महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती : मराठी भाषिक प्रदेशातील लोकसाहित्याचे संशोधन, संकलन व प्रकाशन करणारी एक राज्यशासकीय संस्था. स्थापना मार्च १९५६. सर्वसामान्यांच्या भाषेचा व कल्पनाविष्काराचा अभ्यास व्हावा तसेच पारंपारिक कुळाचारांचे स्वरूप कळावे, हाही या समितीच्या स्थापनेमागील एक हेतू आहे. या समितीवर सदस्य म्हणून लोकसाहित्याचे अभ्यासक राज्यशासनातर्फे नियुक्त केले जातात. या सदस्यसंख्येवर बंधन नसते. समितीचे प्रारंभीचे अध्यक्ष चिं. ग. कर्वे हे होते. विद्यमान अध्यक्षा सरोजिनी बाबर या आहेत. समितीचे सचिव या नात्याने शिक्षण उपसंचालक काम पाहतात.

प्रस्तुत समितीचे उद्देश पुढीलप्रमाणे आहेत : (१) मराठी प्रदेशातील लोकसाहित्याचे संशोधन, जतन व प्रकाशन करणे (२) मिळविलेल्या लोकसाहित्याची विषयवार मांडणी करtन त्याची संपादित व सचित्र आवृत्ती प्रकाशित करणे (३) आकर्षक स्वरूपातील लोक-साहित्य-ग्रंथ वाचकांना स्वस्त किंमतीत उपलब्ध करून देणे (४) लोकसाहित्याचा प्रसार करणे (५) आवश्यकतेनुसार मराठी व अन्य भाषिक लोकसाहित्याचा तुलनात्मक अभ्यास करणे आणि त्याची वैशिष्ट्यपूर्ण माहिती उपलब्ध करून देणे (६) लोकसाहित्यातील बोलीभाषेचा भाषाशास्त्रीय व समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणे (७) त्या अनुषंगाने लोकसंस्कृतीही अभ्यासणे तसेच (८) लोकसंगीत, लोककला (९) लोकगीते, लोककथा, कहाण्या, म्हणी व उखाणे इत्यादीचे ध्वनिमुद्रण करणे (१०) लोककलांची सचित्र माहिती उपलब्ध करून देणे व त्यांचे प्रदर्शन भरविणे आणि (११) लोकसाहित्यविषयक निबंधवाचन करणे.

या समितीने मराठी लोकसाहित्याच्या संदर्भात बरेच उल्लेखनीय कार्य केले आहे. उदा., (१) विविध विषयांवरील सु. २७ ग्रंथांचे प्रकाशन (२) तीनशेहून अधिक लोकगीतांचे ध्वनिमुद्रण (३) लोकसाहित्याच्या प्रकाशनास अनुरूप अशा प्रकारचे छायाचित्रण (४) लोकगीते-लोककथांचे आणि लोकसाहित्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचे आकाशवाणीवरून प्रसारण (५) लोकसाहित्याविषयक संमेलनांचे आयोजन (६) लोकगीतांचे व लोकनृत्यांचे जाहीर कार्यक्रम.

प्रकाशित ग्रंथांपैकी प्रारंभीच्या १ ते ५ भागांतील महाराष्ट्र लोकसाहित्य माला (१९५६–६१) लोकसाहित्य आणि लोकसंस्कृति (यात १९६१ सालच्या पुणे संमेलनात वाचलेल्या निबंधांचा संग्रह (केलेला आहे) बाळराज (१९६२), लोकसाहित्य : भाषा आणि संस्कृति (१९६३), लोकसाहित्य : साजशिणगार (१९६५), जनलोकांचा सामवेद (१९६५), तीर्थांचे सागर (१९६७), राजविलासी केवढा (१९६८), जाई मोगरा (१९६९), नंदादीप (१९७२), लोकसाहित्य शब्दकोश (१९७३), कुलदैवत (१९७४), स्त्रियांचे खेळ आणि गाणी (१९७७) व रांगोळी (१९७९) ही पुस्तके वैशिष्ट्यपूर्ण ठरतात. यांपैकी काही पुस्तकांतून अभ्यासपूर्ण निबंध संग्रहित करण्यात आल्यामुळे ते अभ्यासकांच्या दृष्टीने मोलाचे आहेत.

समितीचे एक संग्रहालय पुणे येथे आहे. त्यात लोकसाहित्यविषयक विविध भाषांतील वाङ्‌मयांचा उपयुक्त असा संग्रह केलेला असून नित्य भर पडत आहे. संशोधक-अभ्यासकांच्या दृष्टीने तो उपयुक्त ठरतो. तसेच काही लोकगीतांच्या ध्वनिफिती व लोकजीवनाची छायाचित्रे यांचेही या संग्रहालयात जतन करण्यात आले आहे. आवश्यकतेप्रमाणे ही संस्था अधूनमधून संमेलनेही भरवीत असते. तसेच सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाच्या कार्यक्रमांची व घटना-प्रसंगांची छायाचित्रेही घेते

जोशी, चंद्रहास