आंतोफागास्ता: चिलीमधील त्याच नावाच्या प्रांताचे मुख्य शहर व पॅसिफिक किनाऱ्यावरील चिलीचे महत्त्वाचे बंदर. लोकसंख्या सु. १,२५,०८१ (१९७०). शहराचे हवामान सम असले, तरी येथे पाऊस जवळजवळ नाहीच. पार्श्वभागी आटाकामाचे ओसाड वाळवंट असले, तरी त्यामधील नायट्रेट व तांबे यांचे उत्पादन प्रचंड असल्याने त्यांची बहुतेक निर्यात याच बंदरातून होते. बोलिव्हिया, अँडीज, अर्जेंटिना, दक्षिण चिली या भागांतील प्रमुख शहरांशी हे रेल्वेने आणि हवाई मार्गांनी सांधले आहे. चिलीमधील बंदरांत याचा निर्यातीत दुसरा व आयातीत तिसरा क्रमांक लागतो. त्यामुळे हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे केंद्र मानले जाते. येथे धातुशुद्धीकरणाचे प्रचंड कारखाने आहेत. शहरास ४५० किमी. अंतरावरील सान पेद्रो नदीमधून नळाने पाणी आणले आहे. १८७० मध्ये आंतोफागास्ता प्रांत बोलिव्हियात असता, चिलीमधील कंपन्यांनी आटाकामामधील खनिजसंपत्तीच्या निर्यातीसाठी हे शहर वसविले. १८७९ – ८४ दरम्यानच्या पॅसिफिक युद्धानंतर व्हॅलपारेझोतहान्वये त्या प्रांताबरोबरच हे चिलीकडे आले.

शहाणे, मो. ज्ञा.