अवरुद्ध-क्लथित वाहिनी-शोथ : नीला किंवा रोहिणी यांच्यामधील तीव्र शोथ (दाहयुक्त सूज) व क्लथन (रक्त गोठणे) यांमुळे रक्तप्रवाहाला अडथळा होणे ही लक्षणे असणाऱ्या रोगास’अवरुद्ध-क्लथित वाहिनी-शोथ’ म्हणतात.
हा रोग सर्व देशांत व मानववंशांत आढळतो. सामान्यतः केवळ पुरुषांना होतो व त्यांपैकी शेकडा ९९ रुग्ण अतीव धूम्रपान करणारे असतात. रोगाचे कारण निश्चित नाही, परंतु बहुतेक सर्व रुग्ण धूम्रपान करणारे असतात व धूम्रपान सोडून दिल्यास रोगाची तीव्रता कमी होते. यावरून धूम्रपानाच्या स्वरूपात तंबाखू सेवन करणे हे या रोगाचे कारण असावे असे मानतात.
या विकारात रक्तवाहिन्यांच्या आवरणांचा शोथ होऊन रक्ताचे क्लथन होते व रक्तप्रवाहास रोध उत्पन्न होतो. विशेषतः पायाच्या रोहिण्यांना हा रोग होतो. चालताना स्नायूंना जे अधिक रक्त लागते ते पुरविता न आल्याने चालताना पायांत तीव्र वेदना होतात व तसेच चालत राहिल्यास काही कालावधीनंतर चालणेच अशक्य होते. विश्रांतीनंतर पुरेसे रक्त स्नायूंना पोहोचते व पुनः चालता येऊ लागते. हा विरामी (थांबून थांबून योणारा) लंगडेपणा हे या रोगाचे प्रमुख व नेहमी आढळणारे लक्षण असते. कुठल्याही वाहिनीत हा विकार होऊ शकतो परंतु विशेषेकरून हातांच्या व पायांच्या मध्यम आकाराच्या रोहिण्या व नीला या विकाराने ग्रस्त होतात. विरामी वेदना व लंगडेपणा पुढेपुढे थोड्याशा हालचालींनीही येऊ लागतो. प्रमुख रोहिणी अवरूद्ध झाल्यास रक्तप्रवाह पूर्णपणे बंद होऊन कोथ (शरीराच्या एखाद्या भागाचा मृत्यू होऊन तो भाग सडणे) होतो व अवयवच्छेद (अवयव कापून काढणे) करावा लागतो. सामान्यतः पायाच्या पोटरीतील नीला अवरुद्ध होतात व त्वचेखाली वेदना होणार्या गुठळ्या हाताला लागतात. अंतस्त्यांतील (अंतर्गत इंद्रियांतील) वहिन्यांमध्ये हा विकार क्वचितच होतो, झाल्यास त्या त्या अंतस्त्यांच्या विकाराची तीव्र लक्षणे दिसतात.
वयाच्या वीस ते पंचेचाळीस वर्षांपर्यंत या रोगाची विशेष शक्यता असते. प्रागनुमान करणे (रोगाच्या पर्यंवसानासंबंधी अंदाज करणे) कठीण असते. कधी हृदयात ⇨ अभिकोथ होऊन रोगी लवकर दगावतो किंवा कित्येक वर्षे निरनिराळ्या जागी क्लथन होते व रोग रेंगाळतो.
चिकित्सा : कोथ झाल्यास अवयवच्छेद करावा लागतो. परंतु बहुतेक रुग्ण तरुण असल्याने पार्श्वपरिवहनाने (आजूबाजूच्या रक्तवाहिन्यांतून) रक्ताचा पुरवठा फिरून पुरेसा होईपर्यंत सहज तग धरू शकतात. चिकित्सेचा उद्देशही रक्त कमी मिळण्यामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्याचाच असतो. क्लथनकालात कमी ऑक्सिजनामध्ये चयापचय (शरीरात सतत होणारे भौतिक-रासायनिक बदल) चालावा म्हणून ग्रस्त भागाचे तापमान कमी करतात. वाहिन्यांचे विकसन करणारी औषधे किंवा अनुकंपी तंत्रिक (मज्जातंतू, → तंत्रिका तंत्र) रोध अथवा छेद करतात ग्रस्त अवयवांत उष्णता अधिक निर्माण करून तेथील रक्तप्रवाह वाढविणे, पार्श्वपरिवहन सुरू करण्याच्या दृष्टीने ब्यूर्गस यांनी सुचविलेले विशेष व्यायाम घेणे, ‘पॅव्हेक्स’ नावाचे बूट वापरणे इ. उपाय करतात.
आपटे, ना. रा.