बॅबिलन : प्राचीन बॅबिलेनियाची राजधानी व इतिहासप्रसिद्ध नगर. मध्य इराकमध्ये बगदादच्या दक्षिणेस युफ्रेटीस नदीकाठी सु. ८५ किमी. वर अल्-इलाह या शहराजवळ त्याचे अवशेष आढळतात. बॅबिलनला सुमेरियन लोक ‘केडिंगिरा’व सेमिटिक लोक ‘बॅबली’असे म्हणत. बायबल मध्ये त्याचा ‘बॅबेल’ असा उल्लेख आहे. या सर्वांचा अर्थ ‘ईश्वराचे द्वार’असा होतो.

या नगराचा इतिहास इ. स. पू. ३००० पासून ज्ञात आहे. सुमेरियन व सेमिटिक लोकांची (अकेडियनांची) राजधानी येथेच होती. इ. स. पू. २००० च्या सुमारास बॅबिलनची झपाट्याने वाढ होऊन समृद्ध अशी बॅबिलोनियन संस्कृती उदयास आली तिचे केंद्र बॅबिलन हेच होते. इ. स. पू. १८०० ते १५०० च्या दरम्यानच बॅबिलोनियन साम्राज्याचा विकास-विस्तार झाला. ⇨ हामुराबीच्या कारकिर्दीत (इ. स. पू. १७९२–१७५०) बॅबिलनचे महत्त्व वाढले. त्याने मार्डुक देवतेचे भव्य मंदिर आणि इतरही अनेक वास्तू उभारल्या. हमुराबीनंतर हिटाइस, कॅसाइट व पुढे ईलम येथील लोकांचा बॅबिलनवर अंमल होता.

सेनॅकरिब (इ. स. पू. ७०४–६८१) राजाच्या नेतृत्वाखाली ॲसिरियाने बॅबिलन जिंकले. त्यावेळी लोकांनी केलेले बंड मोडून काढण्यात आले व हे नगरही उद्ध्वस्त करण्यात आले. पुढे अकरा वर्षांनी त्याचा मुलगा एसार-हॅडन (इ. स. पू. ६८०–६६९) याने बॅबिलनची पुर्नरचना केली. नव-बॅबिलेनियन किंवा खाल्डियन काळात (इ. स. पू. ६२५–५३८), विशेषतः नेबुकॅड्नेझर (कार. इ. स. पू. ६०५–५६२) याच्या कारकिर्दीत, बॅबिलनचा पुन्हा सर्वांगीण विकास झाला, त्याने अनेक राजवाडे व वास्तू बांधल्या आणि आपल्या पत्‍नीस येथील उन्हाळा सुसह्य व्हावा म्हणून झुलती बाग तयार केली. या सर्वांचे वर्णन बुक ऑफ डॅन्येल मध्ये आढळते. पुढे प्राचीन इराणचा (पर्शिया) सम्राट ⇨सायरस द ग्रेट (इ. स. पू. ५५८–५२८) याने हे शहर जिंकले (इ. स. पू. ५३९). पहिला झर्कसीझ (इ. स. पू. ४८५–४६५) याने येथील लोकांना दहशत बसावी आणि उठावाचा बंदोबस्त व्हावा म्हणून निम्मे-अर्धे नगर उद्‍ध्वस्त केले. त्यानंतर मॅसेडनच्या ⇨ अलेक्झांडर द ग्रेट (इ. स. पू. ३५६–३२३) याने हा सर्व प्रदेश काबीज केला. त्याच्या कारकिर्दीत या नगराचा अंशतः जीर्णोद्धार झाला. अलेक्झांडरचे येथे काही दिवस वास्तव्य होते. त्याचा सेनापती सेल्युकस याने टायग्रिस नदीवर सेल्युशिया नावाचे नवीन नगर वसविले (इ. स. पू. २००) त्यामुळे बॅबिलनचे महत्त्व हळूहळू कमी होऊ लागले. पुढे पार्शियन (इ. स. पू. २५०–इ. स. २२६) व सॅसॅनिडी (इ. स. २२६–६४१) राजवटींत त्याची फारशी प्रगती झाली नाही. इ. स. १२०० मध्ये अरबांनी तेथील बांधकामाच्या सामग्रीचा उपयोग करून अल्-इलाह या शहरातील अनेक इमारती बांधल्या.

प्राचीन ग्रीक इतिहासकार हीराडोटसनेही या नगरासंबंधी, विशेषतः येथील भव्य भिंतीसंबंधी, लिहिले आहे. या स्थळाची प्रथम पाहणी क्लॉडियस जेम्स रिच या इंग्रज सर्वेक्षकाने केली व तत्संबंधीची त्याची स्मरणिका १८४१ मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर ⇨ रोबोर्ट कोल्डेव्हाइ या जर्मन पुरातत्त्वज्ञाने १८९९–१९१७ यांदरम्यान तेथे विस्तृत प्रमाणात उत्खनन केले आणि अनेक अवशेष प्रकाशात आणले. त्याने स्तरशास्त्राचा आधार घेऊन आलेखांच्या मदतीने बॅबिलन शहराची रचना नेबुकॅड्नेझर व प्राचीन ग्रीक महाकवी होमर यांनी केलेल्या वर्णनाप्रमाणे होती, हे दाखवून दिले. मूळ शहराचा विस्तार चौरस होता आणि युफ्रेटीस नदीने त्याचे नैसर्गिक रीत्या दोन समान भाग पडले होते. शहराभोवती बैलगाडी जाईल एवढी रूंद व भक्कम अशी विटांची तटबंदी होती आणि या भिंती चकचकीत निळ्या विटांनी सुशोभित केलेल्या होत्या. काही ठिकाणी त्यांवर पुराणकथा व देवदेवता यांची चित्रे रेखाटलेली होती. चारी बाजूंस चार भव्य प्रवेशद्वारे होती. शहरात मार्डुकव्यतिरिक्त इतर उपदेवतांची अनेक मंदिरे होती. मार्डुकचे मंदिर मोठे व भव्य होते. त्या मंदिराच्या परिसरात उत्तरेस बॅबेलचा भव्य व उंच मनोरा असून त्याची उंची सु. १९८ मी. होती. त्याला सात मजले होते. ‘झिगुरात’ या नावाने तो प्रसिद्ध आहे. त्याची उंची कोणत्याही पिरॅमिडपेक्षा जास्त आहे. याशिवाय येथील राजवाड्यांचे अवशेष सर्वत्र आढळतात. झिगुरातपासून जवळच झुलती बाग आहे. ग्रीकांनी तिची गणना जगातील सात आश्चर्यांत केली होती. प्रमुख मंदिराला जोडणारा पवित्र मार्ग व त्याच्या भिंती रंगीत फरशांनी अलंकृत केलेल्या असून त्यांवर अपोत्थित शिल्पात १२० सिंहप्रतिमा खोदलेल्या आहेत. पवित्र रस्त्याच्या एका द्वारास ‘इश्तारद्वार’म्हणतात. तेही भौमितिक रचनाबंध, फुले व प्राणी यांच्या सुंदर व लक्षणीय आकृत्यांनी अलंकृत केलेले आहे. बॅबेल मनोऱ्याच्या उत्तरेस सु. ५५० मी. वर कॉस्र नावाची टेकडी आहे. तिच्यावर नेबकॅड्नेझर याने एक आलिशान राजवाडा बांधला होता. त्याचे अवशेष व त्यांच्या आसपास इतर इमारतींचे भग्न अवशेष आढळतात. आजचे अल्-इलाह हे इराकमधील गाव या अवशेषांमुळे पर्यटकांचे केंद्र बनले आहे. बॅबिलन संग्रहालयाच्या (१९४९) बॅबिलन येथील अवशेषांच्या प्रतिकृती, छायाचित्रे व रंगीत चित्रे संगृहीत केलेली असून हे संग्राहलय प्राचीन बॅबिलनच्या जागीच उभारलेले आहे.

संदर्भ : 1. Koldewey, Robert, The Excavations at Babylon, London, 1914.

         2. Lloyd, S. Foundations in the Dust, New York, 1955.

         3. Parrot, Andre, Nineveh and Babylon, London, 1961.

देशपांडे, सु. र.