पोगोनोफोरा : या अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) प्राण्यांच्या संघातील प्राणी स्थानबद्ध असून त्यांना प्रसार जगभर सर्वत्र आहे. ते समुद्राच्या तळावरील लांब, दंडगोलकृती संरक्षक नलिकांत राहतात. या नलिका ⇨ कायटिन व प्रथिन यांच्या स्त्रवणाने तयार केलेल्या असतात. त्यांच्या शरीराची लांबी १०–३० सेंमी. व मोठ्या जातींत व्यास २·५ मिमी.पर्यंत असतो. ते समुद्रात १,००० मी.पेक्षा जास्त खोलीवर आढळतात. काही जाती ७,०००-१०,००० मी. खोलीवर आढळतात. त्यांना मुख (तोंड), आतडे व गुदद्वार नसतात. त्यांच्या अग्र (स्पर्शज्ञान, शोध घेणे, पकडणे किंवा चिकटणे इ. कार्यांकरिता उपयोगात आणली जाणारी लांब, सडपातळ व लवचिक इंद्रिये) असतात. त्यावरून त्यांना ‘दाढीवाल्या कृमी’ असे सामान्य नाव पडले आहे. नर व मादी दिसावयास सारखी असतात.

मलेशिया द्वीपसमूहाच्या जवळच्या समुद्रात सापडलेल्या सिबोग्लिनम वेबरी या जातीचे वर्णन १९१४ मध्ये एम्. कॉलरी यांनी केले. लॅमेलीसॅबेली झॅक्‌सी ही दुसरी जाती ओखोट्‌स्क समुद्रात सापडलेली असून तिचे वर्णन १९३३ मध्ये करण्यात आले. १९३७ मध्ये लॅमेलीसॅबेली वंशाचा समावेश असलेला पोगोनोफोरा हा संघ मान्यता पावला. १९५५ मध्ये लॅमेलीसॅबेलीसिबोग्लिनम या दोन्ही वंशांतील आप्तसंबंध सिद्ध झाल्यावर त्या दोहोंचा समावेश असलेला पोगोनोफोरा हा संघ प्रस्थापित झाला.

पोगोनोफोरा संघात एफ्रेन्यूलेटा व फ्रेन्यूलेटा असे दोन वर्ग आहेत. एफ्रेन्यूलेटा वर्गात लॅमेलीब्रँकिया बारहॅमी ह्या जातीचा समावेश असून ती पॅसिफिक महासागराच्या कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ सापडते. फ्रेन्यूलेटा वर्गात ६ कुलांचा व १६ वंशांचा समावेश केलेला आहे. आतापर्यंत या संघातील ११० जातींचे अभिज्ञान (अस्तित्व ओळखणे) झालेले आहे आणि अजून बऱ्याच जातींचे अभिज्ञान व्हावयाचे आहे.

कँब्रियन व ऑर्डोव्हिसियन या कल्पातील (सु. ६० ते ४४ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) खडकांत पोलंडमध्ये, लेनिनग्राडजवळ व सायबीरियात पोगोनोफोरांचे जीवाश्म (शिळारूप अवशेष) विपुल आढळले आहेत.

पहा : एकायनोडर्माटा कीटोग्नॅथा क्रमविकास हेमिकॉर्डेटा.

जमदाडे, ज. वि.