आ. १. स्पंजांचे काही प्रकार : (१) सायकॉन किंवा स्कायफा (कॅल्केरिया वर्ग), (२) रेगॅड्रेला (काच-स्पंज, हेक्झॅक्टिनेलिडा वर्ग), (३) पॉटेरिऑन, (४) यूस्पंजिया (स्नान-स्पंज), (५) मायक्रोसायोना, (६) हॅलिक्लोना (पापुद्र्यासारखा स्पंज) [३–६ डेमोस्पंजिया वर्गातील].

पोरीफेरा : (छिद्री संघ). बहुकोशिक अपृष्ठवंशी (ज्याचे शरीर अनेक कोशिकांचे-पेशींचे-बनलेले आहे व ज्यांना पाठीचा कणा नाही अशा) प्राण्यांचा एक संघ. या संघामध्ये सर्व प्रकारच्या स्पंजांचा समावेश होतो व सु. ५,००० जातींचे वर्णन उपलब्ध आहे. बहुकोशिक प्राण्यांमध्ये स्पंज निकृष्ट दर्जाचे आहेत, बहुतेक समुद्री आहेत पण स्पंजिलिडी कुलातील जाती गोड्या पाण्यात राहतात. समुद्रात ओहोटी रेषेपासून सु. ५·६ किमी. खोलीपर्यंत ते आढळतात व खडकांना किंवा इतर पदार्थांना कायमचे चिकटलेले असतात. स्पंज विविध आकारांचे व आकारमानांचे असतात, ते नळकांड्यासारखे, पापुद्र्यासारखे वाटोळे किंवा शाखित असतात. त्यांचा व्यास एक मिमी.पासून दोन मी.पर्यंत असतो. स्पंज सामान्यतः भुऱ्या रंगाचे असतात पण तांबड्या, निळ्या, पिवळ्या, काळ्या वैगेरे रंगांचेही ते असतात.

काही निवही (वसाहत करून राहणाऱ्या) कशाभिक (जीवद्रव्याचा दोऱ्यासारखा विस्तार होऊन तयार झालेली संरचना–म्हणजे कशाभिका–असलेल्या) प्रोटोझोआंशी स्पंजांचे साम्य आहे. स्पंज बहुकोशिक असून त्यात ऊतकनिर्मितीची (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहांच्या निर्मितीची) चिन्हे आढळ्तात.

क्रमविकासाच्या (उत्क्रांतीच्या) क्रियेत सुरुवातीला केव्हा तरी हे प्राणी इतर बहुकोशिकांपासून अलग पडून आदिम (आद्य) अवस्थेतच राहिले, म्हणून त्यांचा पॅरॅझोआ हा निराळा समूह करण्यात आला. पॅरॅझोआमध्ये स्पंजांचा पोरीफेरा हा एकच संघ आहे.

आ.२. स्पंजाच्या देहभित्तीची रचना दाखविणारा अनुप्रस्थ (आडवा छेद) : (१) अमीबीय कोशिका, (२) चपट्या कोशिकांची बाह्यत्वचा, (३) श्लेषी मेझेंकाइम, (४) कंटिका, (५) रंध्र, (६) रंध्र-कोशिका, (७) ग्रैवेय कोशिका.

शरीररचना : साधा स्पंज (ल्यूकोसोलेनिया) हा उभ्या नळकांड्यांचा लहान समूह असून ती बुडाशी आडव्या नळ्यांनी जोडलेली असतात. नळकांड्यात एक मध्य गुहा (जठर गुहा) आणि त्याच्या टोकावर मोठे छिद्र (आस्यक) असते. देहभित्तीत तीन स्तर असतात : चपट्या कोशिकांची बाह्यत्वचा हिच्या आत श्लेषी (बुळबुळीत) मेझेंकाईम-स्तर (बाह्य स्तर व अंतःस्तर यांच्यामध्ये असणारा ऊतकांचा पुंज) आणि याच्या आत, मध्य गुहेला लागून असणारा कशाभिक ग्रैवेय कोशिकांचा (कशाभिकेच्या तळाभोवती कॉलरसारखे कडे असलेल्या कोशिकांचा) स्तर. मेझेंकाइममध्ये कित्येक प्रकारच्या मुक्त अमीबीय कोशिका (मुक्तपणे भ्रमण करणाऱ्या व विविध प्रकारचे कार्य करणाऱ्या) आणि देहभित्तीला मजबुती आणणाऱ्या कॅल्शियमी कंटिका (बारीक काटे) असतात. काही कंटिका बारीक शलाकेसारख्या (एकार)असतात, तर इतर काही त्रिअरी (तीन अर असलेल्या) व समचतुररही (चार अर असलेल्या) असतात.

जटिल (गुंतागुंतीची संरचना असलेल्या) स्पंजांमध्ये बाहेरचा व आतला स्तर चपट्या कोशिकांचा असतो. ग्रैवेय कोशिका ज्या ज्या ठिकाणी असतात त्या त्या ठिकाणी त्यांचा स्तर सैल असतो. स्पंजांमध्ये संघटीत असे हेच स्तर असतात. अमीबीय कोशिका पुष्कळ प्रकारच्या असतात. कंटिका निरनिराळ्या रासायनिक संघटनेच्या आणि प्रकारच्या असतात. देहभित्तीत अंतर्वाही (पाणी आत नेणारी) रंध्रे (छिद्रे) असतात, ती नालरूप असून रंध्र-कोशिकांमध्ये असतात आणि बाह्यपृष्ठापासून मध्य गुहेपर्यंत गेलेली असतात. ती उघडू किंवा मिटू शकतात. ग्रैवेय कोशिका वाटोळी वा अंडाकृती असते. कोशिकेच्या मोकळ्या टोकावर एक कशाभिका असून तिच्या बुडाभोवती पारदर्शक, संकोचशील (आंकुचन पावणारे) कॉलरसारखे कडे असते. रंध्रामधून पाणी मध्य गुहेत येते आणि कशाभिका एकसारख्या मागेपुढे हालत असल्यामुळे ते आस्यकामधून बाहेर जाते. अशा तऱ्हेने ताज्या पाण्याचा प्रवाह स्पंजांतून सतत जात आ. ३. स्पंजांची नाल तंत्रे : (अ) ल्यूकोसोलेनियाचे नाल तंत्र : (१) आस्यक, (२) जठर-गुहा, (३) अंतर्वाही रंध्र (आ) सायकॉनचे नाल तंत्र : (१) आस्यक, (२) जठर-गुहा, (३) आगमद्वार, (४) अपद्वार, (५) कशाभिक कोष्ठ, (६) अंतर्वाही नाल (इ) गोड्या पाण्यातील स्पंजाचे (स्पंजिला) नाल तंत्र : (१) जठर-गुहा, (२) आस्यक, (३) कशाभिक कोष्ठ, (४) अंतर्वाही नाल, (५) बहिर्वाही नाल, (६) बाह्य-अधो-गुहा, (७) त्वचा-छिद्रे, (८) बहिर्वाही नालद्वारे.

असतो. जटिल स्पंजामध्ये या नाल तंत्राची अथवा जल परिसंचरण तंत्राची (शरीरात पाणी खेळविणाऱ्या संस्थेची) अत्यंत कौशल्यपूर्ण परिवर्तने (फेरबदल) आढळतात. पाण्याबरोबर ऑक्सिजन व अन्न (प्लवक म्हणजे पाण्यात तरंगणारे जीव) आत येते आणि निरुपयोगी द्रवे बाहेर जातात. ग्रैवेय कोशिका अन्नाचे अंतर्ग्रहण करून (आत घेऊन) ते पचवितात.

 

आ. ४. स्पंजांच्या कंटिका आणि तंतू : (अ) कॅल्शियमी कंटिका, (आ) सिलिकामय कंटिका, (इ) स्नान-स्पंजात आढळणारे स्पंजिन-तंतूंचे जाळे.

कंकाल व वर्गीकरण: स्पंजांचा कंकाल (सांगाडा) कंटिकांचा, स्पंजिन- तंतूंचा [केराटिनाचे तंतू  →केराटिने] किंवा दोहोंचाही बनलेला असतो. कंकालाच्या अंशकांच्या (घटकांच्या) लक्षणांवरून पोरिफेरा संघाचे तीन वर्ग पाडले जातात. (१) कॅल्फेरिया : संरचना साधी कंटिका कॅल्शियम कार्बोनेटाच्या सामान्यतः त्रिअरी समुद्राच्या उथळ पाण्यात राहतात. या वर्गात सु. १५० जाती आहेत. उदा., सायकॉन, ग्रॅन्शिया. (२) हेक्झॅक्टिनेलिडा : (काच-स्पंज). कंटिका सिलिकामय, मुख्यतः षडर (सहा अर असलेले) कंटिकापासून अखंड कंकाल तयार होतो. हे स्पंज सगळ्या समुद्रात बऱ्याच खोलीपर्यंत आढळतात. शरीर नळकांड्यासारखे किंवा परडीसारखे. उदा., यूप्लेक्टेला हायालोनेमा. (३) डेमोस्पंजिया : कंकाल फक्त स्पंजिन-तंतूंचा, स्पंजिन–तंतू व सिलिकामय कंटिकांचा किंवा मुळीच नसतो कंटिका असल्या तर एकार किंवा समचतुररी केव्हाही षडर नसतात. या वर्गातील स्पंजांच्या असंख्य जाती सगळीकडे आढळतात. नालतंत्र गुंतागुंतीचे व लहान कशाभिक कोष्ठांशी जोडलेले . या वर्गातील क्लायोना हा स्पंज खडकात किंवा मॉलस्कांच्या (मृदुकाय प्राण्यांच्या) कवचात बोगदे तयार करून त्यात राहतो. गोड्या पाण्यातील स्पंज व स्नान-स्पंज (अंग स्वच्छ करण्याकरिता वापरण्यात येणारे स्पंज) या वर्गातील आहेत. या वर्गातील काही स्पंजांत (उदा., ऑस्करेला) कंकाल नसल्यामुळे ते खाद्य पदार्थावर पापुद्र्याप्रमाणे वाढतात.


प्रजोत्पादन : स्पंजांचे जनन लैंगिक रीतीने, मुकुलनाने (शरीरावर अंकुरासारखे बारीक उंचवटे येऊन त्यांपासून नवीन प्राणी तयार होण्याच्या क्रियेने), कुड्‌मिकांमुळे (प्रतिकूल परिस्थितीत भ्रूणकोशिकांच्या समूहांभोवती तयार होणाऱ्या संरक्षक कवचांमुळे अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यावर त्यांपासून प्राण्यांची नवीन वसाहत तयार होते.) किंवा पुनरुद्‌भवनाने होते [→प्रजोत्पादन]. स्पंज-कोशिकांच्या अंगी पुनर्जननाचे असामान्य सामर्थ्य असते. बहुतेक स्पंज उभयलिंगी (नराची आणि मादीची जननेद्रिंये एकाच प्राण्यात असणारी स्थिती) असतात पण अंडाणू (स्त्री-जनन कोशिका)व शुक्राणू (पुं-जनन कोशिका) एकाच वेळी तयार होत नाहीत. देहभित्तीच्या काही कोशिकांपासून युग्मक (ज्यांच्या संयोगामुळे प्रजोत्पत्ती होते त्या जनन-कोशिका) तयार होतात. अंड्याचे निषेचन (फलन) स्पंजाच्या शरीरात होते व तेथेच त्याची वाढ होऊन कशामिक डिंभ (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी व प्रौढाची साम्य नसणारी, सामान्यतःक्रियाशील असणारी पूर्व अवस्था) बाहेर पडतो. हा मुक्तप्लावी (मुक्तपणे पोहणारा) असतो. काही काळानंतर तो एखाद्या आधाराला चिकटतो व त्याच्यापासून नवीन स्पंज तयार होतो.

काही स्पंज व्यापारी महत्त्वाचे आहेत. बाजारात मिळणारा स्नानस्पंज व्यापारी महत्त्वाचा आहे आणि तो भूमध्य समुद्र, मेक्सिकोचे आखातव वेस्ट इंडीज या ठिकाणी आढळतो.

कायटॉन, गोगलगायी व न्यूडिब्रँक हे प्राणी नियमितपणे, मासे क्वचित आणि इतर प्राणी कदाचित स्पंजाचा भक्ष्य म्हणून उपयोग करतात. समुद्र-पुष्प, ऑक्टोपस, भंगुरतारे, पॉलिकीट, कोळंबी इ. प्राणी स्पंजांच्या वसाहतीत राहतात पण त्यांचे स्पंजांशी कोणते संबंध असतात हे स्पष्ट झालेले नाही. काही समुद्री स्पंज तंतुमय अथवा पोवळ्यासारख्या शैवलांनी व्यापलेले असतात. काही खेकडे संरक्षणासाठी आपल्या पाठीवर स्पंजांची वाढ करतात अथवा त्यांचे तुकडे धरून ठेवतात आणि आजूबाजूच्या परिसरात मिसळून जाण्याचा प्रयत्न करतात.

 कर्वे, ज. नी.

जीवाश्म : (शिळारूप अवषेश). इतर अपृष्ठवंशी प्राण्यांच्या मानाने स्पंजांचे जीवाश्म कमी आढळतात मात्र काही भागांत ते विपुल प्रमाणात आढळले आहेत. मृत्यूनंतर स्पंजांच्या सांगाड्यातील कंटिका सुट्या होतात परंतु ज्या स्पंजांमधील कंटिका एकमेकींना घट्ट चिकटून बळकट सांगाडा बनलेले असतो, असे स्पंज बहुतकरून जीवाश्मरूपात टिकून राहिलेले आढळ्तात. सागरी गाळांच्या खडकांमध्ये सुट्या कंटिका पुष्कळदा आढळतातमात्र एकदा कि कंटिका सांगाड्यापासून सुट्या झाल्या की, त्या कोणत्या स्पंजाच्या आहेत, हे ओळखणे अवघड असते आणि त्यांच्यावरून स्पंजाची जाती अथवा वंश ठरविणे अशक्य असते कारण एका स्पंजात कित्येक प्रकारच्या कंटिका असतात, तर कित्येक वंशातील स्पंजांमध्ये एकाच तऱ्हेच्या कंटिका असू शकतात. यामुळे स्पंजांचे काही विशिष्ट कठीण भागच जीवाश्मरूपात टिकून राहतात. यामुळे स्पंजांचा विकास कसा झाला असेल याचे स्पष्ट चित्र होत नाही. मात्र काहींच्या मते कार्‌बॉनिफेरस (सु. ३५ ते ३१ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील कॅल्केरिया स्पंज आर्किओसायाथिंडापासून उत्क्रांत झाले असावेत. लिथिस्टिड, डेमोस्पंजिया हेक्झॅक्टिनेलिडा, स्क्लेरोस्पंजिया व कल्केरिया यांचे सांगाडे सापेक्षतः दृढ असतात व त्यामुळे यांचे जीवाश्म सामान्यपणे आढळतात.

सामान्यतः कँब्रियन (सु. ६० ते ५१ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळापासून आतापर्यंतचे स्पंजांचे जीवाश्म आढळले आहेत. अगदी थोड्याच भागांत कँब्रियन-पूर्व (सु. ६० कोटी वर्षांच्या आधीच्या) काळातील स्पंजांचे जीवाश्म आढळले आहेत. कँब्रियन काळातील जीवाश्म कॅनडियन रॉकी पर्वतातील बर्गेस शेल खडकांत विपुल आढळले आहेत. ऑर्डोव्हिसियन (सु. ४९ ते ४४ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळाच्या सुरुवातीस लिथिस्टीड स्पंज अवतरले व या काळाच्या मध्यास त्यांची भरभराट होऊन त्यांच्या भित्तीही बनल्या होत्या. ऑर्डोव्हिसियन व सिल्युरियन (सु. ४९ ते ४२ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळांत स्पंजांपैकी डेमोस्पंजियांचे विविध प्रकार प्रमुख होते. डेव्होनियन (सु. ४० ते ३६·५ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील जीवाश्म उत्तर अमेरिकेत (हेक्झॅक्टिनेलिडा) व पश्चिम ऑस्ट्रेलियात (लिथिस्टीड यांच्या भित्तीही) आढळतात. स्क्लेरोस्पंजिया ऑर्डोव्हिसियन ते डेव्होनियन (सु. ४९ ते ३६·५ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील सर्वांत सामान्य स्पंज असून संपूर्ण पुराजीव महाकल्पात (सु. ६० ते २४·५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) आढळणारे हेटरॅक्टिनिडा उत्तर डेव्होनियन व पूर्व कार्‌बॉनिफेरस (सु. ३६ ते ३४ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळात विपुल होते. कार्‌बॉनिफेरस (सु. ३५ ते ३१ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील जीवाश्म थोडे विखुरलेले आहेत परंतु पर्मियन (सु. २७·५ ते २४·५ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळात स्पंजांचे जीवाश्म पुनश्च सर्वसामान्य झाल्याचे दिसुन येते. या काळात त्यांच्या भित्तीही तयार झाल्या होत्या (उदा. पश्चिम टेक्सस, ट्युनिशिया, सिसिली, तिमोर). पर्मियनच्या अखेरीस स्पंजांचे बरेच गट निर्वंश झाले.

मध्यजीव महाकल्पातील (सु. २३ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) स्पंजांचे प्रमुख गट कार्‌बॉनिफेरस व पर्मियन काळात अवतरले होते. उदा., कॅल्केरिया कार्‌बॉनिफेरस काळात अवतरले. ते ट्रायासिक काळात (सु. २३ ते २० कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) विपुल झाले व त्यांच्या भित्तीही तयार झाल्या आणि क्रिटेशस (सु. १४ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळाच्या शेवटी निर्वंश झाले. ट्रायासिक काळातील जीवाश्म सामान्यपणे द. यूरोपातील आल्प्स पर्वतातील खडकांत आढळतात. त्यांच्या भित्तीही तयार झाल्या होत्या. जुरासिक (सु. १८·५ ते १५·५ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळात मुख्यत्वे लिथिस्टिडांचे जीवाश्म असून ते यूरोप, मोरोक्को (भित्तींच्या रूपात) व भूमध्य सागरी प्रदेशाच्या पूर्वेकडील भागात आढळतात. क्रिटेकेश काळात स्पंजांचा चांगला विकास झाला या काळातील जीवाश्म सामान्यपणे पश्चिम व उत्तर युरोपात सापडले आहेत.

नवजीव महाकल्पातील (गेल्या सु. ६·५ कोटी वर्षांतील) स्पंजांचे आधुनिक स्पंजांच्या प्रकारांशी साम्य असून त्यांचे थोडेच जीवाश्म उत्तर अमेरिकेमध्ये सापडले आहेत. 

प्रकार : स्पंजांच्या जीवाश्मांचे पुढील पाच वर्ग केले जातात. त्यांपैकी हेटरॅक्टिनिडा स्पंज तेवढे निर्वंश झाले आहेत.


कॅल्केरिया : (कॅल्सिस्पंज). या गटातील स्पंजांच्या कंटिका चूर्णीय म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटाच्या (कॅल्साइटाच्या वा ॲरॅगोनाइटाच्या) बनलेल्या असतात. याचे सर्वांत जुने जीवाश्म कार्‌बॉनिफेरस काळातील असून पर्मियन व ट्रायासिक काळांत त्यांची भरभराट होऊन त्यांच्यातील विविधता कमाल झाली होती. जुरासिकमध्ये त्यांची संख्या घटली व क्रिटेशसच्या अखेरीस एक सोडता त्यांच्या सर्व जाती निर्वंश झाल्या.

हेक्झॅक्टिनेलिडा : (हायालोस्पंजिया). यातील स्पंजाचा सांगाडा ओपल सिलिकेचा बनलेला असून कंटिका एकमेकींना काटकोनात असतात. पूर्व कॅब्रियन काळात यांचे नियमित व अनियमित मांडणीच्या कंटिका असलेले असे दोन प्रकार होते. एकजीव सांगाडा असलेले प्रकार ट्रायासिकमध्ये आढळले असून ते नंतर सर्वसामान्य प्रकार झाले व क्रिटेशस काळात त्यांच्यामध्ये कमालीची विविधता निर्माण झाली होती.

डेमोस्पंजिया : यांचा सांगाडा स्पंजिन-तंतू, सिलिकामय कंटिका किंवा मिश्र कंटिका व स्पंजिन यांचा बनलेला असतो. फक्त कंटिका असणाऱ्या प्रकारांचेच जीवाश्म आढळतात. (उदा., लिथिस्टीड). यांचे सर्वांत जुने जीवाश्म मध्य कँब्रियन काळातील असून ऑर्डोव्हिसियन काळात ते विपुल आढळतात. व त्या काळातील भित्ती निर्मिणाऱ्या प्रमुख जीवांपैकी हे स्पंज एक होत. सिल्युरियनमध्ये ते सर्वसामान्य जीव होते जुरासिक व क्रिटेशस काळांत ते पुन्हा विपुल झाले आणि अजूनही ते समुद्रांत सामान्यपणे आढळतात.

हेटरॅक्टिनिडा : यातील स्पंजांचा सांगाडा चूर्णीय मोठ्या कंटिकांचा बनलेला असतो. कँब्रियन ते सिल्युरियन कालीन प्रकारांच्या कंटिका पोकळ, तर नंतर त्या जवळजवळ भरीव होत गेल्याचे दिसते. पर्मियन काळात निर्वंश होणारा हा स्पंजांचा एकमेव वर्ग होय.

स्क्लेरोस्पंजिन :यामध्ये आधुनिक स्पंजांचे सहा वंश येतात. त्यांचा सांगाडा चूर्णीय व पत्रित (पापुद्र्यांचा) प्रकारचा असतो. यातील स्पंज कँब्रियनमध्ये अवतरले आणि ऑर्डोव्हिसियन ते डेव्होनियन काळात त्यांची भरभराट झाली व त्यांच्या भित्तीही निर्माण झाल्या. तथापि पर्मियन काळात या वर्गातील स्पंज इतर स्पंजांच्या तुलनेत गौण होते.

 ठाकूर, अ. ना.

संदर्भ: 1. Barnes, R. D. Invertebrate Zoology, Philadelphia, 1963.

            2. Hegner, R. W. Invertebrate Zoology, New York, 1960.

            3. Storer, T. I. Usinger, R. L. General Zoology, Tokyo, 1957.

           4. Zittel, K. A. Von, Text-Book of Palaeontology, 3Vols., London, 1964.