ऊतकक्रामी संसर्ग रोग ट्रिकिनेला स्पायरॅलिस नावाच्या गोलकृमीची अळी-अवस्था स्‍नायूपर्यंत पोहोचून तिथे कवचयुक्त होऊन राहते, त्या पुटीमय अवस्थेला ऊतकक्रामी (समान रचना व कार्य असणार्‍या पेशीसमूहावर म्हणजे ऊतकावर आक्रमण करणारा) संसर्ग रोग (ट्रिकिनोसीस) म्हणतात. या गोलकृमींचे पोषण सामान्यपणे मनुष्य व डुक्कर यांमध्ये होते. बैल, मेंढी, घोडा, कुत्रा, मांजर, ससा, उंदीर तसेच कित्येक वन्य सस्तन प्राण्यांत या रोगाची नोंद झालेली आहे. वन्य डुकरे व उंदीर तसेच सर्वभक्षक प्राणी नैसर्गिक रोगपोषक होत. जगातील डुक्कर-पालन-करणार्‍या सर्व देशांत रोगप्रसार आढळतो.

पोषकाच्या लघ्वांत्रात (लहान आतड्यात) नर व मादी कृमींचा संयोग झाल्यानंतर मादी लीबरक्यून ग्रंथीवाटे (आतड्यात उघडणार्‍या नलिकाकार ग्रंथीवाटे नाव लीबरक्यून या शास्त्रज्ञांच्या नावावरून) श्लेष्मकलेत (आतड्याच्या आतील पृष्ठभागावरील बुळबुळीत अस्तरात) प्रवेश करते व पुढे लसीकेच्या (ऊतकांकडून रक्तात जाणारा व रक्तद्रवाशी साम्य असलेल्या द्रव पदार्थाच्या) पोकळीत पोहोचल्यावर फार मोठ्या अळ्या प्रसवते. ह्या अळ्या रक्तवाहिन्या व लसीकावाहिन्यांद्वारा सर्व शरीरात पसरतात. काही इष्ट स्‍नायूंच्या परिकला (वेष्टनासारखी असणारी पातळ पटले) भेदून, तेथेच द्रवार्बुद (द्रवयुक्त गाठींच्या) अवस्थेत राहतात. संसर्ग झाल्यानंतर ८ ते २५ दिवसांत स्‍नायूमध्ये त्या आढळतात व अशा अवस्थेत कित्येक वर्षे राहू शकतात, पण हळूहळू त्यांचे कॅल्सिकरण होऊन (कॅल्शियम लवणे साचून) त्या नष्ट होतात. द्रवांर्बुदे सामान्यपणे कंकालस्‍नायूमध्ये (सांगाड्याशी संबंधित असलेल्या स्‍नायूमध्ये) आढळली, तरी हृदयाचे स्‍नायू, फुप्फुसे, क्वचित मेंदू व तंत्रिका (मज्‍जातंतू) यांतही दिसून येतात.

लक्षणे : भूक मंद होणे, पोटात मुरडा होणे, जुलाब, कमरेखालील भागाचा पक्षाघात, मलमूत्रावरोध, स्‍नायूचा ताठरपणा इ. लक्षणे आढळतात. रोगाच्या तीव्र प्रकारात फुप्फुसांच्या पक्षाघातामुळे रोगी तत्काळ मृत्यू पावतो.

मरणोत्तर तपासणी : स्‍नायूतील अळ्यांच्या पुटीमय अवस्थेशिवाय विशेष काहीही आढळत नाही.

प्रतिबंध व नियंत्रण : उकिरड्यावर फेकलेल्या कच्च्या मांसावर पोसलेल्या डुकरांत रोगप्रमाण अधिक असते. त्यांच्या खाण्यामध्ये दूषित तसेच कच्चे मांस येऊ न देणे किंवा शिजवून खावयास देणे, कच्चे किंवा अर्धवट शिजवलेले मांस खाण्याने होणारे दुष्परिणाम लोकांना समजावून सांगणे इ. उपाय महत्त्वाचे आहेत.

देवधर, ना. शं.