साबात्ये, पॉल : (५ नोव्हेंबर १८५४–१४ ऑगस्ट १९४१). फ्रेंच कार्बनी रसायनशास्त्रज्ञ. त्यांना १९१२ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक ⇨व्हीक्तॉर गीन्यार यांच्याबरोबर संयुक्तपणे मिळाले. या दोघांनी उत्प्रेरकाच्या [रासायनिक विक्रियेत प्रत्यक्ष सहभागी न होता तिची गती बदलणाऱ्या पदार्थाच्या ⟶ उत्प्रेरण] मदतीने रासायनिक विक्रियांनी कार्बनी संयुगे तयार केली. या रासायनिक संश्लेषण पद्घतींत केलेल्या संशोधनाबद्दल आणि विशेषतः कार्बनी संयुगांच्या रेणूंमध्ये हायड्रोजन समाविष्ट करण्याच्या ‘हायड्नोजनीकरण’ या पद्घतीत निकेलाचा उत्प्रेरक म्हणून उपयोग करण्याचा शोध लावल्याबद्दल हे पारितोषिक त्यांना मिळाले होते.
साबात्ये यांचा जन्म कारकासॉन ( फान्स ) येथे झाला. एकोल सुपेरियर द फार्मसी येथील अध्ययनानंतर कॉलेज द फान्स येथे ⇨प्येअर यूझेअन मार्सलां बर्थेलॉट ( बेर्तलो ) यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करुन साबात्ये यांनी डॉक्टरेट पदवी १८८० मध्ये संपादन केली. एक वर्ष बू र्दा विद्यापीठात अध्यापन केल्यावर ते १८८२ मध्ये तूलूझ विद्याऐपीठात गेले आणि तेथे ते प्राध्यापक (१८८४) व अधिष्ठाता (१९०५) झाले. निवृत्त होईपर्यंत त्यांनी तेथेच अध्यापन केले (१९३०).
साबात्ये यांनी अनेक शोध लावले. हे शोध मार्गारीन, तेलाचे हायड्रोजनीकरण व संश्लेषित मिथेनॉल या उद्योगांसाठी आधारभूत ठरले. तसेच प्रयोगशाळेतील अनेक संश्लेषणांच्या द्दष्टीनेही हे शोध आधारभूत ठरले आहेत. कार्बनी रसायनशास्त्रातील जवळजवळ संपूर्ण उत्प्रेरकी संश्लेषणाच्या क्षेत्राचे त्यांनी सर्वेक्षण (पाहणी) केले होते. व्यक्तिशः त्यांनी शेकडो हायड्रोजनीकरण व हायड्रोजननिरास (हायड्रोजन काढून टाकण्याच्या) विक्रि यांचे अनुसंधान केले. यांवरुन त्यांनी निकेलाशिवाय अनेक धातूंमध्ये उत्प्रेरकी क्रि याशीलता असते, असे निदर्शनास आणले. मात्र या धातूंची ही क्रियाशीलता निकेलाच्या क्रि याशीलतेहून कमी असते. उत्प्रेरकी जलसंयोग व निर्जलीकरण या विक्रि यांचाही साबात्ये यांनी अभ्यास केला होता. यात त्यांनी विशिष्ट विक्रियांची सुसाध्यता व विविध उत्प्रेरकांची सर्वसाधारण क्रि याशीलता यांचे परीक्षण केले होते.
तूलूझ येथे त्यांचे निधन झाले.
पहा : उत्प्रेरण गीन्यार विक्रिया.
ठाकूर, अ. ना.