पोर्ट मोर्झ्बी : पापुआ न्यू गिनीची राजधानी व प्रमुख बंदर. लोकसंख्या १,१३,४०० (१९७६ अंदाज). हे पापुआ आखाताच्या आग्नेय किनाऱ्यावर वसले आहे. बंदराची नैसर्गिक जागा ‘फेर्फॅक्स हार्बर’ नावाने ओळखली जाते. हे बंदर पागा आणि तुआगुबा या डोंगरांमध्ये असल्यामुळे सुरक्षित आहे. या बंदराचा शोध प्रथम १८७३ साली कॅप्टन जॉन मोर्झबी याने लावला व बंदराला ‘फेर्फॅक्स’ हे आपल्या वडिलांचे नाव दिले. १८८३ मध्ये हे ब्रिटिश न्यू गिनीच्या राजधानीचे ठिकाण बनले. जॉन मोर्झ्बीच्या स्मरणार्थ त्याला ‘पोर्ट मोर्झ्बी’असे नाव पडले. दुसऱ्या महायुद्धात हे बंदर मित्र राष्ट्रांचा प्रमुख तळ तसेच जपानचे मुख्य लक्ष्य झाले. महायुद्धात फेर्फॅक्स बंदराचे बरेच नुकसान झाले. युद्धोत्तर काळात याचे शासकीय आणि व्यापारी महत्त्व वाढून त्याचा झपाट्याने व योजनाबद्ध असा विकास झाला. पोर्ट मोर्झ्बी ते सिडनी यांदरम्यान नियमित हवाई व जलवाहतूक चालू असते. अंतर्गत वाहतुकीसाठी उत्तम रस्ते उपलब्ध असून ‘राउना फॉल्स’ या प्रवासी स्थळाशी हे रस्त्याने जोडलेले आहे.
या बंदरातून रबर, नारळ, कॉफी, लाकूड, सोने वैगेरे मालाची निर्यात, तर यंत्रमाल, अन्नपदार्थ व इंधन यांची आयात होते. येथे पापुआ न्यू गिनी विद्यापीठ, तंत्रशिक्षण संस्था व वस्तुसंग्रहालय आहे.
फडके , वि. शं.
“