्त्रीय प्रयोगांनंतर मानसिक प्रयोगशाळांतून आधी प्राण्यांच्या मानसशास्त्राचा व नंतर त्यांच्यात निर्माण केलेल्या प्रायोगिक मज्जावविकृतीचा आणि पर्यायाने मानवी वर्तनाचा पद्धतशीर अभ्यास सुरू झाला (वॉटसन, हल, स्कीनर व वोल्पे). त्यातूनच अध्ययन सिद्धांत निर्माण झाला. अपसामान्य वर्तनाचे परिवर्तन करण्यासाठी या सिद्धांताचे उपयोजन करण्यात आले. (वोल्पे, आयसेंक, आयाँ, राचपन). या सिद्धांताप्रमाणे मूलभूत चिंता निर्माण करणाऱ्या परिस्थितीतील मूळ निरावलंबित उद्दीपक (उदा., भयगंडपीडित रूग्णाच्या अंगावर आलेला विशिष्ट चावरा कुत्रा) आणि त्यासारखा इतर कुठलाही कुत्रा (लहान, गोंडस, शांत व प्रेमळसुद्धा) यांचे अवलंबीकरण होऊन ’कुत्रा हा प्राणी’ हेच अवलंबित उद्दीपक बनते. त्यामुळे मूळच्या कटू अनुभवात उद्भ वलेली भीतीची लक्षणे ही अवलंबित प्रतिसाद बनतात. कुत्र्यापासून पलायन केल्यावर आणि कुत्रा द्दष्टीआड अथवा श्रवणापलीकडे गेल्यामुळे भीती ओसरते व तिच्यामुळे झालेले शारीरिक क्लेश लुप्त होतात. ह्या आरामदायी प्रतिसादामुळे पळून जाण्याच्या सवयीचे आणि कुत्र्याच्या भीतीचे प्रबलन होते आणि त्यामुळे भयगंडाची विकृती पक्की होते.

निदानीय प्रकार : मज्जातविकृतीच्या बऱ्याच निदानीय प्रकारांत काही लक्षणे सर्वसामान्य आहेत. उदा., चिंता हे लक्षण चिंताप्रतिक्रिया (अँग्झायटी – रिॲकक्शन), भावातिरेकी – सक्तियुक्त – मज्जा विकृती, अवसादी मज्जा विकृती, मज्जा – अशक्ती, व्यक्तिमत्त्वहरण तसेच शरीर – चिंता ह्या विकारांत आढळते परंतु चिंताप्रतिक्रिया ह्या विकारात ते प्रमुख असून तीव्र स्वरूपात आढळते. तसेच ‘भयगंडीय’ भीती ही भयगंडात जरी प्रामुख्याने आढळली, तरी चिंताप्रतिक्रिया, भावातिरेकी – सक्तियुक्त – मज्जाहविकृती आणि व्यक्तिमत्त्वहरण मज्जाविकृती ह्या विकारांतसुद्धा ती दिसून येते. तात्पर्य मज्जा विकृतीतील विकारांचे वर्गीकरण हे सुलभ अभ्यासासाठी केले असून प्रत्यक्ष चिकित्सा व्यवसायात संमिश्र विकार सर्रास आढळतात.

चिंताप्रतिक्रिया : हा विकार सर्वात जास्त प्रचिलित असून त्याची सुरुवात वैशिष्ट्यपूर्ण अशा धक्कादायक व भीतीजनक प्रसंगाने होते. अशा तऱ्हेने उद्भतवलेल्या अचानक भीतीने अनुकंपी तंत्रिका संस्थेची (ॲसड्रिनर्जिक) प्रक्रिया प्रबळ होऊन शारीरिक लक्षणे निर्माण होतात. उदा., कासाविस होणे, धडधडणे, गरगरणे, घशाला कोरड पडणे, हातपाय गार होणे वगैरे. अशा लक्षणांची फाजील दखल घेतली गेल्यामुळे असे का होत आहे ह्याची चिंता सुरू होते. आपल्याला काही तरी होणार अशी चिंता वाटून आणखी भीती वाढते आणि त्यामुळे पुन्हा शारीरिक लक्षणे वाढतात. पुढे ही भीती परिसीमा गाठते व शेवटी घाबरगुंडी उडते. डॉक्टरी आश्वासनाचा विशेष परिणाम होत नाही.


महत्त्वाची लक्षणे : (१) सतत अकारण वस्तुनिष्ठ नसलेली स्वैर चिंता (फ्री फ्लोटिंग अँग्झायटी) किंवा शारीरिक तक्रारींविषयीची चिंतातुरता. (२) मनोशारीरिक ताण व ताठरता (रिजिडिटी) तसेच अकारण जागरूकता. (३) आत्मविश्वास, हुरूप, एकाग्रचित्तता, सहनशक्ती व स्मरणशक्ती यांची क्षीणता. (४) चिडचिडेपणा व अस्थिरता. (५) निद्रानाश आणि भुकेवर परिणाम. (६) अनुकंपी तांत्रिका उद्दीपनामुळे उद्‍‌भवणारी शारीरिक चिन्हे. उदा., वाढीव रक्तदाब, जलद नाडी. वाढीव क्रमसंकोच (पेरिस्टाल्सितस) व अपचन तसेच घामाघूम होऊन हातपाय गार पडणे.

हा विकार दीर्घकाल टिकतो. काही वेळा लक्षणे आपणहून ओसरतात, पण काही कटुप्रसंगांमुळे ती पुन्हा प्रज्वलित होतात. काही रूग्णांचा विकार जीर्णावस्थेत जातो. उपचार वेळेवर केल्यास रूग्ण पूर्ण बरा होतो. मानसोपचार सर्वांत जास्त प्रभावी ठरतात. वर्तनोपचारांपैकी रीतसर निर्संवेदीकरण (सिस्टमॅटिक डिसेन्सिटायझेशन) आजकाल जास्त प्रचलित आहे. याशिवाय शांतक, विशेषतः चिंतानिवारक, औषधांचा वापर गुणकारी ठरतो.

उन्माद : ह्या विकाराचा उल्लेख साहित्यात बऱ्याच वेळा येण्याचे कारण तो नाट्यमय वातावरणात उद्‍भवतो व त्याचे स्वरूपही नाट्यमय असेच असते. म्हणजे त्याची लक्षणे लक्ष वेधून घेण्याइतकी तीव्र असतात. शिवाय रूग्ण कळत – नकळत कुठल्यातरी भयंकर विकाराचा आभास निर्माण करावयाचा प्रयत्ने करतो. त्याचा प्रादुर्भाव स्त्रियांत जास्त असायचे कारण त्या सांस्कृतिक व जीवशास्त्रीय दृष्ट्या ‘अबला’ असतात. कठीण परिस्थितीला खंबीरपणे तोंड देण्याऐवजी आप्तेष्टांचे किंवा निकटवर्तियांचे लक्ष आपल्या ‘आजाराकडे वेधून घेऊन’ त्यामुळे निर्माण झालेल्या असहायतेबद्दल सहानुभूती मिळवणे आणि जबाबदारीतून मुक्त होणे त्यांना जास्त पसंत पडते व सुलभही वाटते. अशा विकारांची परंपरा काही जाति – जमातींतील स्त्रियांत – विशेषतः नववधू असताना किंवा गांजलेली सून या भूमिकेत – आजही प्रचलित आहे. असहायता पतकरणाऱ्या, विशेषतः सांस्कृतिक दृष्ट्या कमी दर्जाच्या तरूणांतही हा विकार आढळतो. ह्या विकाराच्या बुडाशी उन्मादी व्यक्तिमत्त्व बहुधा असते. त्याचे घटक पुढीलप्रमाणे आहेत : सूचनक्षमता, आत्मकेंद्रितता, भावनावशता, प्रदर्शनप्रवृत्ती व अतिसंवेदनशीलता. शिवाय त्यांच्या पूर्वायुष्यात भावनिक उपासमार झालेली असते किंवा पालकांनी अतिलाड केलेले आढळतात. त्यामुळे त्यांचे सामाजिक समायोजन कच्चे असते. लक्षणांना सुरूवात आत्मप्रतिष्ठेला धक्का देणाऱ्या अनुभवामुळे होते. उदा., अपयश व हेटाळणी वैवाहिक जीवनातील नेहमीचे पण असह्य असे कलह आणि क्लेश लैंगिक जीवनात निराशा, असफलता वा भीती अपघात अथवा कुटुंबियांच्या गंभीर दुखण्याच्या नाट्यमय वातावरणात स्वतःचे दुःख विसरून इतरांची सहानुभूती मिळवायची नामी संधी तात्पुरत्या दुखण्यामुळे सुचलेली उन्मादी लक्षणांची कल्पना आणि जबाबदारी टाळता येण्याजोग्या सर्व पळवाटा (सबबी) बंद करणारी परिस्थिती.   

उन्मादाचे मुख्य निदानीय वर्ग दोन आहेत : (१) परिवर्तन (कन्व्हर्शन) व (२) बोधविच्छेदन (डिसोसिएशन). पैकी बोधविच्छेदनाचे प्रकार भारतीय संस्कृतीत जास्त प्रचलित आहेत. कारण जुन्या समजुतीप्रमाणे शरीरबाह्य शक्ती उदा., मृतात्मे, दैवी किंवा दानवी शक्ती ह्या शरीरप्रवेश करून एखाद्या व्यक्तीच्या वर्तणुकीत अचानक बदल करतात. अशा व्यक्तीला अंतर्ज्ञानी सामर्थ्य प्राप्त होते अशी भोळ्या लोकांची समजूत असल्यामुळे, अशा विकाराला एक दैवी चमत्कार मानून त्या व्यक्तीला पूज्य मानले जाते.

बोधविच्छेदनीय उन्मादाचे चार प्रचिलित प्रकार आहेत : (१) ⇨ स्मृतिलोप, (२) स्मृतिखंडन, (३) समाधी (ध्यानावस्था) आणि (४) बुद्धिभ्रंशाभास (स्यूडो – डिमेंशिया). अप्रचलित प्रकारात बहुविध व्यक्तिमत्व व संधिप्रकाशावस्था (ट्वानयलाइट स्टेट) हे प्रकार नाट्यमय असून ते अनेक अभिजात साहित्याचा आधार बनलेले आहेत. उदा., डॉ. जेकिल अँड मि. हाईड.

परिवर्तनीय उन्मादाच्या निदानीय प्रकारात लक्षणसमूहाला प्राधान्य दिले जाते. लक्षणांचे स्वरूप बहुधा रूग्णाच्या अनभिज्ञ कल्पनेप्रमाणे केलेल्या शारीरिक व्याधीच्या नाट्यमय अनुकरणावर अवलंबून असते. उदा., अर्धागवातातील एका बाजूच्या अवयवांच्या शक्तिपाताचे अनुकरण म्हणून ती बाजी निश्चल परंतु ताठर करणे (जे खऱ्या पक्षाघातात शक्य नसते). प्रचलित लक्षणसमूह असे आहेत : अपस्माराभासी झटके, पक्षाघात, वाचाघात, कंपन, अनैच्छिक हालचाली, लेखकहस्तकाठिन्य, अनिवार्य उचक्या, ढेकरा किंवा शिंका तसेच संवेदनाहरण, अंधत्व (काही वेळा एकलोचनी), बहिरेपण (काही वेळा निवडक आवाजापुरतेच मर्यादित), क्षुधानाश, सतत उलट्या वगैरे.

वरील लक्षणे काही वेळा खऱ्या शारीरिक विकारांपासून ओळखणे कठीण जाते. परंतु लक्षणांचे महत्त्वाचे घटकगुण पुढीलप्रमाणे :  (१) विकाराची कल्पना किंवा लक्षणांचे स्वरूप शास्त्रोक्त नसून चारचौघांच्या कल्पनेप्रमाणे असते. (२) लक्षणांची सुरूवात व शेवट अचानक व नाट्यमय असतो. (३) रूग्णवृत्तांतात मानसिक समस्यांचे अस्तित्व व त्यांपासून पलायन करण्याची निकड शाबित होते. (४) लक्षणांचे रूप व शरीरावरील जागा निश्चित नसते. (५) तपासणीत निष्पन्न होणारी शारीरिक चिन्हे सापडत नाहीत. (६) एक विशिष्ट व विरोधाभासी अशी समाधानी वृत्ती(स्वीट इंडिफरन्स). (७) चार – चौघांत असताना लक्षणांचे स्वरूप तीव्र असते पण एकांतात ते सौम्य असते. काही वेळा लक्षणे ढोंगासारखी वाटतात परंतु ढोंगी लोकांचा बहाणा हा समजूनउमजून व लोभापोटी केलेला असतो. लक्षणांचे प्रबलन सहानुभूतीने होत राहिल्यास विकार अंगवळणी पडतो परंतु वेळीच योग्य व प्रभावी उपचार केल्यास लक्षणे दूर करता येतात.


या विकाराची लक्षणे तात्पुरती दूर करणे जितके सोपे तितकेच विकाराचे समूळ उच्चाटन करणे कठीण. लाक्षणिक उपचार शांतक औषधे, सूचनोपचार व संमोहन निद्रोपचार याने होतो परंतु विकार पूर्णपणे बरा होण्यासाठी मनोविश्लेषण जरूरीचे असते. त्यानंतर रूग्णाच्या सामाजिक वातावरणात बदल आणि अभिवृत्तीत मानसोपचाराने बदल करणे अत्यंत आवश्यक असते. नाहीतर लक्षणे पुन्हा उद्भमवतात. ती बदलू पण शकतात.

भावातिरेकी – सक्तियुक्त – मज्जावविकृती : हा विकार प्रचलित असूनसुद्धा क्वचित समजून येतो. याचे कारण भावातिरेकी लक्षणे लपविण्याची वृत्ती या विकारात समाविष्ट असते. तसेच विकृत विचार हेच मुख्य लक्षण असल्याकारणाने ते व्यक्त केल्याशिवाय समजत नाहीत. हा विकार एका विशिष्ट व्यक्तिमत्त्वातूनच उद्भवतो. त्याला ‘ॲनॅन्कॅस्टिक कॅरॅक्टर’ असे संबोधले जाते. अशी माणसे उद्योगी, टापटीप व स्वच्छताप्रिय, मितव्ययी, प्रावीण्यवादी, अतिविवेकी, धर्मभोळी, अतिविचारी व आत्मसमीक्षक असून सतत असमाधानी व क्षीण निश्चयी असतात. लक्षणांना सुरूवात बहुधा तीव्र भीती किंवा किळस वाटणाऱ्या एखाद्या धक्कादायक प्रसंगाने होते. मुख्य लक्षणे पाच प्रकारची असतात :  (१) भावातिरेकी विचार, (२) सक्तियुक्त कृती, (३) भयगंड, (४) निरंतर व्यर्थ विचार (रुमिनेशन) आणि (५) विकृत कर्मकांड.           

भावातिरेकी विचार अनाहूत व अप्रिय असून जाणिवेतून जाता जात नाहीत. त्यामुळे रूग्ण दुःखी – कष्टी होतो. उदा., आदरणीय व्यक्तीबद्दल अपशब्द मनात येणे, विष्ठा – कचरा – खरकटे इत्यादींनी विटाळले गेल्याची कायम शंका, दैंनांदिन क्रिया बरोबर न केल्या गेल्याची सतावणारी शंका अथवा गैरकृती करण्याची इच्छावजा शंका. बहुधा अशा विचारांचा ससेमिरा चुकविण्यासाठी सक्तियुक्त कृती केली जाते. परंतु अशी कृती सक्तीने पुनःपुन्हा करूनसुद्धा भावातिरेकी विचार सहसा ओसरत नाहीत आणि समाधान मिळत नाही. म्हणूनच ती कृती पुन्हा करायची आणखी सक्ती होते. उदा., देवाला पुनःपुन्हा हात जोडणे हात सारखे धूत बसणे – विशेषतः संडासातून जाऊन आल्यावर उंबरठा अथवा जमिनीतील भेग ओलांडताना ‘समाधान’ न झाल्यास मागे जाऊन पुन्हा ओलांडणे कुलुपे – कड्या वारंवार तपासून पाहणे नोटा अनेकदा मोजून पाहणे इत्यादी.

भावातिरेकी भयगंडाचे सर्वसामान्य विषय वा वस्तू म्हणजे घाण, विष्टा, सरपटणारे प्राणी, विषारी पदार्थ, भयंकर रोग, वेड किंवा मरण हे असून त्यांच्याविषयी अतिरेकी भीती वाटते म्हणून हे विषय वा वस्तू टाळण्याची पराकाष्ठा केली जाते. 

निरंतर विचार म्हणजे जीवन, मरण, सृष्टी, मनुष्यप्राणी, ‘मी’, अध्यात्म, देवधर्म, नीती वगैरे गहन विषयांवर प्रश्नार्थक तसेच निरर्थक विचार किंवा चर्चा करीत रहाण्याची अनावर व असमाधानी वृत्ती.

विकृत कर्मकांड म्हणजे एका विशिष्ट क्रमाने नियमित करण्यात येणाऱ्या निरर्थक सक्तियुक्त कृती. ह्या पाच लक्षणांमुळे रूग्ण हवालदिल व उदासीन बनतो आणि काही वेळा वैतागून आत्महत्येचा पण विचार करतो. ह्या विकाराचे कालसातत्य दीर्घ असून लक्षणांची तीव्रता कमीजास्त होत राहते. आत्मप्रतिमा व आत्मविश्वास यांची पातळी आणि लक्षणांची तीव्रता यांचे प्रमाण व्यस्त असते.

ह्या विकारांवर मानसोपचाराचा उपयोग होतो परंतु वर्तनोपचार जास्त प्रभावी ठरलेले आहेत. विशेषतः उद्दीपक वर्षाव (फ्लडिंग) व उद्दिष्टविरोधी आचरण (नेगेटिव्ह प्रॅक्टीस). सर्व अवसादविरोधी औषधे ह्या लक्षणांची तीव्रता कमी करतात. काही कठीण प्रकारांवर विद्युत् उपचार आणि काही वेळा मानसशल्यचिकित्सा (सायकोसर्जरी) यांचा पण वापर करावा लागतो.

अवसादी मज्जाविकृती : अवसादी मज्जावविकृती (डिप्रेसिव्ह न्यूरोसिस) अथवा मज्जाकविकृतीय अवसाद (न्यूरोटिक डिप्रेशन) ह्या विकाराची संकल्पना गेल्या पंधरा वर्षांतच स्पष्ट झालेली आहे. चित्तविकृतीय अवसाद (सायकॉटिक डिप्रेशन) या विकाराच्या लक्षणांशी त्याची तुलना केली जाते. पहिल्या विकारात मूळ व्यक्तिमत्त्व मज्जातविकृतीय असते परंतु दुसऱ्यात ते भावचक्राकारी (सायक्लोथायमिक) असते. पूर्वायुष्यात पहिल्या प्रकारचे विकार जडल्याचे आढळून येत नाही त्याउलट दुसऱ्या प्रकारात तसे अनेकदा घडलेले असते. विषण्णतेची तीव्रता पहिल्या विकारात कमी, तर दुसऱ्यात जास्त असते त्यामुळे आत्महत्येचा धोका दुसऱ्यात जास्त असतो. मज्जािविकृतीय अवसादात लक्षणांची सुरूवात धक्कादायक प्रसंगाने होते व मुख्य लक्षणांत चिंता प्रामुख्याने सापडते पण चित्तविकृतीय अवसादात ती सापडत नाही. ह्या विकाराला मानसोपचार अत्यंत जरूरीचा असतो. चित्तविकृतीय अवसादाला गुणकारक ठरलेला विद्युत् उपचार ह्या विकारात प्रभावी ठरत नाही. तसेच चिंतानाशक औषधांचा फायदा अवसादविरोधी औषधांपेक्षा जास्त होतो.

संदर्भ : 1. Batchelor, Ivor, R. C. Ed. Henderson and Gillespie’s Textbook of Psychiatry, London, 1975.

            2. Coleman, J. C. Abnormal Psychology and Modern Life, Bombay, 1970.

            3. Eysenck, H. J. Rachman, S. The Causes and Cures of Neurosis, London, 1971.

            4. Kaplan, H. I. : Sadock, B. J. Modern Synopsis of Comprehensive Textbook of Psychiatry – III, Baltimore, 1981.

            5. Kubie, L. S. Ed. Arieti, S. &amp Others, “Nature of Neurotic Process, “Americen Handbook of Psychiatry, Vol. III, New York, 1974.

            6. Mitchell, A. R. K. Psychiogical Medicine in Family Practice, London, 1971.

            7. Sim, M. Guide to Psychiatry, Edinburgh, 1969.

            8. Stern, P.J. Abnormal Person and His World, Princeton, 1966.

शिरवैकर, र. वै.