पोर्ट लूई : मॉरिशस देशाच्या राजधानीचे शहर व बंदर. ते मॉरिशस बेटाच्या वायव्य किनाऱ्यावर असून मुंबईपासून ४,०५४ किमी. व कलकत्त्याहून ५,१२१ किमी. अंतरावर आहे. लोकसंख्या १,४१,३४३ (१९७६ अंदाज). केप ऑफ गुड होपला वळसा घालून आशिया व यूरोपला जाणाऱ्या–येणाऱ्या व्यापारी जहाजांचे थांब्याचे ठिकाण म्हणून्, बेर्त्रान फ्रांस्वा माए द ला बूर्दाने (१६९९–१७५३) या फ्रेंच गव्हर्नरने पोर्ट लूईची १७३५ मध्ये स्थापना केली. नेपोलियनच्या युद्धांत (१८००–१५) ब्रिटिशांनी मॉरिशसचा ताबा घेतल्याने हिंदी महासागरावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोक्याचे ठिकाण म्हणून या बंदराला फार महत्त्व होते तथापि १८६९ मध्ये सुएझ कालव्यामधून जलवाहतूक सुरू झाल्याने पोर्ट लूईचे महत्त्व कमी होत गेले. येथे साखर, चहा, मद्ये, सिगारेटी, ॲलोतंतू, तेले, साबण, काड्यापेट्या हे प्रमुख उद्योग आहेत. निर्यात व्यापारात साखर व तज्जन्य पदार्थांचा ७६% च्या वर वाटा असतो. साखरेची गुदामे, निर्यात कंपन्या, बॅंका व शासकीय कार्यालये यांचे पोर्ट लूई हे केंद्र असून लोहमार्ग, रस्ते यांचे जाळे येथूनच सबंध बेटावर पसरले आहे. येथे एक आंतरराष्ट्रीय विमानतळही आहे. शहराच्या मध्यभागी ‘सिटडेल हा जुना प्रेक्षणीय किल्ला (१८३८) असून येथील मॉरिशस इन्स्टिट्यूटमध्ये (१८८०) मॉरिशस बेटावरील वनस्पती व प्राणी यांचा अभ्यास चालतो. येथे निसर्गेतिहासविषयक व कलाविषयक संग्रहालये आहेत. यांशिवाय शहरात अश्वशर्यतीचे मैदान, करमणूकगृहे, अँग्लिकन व रोमन कॅथलिक कॅथीड्रल, शाही महाविद्यालय, छोटासा शेअरबाजारही आहे. शहरात प्रसिद्ध होणाऱ्या ५० नियतकालिकांपैकी १३ दैनिके आहेत. पोर्ट लूईहून भारताशी थेट हवाई वाहतूक चालते. शहरातील बहुसंख्य लोकवस्ती भारतीयांची असली, तरी चिनी लोकही बरेच आहेत.

डिसूझा, आ. रे.