पोटॅश : प्राचीन काळी वनस्पतीच्या राखेचे (ash) पाण्याने निक्षालन करून मिळणारा विद्राव लोखंडी भांड्यात (pot) घेऊन त्याच्या बाष्पीभवनाने एक पदार्थ मिळवत असत. त्याचा उपयोग काच तयार करण्याकरिता करत असत. हा पदार्थ म्हणजे अशुद्ध पोटॅशियम कार्बोनेट (K2CO3) होय. या तयार करण्याच्या पद्धतीवरून (pot-ash) ‘पोटॅश’असे नाव तयार झाले. पुढे पोटॅश ही संज्ञा दाहक (कॉस्टिक) पोटॅशलाही (KOH) वापरण्यात येऊ लागली कारण ‘पॉट-ॲश’मध्ये चुना घालून ते मिळते [→दाहक पोटॅश]. त्याचा उपयोग मऊ साबण तयार करण्याकरिता करीत असत. हल्ली तर कृषिविज्ञानात व उद्योगधंद्यात बऱ्याचशा पोटॅशियम संयुगांना ‘पोटॅश’ही संज्ञा वापरतात व पोटॅशची टक्केवारी पोटॅशियम ऑक्साइडाच्या (K2O) सैद्धांतिक सममूल्यात दिली जाते. पोटॅशियम ऑक्साइड हे संयुग निसर्गात आढळत नाही वा त्याचे व्यापारी उत्पादनही करीत नाहीत, तरी सुद्धा त्याच्या मूल्यात पोटॅशची टक्केवारी देण्याची पद्धत आहे. ही पद्धत विशेषःत खतांच्या बाबतीत वापरतात. [→खते].

नैसर्गिक रीत्या पोटॅश भरपूर प्रमाणात आढळते. त्याचा प्रथम शोध १७९७ मध्ये मार्टीन एच्. क्लापरोट यांनी लावला. त्यांनी ल्यूसाइट [KAI(Si3)2] या खनिजात पोटॅशियम असल्याचे शोधून काढले.

पुष्कळशा विद्राव्य पोटॅश खनिजांचे नैसर्गिक बाष्पीभवनामुळे तयार झालेले निक्षेप (साठे) सर्व जगभर आढळतात त्यातील काही महत्त्वाचे त्यांच्या पोटॅश सममूल्यासहित (K2O) पुढीलप्रमाणे आहेत: सिल्व्हाइट (KCl) हे ६३·२% K2O सममूल्य असलेले खनिज जर्मनी, फ्रान्स, पोलंड, स्पेन, रशिया व अमेरिकेची संयुक्त संस्थाने येथे खाणीतून काढतात. लँग्बेनाइट (K2SO4·2MgSO4) या २२·७% K2O सममूल्य असलेल्या खनिजाच्या पोलंड आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने येथे खाणी आहेत. काइनाइट (MgSO4·KCI·3H2O) हे १८·९% K2O सममूल्य असलेले खनिज मुख्यत्वे जर्मनी, रशिया व पोलंड येथे आहे. कार्नालाइट (KCI·MgCI2·6H2O) हे १६·९% K2O सममूल्य असलेले खनिज जर्मनीतील श्टासफुर्ट येथील निक्षेपात आहे. [→ पोटॅशियम].

इ.स. १९७० सालच्या पोटॅशच्या १,८५,४६,००० टन (K2O शी सममूल्य असलेल्या) जागतिक उत्पादनापैकी रशियात २४%, कॅनडात १७%, प. जर्मनीत १४%, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत १३%, पू. जर्मनीत १३% व फ्रान्समध्ये १०% उत्पादन झाले.

उत्पादित पोटॅशपैकी जवळ जवळ ९०% पेक्षा जास्त पोटॅश खत म्हणून वापरतात. पोटॅश खतांचे एक वैशिष्ट्य म्हणजे वनस्पतींमध्ये जे संश्लेषित कार्बनी (सेंद्रिय) घटक तयार होतात त्यांत ते आढळून येत नाही. नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर, मॅग्नेशियम इ. पोषक द्रव्ये वनस्पतींतील संश्लेषित कार्बनी घटकांत आढळतात. वनस्पतींच्या कोशिकारसात (पेशींमधील मूलभूत द्रव पदार्थात) मात्र ते दिसून येते. पोटॅशमुळे पिष्टमय पदार्थाचे साखरेत रूपांतर होण्यास मदत होते, तसेच नायट्रोजनाचे प्रथिनात रूपांतर करण्यास आणि ती प्रथिने वनस्पतीतील कवचाच्या भागापासून आत दूरवर नेण्यास मदत करते. त्यामुळे कवचे मजबूत बनतात व वनस्पतींची रोगप्रतिकारशक्ती वाढते. पोटॅशमुळे वनस्पती जोमदार व तजेलदार राहतात आणि प्रत्यक्ष उत्पादन वाढीपेक्षा त्यांची प्रत सुधारण्यास मदत होते.

घाटे, रा. वि.